इस्लामाबादहून वडिलांचा फोन, 10-वर्षीय मुलीचा मृतदेह रिकाम्या घरात सापडला

सारा शरीफ

फोटो स्रोत, POLICE HANDOUT

फोटो कॅप्शन, सारा शरीफ
Published

ब्रिटनमध्ये सध्या 10-वर्षीय सारा शरिफच्या खूनाचं प्रकरण गाजतंय. साधारण दोन आठवड्यांपूर्वी या मुलीचा मृतदेह रात्री 2 च्या सुमारास पोलिसांना एका घरात आढळून आला.

यातली चक्रावणारी गोष्ट अशी की त्या घरात त्यावेळी कोणीच नव्हतं आणि याबद्दल माहिती देणारा फोन मुलीच्या वडिलांनी इस्लामाबादहून केला होता.

नक्की काय घडलं?

ब्रिटनमधल्या सरे प्रांतातल्या वर्किंग भागात हॅमंड रोडवर एक घर आहे. ते घर तसं इतर भागांपासून काहीसं तुटलेलं आहे. या घरात याच वर्षी एप्रिल महिन्यात एक पाकिस्तानी कुटुंब राहायला आलं.

या कुटुंबात सहा लहान मुलं होती आणि त्यातली सर्वात मोठी होती 10 वर्षांची सारा.

साराचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या शेजारी राहाणाऱ्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, “ती तिच्या लहान बहीण-भावांना सांभाळताना दिसायची. लहान बाळ तर तिच्याचकडे असायचं. तसं पाहिलं तर ते एक आनंदी कुटुंब वाटत होतं.”

कोण होतं या ‘आनंदी कुटुंबात’?

या कुटुंबात सहा लहान मुलं तर होतीच पण त्याबरोबरीने साराचे वडील उर्फान शरीफ, त्यांच्या पार्टनर बैनाश बातूल आणि उर्फानचे भाऊ फैसल मलिक राहायचे.

सारा शाळेतही जायची नाही.

आपली ओळख जेसिका सांगणाऱ्या एका शेजारणीने बीबीसीला सांगितलं की, ‘सारा आधी खूप आनंदी होती. उड्या मारत मारत शाळेत जायची.’

सारा जिथे आधी राहायची, तिथे जवळ जेसिका आणि तिची मुलगी राहायच्या. सारा आणि जेसिकाची मुलगी एकाच शाळेत होत्या.

पण साराचा मृतदेह सापडल्यानंतर जेसिकाच्या मुलीने तिला सांगितलं की एप्रिल महिन्यात जेव्हा सारा शाळेत आली तेव्हा तिच्या अंगावर जखमा आणि खरचटल्याच्या खुणा होत्या.

साराचे वडील उर्फान शरीफ, त्यांच्या पार्टनर बैनाश बातूल आणि उर्फानचे भाऊ फैसल मलिक

फोटो स्रोत, POLICE HANDOUT

फोटो कॅप्शन, साराचे वडील उर्फान शरीफ, त्यांच्या पार्टनर बैनाश बातूल आणि उर्फानचे भाऊ फैसल मलिक या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“इस्टरच्या सुट्ट्यांच्या आधी सारा शाळेत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा होता, खरचटलं होतं,” जेसिका म्हणतात.

“माझ्या मुलीने तिला विचारलं की काय झालं तर साराने तिला सांगितलं ती सायकलवरून पडली. दुसऱ्याच दिवशी शिक्षिकेने सांगितलं की साराने शाळा सोडली आहे आणि तिला घरीच शिकवलं जाईल.”

त्यानंतर जेसिकाला सारा कधी शाळेत जाताना दिसली नाही.

याच सुमारास साराच्या कुटुंबाने ते घर सोडलं आणि ते नव्या, लांबच्या ठिकाणी राहायला गेले.

साराच्या जुन्या घराजवळ राहाणाऱ्या एका शेजारणीने सांगितलं की साराला घरीच ठेवलं जायचं आणि घरीच अभ्यास करतेय असं सांगितलं जायचं.

या महिलेने आपली ओळख न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं की, “साराच्या वडिलांची पार्टनर बैनाशने मला सांगितलं की साराला हिजाब घालण्यावरून शाळेत इतर मुलं त्रास द्यायची, चिडवायची. म्हणून तिचं नाव शाळेतून काढून घेतलं.”

“मी बैनाशला म्हटलं की साराने खरं तिच्या वयाच्या मुलींसोबत राहायला हवं. तर ती मला म्हणाली की साराला मशिदीत आणि स्विमिंग क्लासमध्ये बऱ्याच मैत्रिणी आहेत.”

ही महिला पुढे म्हणाली, “एकदा मी बैनाशला म्हटलं की साराला घरीच शिकवणं तिच्यासाठी अवघड असेल कारण बैनाशला एक लहान बाळही होतं आणि त्याच्याकडेही लक्ष द्यावं लागत असेल. तर बैनाश म्हणाली की काही अवघड नाही, मी बीबीसी बाईटसाईजवरून शिकवते तिला.”

पत्रक
फोटो कॅप्शन, 'आमचं लक्ष गेलं नाही, आम्हाला माफ कर' अशा आशयाचं पत्रक साराच्या घराजवळ शेजाऱ्यांनी तिच्या आठवणीत लावलं आहे

या शेजारणीने सांगितलं की, “सारा एकदम शांत असायची, कोणात फारशी मिसळायची नाही.”

“ती अनेकदा त्या बाळाला सांभाळताना दिसायची. कधी त्याच्याशी खेळायची. मी तिलाही एकदाही हसताना किंवा खिदळताना पाहिलं नाही.”

सारा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तिच्या घराच मृतावस्थेत आढळून आली होती आणि तेव्हा घरात कोणीही नव्हतं.

साराचे वडील साराचे वडील उर्फान शरीफ, त्यांच्या पार्टनर बैनाश बातूल आणि उर्फानचे भाऊ फैसल मलिक तिचा मृतदेह सापडला त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानात पळून गेले.

इस्लामाबादवरून फोन करून उर्फानने याबद्दल माहिती दिली.

उर्फान आणि पोलिसांमध्ये काय बोलणं झालं हे पोलिसांनी जाहीर केलेलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की आमचं थोडाकाळ संभाषण झालं.

साराच्या पोस्टमार्टममध्ये तिच्या शरीरावर अनेक गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या आहेत.

साराची आई ओल्गा शरीफ ब्रिटनमध्येच राहातात. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “माझं आयुष्य आता कायमचं बदलून गेलंय.”

“तिला परत आणण्यासाठी मी काहीच करू शकत नाही, आता फक्त तिच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत,” ओल्गा म्हणाल्या.

पोलिसांनी उर्फान शरीफ, त्यांच्या पार्टनर बैनाश बातूल आणि उर्फानचे भाऊ फैसल मलिक या तिघांना पकडण्यासाठी पाकिस्तान पोलिसांशी संपर्क केला आहे. पण अजूनही या संदर्भात कोणालाही अटक झालेली नाही.

स्थानिक इमामांनी म्हटलं की साराच्या मृत्यूमुळे इथल्या समुदायाला धक्का बसला आहे.

शाह जहान मशिदीचे इमाम हाफीज हाश्मी यांनी म्हटलं की गेल्या काही दिवसांपासून मी झोपू शकत नाहीये.

बीबीसी रेडियो सरेशी बोलताना ते म्हणाले की, “आम्ही शोकात आहोत आणि आम्हाला जबरदस्त धक्का बसलाय. कोणत्याही निरागस बालकासोबत असं होता कामा नये. तिचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, कोणत्या परिस्थिती झाला हे आम्हाला माहिती नाहीये, त्यामुळे आम्ही आता फक्त प्रार्थना करू शकतो. आम्ही प्रार्थना करतोय की सत्य लवकरच समोर यावं म्हणजे तिच्या प्रियजनांना तिचं दफन करता येईल आणि तिला शांती मिळेल.”

साराचा मृतदेह सापडला ते घर

फोटो स्रोत, PA MEDIA

फोटो कॅप्शन, साराचा मृतदेह सापडला ते घर

अॅना ब्रॅडशॉ गुन्हेगार हस्तांतरण कायद्याच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “गुन्हेगारांनी एका देशातून दुसऱ्या देशात आणणं कठीण असतं. काही देश गुन्हेगार हस्तांतरणाला मान्यता देत नाहीत तर काही देश मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित करतात.”

दरम्यान, पाकिस्तानी पोलिसांनी म्हटलंय की साराच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

त्यांनी म्हटलं की नवीन माहिती हाती येतेय त्यानुसार शोध घेतला जातोय.

हाफिज हाश्मी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, ‘न्याय मिळाला पाहिजे.’

ते म्हणाले की पाकिस्तानातले पोलीस आणि त्यांची कार्यपद्धती ‘संशयास्पद’ आहे. तिथे लाच घेणं फारच सामान्य बाब आहे.

हाश्मी यांनी साराचा वडील उर्फान शरीफ यांना आवाहन केलं की त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन व्हावं.

ते म्हणाले, “पूर्ण तपास झाल्याशिवाय कोणाला दोष देऊन चालणार नाही, कोणावर आरोप करणं योग्य नाही. पण एक पिता म्हणून ही त्यांनी जबाबदारी आहे. हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांनी पुढे येऊन पाकिस्तानी पोलिसांशी बोलावं तसंच यूकेच्या अधिकाऱ्यांनाही सत्य सांगावं.”

यूकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की 41 वर्षीय शरीफ यांनी पाकिस्तानात उतरल्यानंतर 999 या क्रमांकावर फोन करून काही माहिती दिली ज्यायोगो त्यांना साराचा मृतदेह सापडला.

पाकिस्तानातल्या एका कोर्टाने म्हटलंय की उर्फान शरीफ आणि इतर दोन आरोपींच्या शोधासाठी त्यांच्या पाकिस्तानातल्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं जाऊ शकत नाही. त्याआधी पोलिसांनी उर्फानचा पत्ता शोधण्यासाठी त्यांच्या पाकिस्तानातल्या दोन भावांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.