You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘नशीबात असेल तर दिवसातून एकदा मिठ भाकरी मिळते’, 8 वर्षांच्या मुलीचं वजन केवळ 10 किलो
तीन मुलांची आई असलेली मेब्रहित हेले या अत्यंत अशक्त दिसत होत्या. त्या 28 वर्षांच्या आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, अन्न नाहीय, त्यामुळे मला भीक मागावी लागतेय.
“अनेक दिवस तर आम्ही इंजेरा (पॅनकेकसारखं आंबलेलं ब्रेड) मीठासोबत खातो. डॉक्टर मला संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. पण ते मिळणार कुठून?”
त्यांचा पाच वर्षांचा मोठा मुलगा आणि अडीच वर्षांचा छोटा मुलगा अत्यंत बारीक झालेले दिसत होते. डोळे आत गेलेले आणि कपड्यांमधूनही हाडं दिसावीत, इतकी भयंकर अवस्था त्यांची झाली होती.
नशीब असेल तर दिवसातून एकदा जेवण होतं, नाहीतर उपाशीपोटीच झोपावं लागतं, असं मेब्रहित म्हणतात.
बीबीसीचे प्रतिनिधी जेव्हा मेब्रहितला भेटले, तेव्हा त्या गरोदर होत्या. काही दिवसांनी त्यांनी मुलीला जन्म दिला. मुलगी सुदैवानं निरोगी आहे.
तिग्रेमधील भूकेचे परिणाम पाहण्यासाठी बीबीसीनं तिथल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या शायर शहराला भेट दिली.
स्थानिक रूग्णालयातील परिचारिका किब्रा मेब्रातु यांनी सांगितले की, “अनेक माता भूकेमुळे स्तनपान करू शकत नाहीत आणि अनेक मुलं तर जेव्हा या रुग्णालयात आणली जातात, तेव्हा ती मृत्युच्या दारात असतात. या एका महिन्यात चार जणांचा मृत्यू झाला. संघर्षाचे परिणाम, अन्नाचा अभाव, वाहतुकीचा अभाव, हे स्पष्टपणे दिसून येतंय.”
बीबीसीच्या प्रतिनिधींनी हॉस्पिटलमध्ये आठ वर्षांच्या राहेल टेवेल्डे या मुलीला पाहिलं. तिचं वजन केवळ 10 किलो होते. ते खरं तर एका वर्षाच्या मुलाचं असतं.
राहेलच्या आईचं म्हणणं आहे की, भ्रष्टाचारामुळेच अन्नधान्याची मदत थांबलीय. अन्नधान्य नीट वितरित केलं गेलं असतं, तर ही वेळ आलीच नसती.
USAid ने जूनमध्ये सांगितलं की, “आम्ही तेव्हाच पुन्हा मदत सुरू करू, जेव्हा आम्हाला खात्री पटेल की, आम्ही पाठवलेली मदत योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचतेय.”
WFP चे प्रवक्त्यांनी सांगितलं की, अन्नधान्याची मदत पुन्हा सुरू व्हावी, यासाठी आम्ही वेगवान प्रयत्न करत आहोत. किंबहुना, अन्नधान्य चुकीच्या हातात पोहोचू नयेत, ते गरजूंनाच मिळावं, याची खबरदारी घेऊन आम्ही मदतीचा ओघ पुन्हा सुरू केलाही आहे.
“अन्नधान्याची मदत थांबवल्यानं तिथल्या लोकांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांमुळे आम्ही अर्थातच काळजीत आहोत. म्हणूनच पाठवेली मदत योग्य आणि गरजूंपर्यंत पोहोचेल, यासाठी उपायांची चाचपणी करून, मदत पुन्हा सुरू करत आहोत,” असंही प्रवक्ते म्हणाले.
इथिओपियाच्या उत्तर तिग्रेमध्ये अन्नधान्याची मदत थांबवल्यापासून किमान 1,400 लोक उपासमारीने मरण पावले आहेत. अन्नधान्य चोरीला जात असल्यानं मदत थांबवल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) आणि अमेरिकेतील आघाडीच्या सेवाभावी संस्थेनं चार महिन्यांपासून तिग्रेमधील अन्न पुरवठा थांबवलाय.
तिग्रेयन प्रशासनानं तपास केल्यानंतर असं आढळून आलं की, जवळपास 500 जण या चोरीत सामील होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली.
तिग्रेनं 2020 साली अत्यंत भयंकर संघर्षाला तोंड दिलं. यामुळे तिथं उपासमारीचं संकट ओढवलं.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये इथिओपियन सरकार आणि तिग्रे पिपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) या दोघांनीही शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर तिग्रेमधील हा संघर्ष संपुष्टात आला. या करारासाठी आफ्रिकन यूनियन (AU) ने मध्यस्थाची भूमिका निभावली.
या संघर्षात एरिट्रियन सैन्य इथिओपियन सैन्याच्या बाजूने उतरलं होतं. संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेला प्रदेश एकप्रकारे नाकेबंदीसारखा झाला होता. त्यामुळे कुठलीही मदत तिथवर पोहोचू शकत नव्हती.
आफ्रिकन यूनियनचे राजदूत आणि नायजेरियाचे माजी अध्यक्ष ओलूसेगन ओबासन्जो म्हणाले की, "तिग्रेतल्या संघर्षात गेल्या दोन वर्षांत सहा लाख लोकांचा जीव गेलाय. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लढाई, उपासमार आणि आरोग्य सेवेचा अभाव यामुळे शेकडो लोकांवर मृत्यू ओढवला."
जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) आणि USAid या अमेरिकेतील सेवाभावी संस्थेनं तिग्रेतील सुमारे 60 लाख लोकांना मदत केली.
मात्र, यंदा एप्रिल महिन्यापासून त्यांनी पाठवलेली अन्नधान्याची मदत स्थानिक बाजारात विक्रीसाठी वळवली जात असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. अशाप्रकारे केलेली मदत स्थानिक बाजारकडे कोण वळवतंय, हे अद्याप त्यांना कळलं नाही.
WFP च्या प्रवक्त्यांनी याच आठवड्यात बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “आम्ही गुन्हेगारी कृत्यांकडे डोळेझाक करून मदतीचं वितरण सुरू ठेवू शकलो नाही.”
राजधानी मेकेलेसह तिग्रेतील अनेक शहरांमध्ये WFP आणि USAid ने मदत म्हणून वितरण केलेले पॅकेट्स विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं बीबीसीनंही पाहिलं.
मात्र, हे अद्याप स्पष्ट नाहीय की, अन्नधान्याचे हे पॅकेट्स बाजारात ‘अवैधरित्या’ वळवली की ज्यांना हे पॅकेट्स देण्यात आले, त्यांनीच पैशाच्या गरजेसाठी बाजारात विक्रीसाठी ठेवली.
यंदा जून महिन्यात WFP आणि USAid नं इथिओपियातील उर्वरित भागांना पुरण्यात येणारी मदत स्थगित करण्याची घोषणा केली.
USAid ही सेवाभावी संस्थात अमेरिकेतील सर्वांत मोठी अन्नधान्य मदत करणारी संस्था आहे. संघर्ष, दुष्काळ आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची कमतरतेशी झुंज देत असलेल्यांना मदत करते.
जूनमध्ये अनेक माध्यमांनी उल्लेख केलेल्या स्वतंत्र देणगीदार गटानं लीक केलेल्या मेमोमध्ये म्हटलं होतं की, ही राज्य सरकार आणि सैन्याच्या पाठिंब्यानं संघटित गुन्हेगारी आहे.
इथिओपियन सरकारनं सांगितलंय की, या आरोपांचा तपास करत आहोत. मात्र, या तपासातील निष्कर्ष अद्याप जारी करण्यात आले नाहीत.
अन्नधान्य चोरीशी आपला काहीही संबंध नसल्याचं इथिओपियन सैन्यानं म्हटलंय.
तिग्रेच्या अंतरिम सरकारमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आयुक्त गेब्रेहिवेट गेब्रेझगाभेर यांनी बीबीसीला सांगितलं की, अन्नधान्याची मदत थांबवण्यात आल्यापासून पूर्व, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व अशा तीन भागातील 1,411 लोकांचा उपासमारीने मरण पावले आहेत.
तिग्रेच्या इतर तीन विभागातील आकडेवारी अद्याप एकत्रित करण्यात आली नाहीय. ही आकडेवारी समोर आल्यानंतर मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे, असंही डॉ. गेब्रेहिवेट यांनी सांगितलं.
डॉ. गेब्रेहिवेट यांच्या माहितीनुसार, या अन्नधान्य घोटाळ्याप्रकरणी 492 संशयितांची चौकशी सुरू असून, 198 जणांवर आरोप सिद्ध झाले आहेत.
संशयितांमध्ये सरकारी अधिकारी, अशासकीय संस्थांचे कर्मचारी आणि संघर्षाचा फटका बसलेल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कॅम्पचे समन्वयक यांचा समावेश आहे. तसंच, अन्नधान्य वितरकांचाही समावेश असल्याचं डॉ. गेब्रेहिवेट यांनी सांगितलं.
तपास पूर्ण होत आल्याचं सांगताना ते म्हणाले की, “अन्नधान्याची दुकानं आणि चक्की यांचे मालक असलेल्या उद्योजकांचाही संशयितांमध्ये समावेश आहे.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)