UPI पेमेंटपासून बँकेच्या कर्जापर्यंत, आजपासून कुठले नवे नियम लागू होतील? जाणून घ्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजपासून म्हणजेच, 1 ऑक्टोबर 2025 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे नियम तुमच्या आर्थिक व्यवहारांपासून ते रेल्वे तिकीट बुकिंगपर्यंत थेट परिणाम करतील.

बँक कर्जाच्या नव्या अटी, यूपीआय पेमेंटमधील बदल, पेन्शन योजनांमधील पर्याय, गॅस सिलेंडरचे दर, आणि ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियम हे सर्व तुमच्या दैनंदिन व्यवहारांशी संबंधित आहेत.

यामुळे काय बदलणार आहे आणि तुम्हाला काय लक्षात ठेवायला हवे, हे जाणून घेण्यासाठी वाचा हा विशेष रिपोर्ट.

बँक कर्जाच्या नियमांमध्ये बदल

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना फ्लोटिंग रेटवर कर्जाच्या व्याजदर ठरवण्याची मुभा दिली आहे.

फ्लोटिंग रेट म्हणजे असा व्याजदर जो बाजारातील स्थितीनुसार बदलत राहतो.

ग्राहकांना आता फिक्स्ड इंटरेस्ट रेट वरून फ्लोटिंग इंटरेस्ट रेट वर स्विच करण्याचा पर्यायही मिळणार आहे.

UPI पेमेंट नियमात बदल

एनपीसीआयने पुल ट्रान्झॅक्शन म्हणजेच कलेक्ट रिक्वेस्ट सुविधा बंद केली आहे.

याचा अर्थ, आता PhonePe, Google Pay, Paytm यांसारख्या अ‍ॅप्सवर पैसे मागण्याची सुविधा उपलब्ध नाही.

फक्त डायरेक्ट पुश ट्रान्सफर (पैसे पाठवण्याची) सुविधा उपलब्ध असेल.

हे पाऊल ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी उचलले आहे.

NPS आणि UPS मध्ये बदल

सरकारी कर्मचाऱ्यांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) यामधून एक निवडण्याचा पर्याय होता.

आता ही वेळ संपली असून, दोन्ही स्कीममध्ये बदल करता येणार नाही.

नॉन-गव्हर्नमेंट सब्सक्रायबर्सना आता 100% पेन्शन रक्कम इक्विटी स्कीममध्ये गुंतवता येईल, याआधी ही मर्यादा 75% होती.

PRAN कार्ड संबंधित शुल्कातही बदल झाला आहे.

  • ई-PRAN किट साठी ₹18
  • फिजिकल PRAN कार्ड साठी ₹40
  • शुल्क सरकारी व खासगी क्षेत्रासाठी वेगवेगळे असेल.

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम

1 ऑक्टोबरपासून रेल्वे आरक्षणाच्या सुरुवातीच्या 15 मिनिटांत फक्त आधार प्रमाणीकरण केलेल्या वापरकर्त्यांनाच आरक्षित जनरल तिकीट बुक करता येईल.

हे नियम तिकीट बुकिंगमधील गैरवापर टाळण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.

गॅस सिलेंडरच्या दरात बदल

प्रत्येक महिन्याला एलपीजी सिलेंडरचे दर पुनरावलोकन केले जातात.

  • घरगुती सिलेंडरचे दर स्थिर आहेत, पण व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर वाढले आहेत.
  • 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या सिलेंडरचा दर ₹15 ने वाढवण्यात आला आहे.

ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियम

  • ऑनलाइन गेमिंगमध्ये पारदर्शकता, सुरक्षा आणि गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी नवीन नियम लागू झाले आहेत.
  • रिअल मनी गेमिंगसाठी वयाची मर्यादा 18 वर्षांपेक्षा अधिक असेल.
  • लायसन्स आवश्यक

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, उद्योगाशी तीन वर्षांपासून चर्चा सुरू आहे आणि अधिक सल्लामसलत आधारित दृष्टिकोन स्वीकारला जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)