'...तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते,' दीपक केसरकर यांचा दावा #5मोठ्याबातम्या

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

Published

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -

1. '...तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते,' दीपक केसरकर यांचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला काल (20 जून) एक वर्ष पूर्ण झालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर टीकाटीप्पणी करत आहेत.

यादरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ माजली आहे. ही बातमी 'टीव्ही 9 मराठी'ने दिली आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. ते सच्चे मनुष्य आहेत. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटलं असतं की मी केलेला हा उठाव यशस्वी होणार नाही, तेव्हा मी सर्व आमदारांना परत पाठवलं असतं.

"मी एक फोन केला असता आणि म्हणालो असतो की, माझी चूक झालेली आहे. पण यामध्ये या लोकांची चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.”

गेल्यावर्षी आजच्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या बंडाची बातमी समोर आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. बातमी एवढी धक्कादायक होती की सुरुवातीला कोणी विश्वास ठेवायलाही तयार नव्हतं.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतरची ही सगळ्यात मोठी राजकीय अविश्वसनीय बातमी होती. पण पुढे याच बातमीने महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदललं.

सुरुवातीला उद्धव ठाकरे सरकारमधील काही मंत्री आणि आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजलं. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 आमदारांसह सुरत गाठली होती. पाहता पाहता ही संख्या 40 आमदारांवर पोहोचली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडली.

शिवसेना दोन गटात विभागली. दोन्ही गटात किंवा पक्षात शिवसेना प्रमुख एकच आहेत. आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. एका गटाचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत तर दुसऱ्या गटाचं नेतृत्त्व मुख्यनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

पक्षासाठी न्यायलयीन लढाई आणि निवडणूक आयोगाची लढाई जिंकण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं. त्यामुळे भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेली सत्ता आज स्थिर आहे.

परवा (19 जून) शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांची चर्चा सुरू असतानाच आता दीपक केसरकर यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. आता या वक्तव्यावर काय राजकीय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

2. विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा

विदर्भात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात मंगळवारी सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून तापमानवाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उष्णता

फोटो स्रोत, Getty Images

यवतमान, वाशिम, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मोसमी वारे अद्याप तळकोकणातच आहे. राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर हलक्या पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीवर 23 आणि 24 जून रोजी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. मोदी सरकारच्या काळात महिलांची उंची वाढली, भाजप नेत्याचा दावा

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हरियाणात महिलांची उंची वाढली आहे. अलिकडच्या काळात आपल्या बहिणींची उंचीदेखील दोन-दोन इंचांनी वाढली आहे, असं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केलं आहे.

ओमप्रकाश धनखड

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, ओमप्रकाश धनखड

हरियाणामधल्या सिरसा येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ओ. पी. धनखड बोलत होते.

धनखड हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी ते म्हणाले, “पूर्वी महिलांच्या डोक्यावर शेणाच्या पाट्या आणि पाण्याच्या टाक्या असायच्या. परंतु आता महिलांची उंची दोन-दोन इंचांनी वाढली आहे.”

“देशातलं मोदीजींचं सरकार आणि इथल्या भाजपा सरकारने महिलांची या कामांपासून मुक्तता केल्यामुळेच हे शक्य झालं आहे,” असं ते म्हणाले. ही बातमी सामनाने दिली.

4. आमदार गीता जैन यांनी इंजिनिअरला कानशिलात लगावली, व्हीडिओ व्हायरल

मीरा-भाईंदर येथील भाजप आमदार गीता जैन यांनी भररस्त्यात एका तरुण इंजिनिअरच्या कानाखाली लगावल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गीता जैन

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, गीता जैन

अनधिकृत बांधकामावरील कारवाईवरून गीता जैन आणि इंजिनिअरमध्ये वाद झाला होता. याच वादातून गीता जैन यांनी इंजिनिअर कॉलर पकडून त्याला कानशिलात लगावली आहे.

वसई विरार महापालिकेतील प्रभाग समिती सहाचे इंजिनिअर शुभम पाटील आणि संजय सोनी अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेले होते. यावेळी आमदार गीता जैन यांनी त्यांना चांगलंच झापलं. यावेळी गीता जैन दोघांना ओरडत असताना इंजिनिअर शुभम पाटील हसल्यानं गीता जैन यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पाटील यांची थेट कॉलर पकडून त्यांच्या कानाखाली लगावली. अनधिकृत बांधकाम कारवाईच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मारहाणीची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ही बातमी झी 24 तासने दिली.

5. मंत्रिमंडळ विस्तारावरून सदाभाऊ खोत यांची नाराजी

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय. या दरम्यान मंत्रिमंडळाचा फक्त एकाच वेळी विस्तार पार पडलाय. दुसऱ्या विस्ताराची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून जाहीरपणे भाजपला इशारा दिला आहे.

सदाभाऊ खोत

फोटो स्रोत, facebook

“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घटकपक्षाची केव्हा आठवण येते ते बघू”, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. “आम्ही भाजप बरोबर आहोत. पण भाजप आमच्याबरोबर आहे, असं आम्ही म्हणत नाहीत”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. मंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सदाभाऊ खोत यांनी ही खंत व्यक्त केली.

“राज्यात महायुतीचं सरकार आलं. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अजून घटकपक्षांची आठवण झालेली नाही. बैठक बोलवायची की अजून आमचा नंबर आलेला नाही हे मला समजलेलं नाही. पण प्रत्येकाची वेळ येते”, असं सदाभाऊ खोत म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)