शिंदे गटातील आमदार म्हणतात, ‘पालकमंत्री बैठकीलाही बोलावत नाही’ #5मोठ्याबातम्या

Published

1) शिंदे गटातील आमदार म्हणतात, ‘पालकमंत्री बैठकीलाही बोलवत नाही’

नाशिकमधील शिंदे गटातील आमदार सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळू लागलं आहे. सरकारच्या कोणत्याही बैठकीला बोलावलं जात नसल्याची तक्रार सुहास कांदेंनी केली. कांदेंच्या या तक्रारीचा रोख नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे होता. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.

सुहास कांदे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले होते, तेव्हा मी भेटू शकलो नाही. तसे मुख्यमंत्र्यांना कळवलंही होतं. मात्र, सरकारच्या कोणत्याही बैठकीला मला बोलवलं जात नाही.”

“यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ किंवा गिरीश महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी बैठकांची माहिती द्यायचे. पण नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून बैठकांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाही,” अशी उघडउघड नाराजी सुहास कांदे यांनी व्यक्त केली आहे.

तसंच, शिंदे गटाच्या बैठकांना सुद्धा तुमची हजेरी नसते, यावरही सुहास कांदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“मला पक्षाच्या बैठकांना बोलवलं जात नाही. पक्षाचे कार्यालय कुठे आहे, याचीही माहिती नाही. त्यामुळे बोलवले नाहीच तर जाऊ कसा. तसेच, नव्या पक्षनिवडींमुळे पक्षाची वाटचाल थांबली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटातील नगरसेवक आणि सरपंच यांचे प्रवेश या नेमणुकांमुळे थांबली आहेत. मी एकनाथ संभाजी शिंदे या व्यक्तीवर प्रेम करणारा आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा नाही,” असंही सुहास कांदेंनी सांगितलं.

2) महाराष्ट्रातून 250 हून अधिक लेखकांचा ‘भारत जोडो’ला पाठिंबा

कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला राज्यातील 250 हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे.

साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

आज लेखक, साहित्यिक दत्ता भगत, गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर, विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले.

या पत्रात लेखकांनी काही मागण्या केल्या आहेत. ‘सध्याचे सरकार आम्हाला पसंद नाही, तुमचेही सॅाफ्ट हिंदुत्वही आम्हाला मान्य नाही,’ अशी भूमिका देखील लेखकांनी राहुल गांधींसमोर मांडली.

3) ‘सरकार पडेल असं म्हणणं म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न’

“सरकार पडेल असं म्हणणं म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे,” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना उत्तर दिलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आमचे सरकार तीव्र गतीने काम करणारे आहे. त्यामुळे काहींना पोटशूळ उठत आहे. म्हणूनच राज्यातील सरकार पडणार, अशा वावड्या वारंवार उठवल्या जात आहे. स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी हे केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.”

“आम्ही 50 खोके घेणारे नाही, तर विकासासाठी 200 खोके देणारे आहोत,” या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले.

तसेच, समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी दरम्यान काम पूर्ण झाले आहे. सर्वांचा आग्रह आहे की, समृद्धी महामार्ग नागपूरपासून पुढे भंडारा आणि गडचिरोलीपर्यंत आला पाहिजे. यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

4) शशी थरूर यांना मतं देणारे काँग्रेस कार्यकर्ते लवकर भाजपमध्ये येतील – हिमंता बिस्वा सरमा

शशी थरूर यांना मतं देणारे काँग्रेस कार्यकर्ते लवकर भाजपमध्ये येतील, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे रिंगणात होते. यातून मल्लिकार्जुन खर्गे जिंकले असले, तरी शशी थरूर यांनाही परिणामकारक मतं पडली.

हाच धागा पकड आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, शशी थरूर यांना मतं देणारे लवकरच भाजपमध्ये येतील.

5) गुजरातमध्ये उमेदवारी न मिळालेल्यांचा भाजपकडून सत्कार

गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

राजकोट येथून लढलेल्या चारही विद्यमान आमदारांना भाजपानं डच्चू दिला आहे. त्यांच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. असं असलं तरी भाजपानं संबंधित आमदारांना व्यासपीठावर बसवून त्यांचा मान राखला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

यंदा उमेदवारी न मिळालेले संबंधित चारही आमदार व्यासपीठावर असताना केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपा नेते मनसुख मांडविया म्हणाले की, “हा भाजपा आणि इतर राजकीय पक्षातील फरक आहे. संबंधित आमदारांना यंदा भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली नाही, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर राग किंवा द्वेष दिसत नाही, हे कार्यकर्त्यांवरील संस्कार दर्शवतात.”

“या शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाकडे निवडणुकीची तिकीटं मागितली होती, पण अनेकांना तिकीटं मिळाली नाहीत. केवळ चार कार्यकर्त्यांना तिकीटं मिळाली आहेत. काही विद्यमान आमदारांनाही तिकीट मिळालं नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, बोलणं, वाक्य, शब्द, भाषा आणि स्वर हे त्यांचे संस्कार दर्शवतात, असे माझे निरीक्षण आहे. त्यांना उमेदवारी मिळाली नसली तरी आपला कार्यकर्ता विजयी करायचा, अशी त्यांची भूमिका आहे” असंही मांडविया म्हणाले.

राजकोट (पश्चिम) चे विद्यमान आमदार विजय रुपाणी यांना गेल्यावर्षी एका रात्रीत मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले होते. आता ते या निवडणुकीच्या स्पर्धेतूनही बाहेर पडले आहेत. रुपाणी यांच्यासह राजकोट (पूर्व)चे विद्यमान आमदार आणि परिवहन राज्यमंत्री अरविंद रैयानी, राजकोट (दक्षिण) चे आमदार गोविंद पटेल आणि राजकोट (ग्रामीण) चे आमदार लखाभाई सगठिया आदि नेत्यांना भाजपानं उमेदवारी नाकारली आहे. संबंधित नेत्यांऐवजी नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.