You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगेंचं निधन
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय शंभरीपार होतं.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गऊळ गावी केशवराव धोंडगेंचा जन्म झाला.
धोंडगेंनी सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवलं तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शेतकरी कामगार पक्षाचा बोलबाला होता. धोंडगे हे विचारसरणीने शेकापच्या जवळचे असल्यानं ते याच पक्षाद्वारे राजकारणात उतरले.
आपल्या मराठवाडी बोली आणि ग्रामीण ढंगातल्या शैलीमुळे केशवरावांनी प्रारंभीच्या काळातच महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
शेकापकडूनच ते सहावेळा आमदार आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते एकदा लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडून गेले होते.
‘केशवराव धोंडगे : मन्याडचा थकलेला वाघ’ या आपल्या लेखात ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर हे धोंडगेंबद्दल लिहितात की, “शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांची होती, तशीच केशवरावांची साम्यवाद, मार्क्सवाद यांवर एकाच वेळी श्रद्धा होती. एकाच वेळी महात्मा गांधी आणि क्रांतीवर श्रद्धा असणारा पाहण्यात आलेले केशवराव हे माझ्या पत्रकारितेतले एकमेव राजकारणी.”
राजकारणात सक्रीय असताना केशवराव धोंडगेंची ‘मफलर’ (उपरणे) फार चर्चेत असे. लाल रंगाची मफलर ते नेहमी आपल्या मानेभोवती गुंडाळून ठेवत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि आणीबाणीविरोधी आंदोलन अशा महत्त्वाच्या, तर इतरही अनेक महत्त्वाच्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता.
आणीबाणीत त्यांनी 14 महिने तुरुंगावासही भोगला होता.
गुराखी संमेलन
1985 साली केशवराव धोंडगेंनी नांदेडमध्ये गुराखीगड स्थापन केला आणि 1992 पासून तिथं गुराखी साहित्य संमेलन भरवण्याव सुरुवात केली.
पोतराजापासून वासुदेव, नाथगोसावी ते अगदी गोंदवणवाल्या बायांपर्यंत अशा सगळ्या उपेक्षितांना या संमेलनाद्वारे त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.
या संमेलनाच्या व्यासपीठाला गुराखीपीठ असं म्हटलं जाई. आजवर ‘उचल्या’कार लक्ष्मण माने, शाहीर किसनराव दिघोळे अशा अनेकांनी गुराखी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलंय.
महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्राच्या विधिमंडळानं नुकताच त्यांचा गौरवही केला होता.
लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी केशवराव धोंडगेंना आदरांजली व्यक्त करताना म्हटलं की, “शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाड्याच्या मातीतील एक अस्सल लोकनेता आपण गमावला आहे. लोककल्याणासाठी असंख्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला. विधिमंडळातील त्यांची आक्रमक, अभ्यासपूर्ण भाषणे खूप गाजली. केशवरावांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही केशवराव धोंडगेंना आदरांजली वाहिलीय.
“ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि शेकापचे जेष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. सहावेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले केशवराव धोंडगे यांचा नुकताच विधीमंडळानेही गौरव केला होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली!” असं ट्वीट रोहित पवारांनी केलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)