वैशाली रमेशबाबूनं जिंकली फिडे कँडिडेट्स स्पर्धा; जाणून घ्या भारताच्या ग्रँडमास्टरचा संपूर्ण प्रवास

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

भारताची ग्रँडमास्टर आर वैशालीनं बुद्धिबळाच्या विश्वात नवी भरारी घेतली आहे.

वैशालीनं फिडे कँडिडेट्स स्पर्धा जिंकून जागतिक विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे.

फिडे कँडिडेट्स स्पर्धा जिंकणारी वैशाली पहिली भारतीय महिला ठरली आहे. तसंच बुद्धिबळाच्या क्लासिकल प्रकारात जागतिक विजेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरलेली ती दुसरीच भारतीय महिला आहे.

याआधी 2011 साली कोनेरू हंपीनं जागतिक लढतीत प्रवेश केला होता, पण तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

जगभरातील आठच आघाडीच्या स्पर्धक कँडिडेट्स स्पर्धेत खेळतात, वैशालीनं त्यात 8.5 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आणि अर्ध्या गुणाच्या फरकानं विजयी ठरली.

वैशालीच्या यशामुळे यावेळी पहिल्यांदाच पुरुष आणि महिलांच्या बुद्धिबळपटू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसतील.

पुरुषांच्या जागतिक लढतीत भारताचा गुकेश त्याचं विजेतेपद राखण्यासाठी खेळेल. बुद्धिबळाची जागतिक लढत या वर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये खेळवली जाणार आहे.

सलग दुसऱ्यांदा जिंकला FIDE महिला ग्रँड स्विसचा किताब

याआधी ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबूनं 2025 ची FIDE महिला ग्रँड स्विस ही स्पर्धा जिंकली होती. तिने सलग दुसऱ्यांदा किताब जिंकला होता.

या विजयासह वैशालीने 2026 च्या महिला कँडिडेट्स स्पर्धेचं तिकीटही मिळवलं होतं.

कँडिडेट्स स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे जागतिक विजेतेपद स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. जगभरातील आठच स्पर्धकांना कँडिडेट्स स्पर्धेत खेळता येतं.

24 वर्षांची वैशाली ही पुढच्या वर्षीच्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरलेली तिसरी भारतीय खेळाडू होती. कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख याआधीच पात्र ठरल्या होत्या.

वैशाली ही ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदची मोठी बहीणही आहे. तिचा प्रवास कसा राहिलाय, ते पाहूयात.

दोघं बहीणभाऊ मुळचे चेन्नईचे आहेत, ज्या शहराची 'भारतीय बुद्धिबळाची राजधानी' अशी ओळख बनली आहे.

वैशालीचे वडील रमेशबाबू एका बँकेत काम करतात. तर आई नागलक्ष्मी अनेकदा वैशाली आणि प्रज्ञानंदसोबत प्रवास करते.

अगदी लहान वयातच या दोघांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती.

ज्युनियर गटात अनेक स्पर्धा जिंकत वैशालीनं आपला दबदबा निर्माण केला होता.

वैशालीनं 2012 साली 11 वर्षांखालील आणि 13 वर्षांखालील वयोगटात बुद्धिबळाचं राष्ट्रीय विजेतेपद मिळवत आपलं नाणं खणखणीत असल्याचं सुरुवातीलाच दाखवलं.

त्याच वर्षी तिनं कोलंबोमध्ये एशियन अंडर-12 आणि स्लोव्हेनियात अंडर-12 यूथ चेस चॅम्पियनशिप या स्पर्धाही जिंकल्या.

जेमतेम 14 वर्षांच्या वयात वैशालीनं मुंबईतल्या नॅशनल विमेन चॅलेंजर्स स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तो पहिला मैलाचा दगड पार केल्यावर वैशालीनं मग मागे वळून पाहिलंच नाही. हळूहळू जग तिची दखल घेऊ लागलं.

2016 साली वैशालीनं विमेन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवला. 2017 साली वैशालीनं आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ चेस विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचं अभिनंदन केलं.

2018 साली ती भारतीय महिला ग्रँडमास्टर बनली, तेव्हा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदनं ट्विटरवरून तिचं अभिनंदन केलं.

मजबूत पायाभरणी

चेन्नईमध्ये बुद्धिबळाची पाळंमुळं घट्ट रुजली आहेत. पण वैशालीला सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कारण सराव आणि प्रवासासाठी लागणाऱ्या पैशामुळे बुद्धिबळ हा खर्चिक खेळ बनू शकतो.

सुरुवातीच्या काळात तिच्याकडे संगणक नव्हता आणि खेळाचं प्राथमिक ज्ञान मिळवण्यासाठी किंवा डावपेच रचण्यासाठी तिला पुस्तकांवर अवलंबून राहावं लागायचं.

बुद्धिबळातली आधुनिक सॉफ्टवेअर्स आणि संसाधनांपासून सुरुवातीला ती वंचित राहिली.

2012 साली जागतिक युवा विश्वविजेतेपद मिळवल्यावरच वैशालीला स्पॉन्सरद्वारा एक लॅपटॉप मिळाला, ज्यामुळे तिचा खेळ आणखी बळकट बनला.

वैशाली आणि तिच्या भावानं स्पॉन्सर्सचं लक्ष वेधून घेतलं. आपले पालकच खरे आधारस्तंभ असल्याचं वैशाली सांगते.

वैशालीचे वडील काम करायचे आणि सरावासाठीच्या आर्थिक गरजा पुरवण्याकडे लक्ष द्यायचे, तर आई वेगवेगळ्या स्पर्धांना तिच्यासोबत जायची.

जगातल्या सर्वांत युवा ग्रँडमास्टर्सपैकी एक घरातच असल्यानं फार मदत झाल्याचं वैशाली सांगते. दोघं बहीणभावंडं एकत्र सराव करत नाहीत, पण अनेकदा डावपेचांवर बराच वेळ चर्चा करतात.

प्रज्ञानंदचा सल्ला तिला वेगवेगळ्या स्पर्धांच्या तयारीसाठी मदत करतो.

आत्मविश्वासानं भरलेले डावपेच

वैशालीच्या कारकीर्दीला कलाटणी देणाऱ्या क्षणांपैकी एक क्षण जून 2020 मध्ये आला, जेव्हा तिनं FIDE chess.com तर्फे आयोजित विमेन्स स्पीड चेस चॅम्पियनशिपमध्ये माजी विश्वविजेती अँटोनेटा स्टेफानोव्हाला सनसनाटी विजय मिळवला.

वैशाली सांगते की, सातत्यानं मिळणाऱ्या यश आणि प्रशंसेनं तिची आणखी चांगलं खेळण्याची जिद्द आणखी वाढवली.

वैशालीनं स्वतः खेळात मोठं यश मिळवलं असलं, तरी ती सांगते अनेक महिला खेळाडूंना ते शक्य होत नाही, कारण त्यांना कारकीर्दीत वेगवेगळ्या टप्प्यांवर भेदभावाचा सामना करावा लागतो.

महिलांच्या यशाला पुरुषांच्या तोडीचं मानलं जात नाही आणि दोघांना मिळणाऱ्या बक्षीसाच्या रकमेतली तफावत हे त्याचंच द्योतक आहे, असं ती सांगते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)