You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मानवी विष्ठेपासून बनवलेल्या 'या' गोळ्या वापरून पोटातील धोकादायक जिवाणू नष्ट होतील का?
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
युकेमधील डॉक्टर मानवी विष्ठेच्या गोळ्या वापरून पोटातील सुपरबगच्या (जिवाणूंचा एक प्रकार) संसर्गावर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोळ्यांमध्ये गोठवलेल्या विष्ठेचा वापर करण्यात आला आहे.
निरोगी विष्ठादात्यांच्या विष्ठेचा या प्रयोगासाठी वापर केला जातो, त्या विष्ठेत चांगले जिवाणू असतात.
या प्रयोगातल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार असं दिसून आलं आहे की, या प्रक्रियेमुळे आतड्यातील सुपरबगचा संसर्ग यामुळे कमी होऊ शकतो. यासोबतच आतड्यांमध्ये आरोग्यदायी जिवाणू देखील तयार केले जाऊ शकतात.
या प्रयोगाच्या माध्यमातून अशा संसर्गांवर उत्तर शोधलं जात आहे जे संसर्ग अँटिबायोटिक औषधांना दाद देत नाहीत. या संसर्गांमुळे दरवर्षी सुमारे 10 लाख रुग्णांचा मृत्यू होतो.
गाईज आणि सेंट थॉमस रुग्णालयात या गोळ्यांची तपासणी करणारे डॉ. ब्लेअर मेरिक म्हणतात, "माणसाच्या शरीरात अँटिबायोटिक्सचा प्रतिकार करणारे घटक आतड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि शरीरातील याच भागावर हा प्रयोग केला जात आहे."
औषधांना प्रतिरोध करणारे हे सुपरबग आतड्यांमधून बाहेर पडून शरीराच्या इतर अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात. मूत्रमार्ग किंवा रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेत हे सुपरबग्स अडचणी आणू शकतात.
डॉ. मेरिक म्हणतात, "त्यामुळे तुमच्या आतड्यातच या जिवाणूंचा नायनाट होऊ शकतो का? यावर बरंच संशोधन केलं जात आहे."
विष्ठेपासून बनवलेल्या गोळ्या म्हणजेच 'पू पिल्स'ची ही कल्पना अगदीच नवी नाही. याआधी क्लोस्ट्रिडियम डिफिसाइल बॅक्टेरियामुळे होणाऱ्या गंभीर अतिसारावर उपचार करण्यासाठी विष्ठा प्रत्यारोपणाला आधीच परवानगी मिळालेली आहे.
शास्त्रज्ञांना हे आढळून आलं की, क्लोस्ट्रिडियम डिफिसाइल किंवा सी. डिफिसाइलच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी केलेल्या विष्ठा प्रत्यारोपणातूनसुद्धा सुपरबगचं निर्मूलन होत आहे.
नवीन संसाधनांमध्ये अशा रुग्णांवर अभ्यास केला गेला ज्यांना औषधांना प्रतिरोध करणाऱ्या जिवाणूंचा संसर्ग झालेला होता. त्यांना निरोगी दात्यांनी स्टूल बँकेत जमा केलेल्या विष्ठेपासून बनवलेल्या गोळ्या देण्यात आल्या.
यात वापरलेल्या विष्ठेच्या प्रत्येक नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये काही धोकादायक घटक किंवा न पचलेलं अन्न असेल, तर ते काढून ती विष्ठा गोठवण्यात आली आणि त्याची पावडर बनवण्यात आली.
त्यानंतर अशा एका कॅप्सूलमध्ये ही पावडर ठेवण्यात आली जी संपूर्ण पोटातून आतड्यांपर्यंत प्रवास करू शकेल आणि या प्रवासात त्या कॅप्सूलला काहीही होणार नाही. त्यानंतर आतड्यामध्ये जाऊन ही गोळी विरघळेल आणि त्यातली विष्ठेपासून बनवलेली पावडर तिथे काम करू लागेल.
लंडनच्या गाईज आणि सेंट थॉमस रुग्णालयातील 41 रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली. जेणेकरून व्यापक पातळीवर अभ्यासासाठी एक ठोस आकडेवारी तयार होऊ शकेल.
हे रुग्ण विष्ठेपासून तयार केलेल्या गोळ्या घेण्यास तयार होते आणि गोळ्या घेतल्याच्या एक महिन्यानंतर विष्ठादात्यांनी दान केलेले चांगले जिवाणू रुग्णांच्या आतड्यांमध्ये दिसून आले.
डॉ. मेरिक म्हणाले, 'सुपरबग्सच्या वाढत्या संसर्गावर या गोळ्या खरोखर परिणामकारक असल्याची आश्वासक चिन्हे दिसू लागली आहेत.
दात्यांनी दिलेले जिवाणू सुपरबग्ससोबत लढतात आणि शरीरात येणाऱ्या अन्नासाठी, आतड्यांच्या मध्ये जागा तयार करण्यासाठी त्यांच्यात लढाई होते. अखेर हे आरोग्यदायी जिवाणू या सुपरबग्सना शरीरातून कायमचे काढून तरी टाकतात किंवा त्यांचं प्रमाण निर्धोक पातळीवर आणतात."
या उपचारानंतर शरीरातल्या चांगल्या जिवाणूंचे वैविध्य वाढत असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. हे चांगल्या आरोग्याचं एक लक्षण आहे आणि यामुळे शरीरात चांगल्या जिवाणूंची रोगप्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे नवीन संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होतं.
डॉ. मेरिक म्हणाले, "हा प्रयोग खूपच उत्साहवर्धक आहे. 20 वर्षांपूर्वी जेव्हा सगळ्याच विषाणू आणि जीवाणूंना धोकादायक समजलं जायचं तिथपासून आतापर्यंत बराच बदल झालेला आहे. तुमच्या एकूण आरोग्यासाठी जिवाणू अत्यंत गरजेचं असल्याचं सध्या सिद्ध झालेलं आहे."
या आठवड्याच्या सुरुवातीला शास्त्रज्ञांनी माणसाचा जन्म झाल्यानंतर काही तासांतच तयार होणारे शरीरातील चांगले जिवाणू दाखवून दिले. या जिवाणूंमुळे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांना फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका अर्ध्यावर येत असल्याचं सिद्ध झालेलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)