You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करून टाइल्स खाली मृतदेह पुरल्याचा आरोप
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहरामध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन घरातच चार फूट खड्डा करुन त्या ठिकाणी पतीचा मृतदेह पुरला आणि त्यावर नवीन टाइल्स बसवले. असा आरोप महिला आणि तिच्या प्रियकरावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित महिला आणि तिचा प्रियकर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सोमवारी (21 जुलै) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव विजय चौहान असं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी विजय चौहान यांचे दोन भाऊ गांगडीपाडा येथील ओम साई या निवासस्थानी आले. त्यांना घरातल्या काही टाइल्सचे रंग वेगळे दिसले आणि मग पुढच्या गोष्टीचा उलगडा झाला.
पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याठिकाणी महापालिका डॉक्टर, कर्मचारी, तहसीलदार, फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या साहाय्याने पंचनामा करुन मृतदेह बाहेर काढण्यात आला.
बीबीसी मराठीने आरोपीच्या कुटुंबीयांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही. त्यांची बाजू मिळाल्यावर बातमीत अपडेट करण्यात येईल.
नक्की हे प्रकरण काय आहे?
नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग येथील गांगडीपाडा येथे विजय चौहान (वय 35 वर्षे) आणि पत्नी चमनदेवी चौहान (वय 28 वर्षे) आपल्या एका मुलासह राहत होते.
विजय यांचे भाऊ मोहन यांनी नवीन घर घेतलं आहे. त्यामुळे मोहन गेले 15 दिवस मदतीच्या आशेने विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र संपर्क होत नव्हता.
त्यामुळे मोहन स्वतःच विजय यांच्या घरी गुरुवारी, 17 जुलैला पोहोचले.
यावेळी घरी विजय यांची पत्नी चमनदेवी उपस्थित होत्या. भाऊ कुठे आहे? संपर्क होत नाही, याबाबत विचारणा केली असता. पत्नीने ते कुर्ला येथील एका वेल्डिंगच्या कामासाठी गेले आहेत, असं सांगितलं.
यानंतर मोहन आपल्या घरी परतले. पुन्हा दुसऱ्या दिवशी मोहन यांनी विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, तेव्हाही संपर्क झाला नाही. मग त्यांनी चमनदेवीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचाही फोन लागला नाही.
त्यामुळे मोहन सोमवारी (21 जुलै) विजय यांच्या घरी पोहोचले. यावेळेस घराला कुलूप लावलेलं होतं. त्यामुळे काहीतरी संशयास्पद आहे, असं मोहन यांना जाणवलं.
आजूबाजूला चौकशी केल्यावर याबाबत कोणालाही काहीही माहिती नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे घराचं कुलूप मोहन यांनी तोडलं. घरात अधिक पाहणी केली असता घरामध्ये इतर टाइल्सपेक्षा तीन टाइल्स वेगळ्या आणि नव्यानं लावलेल्या दिसल्या. हे काम नुकतंच काही दिवसापूर्वी झालेलं असावं, असा संशय मोहन यांना आला.
खड्डा थोडासा खणल्यावर दुर्गंधी येऊ लागली
मोहन यांनी माध्यमांना सांगितले की त्यांना संशय आल्यानंतर ही गोष्ट त्यांनी त्यांचे शेजारी सरफू आणि मोहम्मद यांना सांगितली. आणि घराचे कुलूप तोडून टाइल्स खणण्याबाबत चर्चा झाली.
मोहन आणि शेजाऱ्यांनी टाइल्स काढल्या. टाइल्स आणि तिथे झालेला खड्डा थोडासा खणल्यावर दुर्गंधी येऊ लागली. त्यांना यामध्ये संशयास्पद काहीतरी आहे असं वाटलं. त्यामुळे मोहन आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले.
घटनास्थळी पोलीस आणि विविध पथक दाखल झाल्यानंतर सर्वांसमक्ष हे खणून त्यात मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं. अन् विजय चौहान यांची हत्या झाल्याचं समोर आलं.
चमनदेवी चौहान आणि 20 वर्षीय मोनू शर्मा यांच्यात प्रेमसंबंध?
दरम्यान, एक दिवस आधीच चमनदेवी ही बेपत्ता झाली होती. तिच्या पाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा हा तरुणही बेपत्ता झाला आहे, हे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आलं.
चमनदेवी चौहान आणि 20 वर्षीय मोनू शर्मा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातून ते दोघे पळून गेल्याचे शेजारी आणि विजय यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीतून समोर आले.
नवऱ्याचा काटा काढण्यासाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराने पती विजय चौहान याची राहत्या घरातच हत्या केली असा पोलिसांना संशय आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची इतरत्र विल्हेवाट न लावता मृतदेह घरातच 4 फूट खड्डा खणून पुरला असावा असा पोलिसांना संशय आहे.
हत्येच्या घटनेमध्ये आणखी काही लोक सहभागी असण्याचा अंदाज
विजय चौहान यांचे शेजारी मोहम्मद अन्सारी यांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना म्हटलं की, "वीस दिवसापूर्वी घरातील बाथरुमची टाकी ओव्हरफ्लो होती होती. त्यामुळे काम करण्यासाठी ही महिला एका कामगाराला शोधत होती. त्यानंतर घरामध्ये खड्डा खणून घेतला होता. त्या ठिकाणी नवीन तीन टाईल्स लावण्यात आले होते. याबाबत विजयचा भाऊ हा आला तेव्हा त्याने काहीतरी संशय वाटतोय असं सांगितलं. त्यामुळे विजयाचा भाऊ आणि आम्ही सर्व शेजाऱ्यांनी टाइल्सच्या आतमध्ये थोडं खणलं आणि त्यातून थोडी दुर्गंधी आली."
पोलिसांनी काय माहिती दिली?
या घटनेबाबत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, "चौहान फॅमिली साई वेल्फेअर सोसायटीमध्ये राहते. मृत व्यक्तीचे दोन भाऊ बेलाल पाडा परिसरात राहतात. त्यातील एका भावाने नवीन घर घेतलं त्यामुळे आपल्या भावाकडून काही सहकार्य मिळाले यासाठी 10 तारखेला त्यांनी कॉल केला होता. मात्र फोन बंद असल्याने भाऊ स्वतः इथे आला होता. त्यावेळी भावाच्या पत्नीला सांगितलं ते कुर्ला येथील वेल्डिंगच्या कामासाठी गेले आहेत.
"दोन दिवसांनी भावाच्या पत्नीला देखील कॉल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचाही फोन लागला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा घरी भावाने घर गाठलं. मात्र, घरात वहिनी देखील नव्हती त्यामुळे थोडासा संशय आला. तसेच घरामध्ये तीन टाइल्स नव्याने बसवल्या असल्याने थोडा अधिक एक वेगळा संशय भावाला आला. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने त्या टाईल्स फोडले असता मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आली," वनकोटी सांगतात.
पुढे जितेंद्र वनकोटी म्हणाले की, "याबाबत भावाने पोलीस ठाण्यामध्ये भावाचा घातपात झाल्याबाबत कळविले. यानंतर घटनास्थळी पोलीस, डॉक्टर, फॉरेन्सिक टीम आणि तहसीलदार पोहोचून सर्वांसमक्ष घरामध्ये खोदून मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आम्ही अधिक तपास करत आहोत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आरोपींचा तपास आम्ही करत आहोत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)