अमेरिकेच्या गुहेत 47 वर्ष गोठलेल्या अवस्थेत राहिलेल्या मृतदेहाची अखेर अशी पटली ओळख

फोटो स्रोत, Berks County Coroner's Office
- Author, नादीन युसूफ
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
पेनसिल्व्हेनिया एका गुहेत 1977 मध्ये एका माणसाचा गोठलेला मृतदेह सापडला होता. त्याची ओळख जवळजवळ पाच दशकानंतर पटली आहे.
बर्क्स या गावातील कोरोनर ऑफिसर (मृत्यूच्या तपासासाठी नेमणूक केला जाणारा प्रशासकीय किंवा न्यायालयीन अधिकारी) कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह 27 वर्षीय निकोलस पॉल ग्रब या व्यक्तीचा आहे. तो फोर्ट वॉशिंग्टन पेन्सिलव्हेनियाचा रहिवासी होता.
प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ग्रबच्या बोटांचे ठसे जुळवल्यानंतर त्यांना या ‘पिनॅकल मॅन’ची ओळख पटवण्यात यश आलं आहे.
ग्रब यांचा मृतदेह अलबॅनी टाऊनशिपमध्ये असलेल्या एका शिखराच्या खाली असलेल्या गुहेत गोठलेल्या अवस्थेत सापडला होता. हा भाग फिलाडेल्फियाच्या वायव्येला 122 किमी अंतरावर आहे.
ही ओळख पटल्यानं 50 वर्ष जुनं गूढ उकललं आहे. तसंच अवशेषांची ओळख पटवण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आणि डीएनए शोधण्यासाठी प्रेत पुरलेल्या जागेचं जवळपास पाच वर्षांचं उत्खनन याचा अखेर अंतही झाला आहे.
सुरुवातीला केलेल्या शवविच्छेदनात या ‘पिनॅकल मॅनचा’ अंमली पदार्थाच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. तसंच पोलिसांनी या संपूर्ण प्रकारात घातपाताची शक्यता नाकारली आहे.
दरम्यान, दातांचे नमुने आणि बोटांचे ठसे घेण्यात आले पण ते कुणाशीही जुळले नाहीत.
त्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पेन्सिलव्हेनिया पोलिसांनी ग्रब यांचे बोटांचे ठसे शोधले असं बर्क्सच्या कोरोनर ऑफिसरनं सांगितलं.
ते नमुने बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या डेटाबेसकडं पाठवण्यात आले. त्यानंतर FBI ने एक तासाच्या आत ग्रब यांची ओळख पटवली.


न्यायाधीशांनी सांगितलं की, यातून बेवारस प्रेतांची ओळख पटवण्यासाठीचे प्रयत्न दिसून येतात.
पिनॅकल मॅनच्या मृतदेहाचे अवशेष आणि गेल्या 15 वर्षातील 10 बेपत्ता लोकांशी जुळवून पाहण्यात आले. तसंच 2019 मध्ये डीएनए असलेले अवशेष मिळण्यासाठी मृतदेह पुरतेल्या जागेचं उत्खननही करण्यात आलं. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले.
आता ओळख पटल्यानंतर या मृतदेहाचे अवशेष पुन्हा पुरण्याचा विचार करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
ग्रब यांचे यांना निकी या नावानं ओळखलं जायचं. ते पेनसिल्व्हेनिया आर्मी नॅशनल गार्डमध्ये होते आणि 1971 मध्ये मानाने सेवानिवृत्त झाले होते.
ग्रब यांच्या कुटुंबाने पोलिसांच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे, असंही या प्रकरणाची माहिती देणाऱ्या कोरोनरनं सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























