राहुल गांधी RSS आणि अमित शाह यांच्याबद्दल असं काय म्हणाले, ज्यामुळे लोकसभेत गदारोळ झाला?

राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

लोकसभेत आज बुधवारी (29 जुलै) 'सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026' संमत झालं. हे विधेयक पेपरफुटीशी संबंधित आहे.

काल, मंगळवारी (28 जुलै) लोकसभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या विधानावरून मोठा गदारोळ झाला असताना, आज मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे.

नीट (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणानंतर, दिल्लीतील जंतरमंतरवर तसेच देशाच्या विविध भागांमध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी आंदोलनं झाली.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधींनी अशा एका शब्दाचा वापर केला, ज्याला भाजपनं 'असंसदीय' ठरवलं.

भाजप खासदार किरेन रिजिजू यांनी त्या शब्दांवर आक्षेप घेतला आणि तो शब्द वापरू नये, अशी विनंती केली. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना संसदीय कामकाजातून हा शब्द वगळण्याची विनंती केली.

याव्यतिरिक्त, राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचा आरोप केला. भाजप नेत्यांनी या विधानाचा निषेध केला तसेच हे विधान दिशाभूल करणारं असल्याचं म्हटलं.

दरम्यान, राहुल गांधींनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि 'अंधभक्तांचा'ही उल्लेख केला.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

लोकसभेतील आपल्या भाषणाची सुरुवात करताना राहुल गांधी म्हणाले की, "आपल्या देशाच्या भविष्यानं म्हणजेच पुढच्या पिढीनं रस्त्यांवर उतरून जे काही करून दाखवलं, ते पाहून मी अत्यंत उत्साहित झालो होतो. ती काही राग, हिंसा किंवा द्वेषाची भावना नव्हती. ती या देशातील तरुणांची म्हणजेच आगामी पिढीची एक तीव्र अभिव्यक्ती होती. आणि माझा असा विश्वास आहे की, भाजपमधील माझ्या मित्रांसह सर्व राजकीय पक्षांनी या अभिव्यक्तीचा आदर केला पाहिजे."

"मला पूर्ण खात्री आहे की, भाजपमधील माझ्या मित्रांनी जर त्यांच्या मुलांना विचारलं की त्यांच्या समवयस्कांच्या या कृतीबद्दल त्यांना काय वाटतं, तर त्यांना त्यांच्या मुलांकडूनही सहमतीच मिळेल. जे काही घडलं आहे त्यात काहीही चुकीचं नाहीये आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमानच वाटला पाहिजे."

राहुल गांधी म्हणाले की, "मी विचार केला की, मी जर हे भाषण पुढच्या पिढीसाठी करणार आहे, तर मग भाषणाची सुरुवात कुठून करावी?"

"मला वाटलं की, तरुण विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा एक भाग हीच माझ्या भाषणाची एक चांगली सुरुवात ठरेल."

राहुल गांधींनी बुधवारी लोकसभेत भाषण केले.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राहुल गांधींनी बुधवारी लोकसभेत भाषण केले.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"मी एका तरुणीला विचारलं, तू स्वतःला विद्यार्थिनी म्हणवतेस, तर त्याचा अर्थ काय आहे? तिने मला खूप सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली की, विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती जिचं मन मोकळं असतं. जी सुरुवातीपासूनच हे मान्य करते की तिला सर्व काही माहित नाहीये. ती हे कबूल करते की हे विश्व सतत बदलत असते आणि तिला हेही समजतं की ज्ञानही सतत विकसित होत असतं. त्या विद्यार्थिनीनं मला हे सांगितलं."

"मी तिला पुढचा प्रश्न केला की, तू विद्यार्थी असण्याची खूप चांगली व्याख्या केलीस, तर त्या विद्यार्थिनीनं मला म्हटलं की, आणखीही काही लोक आहेत. मी विचारलं ते कोण आहेत?"

तर तिने म्हटलं की, "हे असे लोक आहेत जे असं मानतात की, त्यांना सगळंच माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, हे विश्व स्थिर आहे. त्यांना असं वाटतं की, ज्ञान त्यांच्या आतूनच बाहेर येतंय. ते स्वत:ला ईश्वरासमान मानतात. असे लोक अहंकारी असतात. ते कुणाचंच ऐकत नाहीत. ते दुसऱ्याच्या सत्याचा सन्मान करत नाहीत. मी विचारलं की, तुम्ही अशा लोकांना काय म्हणता?"

या प्रश्नानंतर राहुल गांधींनी त्या शब्दाचा वापर केला, ज्याच्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये असंसदीय शब्द असल्याचं म्हटलं. त्यानंतर, राहुल गांधींनी म्हटलं की, त्यांनी असंसदीय असं काहीही म्हटलेलं नाहीये.

भाजपचा आक्षेप

राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप नोंदवत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं की, "संसदेत कोणते शब्द वापरता येणार नाहीत, याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. मला तुमच्या भाषणात व्यत्यय आणायचा नाही, पण कृपया तुम्ही आताच वापरलेला शब्द वापरू नका. हीच माझी एकमेव विनंती आहे."

त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना अनेकदा त्यांचं म्हणणे मांडण्यास सांगितलं. मात्र, आपल्या जागेवर खाली बसलेल्या राहुल गांधींनी त्यास नकार दिला आणि अध्यक्षांनी आधी सभागृहात शांतता आणि सुव्यवस्था आणावी, असा आग्रह धरला.

यानंतर राहुल गांधी उठून उभे राहिले आणि म्हणाले, "मी बोलायला सुरुवात करताच सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालायला सुरुवात केली."

राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना तो शब्द संसदीय कामकाजातून वगळण्याची विनंती केली.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना तो शब्द संसदीय कामकाजातून वगळण्याची विनंती केली.

त्यानंतर रिजिजू म्हणाले की, "राहुल गांधीजी, मी पुन्हा एकदा हे स्पष्ट करू इच्छितो की आपण विरोधी पक्षनेते आहात. आम्ही केवळ आपल्याला इतकीच विनंती करत आहोत की आपण असंसदीय भाषेचा वापर करू नये."

यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, "जर मी हा शब्द एखाद्या खासदाराविरुद्ध वापरला असता, तर तो असंसदीय ठरला असता. जेव्हा जेव्हा मी बोलतो, तेव्हा रिजिजू साहेब उभे राहतात."

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही त्या शब्दावर आक्षेप घेतला आणि लोकसभेच्या अध्यक्षांना तो शब्द कामकाजातून काढून टाकण्याची विनंती केली.

त्याच वेळी, त्यांनी आपल्या सत्ताधारी पक्षाला उद्देशून विनंती केली की, "मी तुम्हा सर्वांना शांत राहण्याचं आणि ते काय म्हणत आहेत ते ऐकून घेण्याचं आवाहन करतो."

राहुल गांधींनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही (RSS) उल्लेख केला. ते म्हणाले की, "धर्मेंद्र प्रधान हे केवळ एक प्रतीक आहेत. तुमचा खरा शत्रू आरएसएस आहे. हे लक्षात ठेवा. हेच ते लोक आहेत जे तुम्हाला विद्यार्थी बनण्यापासून रोखत आहेत. हेच ते लोक आहेत ज्यांना तुम्ही 'अंधभक्त' बनावं, असं वाटतं. ही भारताच्या आत्म्याची प्रतिक्रिया आहे, जी ठामपणे सांगते की आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचे अंधभक्त होणार नाही."

राहुल गांधींचे अमित शाह यांच्यावर आरोप

देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, "गृहमंत्री अमित शहा यांनीच विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते."

ते म्हणाले की, "देशाच्या तथाकथित गृहमंत्र्यांमध्ये धैर्याचा अभाव असल्याचं पाहून मला आज खूप आनंद झाला. गृहमंत्र्यांमध्ये सभागृहात येऊन बसण्याचे धैर्य नाही. मी गृहमंत्र्यांना 30 गाड्यांच्या ताफ्यामध्ये थरथर कापत बसलेले पाहिलं."

"आज गृहमंत्री इथे का नाहीयेत? गृहमंत्री इथे नाहीयेत, कारण त्यांना भीती वाटते. विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनीच दिले होते. आमच्या विद्यार्थ्यांच्या रक्ताचे डाग त्यांच्यावर आहेत. त्यांनीच भारतातील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते."

राहुल गांधींनी गृहमंत्र्यांवर विद्यार्थी आंदोलनावर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राहुल गांधींनी गृहमंत्र्यांवर विद्यार्थी आंदोलनावर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला.

या प्रकरणात हस्तक्षेप करताना लोकसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं की, चर्चेत असलेल्या विधेयकाशी संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित आहेत आणि गृह मंत्रालयाचा या चर्चेशी काहीही संबंध नाहीये.

किरेन रिजिजू यांनीही या विधानावर आक्षेप घेतला आणि म्हटलं की, राहुल गांधी चुकीचं बोलत आहेत आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी गांभीर्यानं बोलायला हवं.

राहुल गांधींच्या विधानाबाबत संसदेबाहेर बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, "काही लोकांचा कसलाही इलाज होऊ शकत नाही. प्रत्यक्षात गोळीबार झालेलाच नाही, तरीही विरोधी पक्षनेते सभागृहात असे निराधार आणि असत्य विधान करत आहेत, ज्याचा मी निषेध करतो. राहुल गांधींकडे बोलण्यासारखं काहीच नाही, कारण त्यांनी चर्चेसंदर्भात किंवा विधेयकासंदर्भात काहीही भाष्य केलं नाही."

पीयूष गोयल यांनी राहुल गांधींना या आरोपांबाबत सभागृहात देशाची माफी मागण्यास सांगितलं आहे.

काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, "दिल्ली पोलीस पूर्णपणे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहेत. दिल्ली पोलीस आयुक्त कोणाकडून आदेश घेतात? दिल्ली पोलीस आयुक्त केवळ गृह मंत्रालयाकडूनच आदेश घेतात. यासाठी खुद्द गृहमंत्रीच जबाबदार आहेत आणि म्हणूनच ते सभागृहात येत नाहीत. जर राहुल गांधींनी हे आरोप केले असतील, तर यावर मार्ग काय? गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाही आहात."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)