'डोळ्यांवर पट्टी बांधली आणि गाडीत बसवून घेऊन गेले', जंतर-मंतरवर जेवण वाटणाऱ्या जुनैदसोबत काय घडलं?

मोहम्मद जुनैद
फोटो कॅप्शन, सीजेपीचं आंदोलन सुरू झाल्यापासून जुनैद त्याठिकाणी उपस्थित होते.
    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (25 जुलै) पदाचा राजीनामा दिला, तेव्हा पहिल्या दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतरवर उपस्थित असलेले कार्यकर्ते जुनैद तिथे नव्हते.

त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती, असा दावा जुनैद यांनी केला आहे.

जुनैद यांच्या दाव्यासंदर्भात दिल्ली पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. पोलिसांची बाजू उपलब्ध होताच, ती इथे दिली जाईल.

जंतर मंतरवर 20 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीचं (CJP) आंदोलन सुरू झाल्यापासून जुनैद तिथे उपस्थित होते. आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात ते व्यग्र होते.

उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली, असा जुनैद यांचा आरोप आहे.

पोलीस काय म्हणत आहेत?

बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना गाझियाबाद पोलिसांनी जुनैद यांच्या कुटुंबीयांची चौकशी केल्याचं कबूल केलं, परंतु त्यांना ताब्यात घेतल्याचं नाकारलं.

मेरठ पोलिसांनी बीबीसीच्या प्रश्नांना प्रतिसाद दिला नाही. दिल्ली पोलिसांनी जुनैदच्या कथित अटकेबाबतच्या प्रश्नांवर उत्तर दिलं नाही. दरम्यान, जुनैद यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

जुनैद

फोटो स्रोत, Muhammad Junaid Insta

फोटो कॅप्शन, जुनैदनं त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा काहीही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं सांगितलं आहे.

या याचिकेत त्यांनी असा आरोप केला आहे की, जंतर-मंतरवर आंदोलकांसाठी अन्नाची व्यवस्था केल्यामुळं त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं, तसंच त्यांच्या कुटुंबाचा छळ करण्यात आला आणि हे सर्व करताना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही.

त्यांनी न्यायालयाकडं या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची आणि त्यांच्या तसंच त्यांच्या कुटुंबाविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या दंडात्मक कारवाईवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या घटनेदरम्यान सीजेपीनंही जुनैदपासून काहीसं अंतर राखलं होतं, पण आता सीजेपी मदत करत असल्याचं जुनैद सांगत आहेत.

बीबीसी हिंदीशी बोलताना जुनैद म्हणाले की, त्यांच्यावर किंवा त्याच्या कुटुंबाचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. ते केवळ आंदोलकांना मदत करण्यासाठी जंतर मंतरवर अन्न वाटप करत होते.

कुटुंबाची चौकशी केल्याचा दावा

जुनैद यांच्या मते, 23 आणि 24 जुलै रोजी उत्तर प्रदेश पोलीस त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडिलांना चौकशीसाठी घेऊन गेले. घरातून बँक पासबूक, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रंही नेण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

त्यांना रात्री सोडण्यात आलं, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं असं जुनैदनं सांगितलं.

नंतर मेरठमध्ये राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या सासऱ्याला आणि मेहुण्यालाही स्थानिक पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं, असा आरोपही जुनैदनं केला आहे.

जुनैद

फोटो स्रोत, Muhammad Junaid Insta

फोटो कॅप्शन, जुनैद आंदोलन सुरू झाल्यापासून जंतर-मंतरवर अन्न वाटप करत होते.

जेव्हा जुनैद यांच्या कुटुंबासोबत हे सर्व घडत होतं, तेव्हा जुनैद स्वतः जंतर मंतरवर उपस्थित होते, जिथे ते आंदोलकांना अन्न वाटप करत होते.

जुनैद यांनी म्हटलं की, 24 जुलैच्या रात्री जंतर मंतरवर असताना त्यांना एका कुत्र्यानं चावा घेतला होता. त्यामुळं उपचारासाठी ते दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेले होते.

रुग्णालयातून उपचार घेऊन परत आल्यानंतर थोड्याच वेळात एक पांढरी स्कॉर्पिओ त्यांच्या ऑटोसमोर थांबली. गाडीतून उतरलेल्या लोकांनी स्वतःची ओळख दिल्ली पोलीस अधिकारी म्हणून करून दिली, असं जुनैद यांनी सांगितलं आहे.

"ते साध्या वेशात होते, वाहनाला नंबर प्लेट नव्हती आणि त्यांनी कोणतंही वॉरंट किंवा लेखी आदेश दाखवले नाही, असंही जुनैद यांनी सांगितलं.

बीबीसीने या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.

'डोळ्यांवर पट्टी बांधली'

जुनैद आणि त्यांच्या साथीदाराला गाडीत जबरदस्तीनं बसवल्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आणि त्यांचे दोन्ही मोबाईल फोन काढून घेण्यात आले, असा आरोप जुनैद यांनी केला आहे.

त्यांना एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं आणि तिथे दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं.

जुनैद

फोटो स्रोत, Muhammad Junaid Insta

फोटो कॅप्शन, जुनैद यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना फंडिंगबाबत प्रश्न विचारण्यात आले असं, त्यांनी सांगितलं.

जुनैद यांच्या म्हणण्यानुसार, "ते गाझियाबादहून जंतर-मंतरला का येतात? आणि आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी पैसे कुठून येतात?", असं त्यांना चौकशीदरम्यान वारंवार विचारण्यात आलं.

त्यावर वेगवेगळ्या लोकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जेवणाची व्यवस्था केली जात असल्याची माहिती दिल्याचं जुनैद यांनी सांगितलं.

त्यांच्या मते, कोणीतरी ऑनलाइन फूड डिलिव्हरीद्वारे अन्न पाठवत होते, शेतकरी संघटना अन्न आणत होत्या आणि गुरुद्वारांमधूनही लंगर पोहोचवलं जात होतं.

चौकशीनंतर अज्ञात ठिकाणी सोडलं

जुनैद यांनी सांगितलं की, चौकशीनंतर त्यांना अनेक तास गाडीतून फिरवण्यात आलं आणि नंतर संध्याकाळी उत्तराखंडमधील डेहराडूनजवळ एका अज्ञात ठिकाणी सोडण्यात आलं.

त्या लोकांनी, निघताना त्यांना काही मिनिटे डोळ्यांवरची पट्टी काढू नका आणि एका तासानंतरच मोबाईल फोन चालू करा असं सांगितलं होतं, असं जुनैद म्हणाले.

जुनैद यांच्या म्हणण्यानुसार, पुन्हा अपहरण होण्याची भीती असल्यानं त्यांनी सुरुवातीला या घटनेबद्दल कोणालाही सांगितलं नाही. नंतर, त्यांनी हे सर्व काही सार्वजनिकपणे सांगायचं ठरवलं.

जुनैद

फोटो स्रोत, Muhammad Junaid Insta

फोटो कॅप्शन, भविष्यातही अशा आंदोलनांत सहभागी होणार असल्याचं जुनैद म्हणाले.

आंदोलनासाठीच्या निधीच्या प्रश्नावर जुनैद म्हणाले की, त्यांनी आधीच कोणाकडूनही रोख रक्कम किंवा ऑनलाइन आर्थिक मदत घेणार नाही आणि कोणताही क्यूआर कोडही पैसे स्वीकारण्यासाठी देणार नसल्याचं ठरवलं होतं.

या कामासाठी त्यांच्या बँक खात्यात कोणताही पैसा आलेला नाही आणि तपास यंत्रणांना हवं असल्यास ते त्याच्या नोंदी तपासू शकतात, असंही ते म्हणाले.

दाव्यांच्या पुराव्याबद्दल जुनैद काय म्हणाले?

अटकेदरम्यान त्यांच्याकडे मोबाईल फोन नव्हता, असं जुनैद सांगतात.

सुटका झाल्यानंतर ज्या परिसरात त्यांना सोडण्यात आलं, त्याजवळील एका पोलीस ठाण्याचा फोटो काढला होता, असं जुनैद म्हणाले.

त्यांच्याकडे राम मनोहर लोहिया रुग्णालयाची पावती आणि दिल्लीला परत येण्याचं कॅबचं बिलही आहे, असंही त्यांनी सांगितलं.

बीबीसीनं ही कागदपत्रं पाहिली आहेत.

जुनैद यांनी सांगितलं की, त्यांना कथितरित्या ताब्यात घेण्यात आलं असताना, त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी मिळाली.

त्यांच्या संघर्षामुळं विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारणाप असेल, तर ती आनंदाची बाब असेल असं त्यांना वाटतं. भविष्यातही अशा चळवळींमध्ये सहभागी होणार असल्याचं जुनैद सांगतात.

कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या जुनैद यांनी त्यांना भविष्यातही शिक्षणाशी संबंधित बाबींवर काम करायची इच्छा बोलून दाखवली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)