मोठे बहीण-भाऊ हे त्यांच्या पाठच्या भावंडांपेक्षा जास्त हुशार असतात का?

जन्मक्रम आणि बुद्धिमत्ता, खरंच मोठी मुलं जास्त हुशार असतात का?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मॉली गोर्मन
    • Role, बीबीसी फ्यूचर
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

मी दोन बहिणींमध्ये मोठी आहे. मला अनेकदा मोठ्या मुलांशी जोडल्या जाणाऱ्या गुणांशी आपलेपणा वाटतो. जसं की, जबाबदारीने वागणं, सगळं नीट करण्याचा प्रयत्न करणं आणि महत्त्वाचं म्हणजे परफेक्शनची सवय.

माझी आई देखील आपल्या घरात मोठी मुलगी आहे आणि तिच्यातही हेच गुण आहेत. पण माझी लहान बहीण मात्र थोडी मोकळ्या स्वभावाची आहे.

आम्ही दोघी एकाच घरात, एकाच आई-वडिलांसोबत वाढलो, एकमेकींच्या खूप जवळही आहोत, तरी आमच्या दोघांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्व खूप वेगवेगळे आहेत.

मला असा विचार आला की, आमच्यातला हा स्वभावाचा फरक आमच्या जन्माच्या क्रमामुळे असू शकतो का? म्हणजेच, तुम्ही घरातले मोठे, धाकटे किंवा एकुलते एक मूल असाल, तर त्याचा तुमच्या स्वभावावर आणि जगाकडे पाहण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो का? यामागे खरंच काही शास्त्रीय कारण किंवा विज्ञान आहे का?

शंभर वर्षांपासून न सुटलेलं कोडं

शास्त्रज्ञ आणि सामान्य लोकांना गेल्या शंभर वर्षांपासून हा विषय खूप उत्सुकतेचा वाटतो आहे. पण अजूनही एक गोष्ट ठामपणे सांगता येत नाही, भावंडांमधल्या जन्मक्रमाचा आपल्या स्वभावावर खरंच परिणाम होतो का? यावर आजही चर्चा सुरूच आहे.

पूर्वी या विषयावर अनेक संशोधनं झाली, पण त्यांचे निष्कर्ष एकसंध किंवा ठाम नव्हते. यामागे काही कारणं आहेत आणि सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, हे मोजणं खूप कठीण आहे.

अमेरिकेतील टेक्सासमधील युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनमधील मानसशास्त्राच्या असोसिएट प्रोफेसर रॉडिका डॅमियन सांगतात की, आधीच्या अभ्यासांमध्ये अनेकवेळा सहभागी लोकांची संख्या फारच कमी असायची म्हणजे त्याचा सॅम्पल साइज छोटा असायचा.

जन्मक्रम आणि बुद्धिमत्ता, खरंच मोठी मुलं जास्त हुशार असतात का?

फोटो स्रोत, Getty Images

त्याशिवाय, व्यक्तिमत्त्व चाचणी निकाल अनेकदा लोकांनी स्वतःबद्दल दिलेल्या उत्तरांवर आधारित असत, त्यामुळे त्यात व्यक्तिगत पक्षपात (बायस) होण्याची शक्यता असत.

अलीकडील अभ्यासांत असं दिसून आलं आहे की, जन्मक्रमाचा सर्वांवर एकसारखा परिणाम होतो का, हे शोधणं सोपं नाही. कारण यात अनेक गोंधळ निर्माण करणारे घटक असतात.

उदाहरणार्थ, भावंडांची एकूण संख्या हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. जसं की दोन मुलांच्या कुटुंबातल्या नातेसंबंधांची रचना आणि सात मुलांच्या कुटुंबातील रचना वेगळी असते. म्हणूनच, दोन वेगवेगळ्या आकाराच्या कुटुंबात मोठं किंवा धाकटं असण्याचा अनुभवही खूप वेगळा असतो आणि त्यांची थेट तुलना करताही येणार नाही.

कुटुंबातील मुलांची संख्या आणि त्या कुटुंबात मूल म्हणून मिळालेला अनुभव हे दोन्हीही इतर अनेक गोष्टींशी जोडलेले असू शकतात.

उदाहरणार्थ, कुटुंबाची आर्थिक स्थिती म्हणजेच श्रीमंत किंवा गरीब असणं याचा यावर परिणाम होतो. जसं की, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबांमध्ये सहसा कमी मुलं असतात.

त्याशिवाय, त्या व्यक्तीचं वय आणि लिंग (मुलगा की मुलगी) यांचाही घरात आणि घराबाहेर मिळणाऱ्या अनुभवावर मोठा प्रभाव टाकू शकतो.

वय म्हणजे फक्त एक संख्या?

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या सगळ्या गोष्टींचा विचार करता, संशोधक अजूनही हे ठामपणे सांगू शकलेले नाहीत की, जन्मक्रमाचा सर्वांच्याच स्वभावावर एकसारखा आणि ठरलेला परिणाम होतो.

पण याचा अर्थ असा नाही की, जन्मक्रमामुळे काहीच फरक पडत नाही. काही विशिष्ट कुटुंबांमध्ये किंवा संस्कृतींमध्ये भूमिका बजावू शकतो.

"लोकांमध्ये अजूनही काही जुन्या समजुती आहेत, किंवा काही अशा कल्पना आहेत ज्या सुरुवातीपासूनच नीट पुराव्यांवर आधारलेल्या नव्हत्या," असं जर्मनीच्या लाईपझिग विद्यापीठातील व्यक्तिमत्त्व अभ्यासक ज्युलिया रोहरर सांगतात.

"उदाहरणार्थ, 'मोठ्या मुलीचं सिंड्रोम' ही संकल्पना, अनेक वेळा महिलांकडून अजूनही जास्त काळजी घेण्याची, जबाबदारी सांभाळण्याची अपेक्षा केली जाते. त्यातच जर ती घरातील पहिली किंवा मोठी मुलगी असेल, तर तिच्याकडून लहान भावंडांची विशेष काळजी घेण्याची अपेक्षा केली जाते," असं त्या म्हणतात.

"काही महिलांसाठी हे अनुभव अगदी खरे असतात, पण सगळ्यांच्याच बाबतीत तसं नसतं, कारण प्रत्येक कुटुंब वेगळं असतं."

दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, प्रत्येक मोठी बहीण जबाबदार आणि काळजी घेणारी असेलच असं नाही. पण काहींच्या बाबतीत 'मोठ्या मुलीचं सिंड्रोम' खरं वाटू शकतं, कारण त्यांनी लहानपणापासूनच भावंडांची जबाबदारी घेतलेली असते आणि हाच अनुभव त्यांच्या स्वभावावर परिणाम करतो.

रोहरर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यूके, यूएस आणि जर्मनीमध्ये हजारो लोकांवर झालेल्या तीन मोठ्या सर्वेक्षणांचा अभ्यास केला.

या अभ्यासातून असं आढळलं की, जन्मक्रमाचा आपल्यावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम मोठ्या आणि मुख्य स्वभाव गुणांवर दिसून येत नाही.

पण एका गोष्टीबाबत मागच्या संशोधनाचं समर्थन या अभ्यासातून झालं आणि ती गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता. जन्मक्रमाचा बुद्धिमत्तेवर काही प्रमाणात परिणाम होतो, हे या अभ्यासात स्पष्ट झालं.

जन्मक्रमाचा परिणाम प्रत्येकावर सारखाच नसेल, पण काही कुटुंबांमध्ये किंवा संस्कृतीत तो नक्कीच जाणवू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

बुद्धिमत्ता ही गुंतागुंतीची गोष्ट आहे, या अभ्यासात ती केवळ दोन प्रकारे मोजली गेली. एक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीत मिळालेली गुणसंख्या, आणि दुसरं म्हणजे व्यक्तीने स्वतःबद्दल दिलेली, मी हुशार आहे अशी माहिती.

"आम्ही पाहिलं की मोठी मुलं बुद्धिमत्ता चाचणीत थोडा जास्त स्कोअर करतात, आणि स्वतःला हुशार समजण्याचं प्रमाणही त्यांच्यात जास्त असतं," असं रोहरर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासात लिहिलं.

मागील संशोधनांतही असं दिसून आलं होतं की, बुद्धिमत्ता चाचणीत मिळणारे गुण थोडे थोडे करून कमी होत जातात म्हणजे पहिल्या मुलापासून नंतरच्या मुलांपर्यंत हा फरक थोडा जाणवतो.

मोठ्या मुलांना बुद्धिमत्ता चाचणीत जास्त गुण मिळतात. परंतु, त्यामागची कारणं गुंतागुंतीची आहेत.

जन्मक्रम आणि इतर स्वभावगुणांबाबत सगळ्यांना लागू पडणारा नियम नसला, तरीही आपल्या अनुभवांवर विचार करणं उपयोगी ठरू शकतं, असं रोहरर सांगतात.

"'मोठ्या मुलीचं सिंड्रोम' यासारख्या संकल्पना तुम्हाला तुमच्यासारख्या परिस्थितीत वाढलेल्या लोकांशी जोडू शकतात. अशा लोकांशी तुम्ही अनुभव शेअर करू शकता," असं त्या म्हणतात.

तुमचा अनुभव असा शब्द देऊन मांडण्यात काहीच अडचण नाही. फक्त तो सगळ्यांना लागू होतो असं समजू नये, एवढं लक्षात ठेवायला हवं.

वय म्हणजे फक्त एक संख्या?

फोटो स्रोत, Getty Images

डॅमियनही याच गोष्टीवर भर देतात. त्या म्हणतात, "आम्हाला स्वभावगुणांमध्ये सगळ्यांना लागू होणारे फरक आढळून आले नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक कुटुंबात किंवा संस्कृतीमध्ये जन्मक्रमावर आधारित वेगवेगळे अनुभव घडत नाहीत."

थोडक्यात, जन्मक्रमाचा परिणाम प्रत्येकावर सारखाच नसेल, पण काही कुटुंबांमध्ये किंवा संस्कृतीत तो नक्कीच जाणवू शकतो.

उदाहरणार्थ, यूकेमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या 'प्रायमोजेनिचर' नावाची एक पद्धत होती. ज्यामध्ये कुटुंबातील सर्वात मोठ्या मुलालाच संपत्ती, मालमत्ता किंवा पद मिळायचं. विशेषतः मुलांना प्राधान्य दिलं जायचं.

हा नियम 2013 पर्यंत शाही घराण्यांमध्येही लागू होता. 'सक्सेशन टू द क्राऊन अॅक्ट' नावाचा कायदा झाल्यावरच ही पद्धत संपली. म्हणजे आता मोठ्या मुलीला देखील गादीवर म्हणजेच राजसत्तेवर हक्क मिळू शकतो, आणि मुलगा तिला गादीपासून दूर करू शकत नाही.

ही 'प्रायमोजेनिचर' संकल्पना अजूनही अनेक ठिकाणी दिसते. एचबीओ या वाहिनीच्या 'सक्सेशन' या मालिकेत, एका पात्राने शेवटच्या भागात जोरात ओरडून सांगितलं, 'आय एम द एल्डेस्ट बॉय!' त्याला वाटतं की फक्त मोठा मुलगा आहे म्हणून त्याचाच त्याच्या वडिलांच्या सीईओपदावर अधिकार असावा. (खरंतर तो दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा असतो – पण आपल्याला त्यात जायचं नाहीये.)

"जर एखाद्या समाजात जन्मक्रमावर आधारित वागणूक दिली जात असेल, तर होय, अशा ठिकाणी जन्मक्रमाचा तुमच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होतो," असं डॅमियन म्हणतात.

वय म्हणजे फक्त एक संख्या?

संशोधक सांगतात की, वयामुळे येणारे अनुभव अनेकदा जन्मक्रमामुळे आलेल्या स्वभावगुणांसारखे वाटू शकतात. पण दोन्हीत फरक असतो.

उदाहरणार्थ, मोठं आणि 'जबाबदार' असलेलं भावंड बघा. डॅमियन म्हणतात, "जसं वय वाढतं, तसं माणसं जास्त जबाबदार आणि संयमी होत जातात. त्यामुळे मोठं मूल हे नेहमीच लहान भावंडांपेक्षा वयानं पुढंच असणार आणि तुम्ही तुमच्या मुलांकडे बघितलं, तर पहिलं मूल नेहमीच अधिक जबाबदार वाटेल. कारण ते मोठं आहे."

"दुसरी एक गोष्ट म्हणजे, वय वाढलं की लोक स्वतःबद्दल जास्त विचार करू लागतात," असं डॅमियन सांगतात.

"म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं मूल कधी कधी जरा जास्त मोकळं, बोलकं आणि कमी टेन्शन घेणारं वाटू शकतं. कारण 10 वर्षांचा मुलगा किंवा मुलगी साधारणपणे खूप आनंदी आणि बिनधास्त असतो आणि त्याच वेळी 14 वर्षांचा मोठं भावंड जरा जास्त चिंतेत असतो, त्याला सगळ्याची काळजी वाटते. हे वयामुळे येणाऱ्या वेगळ्या टप्प्यांमुळे असतं," असं त्या स्पष्ट करतात.

मुलांची मित्र मंडळीही त्यांच्या वागणुकीवर प्रभाव टाकू शकतात. उदाहरणार्थ, अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की, चुकीच्या सवयी असलेल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांमध्ये अशाच सवयी निर्माण होण्याची शक्यता वाढते.

म्हणूनच, मोठं मूल कधी कधी नियम मोडणाऱ्यासारखं वागू शकतं. हे त्यांच्या सभोवतालच्या मित्रमंडळींवर अवलंबून असतं.

हुशार भावंडं

वर सांगितल्याप्रमाणे, जन्मक्रमावरील संशोधनात एक गोष्ट सातत्यानं दिसते, ती म्हणजे मोठ्या मुलांचं बुद्धिमत्तेशी असलेलं थोडंसं जास्त जोडणं. अभ्यासांनुसार, मोठ्या मुलांमध्ये लहान भावंडांपेक्षा बुद्धिमत्तेशी संबंधित गुण थोडे अधिक असतात.

"हे बहुतेक वेळा शाब्दिक/मौखिक बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये दिसून येतं, आणि त्याचाही परिणाम फार छोटासा असतो," असं डॅमियन सांगतात.

त्याशिवाय त्या असंही सांगतात, "जर तुम्ही एकच चाचणी दोन वेळा दिली, तर कधी तुमचा मूड, त्या दिवशी खाल्लेलं अन्न, किंवा किती झोप झाली आहे यावरही स्कोअर ठरू शकतो."

ही गोष्ट बालपणात मिळणाऱ्या बौद्धिक उत्तेजनेमुळे (कॉग्निटिव्ह स्टिम्युलेशन) घडत असावी, असं संशोधक डॅमियन सांगतात.

त्या म्हणतात की, एखाद्या कुटुंबात एका मुलामागे जितके जास्त प्रौढ असतात, तितकीच ती मुलं मोठ्यांच्या बोलण्याशी जास्त संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना शब्दसंग्रह व भाषा शिकायला अधिकची संधी मिळते.

पण जर घरात भावंडांची संख्या वाढली, तर अशा शिकण्याच्या संधी कमी होऊ शकतात. त्यामुळे पहिल्या मुलांनी चाचणीत उच्च गुण मिळवले, याचं कारण त्यांची बुद्धिमत्ता अधिक आहे असं नाही. तर ते फक्त अधिक प्रगल्भ भाषा समजत असतील, कारण त्यांच्याशी बोलणाऱ्या मोठ्यांची संख्या जास्त होती.

तशाच प्रकारे, जर दोनच भावंडं असतील, तर पालकांचं लक्ष काहीसं 'वाचन' करण्यापेक्षा त्यांच्या परस्परसंवादांमध्ये जाऊ शकतं. त्यामुळे शिकवण्याचं वातावरण थोडं कमी होऊ शकतं.

संशोधक हेही सुचवतात की, जेव्हा मोठी भावंडं लहान भावंडांना शिकवतात किंवा काही समजावून सांगतात, तेव्हा त्यांचा मेंदू अधिक सक्रिय होतो. ज्याला 'कॉग्निटिव्ह रिर्सोसेस'चा वापर म्हणतात.

हुशार भावंडं

फोटो स्रोत, Emmanuel Lafont

बुद्धिमत्ता जास्त असणं हे नेहमी जन्मापासूनच असतं असं नाही, तर वातावरणाचा आणि शिकण्याच्या संधींचाही मोठा प्रभाव असतो.

उल्लेखनीय म्हणजे, बुद्धिमत्तेचे हे नमुने (पॅटर्न्स) जगभर एकसारखे दिसत नाहीत. विकसित देशांमधील आकडे आणि विकसनशील देशांमधील आकडे वेगळे असतात.

उदाहरणार्थ, इंडोनेशियासारख्या देशात लहान भावंडांना कधी कधी मोठ्या भावंडांपेक्षा जास्त चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळतात.

कारण असं असू शकतं की, सुरुवातीला कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे मोठ्या भावंडांचं शिक्षण मर्यादित राहतं. पण जेव्हा ही मोठी भावंडं नोकरी करायला लागतात आणि घरात पैसे येऊ लागतात, तेव्हा लहान भावंडांना जास्त चांगलं शिक्षण घेणं सुलभ होतं.

डॅमियन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, भाऊ-बहिणींच्या जन्माच्या क्रमाचा करिअरवर फारसा परिणाम होत नाही. झाला तरी अगदी कमी किंवा नगण्यच असतो.

पूर्वी असं मानलं जात होतं की, मोठं अपत्य किंवा भावंड शास्त्र, शिक्षण अशा अभ्यासपूर्ण क्षेत्रांमध्ये करिअर करतं, तर लहान भावंडं सर्जनशील (क्रिएटिव्ह) क्षेत्रांकडे वळतात. परंतु, डॅमियन यांचा दीर्घकालीन अभ्यास काही वेगळंच सांगतो.

या अभ्यासात 1960 साली अमेरिकेतील काही हायस्कूल विद्यार्थ्यांचा अभ्यास केला गेला आणि नंतर 60 वर्षांनंतर पुन्हा त्यांचं करिअर तपासलं गेलं. यात असं दिसून आलं की मोठी भावंडंच अधिक सर्जनशील करिअरमध्ये गेली होती.

स्वतःपुरतंच विचार करणारी एकलुती एक मुलं?

एकुलती एक मुलं ही इतर भावंडांसोबत वाढलेल्या मुलांपेक्षा अधिक स्वार्थी असतात, असा समज अनेकदा केला जातो. कारण त्यांना आई-वडिलांचं लक्ष मिळवण्यासाठी कोणाशी स्पर्धा करावी लागत नाही, असं मानलं जातं.

परंतु, अलीकडच्या अभ्यासांनुसार हे खरं नाही. भावंडांशिवाय वाढल्यामुळे ही मुलं अधिक स्वार्थी किंवा अहंकारी बनतात, असं सिद्ध झालेलं नाही.

काही संशोधनात असंही दिसून आलं आहे की, एकुलती एक मुलं आणि भावंडं असलेली मुलं यांच्या सामाजिक वागणुकीत फारसा फरक नसतो आणि वय वाढत गेल्यावर हा फरक आणखीन कमी होतो.

ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, अशा मुलांचा समावेश सहसा जन्मक्रमासंदर्भातील अभ्यासांमध्ये केला जात नाही. कारण त्यांची तुलना भावंडांसोबत वाढलेल्या मुलांशी करणे योग्य ठरत नाही, असं मानलं जातं.

परंतु, 2025 मधील एका अभ्यासानुसार, भावंडं असलेल्या मुलांमध्ये आणि एकुलत्या एक मुलांमध्ये असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या गुणधर्मांची तुलना करणं शक्य आहे, असं कॅनडामधील ब्रॉक युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्राचे प्रा. मायकेल अॅश्टन आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरीचे प्रा. किबीओम ली यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या अभ्यासात काही नवीन आणि आकर्षक निष्कर्ष समोर आले. त्यांनी 7 लाख लोकांचा ऑनलाइन अभ्यास केला आणि दुसऱ्या गटात 70,000 लोकांचा समावेश होता. त्यांनी जन्मक्रम, भावंडांची संख्या आणि व्यक्तिमत्त्व यांचा संबंध पाहिला.

स्वतःपुरतंच विचार करणारी एकलुती एक मुलं?

फोटो स्रोत, Emmanuel Lafont

या अभ्यासातून असं दिसून आलं की, मधल्या आणि शेवटच्या क्रमांकाची भावंडं म्हणजे ज्यांची मोठी भावंडं असतात. ती 'प्रामाणिकपणा-नम्रता' आणि 'सहमती' या गुणांमध्ये मोठ्या भावंडांपेक्षा जास्त गुण मिळवतात.

प्रामाणिकपणा-नम्रता म्हणजे माणूस किती प्रामाणिक आणि नम्र आहे हे दर्शवतं. ज्यांना या स्केलवर जास्त गुण मिळतात, ते इतरांना फसवण्याची शक्यता कमी असते, ते नियम मोडत नाहीत आणि त्यांना स्वतःला विशेष समजण्याची वृत्ती कमी असते. तर कमी गुण मिळवणाऱ्या लोकांना नियम तोडण्याची, स्वतःला जास्त समजण्याची आणि इतरांना वापरण्याची अधिक शक्यता असते.

सहमती म्हणजे माणूस किती संयमी, समजूतदार आणि इतरांसोबत जुळवून घेणारा आहे हे दाखवतं. जास्त गुण मिळवणारा माणूस सहनशील, शांत स्वभावाचा आणि इतरांना माफ करणारा असतो. तर कमी गुण असणाऱ्या लोकांना लवकर राग येतो, ते हट्टी असतात आणि इतरांवर टीका करतात. म्हणजेच, जन्मक्रमाचा काही प्रमाणात व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो.

"या फरकांचा आकार फारसा मोठा नव्हता, विशेषतः जेव्हा एकाच संख्येची भावंडं असलेल्या कुटुंबांतील लोकांची तुलना केली," असं अॅश्टन आणि ली यांनी ई- मेलमध्ये सांगितलं.

"पण दुसरीकडे, जे लोक एकुलते एक होते आणि जे सहा किंवा त्याहून अधिक भावंडांच्या कुटुंबातून होते त्यांच्यात मात्र फरक जास्त स्पष्टपणे दिसून आला. हा फरक सामाजिक शास्त्रज्ञ 'छोटे ते मध्यम' अशा श्रेणीत मोजतात," असं त्यांनी सांगितलं.

म्हणून मी रोहरर यांना विचारलं, जन्मक्रमाचा परिणाम ही एक अशी 'झॉम्बी थिअरी' आहे का? म्हणजे जे चुकीचं असतं, पण तरीही लोकं ते मानायचं थांबत नाहीत?

रोहरर म्हणतात, "मला असं वाटत नाही की, ती थिअरी 'झॉम्बी' म्हणावी लागेल. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिलं, तर यावरचं संशोधन चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे."

कदाचित भविष्यात आपल्याला 'मोठी मुलगी' असण्याचा नेमका अर्थ काय असतो, याचं स्पष्ट उत्तर मिळेल. तोपर्यंत, मी माझ्या लहान बहिणीला असंच वाटू देईन की मी जन्मत:च तिच्यापेक्षा जास्त हुशार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)