You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बंदुका-तलवारी घेऊन पोलीस ठाण्याला घेराव : #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) बंदुका-तलवारी घेऊन पंजाबमध्ये पोलीस ठाण्याला घेराव
‘वारिस पंजाब दे’ नामक संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंह आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी अमृतसरच्या अजनाला पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.
अमृतपाल सिंह यांनी त्यांचे सहकारी लव्हप्रित तूफान सिंह यांच्या सुटकेची मागणी करत हा मोर्चा आणला होता. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिलीय.
हा मोर्चा अजनाला पोलीस ठाण्याजवळ पोहोचल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. आंदोलकांपैकी काहीजणांकडे बंदुका आणि तलवारीही होत्या.
लव्हप्रित तूफान सिंह आणि इतर पाच सहकाऱ्यांना सोडण्याची मागणी या आंदोलकांची होती.
पोलीस प्रशासन आणि अमृतपाल सिंह यांच्यात काही तास चर्चा झाल्यानंतर मोर्चाने माघार घेतली. आंदोलक अजनाला पोलीस ठाण्याभोवतीचा घेराव सोडून गुरुद्वारा साहिबमध्ये गेले आहेत.
गुरूवारी (23 फेब्रुवारी) अमृतपाल सिंह यांनी शेकडोस समर्थकांसह जल्लूपूर खेडाहून अजानाला पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. मोर्चाच्या मार्गात अनेक ठिकाणी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यात आले होते.
अभिनेता दीप सिद्धू यांनी ‘वारिस दे पंजाब’ संघटनेची स्थापना केली होती. शेतकरी आंदोलनावेळी ते चर्चेत आले होते.
15 फेब्रुवारी 2022 रोजी हरियाणाच्या सोनीपतमध्ये दिल्लीहून पंजाबला जाताना रस्ते अपघातात दीप सिद्धू यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमृतपाल सिंह यांनी संघटनेची धुरा खांद्यावर घेतली.
अमृतपाल सिंह हे खलिस्तानचे समर्थक आहेत आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ त्यांनी अनेकदा वक्तव्य केली आहेत.
2) कसब्याची पोटनिवडणूक हिंदुत्त्ववादाची आहे – देवेंद्र फडणवीस
“कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे. या निवडणुकीत नाराजीनाट्य रंगल्याचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत अनेक जातीयवादी गोष्टी परवण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला. मात्र कसबा हा हिंदुत्ववादी आहे आणि तो राहणार आहे,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पुण्यातील कसबा मतदारसंघात उपस्थित होते. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “आम्हाला पुण्याची संस्कृती जपायची आहे. द्वेषापेक्षा विकासाच्या कामावर आम्ही भर देणार आहोत.
पुण्याचा चेहरा बदलण्याचं काम भाजप करत आहे. त्यामुळे आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी नाही तर खुर्च्या जोडण्याचं काम करत आहोत. लोकांनी भाजपला कामं करताना पाहिलं आहे. त्यामुळे कसब्याचाच नाही तर संपूर्ण पुण्याचा विकास होणार आहे.”
“कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही. मात्र आलाच तर पुण्येश्वर मंदिराबाबत धंगेकरांची भूमिका काय? कॉंग्रेसची भूमिका काय आहे? असा सवालही फडणवीसांनी विचारला.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, तर भाजपकडून हेमंत रासने एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
3) पुण्यात मनसेत खिंडार, 7 जणांच्या हकालपट्टीनंतर 40 ते 50 जणांचे राजीनामे
पुण्यात कसबा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये खिंडार पडली आहे.
कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्यानं मनसेकडून सात जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर या हकालपट्टीच्या विरोधात मनसेतील 40 ते 50 जणांनी राजीनामे दिल आहेत. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
कसब्यात मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. असं असतानाही मनसेच्या काही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे पक्षविरोधी काम करण्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आलीय.
रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांच्यावर मनसेनं हकालपट्टीची कारवाई केली होती.
4) GST लाचखोरी प्रकरणात CBI चे आरोपींच्या कार्यालयांवर छापे
वस्तू आणि सेवा कर (GST) लाचखोरी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (CBI) पुणे आणि मुंबईसह तीन ठिकाणी आरोपींच्या कार्यालयात छापा टाकला.
त्यामध्ये कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, चार लाख रुपये आणि सोन्याचे दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
जीएसटी गुप्तचर विभाग महासंचालक कार्यालयातील उपसंचालक विमलेश कुमार सिंग आणि वरिष्ठ गुप्तचर अधिकारी राहुल कुमार या दोघांनी एकाला कारवाई टाळण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी महासंचालक कार्यालयाकडून तक्रार देण्यात आली होती.
त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका तक्रारदाराच्या जागेवर दाखल केलेला खटला बंद करण्यासाठी या दोन अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून एक कोटी रुपयांची लाच मागितली होती.
5) काँग्रेस नेते पवन खेरा यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अवमानजनक विधान केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केली होती. दैनिक भास्करनं ही बातमी दिलीय.
पवन खेरा यांना विमानातून खाली उतरवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विमानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं.
त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर द्वारका कोर्टानं पवन खेरा यांना अंतरिम जामिनावर सुटका केली.
“आम्ही तुम्हाला संरक्षण देत आहोत, मात्र सांभाळून वक्तव्य करा,” असंही कोर्टानं पवन खेरा यांना सांगितलं.
हिंडनबर्ग संस्थेच्या अहवालावर बोलताना पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नरेंद्र गौतमदास मोदी’ असा केला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्ते सॅम्युअल चँगसंग यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आसाम पोलिसांनी कारवाई केली होती.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)