You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे'- अजित पवार #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. अजित पवारांच्या 'संभाजीराजे धर्मवीर नव्हते' या विधानावर विरोधक आक्रमक, माफीची मागणी
"छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे," अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली आहे.
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांचे वक्तव्य हे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' अशा पद्धतीचे असल्याचं म्हटलं.
"आपण चुकीचे बोललो हे अजित पवारांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे कालही धर्मवीर होते, आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरपर्यंत राहतील," असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे अजित पवारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हटलं.
अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असंही तुषार भोसले यांनी म्हटलं.
लोकमतने ही बातमी दिली आहे.
"संभाजी महाराज धर्मवीर नाही, हे म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही संभाजी राजेंचा अवमान करत आहात," अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनीही केली.
2. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात सीबीआयकडे तक्रारी, अडचणीत वाढ होणार?
गायरान जमीन प्रकरण, सिल्लोड कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत थेट सीबीआयकडे दोन वेगवेगळ्या तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्यासह एकूण पाच जणांनी या प्रकरणी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत.
सत्तार यांच्याविरोधात तब्बल 1 हजार 400 पानांची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 200 पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे.
सत्तार यांनी जमिनी कशा बळकावल्या याचे पुरावे या तक्रारीत असल्याचा दावा देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील एका गायरान जमिनीचं प्रकरण आणि कृषीप्रदर्शनासाठी पैसे गोळा करण्याच्या आरोपावरून हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
3. “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच…”, शंभूराज देसाईंवर भास्कर जाधवांची टीका
शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीकास्त्र सोडताना भास्कर जाधव यांनी शंभूराज देसाईंचा उल्लेख ‘चंबू देसाई’ असा केला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला आणि शंभूराज देसाईंच्या तोंडाचा ‘चंबू’ झाला, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी टीका केली.
सीमावादाबाबत प्रश्न विचारला असता भास्कर जाधव म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला लॉक लागलं आहे. तिकडे कर्नाटकचे बोम्मई रोज महाराष्ट्रावर आणि सीमावर्ती भागातील मराठी माणसांवर अन्याय करत आहेत. यावर महाराष्ट्राचं सरकार तोंड उघडत नाहीत.
"यांच्या दोन मंत्र्यांनी राणा भीमदेवच्या थाटात सांगितलं की, आम्ही कर्नाटकला जाणार आहोत, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच चंद्रकांत पाटील यांच्यासारखा मजबूत मंत्री आणि अन्य एक ‘चंबू देसाई’ त्यांच्या तोंडाचा ‘चंबू’ झाला.”
भास्कर जाधव यांच्या टीकेला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 2024 मध्ये स्वत:ची काय अवस्था होईल, याकडे भास्कर जाधवांनी लक्ष द्यावं, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिल्याचं लोकसत्ताने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
4. केंद्र सरकारचे चीन धोरण चुकलेलं, लष्कराचा राजकीय वापर- राहुल गांधींची टीका
‘केंद्र सरकारचे चीन धोरण पूर्णपणे चुकले असून लष्करामागे लपून स्वत:च्या बचावाचा प्रयत्न होत आहे. लष्कराचा राजकीय वापरही केला जात आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (31 डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस आक्रमक झाला होता.
"माझे वडील, माझी आजी दोघेही शहीद झाले. हे दु:ख भाजपला समजणार नाही, त्यांच्या कुटुंबातील कोणाचीही हत्या झालेली नाही. सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात प्रत्येक जवानावर मी प्रेम करतो. त्यांच्यापैकी एकही शहीद होऊ नये, असे मला मनापासून वाटते. पण मी सरकारवर टिप्पणी केली तर मी लष्कराविरोधात बोललो असल्याची दिशाभूल केली जाते," अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
"काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष केंद्राच्या मदतीला धावतील, पण चिनी घुसखोरी झाल्याचे उघडपणे मान्य करून त्यांनी चुकांची कबुली दिली पाहिजे," असे ‘आवाहन’ राहुल गांधींनी केले.
इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.
5. तुनिषा शर्मा : शिझान खानची बहीण, अभिनेत्री फलक नाझची मीडिया ट्रायलविरुद्ध नाराजी
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता शिझान खानची बहीण आणि अभिनेत्री फलक नाझ हिने आपल्या भावाविरोधात सुरू असलेल्या मीडिया ट्रायलविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये फलकने आपल्या भावाची प्रतिमा त्याच्या धर्मामुळे मलिन केली जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला.
लोक शिझानबद्दल सतत असं बोलत असल्याचं पाहून वाईट वाटतं. वेगवेगळ्या गोष्टी रचून सांगणं, याप्रकरणी धर्माला मधे आणणं आणि पंधरा मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी कोणत्याही लोकांनी आमच्यासोबत नावं जोडणं असं सुरू असल्याचं फलकने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं.
या प्रकरणी दोन्ही कुटुंब बळी असल्याचं फलकने याआधीही म्हटलं होतं.
एऩडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)