महाराष्ट्राची क्रिकेट टीम असताना, मुंबई आणि विदर्भाची वेगळी टीम का आहे?

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published

बेळगाव आणि कर्नाटकातील सीमेलगतच्या गावांच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात वाद सुरू आहे. तूर्तास यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण तरीही सीमेजवळच्या गावांमध्ये वातावरण तापलेलं आहे.

एकीकडे कर्नाटकातील गावांमधल्या मराठी भाषिक गावांसाठी लढा सुरू असताना दुसरीकडे क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे तीन संघ सहभागी होताना दिसतात. असं का? एक राज्य-एक संघ असं का नाही? याचा घेतलेला आढावा.

रणजी स्पर्धेचा इतिहास

रणजी स्पर्धा 1934 मध्ये सुरू झाली आहे. बीसीसीआयचे संस्थापक ए.एस. डीमेलो यांच्या संकल्पनेतून रणजी स्पर्धेची सुरुवात झाली. डीमेलो यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची कल्पना बीसीसीआयच्या 1934 साली सिमला इथे झालेल्या बैठकीत मांडली.

सुरुवातीला स्पर्धेचं नाव द क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया असं करण्यात आलं. त्यावेळी बीसीसीआयकडे अशी स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुरेसा निधी नव्हता. त्यामुळे पटियाळाचे महाराज भूपेंद्र सिंह यांनी स्पर्धेचं प्रायोजकत्व घेतलं.

आर्थिक आघाडीची जबाबदारी घेताना त्यांनी या स्पर्धेला सर रणजीतसिंहजी यांचं नाव द्यावं अशी विनंती केली. रणजीतसिंहजी हे भारताबाहेर खेळणारे पहिले क्रिकेटपटू होते. ते नवानगरचे महाराज होते. ते रणजी या नावाने प्रसिद्ध होते.

ते इंग्लंडमध्ये ससेक्स, केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड संघाकडून खेळले. दिमाखदार फलंदाजी हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्व करावं अशी विनंती त्यांना करण्यात आली होती पण त्यांनी नकार दिला. त्यांच्या योगदानाची दखल घेत स्पर्धेला रणजी हे नाव मिळालं.

रणजी स्पर्धेच्या 1934 मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात म्हैसूर, मद्रास, हैदराबाद, आर्मी, नॉदर्न इंडिया, सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार, सेंट्रल इंडिया, युनायटेड प्रोव्हिन्स, सदर्न पंजाब, बॉम्बे, गुजरात, महाराष्ट्र असे 12 संघ सहभागी झाले होते.

हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. भारत असा देश आणि त्यातील संलग्न राज्यं अशी रचनाच नव्हती. अनेक संस्थानं होती. अनेक राजे खेळप्रेमी होती. राजाश्रयाने क्रिकेटच्या वाढीत मोलाची भूमिका बजावली.

याचा परिणाम म्हणजे बॉम्बे, वेस्टर्न इंडिया, महाराष्ट्र आणि सेंट्रल प्रोव्हिन्स तसंच गुजरात असे संघ होते. महाराष्ट्र असं राज्य नसल्याने त्यावेळी खेळाडू ज्या भागात तिथल्या संघासाठी खेळले.

1932 मध्ये सेंट्रल इंडिया क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. त्यातून पुढे होळकर क्रिकेट असोसिएशन निर्माण झाली. होळकर संस्थानचा क्रिकेटला मोठा पाठिंबा होता.

स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन झाली. त्यामुळे होळकर असोसिएशनऐवजी मध्य भारत संघटना निर्माण झाली. विदर्भाचा भाग त्यात येत असे. पण याच काळात मध्य प्रदेश असं स्वतंत्र राज्य निर्माण झालं.

विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. 1956 मध्ये मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली, वर्षभरात मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन अस्तित्वात आलं. विदर्भ भागातील खेळाडूंसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली.

सध्याची रचना

मुंबईकडून खेळण्यासाठी तीन जिल्ह्यातले खेळाडू पात्र ठरतात. मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यात जन्मलेले खेळाडू मुंबईसाठी खेळू शकतात. मुंबईची व्याप्ती वाढती आहे. एमएमआरडीए प्रदेशही यातच मोडतो. उदाहरणार्थ खारघरसारखं शहर.

तांत्रिकदृष्ट्या खारघर रायगड जिल्ह्यात येतं पण भौगोलिक आणि व्यवहारादृष्टीने मुंबई जवळचं आहे. त्यामुळे मुंबईनजीकच्या भागातल्या खेळाडूंना रायगड किंवा मुंबई असा खेळण्याचा पर्याय मिळतो. विदर्भातील 11 जिल्ह्यातले खेळाडू विदर्भ संघाकडून खेळण्यासाठी पात्र ठरतात.

उर्वरित 22 जिल्ह्यातील खेळाडू महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी पात्र ठरतात. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. तीन संघ असल्याने खेळाडूंचा फायदा होतो असंही त्यांनी सांगितलं. आपलं राज्य मोठं आहे. एवढ्या मोठ्या राज्यासाठी एकच संघ असता तर अनेक गुणी खेळाडूंना संधीच्या प्रतीक्षेतच राहावं लागलं असतं. कारण 15 जणांची निवड होऊ शकते.

याव्यतिरिक्त खेळाडूंचं राहण्याचं ठिकाण आणि संघटनेचं प्रशासकीय केंद्र यातलं अंतर प्रचंड झालं असतं. दैनंदिन कामकाज आणि सराव-सामने या दृष्टीनेही ते त्रासदायक ठरलं असतं असं कऱ्हाडकर सांगतात. सद्यस्थितीत मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई आणि परिसरातील भागासाठी, विदर्भ क्रिकेट असोसिएशन विदर्भातील जिल्ह्यांसाठी तर उर्वरित जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कार्यरत आहे.

रणजी स्पर्धेत किती संघ खेळतात?

सध्याच्या संरचनेत रणजी स्पर्धेत 38 संघ खेळतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र या राज्यांचे तीन तीन संघ आहेत. महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ असे महाराष्ट्राचे तर बडोदा, सौराष्ट्र आणि गुजरात असे गुजरातचे तीन संघ आहेत. आंध्र प्रदेश आणि हैदराबाद असे दोन संघ त्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसला तरी दिल्लीचा स्वतंत्र संघ या स्पर्धेत खेळतो. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड यांचे संघ 2018-19 हंगामापासून खेळू लागले आहेत. त्याचप्रमाणे सिक्कीम, पुदुचेरी, उत्तराखंड, चंदिगढ हे संघ 2018 पासून सहभागी होऊ लागले आहेत. रेल्वे आणि सर्व्हिसेस ही राज्यं नसली तरी त्यांचे संघ आहेत. रेल्वेसाठी कार्यरत खेळाडू रेल्वेकडून खेळतात. सर्व्हिसेस संघात लष्कर, नौदल आणि हवाई दलात कार्यरत खेळाडू खेळतात.

रणजी स्पर्धेचं स्वरुप कसं असतं?

रणजी स्पर्धा दरवर्षी वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात सुरू होते आणि फेब्रुवारी महिन्यात संपते. दोन महिने स्पर्धेच्या लढती देशभरात सुरू असतात. स्पर्धा सुरू झाली तेव्हा झोनल म्हणजे क्षेत्रीय पातळीवरचे संघ असायचे.

उदाहरणार्थ पश्चिम, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि मध्य अशा विभागांदरम्यान सामने व्हायचे. 2002-03 मध्ये हे प्रारुप बदलण्यात आलं. सर्व संघांची एलिट आणि प्लेट अशा दोन गटात विभागणी करण्यात आली. प्राथमिक फेरीनंतर दोन अव्वल संघ बाद फेरीत जात असत. एलिट गटात तळाशी राहणाऱ्या संघाची प्लेट गटात रवानगी होत असे. दहा वर्षानंतर सुपर लीग आणि प्लेट लीग असं नामकरण करण्यात आलं. 2017-18 पासून दोनस्तरीय रचना बदलून प्रत्येकी 7 संघांचे असे 4 गट करण्यात आले.

2018-19 पासून त्रिस्तरीय रचना करण्यात आली. रणजी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या लढती चारदिवसीय असतात.

बाद फेरीचे सामने पाच दिवसांचे असतात. देशभरात विविध ठिकाणी विभिन्न वातावरणात चार/पाच दिवस सातत्याने चांगलं खेळण्याचं आव्हान खेळाडूंवर असतं.

रणजी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडूच पुढे जाऊन भारतीय संघासाठी खेळताना दिसतात. स्पष्ट निकाल न लागल्यास पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजेता ठरवला जातो.

रणजी स्पर्धेच्या विजेत्या संघाची हंगामाअखेर शेष भारत अर्थात रेस्ट ऑफ इंडियाशी लढत होते. विजेत्या संघाला इराणी चषक प्रदान करण्यात येतो.

एकप्रकारे हंगामातील सर्वोत्तम संघ रणजीचं जेतेपद पटकावतो आणि अन्य संघातील दर्जेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघ केला जातो.

अशा दोन संघांमधील मुकाबला म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते.

रणजी स्पर्धेत कोणाचा दबदबा?

रणजी स्पर्धेच्या जेतेपदावर वर्षानुवर्ष मुंबईचा दबदबा राहिला आहे.

मुंबईने तब्बल 41 वेळा या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.

महाराष्ट्र संघाने इतिहासात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात 1939-40 आणि 1940-41 हंगामात जेतेपदाची कमाई केली होती.

विदर्भ संघ अलीकडे म्हणजे 2017-18 आणि 2018-19 अशी सलग दोन वर्ष रणजी स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी ठरला होता.

कोव्हिडमुळे लागला ब्रेक

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या या स्पर्धेला कोरोना संकटामुळे ब्रेक घ्यावा लागला.

1934 पासून दरवर्षी अव्याहतपणे ही स्पर्धा होते. देशभरातल्या वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळवले जातात. कोरोनामुळे लॉकडाऊन तसंच संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंध म्हणून 2020-21 हंगामात रणजी स्पर्धा होऊ शकली नाही.

विक्रम

रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम वासिम जाफर यांच्या नावावर आहे. भारतीय संघाचे माजी सलामीवीर आणि मुंबई क्रिकेटचे शिलेदार असलेल्या जाफर यांनी रणजी स्पर्धेत 12038 धावा केल्या आहेत.

मुंबईला अलविदा केल्यानंतर जाफर यांनी विदर्भ संघाचं प्रतिनिधित्व केलं. स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा (40) विक्रमही जाफर यांच्याच नावावर आहे. रणजी स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम महाराष्ट्राचे भाऊसाहेब निंबाळकर (443*) यांच्या नावावर आहे. रणजी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स राजिंदर गोएल (637) यांच्या नावावर आहेत.

एवढी जबरदस्त कामगिरी असूनही गोएल यांना भारतासाठी खेळता आलं नाही हा दुर्देवी योगायोग म्हणावा लागेल. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे यांच्या नावावर आहे. या जोडीने 2016-17 हंगामात दिल्लीविरुद्ध खेळताना 594* धावांची भागीदारी केली होती. महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईच्या 10 खेळाडूंनी रणजी स्पर्धेत हॅटट्रिकही नोंदवली आहे.

जेहांगीर खोत, वसंत रांजणे, उमेश कुलकर्णी, अब्दुल इस्माईल, सलील अंकोला, प्रीतम गंधे, समद फल्ला, उमेश यादव, रजनीश गुरबानी यांच्या नावावर हॅट्ट्रिकचा विक्रम आहे.

अन्य स्पर्धा

दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी (वनडे), विजय हजारे ट्रॉफी(वनडे) , सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (ट्वेन्टी20) या स्पर्धांमध्येही मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ असे तीन स्वतंत्र संघच सहभागी होतात. 2008 मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू झाली. शहर आधारित संघ असं या स्पर्धेचं स्वरुप आहे. यामध्ये मुंबईचा संघ सुरुवातीपासूनच आहे. मुंबई इंडियन्सच्या नावावर या स्पर्धेची 5 जेतेपदं आहेत.

2011 मध्ये पुण्याला आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळालं.

सुब्रतो रॉय यांच्या सहारा ग्रुप स्पोर्ट्स लिमिटेड कंपनीने या संघाची मालकी मिळवली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरचं गहुंजे इथलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ग्राऊंड या संघाचं होम ग्राऊंड होतं. मात्र हे स्टेडियम तयार होण्यापूर्वी पुण्याने आपल्या मॅचेस नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवल्या.

2012 हंगामापूर्वी बीसीसीआयबरोबरच्या आर्थिक वादामुळे पुणे संघ खेळणार नसल्याचं सहाराने स्पष्ट केलं. फ्रँचाइज शुल्क आणि युवराज सिंगऐवजी बदली खेळाडू ही वादाची कारणं होती.

हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने सहारा कंपनीला ठराविक रक्कम देण्याचं मान्य केलं आणि वाद मिटला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सहारा यांच्यातला वाद न्यायालयात गेला होता.

हंगामातली शेवटची मॅच खेळल्यानंतर सहाराने बीसीसीआयविरुद्धच्या वादामुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं.

मॅच फिक्सिंग आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. चेन्नईच्या जागी पुण्याला संघ देण्यात आला.

बंदीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर चेन्नईचं पुनरागमन होणार असल्याने रनरअप असूनही पुणे संघाचा प्रवास तिथेच थांबला.

"बीसीसीआयची स्थापना झाली तेव्हा संस्थानं होती. तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात आजचं मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात यांचा समावेश होता. या प्रांतांमध्ये क्रिकेट संघटना तयार झाल्या होत्या.

1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1956 मध्ये राज्यांची पुनर्रनचा करण्यात आली. त्यावेळी एक राज्य-एक संघटना असं ठरलं होतं. पण बीसीसीआयने सरकारला विनंती केली की संघटना अस्तित्वात आहेत, त्यांचं काम सुरू आहे. जे आहे ते मोडून नव्याने संरचना करायला नको", असं क्रिकेट लेखक, चरित्रकार, माध्यम समन्वयक आणि व्यवस्थापक  देवेंद्र प्रभूदेसाई यांनी सांगितलं. 

ते पुढे म्हणाले, "मुंबई क्रिकेट संघटना ही बीसीसीआयच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. मुंबई, महाराष्ट्र तसंच राहिलं. विदर्भ मध्य भारताचा भाग होतं.

मध्य प्रदेशची स्वत:ची संघटना अस्तित्वात आल्यानंतर विदर्भ हा स्वतंत्र संघ आणि पर्यायाने संघटना झाली. मुंबई आणि महाराष्ट्र तांत्रिकदृष्ट्या पश्चिम क्षेत्रात येतात तर विदर्भचा संघ मध्य क्षेत्रात मोडतो".

"मुंबईत क्रिकेटसाठी पोषक वातावरण आधीपासून आहे. वयोगट स्पर्धा, क्लब, जिमखाने, ऑफिस पातळीवरचे संघ, मैदानं असं सगळं मुंबईत होतं, आहे.

रणजी क्रिकेटमध्ये मुंबईचा वर्षानुवर्ष दबदबा राहिला आहे. मुंबई ही भारतीय क्रिकेटची नर्सरी मानली जाते. मुंबईच्या तुलनेत महाराष्ट्र आणि विदर्भ हे नव्याने तयार झालेले संघ आहेत.

तीन संघ असल्यामुळे अधिकाअधिक खेळाडूंना संधी मिळते. तिन्ही मिळून एकच संघ असता तर मुंबईचाच वरचष्मा राहिला असता.

महाराष्ट्र आणि विदर्भाच्या खेळाडूंना संघांच्या निमिताने चांगले व्यासपीठ उपलब्ध झालं आहे", असं त्यांनी सांगितलं.

"आपल्या राज्यातील तीन संघांप्रमाणेच गुजरातचेही तीन संघ आहेत. बडोदा आणि सौराष्ट्र म्हणजे पूर्वीचं नवानगर संस्थान होतं. संस्थानांचा क्रिकेटला भरघोस पाठिंबा होता, साहजिक त्यांच्या संघटना होत्याच. उर्वरित भागातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी गुजरातची संघटना स्थापन झाली. अशा पद्धतीने त्यांचेही तीन संघ झाले.

आंध्र प्रदेश आणि हैदराबाद असे दोन संघ होते. हैदराबादचा संघ तेलंगण राज्याचा भाग असलेल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ झालं".

यासंदर्भात त्यांनी एक किस्साही सांगितला. 1970 पर्यंत रणजी स्पर्धा क्षेत्रीय पातळीवर खेळली जात असे. मुंबई आणि महाराष्ट्र या संघांमधील मुकाबला नेहमी चुरशीचा होतो.

गटातील अव्वल संघच बाद फेरीसाठी पात्र ठरत असल्याने महाराष्ट्राची संधी हुकत असे.

त्याचवर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने दोन संघांना बाद फेरीची संधी मिळावी अशी विनंती केली. त्यावर शिक्कामोर्तब झालं. योगायोगाने अंतिम लढतीत महाराष्ट्र-मुंबई आमनेसामने होते.

मुंबईच्या संघातील अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, सुनील गावस्कर, अशोक मंकड आणि एकनाथ सोलकर वेस्ट इंडिजमध्ये खेळत होते.

मुंबईचा संघ युवा खेळाडूंचा होता तर महाराष्ट्राकडे अनुभवी खेळाडूंची फौज होती.

पण तरीही मुंबईने वर्चस्व सिद्ध करत बाजी मारली. महाराष्ट्रासाठी तो निर्णय बूमरँग ठरला.

हे वाचलंत का?