You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाठलाग करताच गायब होणारं भूत पाहायला 'या' ठिकाणी हजारो माणसं जमतात
- Author, जॉन स्कॉट लेविन्स्की
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
- Published
अमेरिकेच्या उत्तर मिशिगनमध्ये जशी रात्री पडायला सुरुवात होते तशी हायवे 45 वरील दुर्गम ठिकाणी गर्दी जमू लागते. ही गर्दी भूतं बघण्यासाठी जमा झालेली असते.
स्कॉटिश तळ्यातील मायावी नाग असो किंवा गूढ किल्ल्यात राहणारी पांढऱ्या कपड्यातली महिला...अद्भूत गोष्टींमध्ये रस असलेल्यांना यामध्ये आवड असते.
त्यामुळे अमेरिकेतील मिशिगनच्या वरच्या द्वीपकल्पातील हे ठिकाण अलौकिक गोष्टींमध्ये स्वारस्य असलेल्या पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे.
तुम्ही जर योग्य वेळी निश्चित ठिकाणी उभे असाल तर तुम्हाला पॉल्डिंग प्रकाश दिसतो.
दमट वातावरण असो वा हिवाळ्यातील बर्फाळ रात्री...हायवे 45 वरील मोकळ्या मैदानात स्थानिक लोक आणि पर्यटकांची गर्दी जमलेली असते.
जसजसा सूर्यास्त होतो, तिन्हीसांजा आणि रात्र होऊ लागते तसतसा पाच मैल दूर असलेल्या टेकडीवर विविध रंगाचा प्रकाश चमचमताना दिसतो.
आजूबाजूला मोकळा वारा येत असतो. तरीही या प्रकाशाचा आकार कमी होत नाही ना कधी वाढतो. हा प्रकाश वाऱ्याने कधीच विझतही नाही. तुम्ही याचा पाठलाग करू लागला तर मात्र तो अदृश्य होऊ लागतो.
हे नक्की काय आहे हे समजत नाही, पण तो प्रकाश निःसंशयपणे दिसतो. हा प्रकाश पहाटेपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येतो.
अलौकिक प्रकाशाचे रहस्य
फोटोग्राफिच्या व्यावसायिक उपकरणांसह सुसज्ज असलेल्या लोकांनादेखील याचे फोटो घेता आलेले नाहीत. या फोटोंमध्ये तो प्रकाश स्पष्टपणे दिसत नाही.
या अलौकिक प्रकाशामागे वेगवेगळ्या स्थानिक दंतकथा प्रचलित आहेत.
यातली सर्वात लोकप्रिय दंतकथा अशी आहे की, एका रेल्वे ब्रेकमॅनचा अपघातात मृत्यू झाला होता. भविष्यात असे रात्रीचे अपघात होऊ नये यासाठी तो हिरवा कंदील घेऊन उभा असतो, असं म्हणतात.
अर्थात, या परिसरात रेल्वे मार्गाची कोणतीही नोंद किंवा पुरावाच नाही.
या प्रकाशासंबंधी इतरही कथा प्रचलित आहेत. हरवलेल्या मुलांचा शोध घेणारा अदृश्य प्रकाश किंवा झाडाच्या टोकावर राहणारे एलियन अशा नानाविध कथा लोक सांगतात.
पण इथे येणारे पर्यटक मात्र दैनंदिन आयुष्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं पाहतोय या विश्वासाला चिकटून राहतात.
या प्रकाशामागची कथा काहीही असो पण या प्रकाशामुळे हे छोटसं शहर आकर्षणाचं केंद्र बनलंय.
'भूत' पाहण्यासाठी स्थानिक आणि पर्यटक गर्दी करतात.
इथले आजूबाजूचे रेस्टॉरंट्स आलेल्या पर्यटकांचं केटरिंग पाहण्यात व्यस्त आहेत, तर 'पोल्डिंग लाइट' नावाने टोप्या आणि टी-शर्ट विकणारी दुकानांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे.
लोकांचे अनुभव काय आहेत?
जवळच्या एका सिल्व्हेनिया आउटफिटर्स नामक दुकानातील कर्मचारी सारा बेकर सांगते, "मी अनेक वेळा 'पोल्डिंग लाइट' पाहिला आहे. मला तो अलौकिक वाटत नाही. पण हा प्रकाश बघायला मला आवडतं.
काही लोकांना वाटतं की ते कारचे हेडलाइट्स आहे, तर काहींना आणखीन काहीतरी वेगळं वाटतं."
शेवटी 2010 मध्ये, मिशिगन तंत्रज्ञान विद्यापीठातील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी करत असलेल्या जेरेमी बॉसच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या गटाने इथे येऊन या प्रकाशाचा अभ्यास करायला सुरुवात केली.
कॅमेरे, लाइट मीटर सोबतच भल्या मोठ्या दुर्बिणीने सुसज्ज असे विद्यार्थी हा रहस्यमय प्रकाशाचा अभ्यास करायला सज्ज झाले होते.
त्यांना अनुभवजन्य पुरावे सापडले. जेरेमी बॉस सांगतात की, पॉल्डिंग लाइट्स हे प्रत्यक्षात दूरवर असलेले हेडलाइट्स आहेत. वातावरणाच्या प्रभावामुळे इथे एक चकचकीत भ्रम निर्माण होतो.
पीएच. डी. प्राप्त केल्यानंतर जेरेमी बॉस मिशिगन तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतात.
प्रकाश कशामुळे दिसतो याचं कारण त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी दंतकथा संपलेल्या नाहीत.
जेरेमी बॉस सांगतात, "ज्यांनी प्रकाश पाहिला आहे त्यांना मी विचारतो की त्यांनी काय पाहिलं आणि त्यांनी जे पाहिले त्याबद्दल त्यांचं काय मत आहे. जर त्यांनी माझ्याकडे स्पष्टीकरण मागितलं तर मी ते देतो.
बहुतेक लोक पिवळे किंवा लाल दिवे चमकत असल्याचं सांगतात. त्यात हालचाल होण्याचे कारण म्हणजे ऑटो-कायनेटिक इफेक्ट. इथे मृगजळांचं उदाहरण देणं योग्य ठरेल."
गूढ उकलावं असं लोकांना वाटत नाही
मिशिगन तंत्रज्ञान विद्यापीठातील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे प्राध्यापक मायकेल सी. रोगमॅन या विद्यार्थी मोहिमेचे प्राध्यापक सल्लागार होते.
ते सांगतात की, या प्रकाशाविषयी ज्या दंतकथा प्रचलित आहेत त्याहीपेक्षा अधिक मनोरंजक वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे.
ते पुढे सांगतात की, "पृष्ठभागाजवळील हवेतील अति तापमानामुळे तुमच्या डोळ्यांसमोर येणारा प्रकाश म्हणजे मृगजळ होय. ज्या लोकांनी प्रकाश पाहिला आहे त्यांना मी विचारलं की, तापमानाच्या व्युत्क्रमणाबद्दल तुम्ही ऐकलंय का? यात हवेचे तापमान प्रथम कमी होते आणि नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उंचीनुसार वाढत जाते.
आजूबाजूचे रस्ते, स्थानिक हवामान, आणि हायवेवरील संध्याकाळच्या रहदारीमुळे तापमानात वारंवार बदल घडू लागतात याचा परिणाम उलट भ्रमात होतो. पॉल्डिंग प्रकाशाचे हेडलाइट्स ध्रुवीय रेषेपासून हायवेला रेषेवर आणण्यासाठी उलटे केले जातात आणि परत जमिनीकडे वाकतात. लोक जेथे जमतात तेथे त्याचा विशेष प्रभाव दिसून येतो."
जेरेमी बॉस जिज्ञासूंना दुर्बिणीद्वारे किंवा टेलिफोटो लेन्सद्वारे दृश्य पाहण्याचा आग्रह करतात आणि त्यांना आश्वासन देतात की त्यांना फक्त कारचे हेडलाइट्स आणि ब्रेक लाईट्स दिसतील.
रोगमॅन यांचा असा विश्वास आहे की प्रकाशाबद्दलची आख्यायिका टिकून राहण्याचे कारण म्हणजे स्थानिक लोकांनी याला भयकथा म्हणून पुढे आणलंय.
ते म्हणाले, "मला वाटतं की लोक स्थानिक आख्यायिकेचा आनंद घेतात कारण हा प्रकाश पूर्णपणे निरुपद्रवी आणि सौम्य आहे. भूतांचे अस्तित्व आपण नाकारू शकत नाही हे मान्य करावं लागेल."
मिशिगन येथील वरिष्ठ सामग्री विशेषज्ञ सिंडी पर्किन्स मिशिगन तंत्रज्ञान विद्यापीठाने दिलेलं स्पष्टीकरण स्वीकारतात. परंतु त्या त्यांच्या मुलीसोबत अधूनमधून संध्याकाळी मनोरंजनासाठी फिरायला जातात. त्यांच्या मते, अनेक पर्यटक ज्यांना वैज्ञानिक स्पष्टीकरणाची चाचणी घ्यायची आहे ते त्या ठिकाणी येतात कारण त्यांचा अलौकिक गोष्टींवर विश्वास आहे.
पर्किन्स ठामपणे सांगतात, "जे लोक पॉलडिंग लाइटवर विश्वास ठेवतात त्यांना हे गूढ उकलू नये असं वाटतं. ते असा युक्तिवाद करतात की, संशोधकांनी जो प्रकाश पाहिला तो खरा नव्हता."
जेरेमी बॉस या प्रकाशाला सर्वज्ञतावादाशी किंवा नैसर्गिक घटनांना ओळख किंवा चेतना देणार्या अलौकिक शक्तीवरील विश्वासाशी जोडतात.
ते म्हणतात, "ही सर्वात प्राचीन मान्यता आहे आणि हा प्रकाश मानवी प्रवृत्तीचे एक अतिशय आधुनिक उदाहरण आहे."
सारा बेकर यांनी हा प्रकाश पुन्हा एकदा पाहायला जायची योजना आखली आहे. त्या म्हणतात, "मी तिथे एकदा गेले होते तेव्हा मला 20 डॉलर्स मिळाले होते. त्यामुळे बाकी काही असेना, माझं तरी ते आवडतं ठिकाण आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)