You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी शरीर सोडलं होतं आणि...' मृत्यूला स्पर्श करून आलेल्या व्यक्तीचा अनुभव काय होता?
"मी एक बिल्डर म्हणून फेल ठरलो होतो. पैसे संपले होते आणि माझा फ्लॅट जप्त होणार होता."
डेव्हिड डिचफिल्ड यांचे हे शब्द आहेत. ही गोष्ट आहे 2006 सालची. त्यावेळी ते 46 वर्षांचे होते. त्यांना दारूचं व्यसन जडलं होतं. ब्रिटन मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ सुरू होती.
हताश झालेले डेव्हिड आपल्या बहिणीसोबत केंब्रिजशायरच्या बाहेर राहायला गेले. इथे त्यांच्यासोबत एक वाईट घटना घडली. ते त्यांच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले होते. तिथे त्यांचा कोट ट्रेनच्या दरवाजात अडकला आणि ट्रेनचे दरवाजे बंद झाले.
ट्रेन धावू लागली तसे डेव्हिड फलाटावरून घसरले आणि रुळांवर पडले. त्यांना सगळीकडे लागलं होतं, हात तुटला होता. जखमी अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना अतिशय अनोखा आणि अनपेक्षित आध्यात्मिक अनुभव आला.
आपल्या अनुभवाविषयी बोलताना डेव्हिड सांगतात, "मी माझ्या शरीरातून बाहेर पडलो होतो. मी रुग्णालयातील गजबजाटापासून दूर होतो. माझ्या शरीरात जाणवणाऱ्या भयानक वेदना संपल्या होत्या आणि मी एका शांत ठिकाणी उभा होतो."
"मी वर पाहिलं तर माझ्या सभोवताली प्रकाशाच्या तीन रेषा समान रीतीने पसरल्या होत्या. त्या रेषा अतिशय तेजस्वी आणि प्रखर होत्या. मला त्या रेषा अतिशय पवित्र वाटल्या. मी त्या रेषांच्या माध्यमातून पाहू शकत होतो. माझ्या अवतीभोवती पसरलेला प्रकाश माझ्या शरीरातून आरपार जाऊन मला बरं करत होता."
"तिथे आलेला देवदूत मला त्रासदायक वाटत होता. मला जाणवलं की, ते माझ्या शरीराच्या जखमा ठीक करत आहेत आणि माझ्या आयुष्यातील वेदनांचे स्तर एक एक करून कमी करत आहेत. जणू माझ्या अंतरात्म्यापर्यंत ते पोहोचले होते. मला पहिल्यांदाच माझ्या संपूर्ण अस्तित्वाची जाणीव झाली."
डेव्हिडला शेवटच्या टप्प्यावर आलेली जाणीव सर्वात प्रगल्भ होती. ते सांगतात की जणू ते नक्षत्र आणि ग्रह यांच्यामध्ये फिरत आहेत. प्रकाशाचे पांढरे बोगदे अनंतात पसरलेले होते.
ते सांगतात, "पांढऱ्या प्रकाशाच्या या बोगद्यातून येणार्या ऊर्जेने माझ्या शरीराचं प्रत्येक अंग कंप पावत असल्याचं मला जाणवलं. मी सर्व सृष्टीचे उत्सर्जन केंद्र पाहत असल्याचा भास मला झाला. प्रकाशाच्या एका मोठ्या बोगदयात देव पाहून मी भारावून गेलो होतो "
डेव्हिडला मिळालेला हा आध्यात्मिक अनुभव त्यांना वारंवार येत राहतो. ते म्हणतात की, ते सतत आत्म-समाधान, अस्तित्वाचा हेतू आणि विश्वाच्या उर्जेशी एकरूपतेचा अनुभव घेतात. आता ते बरे झालेत, त्यांचा हात पूर्ण क्षमतेने काम करू लागलाय. आता त्यांना मृत्यूची अजिबात भीती वाटत नाही असं ते सांगतात.
डेव्हिडने कधीच संगीताचा अभ्यास केला नव्हता, पण आता ते शास्त्रीय सिम्फनी वाजवतात. त्यांना अनुभव आलेल्या अनेक चित्रांना ते रंगात कैद करतात.
स्थानिक पातळीवर त्यांच्या मैफिली आयोजित केल्या जातात. वॉशिंग्टनमधील बायबलच्या संग्रहालयात त्यांच्या काही चित्रांचं प्रदर्शन देखील भरलं होतं.
डेव्हिड त्यांच्या अनुभवांचं वर्णन करताना धार्मिक ऐवजी आध्यात्मिक असं करतात.
आंतरिक जागरूकता
ट्रान्सपर्सनल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करणारे डॉ. स्टीव्ह टेलर तीव्र वेदना आणि त्यावेळी आलेला आध्यात्मिक अनुभव यांच्यातील दुवा शोधतात. डेव्हिड सारखा अनुभव अनेकांना आल्याचं ते सांगतात. ज्या लोकांना असे अनुभव येतात ते स्वतःची अध्यात्मिक व्यक्ती अशी ओळख करून देतात.
"जेव्हा तुम्ही मृत्यू इतक्या जवळून पाहता तेव्हा आलेला अनुभव इतका जबरदस्त असतो की तुम्हाला वास्तविकतेची होणारी जाणीव अत्यंत तीव्र असते. यामुळे तुम्ही वास्तविक जग वेगळ्या पद्धतीने पाहू लागता."
लीड्स बेकेट विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम करणारे डॉ. टेलर सांगतात, "धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांना असा अनुभव नंतरच्या आयुष्यात येण्याची शक्यता असते. अशा अलौकिक अनुभवानंतर ती व्यक्ती धार्मिक बनते असं नाही."
ते म्हणतात की, काही लोक धार्मिकदृष्ट्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्याची व्याख्या करणं कठीण असतं. एखाद्या नव्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा ते सर्व विश्वासांपासून मुक्त होणे पसंत करतात. वैज्ञानिक सिद्धांत सांगतो की, मेंदूला ऑक्सिजन मिळणं बंद होतं तेव्हा मृत्यू होतो.
मात्र, यावर केलेलं संशोधन अपूर्ण असून यावर कोणतेही स्पष्ट वैज्ञानिक निष्कर्ष आलेले नाहीत असं ते सांगतात. अशा बाबींवर फारशी चर्चाही केली जात नाही. कारण, विज्ञान ज्या पद्धतीने वास्तवाकडे पाहतं त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन इथे असतो.
डॉ. टेलर म्हणतात की, "हे अनुभव सांगतात की चेतनेचा अनुभव हा केवळ मेंदूने निर्माण केलेला अनुभव नसतो. या चेतना शरीराचा मृत्यू झाल्यानंतर अनुभवता येतात."
रिकामेपणा
गिगी स्ट्रेहलरचा अनुभव असाच काहीसा आहे. तिला वाटतं की, या प्रकारच्या अनुभवांवर चर्चा करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. या अभिनेत्रीने 2014 मध्ये 'नियर-डेथ एक्सपीरियंस यूके' नावाचा ग्रुप तयार केला होता. तिने रुग्णालयात मृत्यूला जवळून अनुभवलं होतं.
ती सांगते, "प्रकाशाचा बोगदा म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं तसं मला काहीच दिसलं नाही. उलट मला रिकामेपणा जाणवला. मी कुठे आहे हे मला माहित नव्हतं. तिथे केवळ शांतता आणि प्रेम होतं. मी हसत नव्हते, पण तरीही मी तिथे होते."
गिगी सांगते, "ते जग या जगापेक्षा रिकामं आणि खरं वाटलं होतं. मी या जगात परतल्यानंतर हे जग स्वप्नवत भासलं होतं."
या अनुभवानंतर गिगीमध्ये खूप बदल झाला. तिला क्वांटम फिजिक्स समजू लागले. कित्येक वर्ष तिने याच्या अभ्यासात घालवले. धार्मिक परंपरेत तसेच गूढवादातही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तिला कुठूनही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. आजही गीगी पारंपारिक धर्माबाबत संदिग्ध आहे.
"माझ्या अनुभवाने मला खात्री पटली आहे की आपली जाणीव आणि अस्तित्व सर्व मानवी कल्पनेपेक्षा वेगळं आहे. आणि आपण सर्व एकमेकांशी खूप जवळून जोडलेले आहोत."
डेव्हिड डिचफिल्ड यांनाही असंच वाटतं. आता ते खूप आध्यात्मिक बनले आहेत आणि धार्मिक परंपरांचा आदर करतात, परंतु ते स्वतः इतके धार्मिक झालेले नाहीत.
अशा प्रकारच्या आध्यात्मिक अनुभवांबद्दल बोलताना डॉ. स्टीव्ह टेलर आणि डेव्हिड गुंग होतात, तर गिगीला हे अनुभव अद्वितीय वाटतात. हे अनुभव इतके रहस्यमय आहेत की बहुतेक लोक ते स्वीकारू शकत नाहीत.
ते सांगतात की, "मानवजातीच्या रूपात आपण वास्तविक जगाचं वर्णन करू शकतो, पण प्रत्यक्षात आपण तसं करत नाही. काही गोष्टी इतक्या विचित्र असतात की आपल्याला त्या समजत नाहीत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)