विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावली

Published

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत पुन्हा खालावल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

"विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी औषधे चालू आहेत," असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितलं आहे.

विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत.

दरम्यानच्या काळात गोखले यांचं निधन झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, या बातम्या खोट्या असल्याचं गोखले कुटुंबीयांकडून जाहीर करण्यात आलं होतं.

विक्रम गोखले यांच्या मुलीनं काल त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना म्हटलं होतं की, "ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अजूनही गंभीर आहेत आणि लाइफ सपोर्टवर आहेत, त्यांचे अद्याप निधन झाले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा."

विक्रम गोखले कोण आहेत?

विक्रम गोखले यांनी गोखलेंच्या तीन पिढ्यांचा अभिनयाचा वसा पुढची सात दशकं जपला. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक चढ उतार पाहिले. एक काळ असाही आला जेव्हा ते रंगमंच सोडून थेट शेतात जाऊन रमले.

विक्रम गोखले यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत आणि मालिकेत भूमिका केल्या होत्या.

त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले हे सुद्धा मराठी रंगभूमीवरचे महत्त्वाचे कलाकार होते. दुर्गाबाई कामत यांनी 1913 साली प्रसिद्ध झालेल्या मोहिनी भस्मासूर सिनेमात भूमिका केली होती.

विक्रम यांच्या हिंदी-मराठी चित्रपटातील अनेक भूमिका गाजल्या . 30 वर्षांपूर्वी रिलीज झालेला खुदा गवाह हा त्यावेळेच्या सर्वांत लोकप्रिय हिंदी चित्रपटांपैकी एक होता.

मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. विक्रम गोखले यांची भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)