You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रक्त पिणाऱ्या व्हॅम्पायरची दंतकथा कधी आणि का पसरली ?
- Author, मिलिशा रादेंकोविक जेरेमिक
- Role, बीबीसी न्यूज सर्बियन
- Published
18 व्या शतकाच्या सुरूवातीला, सर्बियामध्ये डझनावारी लोकांचा मृत्यू रहस्यमयपणे होऊ लागला होता. त्यांच्या मृत शेजाऱ्यांनी कथितरित्या पछाडल्याचा आणि मृत्यू होण्यापूर्वी त्यांचा श्वास गुदमरल्याचा किंवा श्वासोच्छवास जड झाल्याचा अनुभव आला होता.
खासकरून दक्षिण सर्बियातील मेडवेडजा आणि ईशान्येतील किसिलजेवा ही दोन गावं या कथित मृत्यूंच्या केंद्रस्थानी होते. या दोन्ही गावांमध्ये 200 किलोमीटरचं अंतर होतं मात्र एकाच दशकामध्ये एकाच प्रकारच्या औत्सुक्यपूर्ण घटनांची तिथे नोंद झाली होती.
या मृत्यूमागच्या कारणाचा तपास करण्यासाठी ऑस्ट्रियन डॉक्टरांना तिथं पाठवण्यात आलं होतं आणि त्यांना जे काही सापडलं त्याचे त्यांनी विस्तृत अहवाल तयार केले होते. या तपासाला लगेचच ऑस्ट्रियन वृतपत्रांमध्ये स्थान मिळालं आणि नंतरच्या शैक्षणिक वर्तुळात देखील मिळालं.
'व्हॅम्पायर्स: द ओरिजिन ऑफ द युरोपियन मिथ' या पुस्तकाचे लेखक आणि जर्मन इतिहासकार थॉमस एम बॉन म्हणतात, अशा रितीनं 1725 मध्ये 'विएनरिशेस डायरियम' या ऑस्ट्रियन दैनिकात पहिल्यांदा व्हॅम्पायर हा शब्द समोर आला.
व्हॅम्पायर हा एक पौराणिक प्राणी असून तो सजीवांचं रक्त पिऊन जिवंत राहतो असं मानलं जातं.
जगभरातील संस्कृतींमध्ये व्हॅम्पायर दिसल्याचे किस्से नोंदवले गेले आहेत. मात्र 18 व्या शतकात आलेल्या या अहवालांनंतर पश्चिम युरोपात व्हॅम्पायर हा शब्द लोकप्रिय झाला.
'सैतानाचं काम'
1725 मध्ये किसिलजेवोमध्ये दोनच दिवसात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी हे सर्वजण कथितरित्या एका विशिष्ट शेजाऱ्याबद्दल बोलले होते.
ते म्हणाले होते की पेटार ब्लागोजेविक नावाचा माणूस ज्याचा मृत्यू आधीच झालेला होता, तो त्यांच्या स्वप्नात आला होता आणि त्याने त्यांना गुदमरण्यास सुरूवात केली होती.
त्यामुळे स्थानिकांनी ब्लागोजेविकची कबर उघडली आणि त्यांना तिथे एक अतिशय व्यवस्थित जतन केलेला मृतदेह सापडला जो 'सैतानाच्या कामाचा पुरावा' म्हणून ओळखला जातो.
"चेहरा, हात आणि पाय किंबहुना सर्व शरीर, ते जर जिवंत असते तर यापेक्षा अधिक जतन करता आले नसते," असं उत्खननाच्या वेळेस हजर असलेल्या एका ऑस्ट्रियन अधिकाऱ्यानं लिहिलं होतं.
"मला प्रचंड आश्चर्य वाटलं की त्याच्या तोंडात मला ताजं रक्त सापडलं, जे सर्वसाधारण धारणेप्रमाणे त्यानं ज्यांना ठार केलं त्यांच्याकडून शोषलं होतं."
डब्लिनमधील ट्रिनिटी महाविद्यालयातील प्राध्यापक क्लेमेन्स रुथनर यांना वाटतं की जेव्हा ऑस्ट्रियन डॉक्टर्स कबर उघडत होते आणि काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्थानिक दुभाषांशी बोलत होते तेव्हा व्हॅम्पायर या शब्दाचा जन्म झाला असावा.
"दुभाषा बहुधा 'यपार' असंकाही तरी पुटपुटला, राक्षसासाठीचा तो स्लोवन शब्द आहे आणि त्या गैरसमजात 'व्हॅम्पायर' या शब्दाचा जन्म झाला," असं ते म्हणतात.
स्वत:ला 'प्रबुद्ध' समजणारे ऑस्ट्रियन अधिकारी आणि ऑस्ट्रियन लोक ज्यांना 'आदिम' किंवा 'मागासलेले' समजत होते ते स्थानिक गावकरी यांच्या भाषिक व्यवहारातून एक नवीन प्राणी अस्तित्वात आला, असं ते पुढे सांगतात.
पेटारला थांबवण्यासाठी गावकऱ्यांनी कथितरित्या त्याच्या हृदयातून एक भाग घेतला आणि त्याचं शरीर जाळून टाकलं आणि त्यातून गावातील व्हॅम्पायरच्या बातम्यांचा शेवट झाला.
प्राध्यापक बॉन यांच्या मते, जरी या घटनांनी लक्ष वेधून घेतलं तरी मोठ्या प्रमाणात लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी 'व्हॅम्पायरिझम'साठीचा क्षण अद्याप आलेला नव्हता. 'व्हॅम्पायरिझम' ही संकल्पना व्हॅम्पायर्सवरील विश्वासाचा संदर्भ देण्यासाठी वापरली जाते.
त्या काळातील प्रबोधनाच्या वातावरणात तर्कशुद्धरित्या स्पष्ट करता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट स्वीकारली गेली नाही.
व्हॅम्पायर की बळीचा बकरा?
सात वर्षांनी जानेवारी 1732 मध्ये मेडवेडजा गाव भीतीनं ग्रासलं होतं.
फक्त तीन महिन्यांमध्ये 17 लोकांचा, ज्यातील काहीजण तरुण आणि निरोगी होते, कोणतंही कारण दिसत नसताना मृत्यू झाला होता.
किसिलजेवोमधील घटनांप्रमाणेच मरणाऱ्यांपैकी काहींनी गुदमरल्यासारखे वाटले होते तर काहींनी छातीमध्ये तीव्र वेदना झाल्याची तक्रार केली होती.
कबरीचं उत्खनन करण्याच्या आदेशाचं पालन केल्यानंतर, डॉक्टर जोहान्स फ्लकिंजर यांनी एक अहवाल लिहिला ज्यात व्हॅम्पायरिझमच्या प्रकरणांमध्ये मुख्य गुन्हेगार हा म्हणून एका सैनिकाचा किंवा शस्त्रधाऱ्याचा उल्लेख त्यांनी केला.
त्याचं शरीर अद्याप कुजलेलं नव्हतं आणि त्याच्या डोळ्यातून, नाकातून, तोंडातून आणि कानातून ताजं रक्त वाहत होतं.
मेडवेडजा गावातील लोकांनी त्याच्याकडे खरोखरंच एक व्हॅम्पायर असल्याचा पुरावा म्हणून पाहिलं होतं. त्यामुळेच त्यांनीसुद्धा त्याच्या ह्रदयाचा काही भाग काढला आणि त्याचं शरीर जाळून टाकलं.
"या व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यूविषयी फारच थोडं माहित आहे. त्याचा मृत्यू पडल्यामुळे झाला होता आणि गावकऱ्यांनी त्याला बळीचा बकरा केला होता," असं थॉमस बॉन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
त्यांना वाटतं की हा माणूस अर्नाट पावेल होता. तो कोसोवोहून आलेला एक अल्बॅनियन होता.
"किसिलजेवोमधील पेटार ब्लागोजेविक आणि मेडवेडजामधील अर्नाट पावेल हे व्हॅम्पायर या प्रजातीचे पहिले ज्ञात प्रतिनिधी होते," असं ते म्हणतात.
वैज्ञानिक स्पष्टीकरण
जे मृतदेह कुजत नव्हते त्यांच्याबद्दल गावकऱ्यांना भीती वाटत असताना तत्कालीन पॅथोलॉजिस्ट्स या गोष्टीकडे लक्ष वेधतात की ज्या राज्यात हे मृत आढळले तिथे ही नवखी गोष्ट नव्हती.
"ख्रिस्तियन रिटर या प्रख्यात व्हिएनीज पॅथोलॉजिस्टला वाटतं की या सर्व प्रकरणांमागे अँथ्रॅक्स हा साथीचा रोग होता. भूतकाळात युद्धाआधी आणि युद्धानंतरच्या काळात ही घटना नेहमीची होती," असं प्राध्यापक रुथनर म्हणतात.
अँथ्रॅक्स हा एक विषाणूंमुळे होणारा आजार असून तो संसर्ग झालेल्या प्राण्यांमधून माणसांमध्ये हस्तांतरित होतो आणि त्यामुळे अनेकदा मृत्यू होतो.
रुथनर यांना वाटतं की मृत्यूआधी गुदमरल्याच्या ज्या बातम्या होत्या त्या निमोनियाशी संबंधित असू शकतात.
"जर तुम्ही बातम्या काळजीपूर्वक वाचल्या तर तुम्हाला दिसेल की कोणीही व्हॅम्पायरला स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं. त्यांनी रक्त शोषल्याची कल्पना हा ऑस्ट्रियन डॉक्टर्सनी लावलेला अर्थ होता," असं ते म्हणतात.
थॉमस बॉन यांना असंही वाटतं की रक्त शोषण्याचं मिथक पाश्चात्य लोकांनी तयार केलं होतं.
इवान नेसिक या मेडवेडजा मधील स्थानिक इतिहासकारानुसार, तरीदेखील व्हॅम्पायर असण्याचा विश्वास आणि भीती जनमानसात कायम आहे.
ते या गोष्टीकडे वेधतात की पेटार ब्लागोजेविक आणि अर्नाट पावेल यांच्या मृत्यूच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुद्धा स्थानिकांनी व्हॅम्पायर पासून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
"सर्बियन व्हॅम्पायर (साम्य असल्याचे मानले जाते) त्वचेचा फुगलेला बुडबुडा आणि रक्ताने भरलेला असतो," असं ते म्हणतात.
"असं मानलं जातं की जर कुठेही पंक्चर झाला तर तो एखाद्या फुग्याप्रमाणे सपाट होतो. त्यामुळेच संरक्षणासाठी लोकांनी दरवाजे, खिडक्या आणि वेशीवर नागफणी लावल्या होत्या."
तुर्की धोक्याला पर्याय
किसिलजेवो आणि मेडमेडजा ही दोन्ही गावं सीमावर्ती भागात होती जो शतकानुशतकांच्या ऑटोमन शासनानंतर 1700 च्या काळातील हॅब्सबर्ग राजवटीच्या अधिकाराखाली आला होता.
प्राध्यापक रुथनर यांना वाटतं की व्हॅम्पायर्सच्या कथित दिसण्याकडे लक्ष वेधलं गेलं कारण या प्रकारच्या घटना या प्रकारच्या वादग्रस्त प्रदेशात घडल्या होत्या.
"ऑटोमन साम्राज्य आणि पाश्चात्य देशांमधील मोठ्या संघर्षाची पार्श्वभूमी या प्रकारच्या घटनांना आहे," असं ते म्हणतात.
प्राध्यापक बॉन या गोष्टीकडे देखील लक्ष वेधतात की 1683 मध्ये व्हिएन्नाच्या दुसऱ्या अयशस्वी ऑटोमन वेढ्यानंतर व्हॅम्पायर्स खिश्चन धर्मासाठी तुर्की धोक्याचा पर्याय ठरले.
18 व्या शतकाच्या मध्यावर हॅब्सबर्ग राजवटीत व्हॅम्पायर्स पाहिल्याची एक नवीन लाट उदयास आली. मात्र अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी या कल्पित प्राण्याविरुद्धची सर्व लढाई निषिद्ध होती.
मात्र लवकरच व्हॅम्पायर्सचे वेगळ्या रूपात पुनरुत्थान झालं.
"रोमँटिक काळातील व्हॅम्पायर्स देखणे, फिकट गुलाबी कातडीचे सरंजामदार होते आणि लाल चेहऱ्याचे फुगलेले सर्बियन गावकरी नव्हते," असं रुथनर म्हणतात.
1819 मध्ये इंग्रजी लेखक जॉन पॉलिडोरी यांच्या 'द व्हॅम्पायर' या प्रकाशनामुळे आधुनिक काल्पनिक कथांमधील करिश्मा असलेल्या आणि अत्याधुनिक व्हॅम्पायरचा जन्म झाला.
ब्राम स्टोकरची 1897 मधील ड्रॅक्युला ही कादंबरी सर्वोकृष्ट व्हॅम्पायर कादंबरी म्हणून गणली जाते आणि आजपर्यंतच्या आधुनिक व्हॅम्पायर दंतकथेला आधार देते.