You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्वास : आजोबा-नातवाची साधी गोष्ट कशी ठरली मराठी सिनेमासाठी 'टर्निंग पॉइंट'
- Author, अक्षय शेलार
- Role, चित्रपट अभ्यासक
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
2000 च्या दशकाच्या सुरुवातीला मराठी चित्रपटसृष्टी एका विचित्र वळणावर उभी होती. तमाशापट, सामाजिक नाट्यांचे रूपांतर, (तथाकथित) विनोदी चित्रपट, अंधश्रद्धाप्रधान भक्तीपट आणि कौटुंबिक चित्रपट यांच्या पलीकडे फार काही घडत नव्हतं.
प्रेक्षक थिएटरकडे फिरकत नव्हता, निर्माते धास्तावलेले होते आणि एकूणच उद्योगाला एका मरगळीनं घेरलं होतं. अशा वातावरणात संदीप सावंत या तोवर अनोळखी असलेल्या दिग्दर्शकाचा 'श्वास' हा चित्रपट 2004 साली टप्प्याटप्प्यानं प्रदर्शित झाला.
या चित्रपटाचं यश केवळ एका चित्रपटाचं यश न राहता मराठी चित्रपटसृष्टीसाठी नव्या युगाची नांदी ठरलं.
'श्वास'ची कथा अगदी साधी आहे. कोकणातील एका खेड्यात राहणारा परशुराम ऊर्फ परश्या (अश्विन चितळे) हा 7-8 वर्षांचा मुलगा. त्याची दृष्टी धूसर होऊ लागली असल्याचं त्याच्या आजोबांच्या (अरुण नलावडे) लक्षात येतं आणि ते त्याला घेऊन पुण्यात डॉक्टरांकडे जातात.
तपासणीअंती कळतं की, त्याला रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यांचा दुर्मिळ कर्करोग झाला आहे. हा आजार जीवघेणा असल्यानं शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय असतो, पण या शस्त्रक्रियेत त्याचे दोन्ही डोळे काढावे लागणार असतात. म्हणजेच त्याचा जीव वाचेल, पण तो कायमचा अंध होईल.
ही बातमी ऐकून आजोबा कोलमडून पडतात. परश्याचे वडील अपघातात अधू झाले असल्यानं आणि आई लहानपणीच गेलेली असल्यानं त्याला सांभाळण्याची, या निर्णयाला सामोरं जाण्याची जबाबदारी मुख्यतः आजोबांवरच येऊन पडते.
डॉ. साने (संदीप कुलकर्णी) आणि सामाजिक कार्यकर्ती आसावरी (अमृता सुभाष) यांच्यासोबत या वृद्ध आजोबांचा होणारा संवाद, त्यांची घालमेल आणि शेवटी परश्याला हे सत्य न कळवता त्याच्यासाठी काही आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न, हा चित्रपटाचा गाभा आहे.
चित्रपटाच्या शीर्षकातच त्याचा आत्मा सामावलेला आहे. श्वास म्हणजे जगण्याची सर्वात मूलभूत खूण.
परश्याला अंधत्व आले तरी तो जिवंत राहील, श्वास घेत राहील. परंतु, हे जगणं आधीसारखं कधीच असणार नाही. हा बदल त्याला कसा समजावून सांगायचा, कधी सांगायचा आणि मुळात सांगायचा की नाही, हे प्रश्न चित्रपटात आजोबांना सतावत राहतात.
लहान मुलाला अशा प्रकारच्या आयुष्यभर बदलणाऱ्या वास्तवाला सामोरं जाण्यास कसं तयार करायचं, याबाबतचा हा प्रश्न केवळ वैद्यकीय नसून तो नैतिक आणि भावनिकदेखील आहे.
चित्रपट या प्रश्नासमोर उभ्या असलेल्या एका साध्या खेडूत माणसाचे चित्रण करतो.
आजोबांचं पात्र चित्रपटाचा गाभा आहे. ते अशिक्षित नसले, तरी शहरी वैद्यकीय व्यवस्थेशी अपरिचित असे एक साधे खेडूत आहेत.
हॉस्पिटलमध्ये दाखल करताना त्यांना एक संमतीपत्र सही करायला सांगितले जाते, ज्यात डॉक्टरांची जबाबदारी मर्यादित असल्याचा उल्लेख असतो.
हे वाचून आजोबा अस्वस्थ होतात, कारण आपल्या नातवाच्या आयुष्याची जबाबदारी कुणीच घेत नाही, ही गोष्ट त्यांना झेपत नाही. इथे सामाजिक कार्यकर्ती आसावरी मध्यस्थी करते आणि त्यांना शांत करते.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच येणारा हा प्रसंग छोटा असला तरी महत्त्वाचा आहे, कारण तो शहरी वैद्यकीय व्यवस्था आणि ग्रामीण भारतातील सामान्य माणूस यांच्यातील दरी अधोरेखित करतो.
हीच दरी, हाच गोंधळ अनेक ग्रामीण कुटुंबांना शहरातील रुग्णालयांमध्ये जाणवतो आणि 'श्वास' हा मुद्दा कुठल्याही आक्रस्ताळेपणाशिवाय अगदी सहजपणे दाखवतो.
डॉक्टरांची भूमिका साकारणारे संदीप कुलकर्णी हे चित्रपटात संयमी आणि संवेदनशील डॉक्टरांच्या प्रतिमेचे प्रतिनिधित्व करतात.
ते आजोबांना सत्य सांगताना अत्यंत काळजीपूर्वक शब्द निवडतात, त्यांच्या भावनांचा आदर राखतात. आसावरी या सामाजिक कार्यकर्तीची व्यक्तिरेखा डॉक्टर आणि रुग्णाचं कुटुंब यांच्यातील दुवा बनते.
या दोन्ही व्यक्तिरेखा चित्रपटात वैद्यकीय व्यवस्थेला एक मानवी चेहरा देतात. मात्र, त्याचवेळी या व्यवस्थेतील गुंतागुंत, त्यातील ताण, डॉक्टरांवर असलेला मानसिक भार यांचं सखोल विश्लेषण अथवा चित्रण चित्रपट करत नाही. ही एक मर्यादा म्हणावी लागेल.
डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ती यांच्या भूमिका इथे आजोबा आणि परश्या यांच्या नात्याला आधार देण्यापुरत्याच मर्यादित राहतात.
असं असलं तरी, आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं सहानुभूतीशील असणं किती गरजेचं आहे, हे या चित्रपटातून चपखलपणे अधोरेखित होतं.
चित्रपटातील सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी आजोबा परश्याला रुग्णालयातून बाहेर घेऊन जातात तो प्रसंग.
ऑपरेशन पुढे ढकललं जातं. आजोबा परश्याची अस्वस्थता, चिडचिड कमी व्हावी म्हणून त्याला घेऊन बाहेर पडतात.
हा दिवस ते दोघे एकत्र घालवतात, जणू आयुष्यभरासाठी पुरतील इतक्या आठवणी जमवण्याचा प्रयत्न करतात. तो एका प्लास्टिकच्या तुतारीसोबत खेळत, निरागसपणे हसत फिरत राहतो.
हा दिवस संपवून ते दोघे परत रुग्णालयात येतात तेव्हाचा एक शॉट चित्रपटातील सर्वात मार्मिक क्षणांपैकी एक आहे.
डॉक्टरांना पाहताच परश्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळतो. या एका छोट्याशा प्रसंगात परश्या, आजोबा आणि डॉक्टर या तिन्ही पात्रांचे स्वभाव, त्यातील बदल एकवटलेले आहेत.
'श्वास'चं वेगळेपण आणि प्रवास
'श्वास'चं सर्वात मोठं यश त्याच्या साधेपणात आहे. कुठलंही गाणं नाही, साचेबद्ध नायक-नायिका नाहीत, ओळखीचे चेहरे जवळपास नाहीतच.
अरुण नलावडे आणि अश्विन चितळे यांच्यासारखे अनोळखी कलाकार घेऊन अत्यंत मर्यादित बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाला.
कोकणातील सिंधुदुर्ग, पुणे आणि पुण्यातील के. ई. एम. रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत म्हणजे मार्च ते एप्रिल दरम्यान जवळपास 35 दिवसांमध्ये याचं चित्रीकरण झालं.
या बाबी चित्रपटाची ताकद ठरल्या. भपका नसल्यानं, गाणी आणि अतिनाट्यमय वळणं नसल्यानं चित्रपट आजोबा-नातवाच्या नात्यावर, त्यांच्या परस्परांवरील विश्वासावर आणि त्या दोघांमधील शांत, खोल आपुलकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकला.
'श्वास'मधील घटना डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या आयुष्यात घडलेली आहे. ते त्यांच्या व्याख्यानांमध्ये ही घटना सांगत.
ही गोष्ट माधवी घारपुरे बाईंच्या कानावर गेली. ती ऐकून त्यांनी यावर कथा लिहिली. बाईंच्या कथा वाचताना ही कथा दिग्दर्शक संदीप सावंतांना आवडली. मूळ कथेत वडील आणि मुलगा होते, पण आसावरीची व्यक्तिरेखा अस्तित्त्वात नव्हती. या कथेचे नाव होते 'किमयागार'.
सुरुवातीला ही एक टेलिफिल्म म्हणून योजली गेली होती, पण नंतर तिचं रूपांतर पूर्ण लांबीच्या चित्रपटात झालं. या प्रवासात अनेक अडचणी आल्या.
असंख्य संभाव्य गुंतवणूकदारांकडे हा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर अखेर 8 निर्मात्यांनी एकत्र येऊन हा चित्रपट उभा केला.
यातच चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेचं इंडी स्वरुप (इंडिपेंडन्ट फिल्ममेकिंग अर्थात स्वतंत्र, स्वायत्त पद्धतीनं केली जाणारी निर्मिती) लक्षात येतं.
कुठल्याही मोठ्या स्टुडिओचा पाठिंबा नसताना, कुठलाही मोठा स्टार नसताना हा चित्रपट केवळ कथेच्या ताकदीवर आणि टीमच्या जिद्दीवर पूर्ण झाला.
चित्रपट पूर्ण झाल्यानंतरचा प्रवासही तितकाच लक्षणीय आहे. हा चित्रपट सुरुवातीला मोठ्या शहरांतील मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित न होता गावोगावी, विवाह मंडपांत, शाळांच्या सभागृहांत दाखवला गेला.
तेव्हा मल्टिप्लेक्सची संस्कृती आताइतक्या जोमाने फोफावली नव्हती. सिंगल स्क्रीन थिएटर्स अस्तित्वात होते.
सिनेमाचे गावोगावी खेळ करून प्रसिद्धी करायची ही कल्पना दिग्दर्शक संदीप सावंत यांची होती. त्याचा खूप उपयोग झाला.
हळूहळू तोंडी प्रसिद्धीनं (वर्ड ऑफ माउथ) तो प्रेक्षकांपर्यंत पोचला. पुढे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
1954 साली 'श्यामची आई' या चित्रपटाला हा बहुमान मिळाला होता, त्यानंतर तब्बल 50 वर्षांनी हा सन्मान पुन्हा एका मराठी चित्रपटाला मिळाला.
यानंतर आलेली ऑस्करची चर्चा म्हणजे या चित्रपटाच्या प्रवासातील आणखी एक नाट्यमय वळण ठरली. भारताच्या अधिकृत प्रवेशिकेच्या रूपात 'श्वास' ऑस्करसाठी पाठवला गेला आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा विभागातील अंतिम 5 चित्रपटांपर्यंत पोचण्याच्या शर्यतीत समर्थपणे उभा राहिला.
या चित्रपटाला ऑस्करसाठी प्रसिद्धी देण्यासाठी निधी उभारणं हे या टीमपुढील एक मोठं आव्हान होतं.
सचिन तेंडुलकरनं यासाठी लिलाव आयोजित केला, अमिताभ बच्चन यांनी देणगी दिली, मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगीपेटी ठेवण्यात आली, शाळकरी मुलांनी दिवे विकून, गाड्या धुवून पैसे जमा केले.
ही सगळी मदत म्हणजे एका छोट्या चित्रपटाला मराठी समाजानं दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याचं उदाहरण होतं.
मात्र, 'श्वास'चं महत्त्व केवळ या पुरस्कारांत आणि या प्रसिद्धीत सामावलेलं नाही. खरी गोष्ट या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत जे बदल घडवले त्यात आहे.
समीक्षक गणेश मतकरी यांनी या दशकातील मराठी सिनेमाबाबत लिहिताना नमूद केलं आहे की, 'श्वास'नंतर आलेला नव्या प्रकारचा मराठी सिनेमा हा जवळपास एखाद्या चळवळीच्या स्वरूपात समोर आला.
अनेक दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी पारंपरिक व्यावसायिक गणितं बाजूला ठेवण्याची तयारी दाखवली आणि त्यातूनच एक नवी लाट तयार झाली.
कुठल्याही मोठ्या स्टारशिवाय, गाण्यांशिवाय, भपक्याशिवाय, केवळ एका प्रामाणिक कथेच्या आणि संयत मांडणीच्या जोरावर मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचू शकतो, त्यांना भावू शकतो आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मंचावरही मान्यता मिळवू शकतो हे 'श्वास'नं सिद्ध केलं.
या यशानंतरच्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत जे बदल झाले, ते 'श्वास'च्या वाटेवरूनच पुढे गेले असल्याचं लख्ख जाणवतं.
निशिकांत कामत यांचा 'डोंबिवली फास्ट' (2005) हा एका मध्यमवर्गीय माणसाच्या व्यवस्थेविरुद्धच्या लढ्याची कहाणी सांगणारा चित्रपट, मंगेश हाडवळे यांचा 'टिंग्या' (2008), उमेश कुलकर्णी यांचे 'वळू' (2008) आणि 'विहीर' (2009) हे ग्रामीण-निमशहरी जगण्याचे बारकावे टिपणारे चित्रपट.
सतीश मन्वर यांचा 'गाभ्रीचा पाऊस' (2009) हा विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवरील संवेदनशील चित्रपट, परेश मोकाशी यांचा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' (2009) हा दादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रपट, असे एकाहून एक सरस प्रयोग या दशकात घडले.
या सर्व चित्रपटांमध्ये एक समान धागा दिसतो: रोजच्या जगण्याशी असलेली बांधिलकी, मोठ्या स्टार्सवर अवलंबून न राहता आशयावर भर देण्याची वृत्ती आणि स्वतःची पटकथा स्वतः लिहिण्याचा आत्मविश्वास.
हे सगळे दिग्दर्शक आपापल्या विषयांशी, आपापल्या भावविश्वाशी प्रामाणिक राहिले आणि याच प्रामाणिकपणाला 'श्वास'नं वाट मोकळी करून दिली होती.
यानंतरच्या दशकातही जे उत्तम मराठी चित्रपट बनले, त्यामागेही 'श्वास'नं निर्माण केलेल्या वातावरणाचा मोठा वाटा आहे.
एकेकाळी निर्मात्यांना अशा प्रकारचे 'कठीण' विषय व्यावसायिकदृष्ट्या अव्यवहार्य वाटत असत. जर कथा प्रामाणिक भावनेनं सांगितली गेली असेल, तर प्रेक्षक अशा प्रामाणिक, संयत आणि कठीण विषयांनाही स्वीकारायला तयार आहे, हे 'श्वास'नं दाखवून दिलं.
यामुळे पुढच्या दिग्दर्शकांना आपापल्या निवडीच्या, मनाला भिडणाऱ्या विषयांवर चित्रपट करण्याचा आत्मविश्वास मिळाला.
'श्वास' हा परिपूर्ण चित्रपट आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. यातील डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्तीच्या भूमिकांना अधिक खोली देता आली असती.
वैद्यकीय व्यवस्थेवरील भाष्य अधिक तीव्र होऊ शकलं असतं. मात्र, या मर्यादादेखील चित्रपटाच्या मूळ ताकदीला झाकोळत नाहीत.
'श्वास'ची खरी कामगिरी ही की, त्यानं एका लहान, वैयक्तिक, जवळपास क्षुल्लक वाटणाऱ्या कौटुंबिक कहाणीतून एक विश्वव्यापी सत्य मांडलं.
जगण्यातील प्रत्येक बदल, मग तो कितीही वेदनादायक असो, स्वीकारण्याची, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि त्या बदलानंतरही प्रेम करत राहण्याची माणसाची क्षमता.
हेच सत्य अगदी साध्या भाषेत, साध्या प्रतिमांमध्ये मांडल्यामुळे हा चित्रपट इतक्या व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोचू शकला.
आज, 2 दशकांनंतर मागे वळून पाहताना 'श्वास'चं स्थान अधिक स्पष्ट होतं. ही एका आजोबा-नातवाच्या नात्याची भावनिक कहाणी होती.
पण सोबतच हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक टर्निंग पॉइंट होता. एक असा क्षण जिथून पुढे प्रायोगिक, स्वतंत्र आणि आशयप्रधान मराठी सिनेमाला नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि नवा प्रेक्षकवर्ग मिळाला.
गेल्या 2 दशकांत मराठी चित्रपटसृष्टीने जी विविधता, जे धाडस आणि जी सर्जनशीलता दाखवली, त्या साऱ्याची मुळे कुठेतरी या एका साध्या, प्रामाणिक चित्रपटात सापडतात. त्यामुळेच 'श्वास' हा केवळ एक चित्रपट न राहता मराठी सिनेमाच्या एका नव्या प्रवासाचा प्रारंभबिंदू ठरतो.
संदर्भसूची:
- घारपुरे, माधवी. "श्वास आणि इतर कथा." अनघा प्रकाशन.
- मतकरी, गणेश. "या दशकातला मराठी सिनेमा." साधना साप्ताहिक. https://www.weeklysadhana.in/view_article/ganesh-matkari-on-marathi-cinema-of-the-decade. नोव्हेंबर 13, 2010.
- झणकर, अनिल. "न्यू मराठी सिनेमा मूव्हमेंट." अपर स्टॉल. https://upperstall.com/features/new-marathi-cinema/. मे 11, 2010.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)