'माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाला पोलिसांनी गोळ्या घातल्या'; भरत तिवारी एन्काऊंटर प्रकरण काय आहे?

बिहारमध्ये भरत तिवारी 'एन्काउंटर' प्रकरण, ग्रामस्थांचा संताप आणि पोलिसांवर संशयाची सुई

फोटो स्रोत, Priti Prabha

    • Author, प्रीती प्रभा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी भोजपूरहून
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"भरतने काहीही केलं असलं तरी जेव्हा त्याने शस्त्रासह शरणागती पत्करली होती, तेव्हा पोलिसांनी त्याला गोळी मारण्याची काय गरज होती?"

गावातील ओट्यावर बसलेले भारत पासवान उदासपणे हे सांगत होते. दुपारची वेळ होती. कडक उन्ह आणि गरम वाऱ्यात ओट्याभोवती असलेल्या बांबूच्या झाडीतून थोडी थंड हवा येत होती. पण त्याचवेळी भारत पासवान यांच्यासोबत बसलेल्या वडीलधाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते.

भारत पासवान म्हणतात, "पोलिसांनी भरतला 'मानसिकदृष्ट्या अस्वस्थ' म्हटलं होतं, मग त्यानंतर अवघ्या एका दिवसातच त्याचा एन्काउंटर का केला?"

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिलोटी गावातील 26 वर्षीय भरत भूषण तिवारीचा 17 जून रोजी पोलीस एन्काउंटरनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणाबाबत भोजपूरच्या पोलीस अधिक्षकांनी (एसपी) जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, "पोलीस पथकाने स्वतःच्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठी गोळीबार केला होता आणि ती गोळी भरतच्या पायाला लागली."

परंतु, घटना आणि पोलिसांच्या दाव्यापेक्षा गावातील लोक वेगळीच माहिती देत आहेत.

ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, "गोळी लागण्यापूर्वी भरतने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाइव्ह केलं होतं. त्या व्हीडिओमध्ये तो आपली पिस्तूल पोलिसांच्या दिशेने फेकताना स्पष्ट दिसतो आणि एका पोलिसाने ती पिस्तूल उचलल्याचेही दिसून येतं. मग त्याने पोलिसांवर गोळी कशी झाडली असेल?"

न्यायालयीन चौकशीची घोषणा, पण कुटुंब समाधानी नाही

या घटनेनंतर पोलिसांची कार्यपद्धती, निष्काळजीपणा आणि त्यांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

घटनेच्या तीन दिवसांनंतर प्रशासनाने कारवाई करत शाहपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि इतर 5 पोलिसांना निलंबित केलं आहे. तसेच मंगळवारी भरतची आई आशा देवी यांच्या अर्जावरून संबंधित एसडीपीओ, एसएचओ आणि इतर पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अद्याप एकाही आरोपी पोलिसाला अटक करण्यात आलेली नाही.

त्याचबरोबर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर लिहिलं की, "17 जून रोजी भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिलोटी गावात पोलीस चकमक झाली. त्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेच्या सर्व बाजूंची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करणे हा या न्यायालयीन चौकशीचा उद्देश आहे."

भरतच्या बिलोटी गावात लोकांमध्ये दुःख आणि राग दिसून येत आहे.

फोटो स्रोत, Priti Prabha

फोटो कॅप्शन, भरतच्या बिलोटी गावात लोकांमध्ये दुःख आणि राग दिसून येत आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भरत तिवारी एन्काउंटरनंतर 22 जून रोजी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) सुधांशु कुमार यांनी ही घटना पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचं मान्य केलं आहे.

ते म्हणाले, "एन्काउंटरच्या आधी 16 जून रोजी जे पोलीस त्याच्याशी बोलण्यासाठी गेले होते, त्यांना त्याला योग्य पद्धतीने हाताळता आलं नाही."

परंतु, प्रशासन आणि सरकारने केलेल्या या कारवाईवर भरतचे कुटुंब समाधानी दिसत नाही.

त्याचे वडील काशीनाथ तिवारी म्हणाले की, "मी माझा मुलगा भरतच्या पिस्तूलविषयी पोलिसांशी बोलण्यासाठी शाहपूर पोलीस ठाण्यात गेलो होतो, तेव्हा पोलिसांनी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताब्यात ठेवून घेतलं. मी वारंवार घरी जाण्याची विनंती करत होतो आणि कुटुंबीयांबरोबर फोनवर बोलू द्या अशी मागणीही करत होतो, पण कोणीही माझं ऐकलं नाही."

ते पुढे म्हणाले, माझ्या डोळ्यांसमोर पोलीस बुलेटप्रूफ जॅकेट घालून बाहेर जाताना दिसले. मला माहीत नव्हतं की, हेच लोक परत येऊन माझ्या मुलाच्या मृत्यूची बातमी देतील."

भरतच्या आई आशादेवी म्हणतात की, त्यांच्या डोळ्यादेखत मुलाला पोलिसांनी गोळ्या घातल्या.

त्या रडत रडत म्हणाल्या, "असं तर एखाद्या गुंडालाही मारलं जात नाही. माझा मुलगा निर्दोष आणि समाजसेवक होता. आधी त्याला रायफलच्या बटने मारून खाली पाडलं आणि नंतर गोळी झाडली."

"सरकारचा हा कुठला नियम आहे? माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी गोळी मारली. मी आणि माझी सून तिथेच उभे होतो. एसटीएफच्या जवानांनी चहूबाजूंनी त्याला घेरलं होतं. डीएसपीही तिथे होते."

"आम्ही तिथे गेलो तेव्हा डीएसपी म्हणाले, 'यांनाही मारा, दोघींवर लाठीचार्ज करा.' त्यानंतर आम्हा सासू-सुनेवर लाठीचार्ज करण्यात आला. तिथे दोन महिला पोलीस होत्या. त्यानंतर त्यांनी भरतवर गोळीबार सुरू केला."

"त्याआधी पोलिसांनी भरतला त्याच्या 3 मागण्या मान्य केल्या जातील, असं सांगितलं होतं. माझा मुलगा जवइनिया गावातील लोकांसाठी माती भरून देण्याची मागणी करत होता, कारण सरकारने त्यांना खड्ड्यासारख्या जागेत वसवलं आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "भरत पोलिसांना म्हणाला, 'ठीक आहे, माझ्या मागण्या मान्य होत असतील तर मग ही पिस्तूल घ्या.' त्यानंतर पोलिसांनी त्याची पिस्तूल घेतली. आणि त्यानंतरही त्यांनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला."

भरतच्या बहुतांश व्हीडिओंमध्ये प्रशासनाविषयीचा त्याचा राग दिसून येत होता. काही दिवसांपूर्वीही त्यांने फेसबुकवर एक पोस्ट करून सरकारी कामकाजाच्या पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच एका पोलीस अधिकाऱ्याने 'एन्काउंटर' करण्याची धमकीही दिल्याचंही म्हटलं होतं.

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलीस भरतच्या घरी गेले होते. पोलीस आल्यानंतर भरतने फेसबुकवर लाइव्ह केलं होतं. त्या व्हीडिओमध्ये त्याची आईही त्याला समजावून सांगताना दिसत आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, त्यांनी भरतला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पिस्तूल काढली. भरतच्या या वागण्यामुळे पोलिसांनी त्याला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं म्हटलं होतं.

भरत खरंच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता का?

या प्रश्नावर गावातील गणेशजी म्हणतात, "भरत चांगला मुलगा होता. तो थोडा तापट आणि अतिउत्साही स्वभावाचा होता, लोकांच्या मदतीसाठी तो नेहमी पुढे असायचा. रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत समस्यांसाठी तो प्रशासनाकडे जात असत, पण त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जायचं."

"तो तरुण होता, त्यामुळे त्याचा स्वभावही तडफदार होता. त्याचा राग आणि लढा हा भ्रष्ट व्यवस्थेविरोधात होता. त्यानं शस्त्र उचलून चूक केली, पण त्याने शरणागती पत्करल्यानंतरही पोलिसांनी त्याला का मारलं?"

बिलोटी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर जवइनिया हे गाव आहे. हे गाव नुकतंच वसवण्यात आलं असून त्याला अवघा एक महिनाच झाला आहे.

शाहपूर आणि बिलोटीपासून साधारण 2 ते 3 किमी अंतरावर असलेलं हे गाव गेल्या वर्षी नदीची धूप झाल्यामुळे वाहून गेलं. त्यामुळे अनेक कुटुंबं बेघर झाली आणि त्यांना कुटुंबासह बांधावर झोपड्या बांधून राहणं भाग पडलं होतं.

बिहार सरकारने या लोकांना शाहपूरमध्ये राहण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली. तसेच प्रत्येक कुटुंबाला घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयेही दिले. जवइनिया गावातील लोकच येथे येऊन राहू लागल्याने नव्या वस्तीचे नावही 'जवइनिया' हेच ठेवण्यात आले.

जवइनिया गावातील लोकांना ज्या ठिकाणी पुनर्वसित करण्यात आलं आहे, तिथे मोठा खड्डा आहे. तो भरून द्यावा, अशी मागणी भरत करत होता.

फोटो स्रोत, Priti Prabha

फोटो कॅप्शन, जवइनिया गावातील लोकांना ज्या ठिकाणी पुनर्वसित करण्यात आलं आहे, तिथे मोठा खड्डा आहे. तो भरून द्यावा, अशी मागणी भरत करत होता.

याच गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी भरतवर गोळीबार केला होता. त्या ठिकाणी अजूनही रक्ताचे डाग दिसतात.

गावातील तेतरी देवी रडत सांगतात की, "सरकारने आमचा विश्वासघात केला. आम्हाला पाण्यातून काढून पुन्हा पाण्यातच आणून ठेवलं. येथून नदी खूप जवळ आहे. पाणी वाढलं की, हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. येथे सुमारे चार ते पाच फूट उंचीचे खोल खड्डे आहेत."

"पूर आला किंवा पाणी साचलं तर लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. लहान लहान मुलं आहेत. बुडण्याची शक्यता आहे. हेच खड्डे भरून देण्याची मागणी भरत करत होता. पण पोलिसांनी त्यालाच मारलं. आता आमचं दुःख कोण ऐकणार?"

24 वर्षीय सबिता देवी म्हणतात, "आमच्या अडचणी काही कमी होत नाहीत. आमचे घर नदीत वाहून गेलं. आम्ही 10 महिने बांधावर राहिलो. आता येथे राहायला आलो आहोत, पण रोजगार काही मिळत नाही. किमान डोक्यावर छप्पर मिळेल, याचाच आधार होता."

"हे गाव वसून अजून 20 दिवसही झाले नाहीत. भरतच्या प्रयत्नांमुळे येथे हँडपंप आणि वीज सुविधा तरी मिळाली होती, पण आता त्यालाही मारण्यात आलं आहे. आता आमच्यासाठी आवाज कोण उठवणार?"

वडील आणि भावावर गुन्हा, पण आईच्या तक्रारीकडे दुर्लक्ष?

भरत तिवारीने पिस्तूल दाखवल्याच्या घटनेनंतर आणि त्याच्या एन्काऊंटरनंतर मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

17 जून रोजी झालेल्या एका एफआयआरमध्ये भरत तिवारीचे वडील काशीनाथ तिवारी आणि त्याचा लहान भाऊ चंदन तिवारीला आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांनी भरत तिवारीचे वडील काशीनाथ तिवारी आणि लहान भाऊ चंदन तिवारीविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

फोटो स्रोत, Priti Prabha

फोटो कॅप्शन, पोलिसांनी भरत तिवारीचे वडील काशीनाथ तिवारी आणि लहान भाऊ चंदन तिवारीविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

तर रास्ता रोको आंदोलन प्रकरणी 14 जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. तर 50 हून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध दुसरी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

हे दोन्ही एफआयआर शाहपूरचे निलंबित ठाणेप्रमुख राजेश मालाकार यांनी दाखल केले आहेत. परंतु, भरतच्या एन्काउंटर प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल अद्याप कुटुंबीयांना देण्यात आलेला नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)