'जर तिला लग्न करायचे नव्हते तर नकार द्यायला हवा होता, आम्ही लग्न तत्काळ रद्द केले असते'

फोटो स्रोत, UGC
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
ज्याच्याशी लग्न ठरलं होतं त्या मुलाला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन हत्या केल्याच्या आरोपात एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. त्यासोबत तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
होणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने किल्ल्यावरून ढकलून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी संबंधित तरुण आणि तरुणीला अटक केल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
लोहगडवर मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव केतन अग्रवाल आहे. त्याच्या हत्येच्या आरोपात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
'मी आणि होणारा नवरा फिरायला लोहगडला गेलो होतो. तिथे तो घसरून पडून मृत्यू झाला,' असं या तरुणीने सुरुवातीला पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, तपासात तिच्या प्रियकराबद्दलची माहिती समोर आली. त्यातून जुन्या प्रेमसंबंधांची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी प्रकरणाची नोंद हत्या म्हणून केली.
या प्रकरणात पोलिसांनी नेमकं काय सांगितलं, ते पाहूया.
संशय निर्माण झाल्यावर पोलिसांनी चौकशी केली. त्यात दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चेतन चौधरीचे वकील राम शहाने म्हणाले, "पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने दोन्ही आरोपींसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांनी सादर केलेल्या रिमांडच्या कारणांचा विचार करून न्यायालयानेही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
"आरोपी क्रमांक दोन चेतन चौधरी याच्याविरोधात या FIR मध्ये कोणतेही थेट आरोप नाहीत. त्याला केवळ मुलीचा मित्र असल्यामुळे या प्रकरणात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, चेतन चौधरी हा लोहगड परिसरात फिरत असल्याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे नाही आणि या संदर्भात न्यायालयात कोणतीही कागदपत्रेही सादर करण्यात आलेली नाहीत," असं शहाने यांनी सांगितले.
तरुणीला मान्य नव्हते लग्न?
पुण्यातील मावळ तालुक्यातील गहुंजे येथील केतन अग्रवाल याचं पुण्याच्या मार्केट यार्डमधील सिया गोयल या तरुणीबरोबर काही महिन्यांपूर्वी लग्न ठरलं होतं.
तिन्ही कुटुंबीयांचे मार्केट यार्ड परिसरात वेगवेगळे व्यवसाय असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
केतन आणि सियाची फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. एक-दोन महिन्यांत लग्न होणार होतं.

मात्र, सियाचे कोंढव्यातील चेतन चौधरी नावाच्या तरुणाबरोबर लग्न ठरण्यापूर्वीपासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली.
चेतनबरोबर प्रेमसंबंध असल्यामुळे सियाला केतनबरोबरचं लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे लग्न टाळण्यासाठी सिया आणि चेतन यांनी मिळून केतनची हत्या करण्याचा कट रचला. ही हत्या अपघात वाटावी यासाठी त्यांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून दिलं, असा आरोप आहे.
अशी घडवून आणली हत्या?
पोलिसांच्या माहितीनुसार, केतन आणि सियाचं लग्न ठरलेलं होतं. सियाने केतनला 18 जून रोजी फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर नेलं.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि केतन आधी लोहगडावर गेले. काही वेळाने चेतन त्यांच्या मागून तिथे पोहोचला. त्याने मागून जाऊन केतनला कड्यावरून खाली ढकललं. त्यामुळे तो किल्ल्याच्या पश्चिम बाजूला खाली पडून जखमी झाला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर सियाने आरडाओरडा केला, त्यामुळे तिथल्या सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. किल्ल्याच्या पश्चिमेकडील झुडपांमध्ये केतनचा मृतदेह आढळून आला.
घटनेनंतर सिया गोयलनं पोलिसांना, "किल्ल्यावर फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडला," असं सांगितलं होतं.
त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
तपासातून पोलिसांना आला संशय
जबाब नोंदवताना पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. केतन आणि सिया यांच्यात गेल्या काही दिवसांत वाद झाल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती.
त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये सियाचे चेतनबरोबर प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. त्यानंतर तपासासाठी दोन विशेष पथके नेमण्यात आली.
तांत्रिक तपासात घटनेच्या दिवशी चेतन चौधरी लोहगड परिसरात उपस्थित असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर चेतनला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हत्येचा प्रकार समोर आला असे पोलिसांनी सांगितले.
सियाने अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक पुरावे, घटनास्थळाची परिस्थिती आणि आरोपींच्या हालचालींची पडताळणी केल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फोटो स्रोत, Getty Images
सियाला केतनबरोबर लग्न मान्य नव्हते. सिया आणि चेतन यांना केतन हा प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याचे वाटत होते, त्यामुळं त्याची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचंही पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी सांगितलं.
बीबीसी मराठीने सिया गोयल यांच्या वकील राजश्री सकट यांच्याशी पुण्यात संपर्क साधला.
त्या म्हणाल्या, "पोलिसांनी सिया गोयल यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, एफआयआर पाहिल्यानंतर आम्ही आमच्या अशिलाच्या पोलीस कोठडीला विरोध केला आणि न्यायालयीन कोठडीची मागणी केली. मात्र, ती मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. त्यामुळे 7 दिवसांनंतर, म्हणजे 29 जून 2026 रोजी, आमच्या अशिलाला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी आम्ही त्यांची सविस्तर बाजू मांडू."
'14 तारखेलाही झाला होता हत्येचा प्रयत्न'
दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सियाने यापूर्वीही लोहगडवरच केतनला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सियाने सापाचं नाटक रचल्याची माहिती दिली. तो प्रयत्न फसल्यानंतर तिने पुन्हा केतनला लोहगडवर येण्याचा आग्रह केला होता, असं त्यांनी सांगितलं.
विशाल अग्रवाल म्हणाले की, ते 6 फेब्रुवारीला बालीला जाणार होते. त्यांच्याबरोबर आणखी दोघे असं चौघेजण जाणार होते. त्यावेळी केवळ केतनचाच पासपोर्ट हरवला होता. विदेशी चलन आणि इतरांचे पासपोर्ट व्यवस्थित होते. पण आम्हाला त्यावेळी हे लक्षात आलं नाही. त्यांचं बालीला जाणं रद्द झालं.
मग ते 14 तारखेला लोहगडला गेले होते. त्यावेळी सियाने त्याला मारण्यासाठी धक्का दिला होता. पण मागे असलेल्या एका झाडामुळे तो बचावला. केतन वाचल्यामुळे सियाने लगेचच साप आल्याने मी तुला वाचवलं, असं नाटक केलं. केतनला तेव्हा लक्षात आलं नाही की, त्याला मारण्यासाठीच सियाने धक्का दिला आणि नंतर सापाचं नाटक करत आहे. पण सियाने नंतर लगेचच आपल्याला 18 तारखेला लोहगडला जायचं असल्याचं म्हटलं.
मृत तरुणाच्या आईने काय म्हटलं?
मृत तरुणाची आई पाखी अग्रवाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "आज माझा मुलगा गेला आहे. याला सर्वस्वी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड जबाबदार आहे. मी सियाला माझ्या सूनेसारखं मानलं होतं. तिने मला खूप मोठा धोका दिला आहे. ती खोटं बोलली. आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. ती दोन-तीन वेळा आमच्या घरी आली होती."

फोटो स्रोत, ANI
"आमच्या घरी पूजा होती, त्यावेळीही आली होती. वाढदिवसाला आली, दोन-तीन वेळा जेवायलाही घरी आली होती.
"मी तिला अनेकवेळा भेटले, अनेकवेळा आम्ही शॉपिंगलाही गेलो होतो. सिया अशी मुलगी आहे, याचा आम्हाला कधीच संशय आला नाही. तिला मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला हवी," असे पाखी अग्रवाल यांनी म्हटले.
'लग्न करायचे नव्हते तर सहज नकार दिला असता, असे टोकाचे पाऊल का उचलले?'
केतनचे वडील विशाल अग्रवाल एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "त्यांचा (सिया गोयल आणि केतन अग्रवाल) फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. ते 6 जूनला बालीला निघणार होते, चारजण एकत्र बालीला प्रवास करत होते, पण फक्त केतनचा पासपोर्ट चोरीला गेला. त्यामुळे तो जाऊ शकला नाही आणि त्याला विमानतळावरून परतावे लागले.
"चेतन चौधरी दुचाकीवरून लोहगड किल्ल्यावर आला. ते दोघे (चेतन चौधरी आणि सिया गोयल) एकत्र वर गेले, त्यांनी केतनला एका वस्तूने मारले आणि त्याला वरून खाली फेकून दिले," असे विशाल अग्रवाल यांनी म्हटले.

फोटो स्रोत, ANI
पुढे बोलताना ते म्हणाले, "स्थानिक ग्रामीण एसपी संदीपसिंग गिल्ल यांनी विलक्षण सहकार्य केले; त्यांनी तत्काळ आम्हाला तपशील कळवला आणि दोन्ही व्यक्तींना अटक केली. चेतन चौधरीला काल रात्री अटक करण्यात आली आणि सियाला आज सकाळी अटक करण्यात आली. त्यांना आता न्यायालयात हजर केले जात आहे.
"जर तिला लग्न करायचे नव्हते, तर तिने सहज नकार दिला असता; आम्ही लग्न तत्काळ रद्द केले असते. त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले? त्यांची मानसिकता तरी काय आहे?
"त्यांची मानसिकता इतकी क्रूर आहे की कोणाच्यातरी 26 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला जाऊ शकतो... समाजाने अशा क्रूर मानसिकतेची दखल घ्यायला हवी. ही विचारसरणी येते कुठून, त्यांच्या कुटुंबातून, त्यांच्या संगोपनातून?..." या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
























