You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हजारो वर्षांपूर्वी बनलेली कॅलेंडर्स आजही कशी वापरली जातात?
हिंदू दिवाळी, गणपती असो, मुस्लिमांचा पवित्र महिना रमजान, ख्रिश्चनांचा ख्रिसमस. चिनी नववर्ष किंवा ज्यू धर्मीयांचा योम किपूर.
प्रत्येक संस्कृती आणि धर्माची एक विशिष्ट कालगणना आहे आणि त्यातले सण एका विशिष्ट कालगणनेनुसार येत असतात.
जसं की राखी पौर्णिमा श्रावणात येते, किंवा गणपती भाद्रपदात. हे हिंदू कालगणनेतले महिने आहेत तर रमजान हा मुस्लिमांच्या वार्षिक कालगणनेत नववा महिना असतो.
पण या कालगणना किंवा कॅलेंडर्स हजारो वर्षांपूर्वी बनली आहेत आणि आजही वापरली जातात.
अश्मयुगात किंवा ताम्रयुगात जमिनीत खड्डे खणून त्यावर सूर्य किंवा चंद्राच्या पडणाऱ्या सावल्या पाहून कालगणना केली जायची.
त्यानंतर वाळूची घड्याळं तयार झाली, त्यात दिवसाची वेळ कळायची आणि कालगणनाही.
पण कॅलेंडर्स किंवा कालगणनेची गरज मानवाला का भासली?
कारण साधं आहे, जसा माणूस शेती करायला लागला, तसं त्याला बदलत्या ऋतूंचा माग घेणं गरजेचं झालं. किती काळाने एखादा ऋतू, सूर्याची किंवा चंद्राची विशिष्ट स्थिती परत येते हे त्याला अभ्यासावं लागलं.
उन्हाळा कधी येतो, पावसाळा कधी, हिवाळा कधी हे समजण्यासाठी वेळाचं आणि दिवसाचं एक गणित तयार करणं गरजेचं होतं.
अमुक एका परिस्थितीचा आपल्यावर असा परिणाम होतो हे कळल्यावर ती परिस्थिती पुन्हा कधी येईल त्यासाठी तयार राहावं म्हणून माणसाने कालगणना विकसित केली.
पुढे जशी संस्कृती विकसित झाली, धर्म विकसित झाले तसं याच कालगणनेच्या आधारावर सण तयार झाले.
जगातल्या सर्वात जुन्या कॅलेंडर्सपैकी एक असणारं कॅलेंडर स्कॉटलंडमध्ये सापडलं आहे. हे जवळपास 10 हजार वर्षं जुनं आहे. हे कॅलेंडर म्हणजे खडकात खोदलेले वेगवेगळ्या आकाराचे खड्डे असून त्यात पडणाऱ्या चंद्राच्या प्रकाशाचा अभ्यास करून कालगणना केली जात असावी.
जगातल्या वेगवेगळी संस्कृती चंद्र आणि सूर्यावर आधारित कालगणना करतात. चंद्रावर आधारित असलेल्या कॅलेंडरमध्ये महिन्याता 29.5 दिवसांचा महिना असतो तर सौर कॅलेंडरमध्ये एका वर्षांत 365 दिवस असतात.
हिंदू धर्माचं कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात 29.5 दिवस असतात. आता असं असतानाही सहसा हिंदू सण सौर कॅलेंडरच्या महिन्यांच्या ठरलेल्या महिन्यांमध्येच कसे येतात.
उत्तर आहे अधिक महिना.
सामान्यत: एक चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा सुमारे 10 दिवसांनी लहान असते.
भारतीय पंचाग आणि धर्मशास्त्रांत सौर, चंद्र, पृथ्वीवरील वृत्तं आणि नक्षत्र यांच्या स्थानांनुसार कालगणना केली जाते.
एका ऋतूपासून सुरुवात करून त्या ऋतूत परत येणे हे वर्ष मानले जाते आणि त्यात सूर्याचा राशींमधला प्रवेश 22 दिवसांनी उशीरा मानला जातो.
राशींच्या संक्रांतीनुसार, सूर्य जेव्हा बारा राशींमधलं संक्रमण पूर्ण करतो तेव्हा एक 'सौरवर्ष' पूर्ण होतं. परंतु व्यवहारात चांद्रमास प्रचलित आहेत. हा महिना शुद्ध प्रतिपदा ते वद्य अमावस्या असा मोजला जातो.
चांद्रमासात एका महिन्यात 29 दिवस 31 तास 50 सेकंद असतात, तर सौर महिन्यात 30 दिवस, 26 तास, 19 मिनिटं आणि 31 सेकंद असतात.
अशा प्रकारे दर महिन्याला 54 तास, 29 मिनिट आणि 31 सेकंदांचा फरक पडतो. म्हणजे बत्तीस सौर महिने आणि साडेतीस चंद्रमहिने.
त्यामुळे पाच वर्षांत सरासरी दोन लीप महिने असतात. त्यामुळे सरासरी पाच वर्षांनी दोन अधिक मास येतात.
म्हणूनच दिवाळी कधी जानेवारीत येत नाही, किंवा नवरात्र कधी डिसेंबरमध्ये येत नाही. या सणांचे इंग्रजी महिनेही थोड्याफार फरकाने ठरलेले असतात.
मुस्लीम कालगणना पण चांद्रमासावरच आधारित आहे.
मुस्लीम धर्मीयांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो.
इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार त्यांच्या कालगणनेतला नववा महिना रमजान असतो. पण रमजान ईदीचा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे येतो.
त्यामुळे कधी रमजान ईद उन्हाळ्यात असते, तर कधी पावसाळ्यात तर कधी डिसेंबर महिन्यात.
सौर आणि चांद्र कालगणनेतला फरक भरणारा एक अधिकचा महिना मुस्लीम कालगणनेत नसल्याने ईद पुढे मागे होत असते.
तर कधी कधी एका वर्षांत दोनदा येते. 2030 साली जानेवारी महिन्यात रमजान ईद असेल आणि डिसेंबर महिन्यातही.
कालगणनेचे चांद्र आणि सौर असे दोनच प्रकार नाहीयेत. प्राचीन माया संस्कृतीत शुक्र ग्रहाच्या हालचालींवर आधारित एक कालगणना होती.
वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्मांची वेगवेगळी कॅलेडर्स असली तरी आता जगात एक कॅलेंडर सर्वमान्य आहे. ज्यानुसार आता जगातले सगळे व्यवहार होतात. तेच जानेवारी ते डिसेंबरवालं.
याला ग्रेगोरियन कॅलेंडर असं म्हणतात. म्हणजे हा लेख प्रसिद्ध झाल्याची वरती जी तुम्हाला तारीख दिसतेय ना, तीही ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार आहे.
ग्रेगोरियन कॅलेंडर साधारण सोळाव्या शतकात तयार झालं. त्याकाळातले पोप ग्रेगरी यांच्या नावावरून याला ग्रेगोरियन कॅलेंडर असं नाव पडलं.
पुढे साम्राज्यवादी देशांनी हे कॅलेंडर आपआपल्या वसाहतींमध्ये नेलं. एक वेळी अशी होती की जगातल्या 80 टक्के भूभागावर युरोपियन देशांचं साम्राज्य होतं. त्यामुळे आपसूकच हे कॅलेंडर सगळीकडे पोचलं.
आता जगात अनेक संस्कृती आणि देश व्यवहारात ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतातच, पण आपल्या संस्कृतीचं कॅलेंडरही वापरतात.
उदाहरणार्थ म्यानमारमध्ये आता 2023 चालूये आणि 1384 ही. थायलंडमध्ये 2023 तर आहेच पण 2066 ही चालूये. आणि भारतात विक्रम शक 2080 आणि शालिवहन शक 1945 चालूये.
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.