वॅग्नर ग्रुप : खाजगी लष्कर काम कसं करतं? जाणून घ्या अशा सैन्यांचा वादग्रस्त इतिहास

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published

शुक्रवारच्या (23 जून) अयशस्वी उठावानंतर वॅग्नर आर्मीचे प्रमुख प्रमुख येवगेनी प्रिगोझिन बेलारूसमध्ये आले आहेत. बेलारूसचे नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मंगळवारी (27 जून) या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारीच लष्कराला संबोधित म्हटलं की, वॅग्नर आर्मीचं बंड शमवत त्यांनी संभाव्य गृहयुद्ध टाळलं आहे.

युक्रेनसोबत युद्धात गुंतलेल्या पुतिन यांना वॅग्नर ग्रुपच्या बंडाने ज्या प्रकारे अडचणीत आणलं, त्यामुळे आता अशाप्रकारच्या खाजगी लष्कराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाडोत्री सैनिकांमुळे निर्माण झालेल्या अराजकतेबद्दल बोललं जात आहे.

अशाप्रकारचं सैन्य हे जिथे युद्ध असतं, तिथे उपस्थित असतं. ते जगातील प्रमुख देशांसाठी काम करतात आणि काही गैर-सरकारी संस्थाही त्यांच्या सेवा घेतात.

अनेक देशांमध्ये खाजगी लष्करं सक्रिय आहेत. त्यांची संख्या कमी-जास्त होताना दिसते. पण रशियाचा वॅग्नर ग्रुप आणि अमेरिकेची अॅकेडमी (जुनं नाव ब्लॅकवॉटर) या दोन खाजगी लष्करी कंपन्या अलीकडच्या काळात वादात अडकल्यामुळे खूप चर्चेत आल्या.

शॉन मॅकफेट हे वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत आणि काही वर्षं त्यांनी अशाच खाजगी लष्करात सेवाही बजावली होती. त्यांनी अशा लष्कराच्या कार्यपद्धतीवर दोन पुस्तकं आणि कादंबऱ्याही लिहिल्या आहेत.

बीबीसीशी फोनवर झालेल्या संभाषणात त्यांनी म्हटलं की, खाजगी लष्कर किंवा भाडोत्री सैन्य हा एक उद्योग आहे.

ते सांगतात, “मी लोकांना भाडोत्री किंवा खाजगी सैनिकांच्या आयुष्याविषयी सांगता यावे म्हणून पुस्तकं लिहिली. त्यांचं आयुष्य धोक्यानं भरलेलं आहे. हा उद्योग कोणत्याही धरबंदाशिवाय वाढत आहे आणि मोठे देश त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत.

याची सुरुवात 1990 च्या दशकातच झाली. परंतु त्यावर निर्बंध आणण्यात अनेक देशांनी तत्परता दाखवली नाही. हा उद्योग असाच फोफावत राहिला, तर त्याचा परिणाम शेवटी आंतरराष्ट्रीय संबंधांवर होईल. लोक स्वतःचं खाजगी लष्कर बाळगायला लागतील. उद्या इलॉन मस्क (ट्विटर आणि टेस्लाचे मालक) हे सुद्धा स्वतःचं खाजगी लष्कर बाळगतील. हीच प्रवृत्ती राहिली तर जगात अराजकता माजेल.”

62 वर्षीय प्रिगोझिन यांना राष्ट्रपती पुतिन यांनीच उभं केलं होतं. वॅग्नर ग्रुपची स्थापना 2014 मध्ये पुतिन यांनी केली होती. कारण त्यांना जगात पुन्हा रशियाचं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं.

दिल्लीमधील राजकीय आणि परराष्ट्र नीतिमधील तज्ज्ञ डॉ. सुव्रोकमल दत्ता सांगतात की, वॅग्नर ग्रुपच्या बंडामुळे पुतिन यांची राजवट धोक्यात आल्याचं दिसत होतं.

या गटाच्या सैनिकांची संख्या 20 ते 35 हजारांदरम्यान असून युक्रेनच्या दक्षिण आणि पूर्व भागात त्यांना युक्रेनियन सैन्याविरुद्ध मोठ्या प्रमाणावर यश मिळालं होतं.

हे रशियाचं खाजगी लष्कर आहे, ज्याचा वापर त्यांनी जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी केला आहे.

2014 मध्ये रशियाने क्रिमियावर कब्जा केला तेव्हाही या गटाची भूमिका महत्त्वाची आहे.

खाजगी लष्कराच्या कारवाया नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. सप्टेंबर 2007 मध्ये इराकची राजधानी बगदादमध्ये एक नरसंहार झाला. त्यामध्ये अमेरिकेतली खाजगी सुरक्षा कंपनी ब्लॅकवॉटर वर्ल्डवाईडच्या (आताची अॅकेडमी) सैनिकांचा समावेश होता. इराकमधील संरक्षणविषयक कारवायांसाठी अमेरिकन सरकारने त्यांच्यासोबत करार केला होता.

त्या दिवशी ब्लॅकवॉटर सैनिकांच्या चार हत्यारबंद वाहनांचा ताफा बगदादमधून चालला होता. या ताफ्यात अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्ज असे सैनिक होते, ज्यांना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका टीमच्या सुरक्षेचं काम देण्यात आलं होतं.

प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलं तसंच चौकशीतून जे समोर आलं, त्यानुसार एक कार ब्लॅकवॉटरच्या ताफ्याजवळ आली आणि या घटनेला सुरूवात झाली. पुढे काय घडलं याचा तपशील वादग्रस्त आहे.

पण ब्लॅकवॉटरच्या टीमला येणाऱ्या वाहनाकडून धोका जाणवला आणि त्यांनी गजबजलेल्या चौकातच अंदाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली. वाहनांवर तसंच पादचाऱ्यांवर गोळ्या चालवल्या.

या गोळीबारात 17 इराकी नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पीडितांमध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुले यांचा समावेश होता. ते निःशस्त्र होते आणि ब्लॅकवॉटरच्या ताफ्याला कोणताही धोका नव्हता. इराकी सरकारने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच या घटनेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र टीकाही झाली.

ब्लॅकवॉटरच्या सैनिकांनी शस्त्रांचा केलेला प्रयोग अवाजवी आणि अन्यायकारक होता, असा निष्कर्ष या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अमेरिकेतील समितीने काढला. अमेरिकेतील न्याय विभागाने नंतर या घटनेत सहभागी असलेल्या ब्लॅकवॉटरच्या अनेक कर्मचाऱ्यांवर हत्येचा आरोप लावला.

या घटनेने अमेरिकेच्या इराकमधील खाजगी सुरक्षा कंत्राटदारांच्या वादग्रस्त भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांच्या उत्तरदायित्वाबद्दल चिंताही वाढवली. यानंतर युद्धग्रस्त प्रदेशात खाजगी सैन्याच्या तैनातीबद्दल व्यापक चर्चा सुरू झाली.

प्रोफेसर शॉन मॅकफेट हे आफ्रिकेमधल्या अनेक देशांत खाजगी लष्कराचा भाग बनून कार्यरत होते. ते सांगतात की, या सैनिकांबद्दल कोणालाही उत्तरदायी नसल्यामुळे सरकारं त्यांचा वापर करून घेतात.

“हा भाडोत्री सैनिकांना बाळगण्याचा विशेष फायदा आहे. जर लष्करातील सैनिकाने कोणाची हत्या केली, तर त्यांचं कोर्टमार्शल होऊ शकतं. पण जर खाजगी लष्करातील भाडोत्री सैनिकाने हे कृत्य केलं, तर त्याची जबाबदारी कोणावरही नसते. तो त्याच्या घरी परत जाऊ शकतो.”

ही सगळी गुंतागुंत ते एक उदाहरण देऊन सांगतात.

“प्रश्न अधिकारक्षेत्राचा आहे. अफगाणिस्तानमधील कंदहारमध्ये एखाद्या खाजगी लष्कराच्या सैनिकाने संपूर्ण कुटुंबाचीच हत्या केली, असं समजू. आता हा सैनिक मेक्सिकोचा नागरिक आहे, ज्याला दुबईमधील एका कंपनीने कामावर ठेवलं आहे. ही कंपनी अमेरिकन सरकारसाठी काम करते. मग या सैनिकावर खटला नेमका चालणार कुठे? अफगाणिस्तान, मेक्सिको, दुबई की अमेरिकेमध्ये?

बऱ्याचदा होतं असं की, खटला कुठेच चालत नाही. कारण या भाडोत्री सैनिकांचं उत्तरदायित्व ठरवणं कठीण असतं. याचं कारण म्हणजे जे लोक यांना काम देतात, त्यांचं काम हे धोकादायक आणि राजकीयदृष्ट्या जोखमीचं असतं.”

भाडोत्री सैनिकांचा इतिहास

भाडोत्री सैनिकांची भूमिका आपल्या इतिहासाइतकीच जुनी आहे. वैयक्तिक फायदे, राजकीय हितसंबंध, वैचारिक कारणं किंवा इतर प्रेरणांसाठी लढल्या गेलेल्या युद्धांमध्ये शतकानुशतकांपासून त्यांचा वापर होत आला आहे.

राज्याच्या नियमित सैन्याला मदत करणे, व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करणे, विशेष लष्करी कारवायांची अंमलबजावणी अशा विविध कारणांसाठी इतिहासामध्ये खाजगी लष्कर आणि भाडोत्री सैनिकांचा वापर करण्यात आला आहे.

प्राचीन आणि मध्ययुगीन इजिप्तमध्ये फारोने शेजारच्या प्रदेशातून भाडोत्री सैनिकांना कामावर घेतले आणि त्यांची एक कायमस्वरूपी सेनाच पदरी बाळगली.

प्राचीन ग्रीसमधील अथेन्स आणि स्पार्टासारख्या शहर-राज्यांनी त्यांच्या लष्करी सैन्याला बळ देण्यासाठी ‘हॉपलाइट्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाडोत्री सैनिकांना कामावर ठेवले.

प्राचीन रोमन साम्राज्याने आपल्या सैन्याला पूरक म्हणून जर्मनिक जमातींसारख्या भाडोत्री सैनिकांना नियुक्त केलं होतं. सम्राटांनी वैयक्तिक अंगरक्षक तुकड्याही तयार केल्या.

साम्राज्यवाद आणि प्रबोधनाचा काळ

डच ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या खाजगी व्यापारी कंपन्यांनी त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी खाजगी लष्करांची स्थापना केली होती.

इटलीमधील प्रबोधनाचा काळ- व्हेनिस आणि फ्लॉरेन्ससारख्या शक्तिशाली शहर-राज्यांनी त्यांच्या वतीने युद्धे लढण्यासाठी कोंडोटिएरीसारख्या भाडोत्री सैन्याची उभारणी केली होती.

साम्राज्यवादाचा काळ

युरोपियन साम्राज्ये: वसाहतवाद जेव्हा प्रभावी होता, त्या काळात युरोपियन देशांनी त्यांच्या वसाहतींचा विस्तार करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण राखण्यासाठी खाजगी लष्कर आणि भाडोत्री सैनिकांची नियुक्ती केली होती.

ब्रिटीश साउथ आफ्रिका कंपनी आणि काँगो फ्री स्टेटच्या फोर्स पब्लिकसारख्या कंपन्यांचं स्वतःचं खाजगी सैन्य होते.

अमेरिकन क्रांती: अमेरिकन स्वातंत्र्य युद्धादरम्यान अमेरिकन वसाहती आणि ब्रिटिश साम्राज्य या दोघांनीही भाडोत्री सैनिकांचा वापर केला होता.

आधुनिक युगात भाडोत्री सैन्याचा वापर

वसाहतवादानंतरचा काळ- 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात खाजगी लष्करी कंपन्यांना (PMC) महत्त्व प्राप्त झाले. सरकार आणि गैर-सरकारी संस्थांच्या वतीने त्यांनी अनेक युद्धांमध्ये भाग घेतला.

इराक आणि अफगाणिस्तान युद्धं : इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांदरम्यान, अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र ब्लॅकवॉटरसारख्या पीएमसीवर खूप अवलंबून होते. या खाजगी लष्कराने सुरक्षा, लॉजिस्टिक सपोर्ट आणि इतर सेवा पुरवल्या.

इतर मोहीमा : PMC जगभरातील वेगवेगळे संघर्ष आणि संघर्षानंतरच्या वातावरणात भूमिका बजावत आहेत. मात्र, जबाबदारी, पारदर्शकता आणि संभाव्य मानवी हक्क उल्लंघनांच्या बाबतीत त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यांचा वापर या कारणांमुळे कायमच वादग्रस्त राहिला आहे.

भारतातील खाजगी सैन्याचा इतिहास

डॉ. सुव्रोकमल दत्त यांच्या मते, विजयनगर साम्राज्यात सैन्याचा एक तुकडी होती, ज्यामध्ये उझबेकिस्तान, कझाकस्तान, मध्य आशिया किंवा अफगाणिस्तान- इराणसारख्या देशांतून आलेले सैनिक होते.

त्यांना योग्य शुल्क दिले गेले, त्यांनी करारावर काम केले आणि विजयनगर साम्राज्याने त्यांचा अहमदनगरच्या सुलतान तसंच गोवळकोंडा आणि हैदराबादच्या निजामाविरूद्ध चांगला वापर केला.

ते सांगतात, "मध्य आशियातील लोकांचा समावेश असलेल्या या खाजगी सैन्याने चोल साम्राज्याच्या विस्तारातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्याच्या काळातही खाजगी सैनिकांचा वापर सामान्य होता.”

वसाहतवादी साम्राज्याबद्दल बोलायचे तर, जेव्हा ते नवीन ठिकाणं आणि नवीन देश व्यापत होते, त्या काळात खाजगी सैन्याचा वापर करून घेतला जात होता. ज्या देशांचा ताबा मिळवला, त्याच देशातील अनेक लोकांचा बळाने खाजगी सैनिक म्हणून वापर केला गेला. युद्धभूमीवर त्यांचा क्रूरपणे वापर केला गेला.

त्यांचा वापर बेकायदेशीर आहे का? त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे?

या प्रश्नांना उत्तरं देताना डॉ. दत्ता म्हणतात की, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न हवे, कायदा हवा.

ते म्हणतात, "21 व्या शतकात अमेरिका, युरोप आणि रशियाने ज्या प्रकारे खाजगी सैन्याचा वापर करून इतर देशांवर कब्जा केला आहे, देशांची सरकारे अस्थिर केली आहेत आणि स्वतःची धोरणं अंमलात आणली आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे, व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले आहे."

“अमेरिका याचं जिवंत उदाहरण आहे. इराकमध्ये ज्या प्रकारे खाजगी सैन्याचा वापर केला तो सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणारा होता. याचा परिणाम असा झाला आहे की, मानवी हक्कांचंही उल्लंघन झालं आहे.

खाजगी सैन्याचा वापर थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय करार व्हायला हवा, असं मला वाटतं. आता हे थांबवण्याची वेळ आली आहे.”

प्रोफेसर शॉन मॅकफीट यांनी असा युक्तिवाद केला की, "खाजगी लष्कर आणि भाडोत्री सैनिकांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा त्यांचे नियमन करण्यासाठी कायदे करण्यात दोन अडथळे आहेत. एक म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्यच असे देश आहेत, ज्यांच्याकडे खाजगी सैनिकांची संख्या सर्वाधिक आहे. उदाहरणार्थ- अमेरिका.”

दुसरा अडथळा सांगताना ते म्हणतात, "आपण एक चांगला आंतरराष्ट्रीय कायदा तयार केला तरी बेलारूसमध्ये भाडोत्री सैनिकांना कोण अटक करेल? लिबिया, येमेन, इराकमध्ये जाऊन त्यांना कोण अटक करेल? संयुक्त राष्ट्र ते करू शकत नाही. काही लोक आंतरराष्ट्रीय कायद्यांची मागणी करत आहेत, पण ही फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे."

शॉन मॅकफीटसारख्या तज्ज्ञ आणि खाजगी सैन्यात काम केलेल्या लोकांच्या मते, हा उद्योग वाढणार आहे आणि वाढतच जाणार आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही.

त्यांच्या मते, मोठी राष्ट्रं त्याचा वापर करत आहेत आणि ही चिंतेची बाब आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)