You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कामाच्या मध्ये फक्त 5 मिनिटांचा डान्स ब्रेक घेतल्याने होऊ शकतात असे भन्नाट फायदे
- Author, मेलिसा होगेनबूम
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारण्यापासून ते क्रिएटीव्हीटी वाढवण्यापर्यंत, डान्स करण्याचे मेंदूसाठी खूप मोठे फायदे आहेत. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला डान्स फ्लोअरवर तासनतास घालवायची अजिबात गरज नाही.
मी माझ्या ऑफिसमध्ये लॅपटॉपसमोर उभी राहून 'समर हिट्स'च्या गाण्यांवर सहज थिरकते.
दुपारचे 1 वाजले आहेत आणि मी कामावर आहे. पण मी काम टाळण्यासाठी नाही तर हा डान्स माझ्या मेंदूच्या आरोग्यासाठी करत आहे.
आरोग्यासाठी कधी आणि किती व्यायाम करावा याबद्दलचे सल्ले संपतच नाहीत. बऱ्याचदा ही खूप गांभीर्याने घ्यायची गोष्ट मानली जाते. पण अमूक एकाच पद्धतीने व्यायाम करण्याच्या किंवा फॉर्मच्या काळजीपोटी व्यायामातील सगळी मजाच निघून जाते. त्याहून वाईट म्हणजे यामुळं आपण व्यायाम करणे टाळतो. परिणामी दिवसभरात अजिबात हालचाल न होणं अगदी सहजपणे घडते.
म्हणूनच जेव्हा माझ्या सहकाऱ्यानं मला सांगितले की, डान्समुळे आपल्या मनःस्थितीवर आणि मेंदूवर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. तेव्हा हे फायदे मला स्वतःला नियमितपणे अनुभवता येतील का, हे मला पाहायचे होते.
त्यासाठी मी आठवडाभरात रोज 5 मिनिटांचा डान्स ब्रेक घेण्याचं आव्हान स्वतःला दिलं. जेणेकरून माझ्या मनःस्थितीवर आणि कार्यक्षमतेवर याचा काही चांगला परिणाम होतो का, हे मला अनुभवता येईल.
पहिल्या दिवशी भरदिवसा एकटीनंच डान्स करणे थोडे विचित्र वाटले. पण जेव्हा मी पुन्हा कामाला बसले तेव्हा इतर दिवशी ज्यावेळी मला आळस येतो त्याचवेळी मला अधिक ऊर्जा मिळाल्याचे जाणवले.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मला हा अनुभव इतका आनंददायी वाटला की, मी सहज आणखी काही वेळ डान्स चालू ठेवू शकले असते.
मला आलेला हा अनुभव विज्ञानाच्या आणि पुराव्यांच्या दृष्टीनेही अगदी योग्य आहे. डान्समुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर असे काही फायदे मिळतात, जे इतर कोणत्याही व्यायामात एकाच वेळी मिळत नाहीत.
मी स्वतः अनुभवल्याप्रमाणे, फक्त 5 मिनिटे डान्स केल्यानेसुद्धा आपल्या आरोग्याला, विशेषतः मेंदूच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात.
डान्समुळे फिटनेस सुधारतो
जसजसे आपले वय वाढते, तसतसे आपण 'डान्सपासून दूर जायला शिकतो'. पण आपण जन्माला येतो तेच मुळी डान्स करण्यासाठी, असं डान्स सायकॉलॉजिस्ट (नृत्य मानसशास्त्रज्ञ) आणि माजी प्रोफेशनल डान्सर पीटर लव्हॅट म्हणतात.
डान्स इतका फायदेशीर ठरण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीराची हालचाल आणि संगीताचा ताल यांचा सुंदर मेळ. अगदी आईच्या गर्भात असल्यापासूनच आपली शरीररचना हालचाल आणि तालाला प्रतिसाद देण्यासाठी बनलेली असते.
ताज्या संशोधनानुसार, अगदी नुकतीच जन्मलेली बाळेसुद्धा तालाची लय ओळखून त्याला प्रतिसाद देऊ शकतात.
"इतर कोणतेही व्यायाम किंवा ॲक्टिव्हिटी ज्या गोष्टी एकाच वेळी करू शकत नाहीत, ते डान्स सहज करतो. आपल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे 3 पैलू डान्स एकाच वेळी एकत्र आणतो," असे जर्मनीच्या 'मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर एम्पिरिकल एस्थेटिक्स'च्या मज्जाशास्त्रज्ञ (न्यूरोसायंटिस्ट) आणि माजी प्रोफेशनल बॅले डान्सर ज्युलिया एफ. ख्रिस्टेनसेन म्हणतात.
ख्रिस्टेनसेन सांगतात की, हे 3 मुख्य फायदे म्हणजे ॲरोबिक एक्सरसाइज, लोकांशी जोडले जाणे आणि संगीतावर स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याचा आनंद.
डान्स केल्याने तुमचा फिटनेस तर वाढतोच पण इतरांसोबत डान्स केल्यामुळे लोकांमध्ये मिसळल्यामुळे अतिरिक्त फायदेही मिळतात.
जेव्हा आपण इतरांच्या तालावर ताल मिळवून डान्स करतो, तेव्हा आपल्या शरीरात आनंदी ठेवणारे 'एंडॉर्फिन्स' आणि नात्यांमध्ये जवळीक निर्माण करणारे हार्मोन्स तयार होतात.
मेंदूसाठी होणारे फायदे
डान्स आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. कारण यामध्ये शरीराबरोबरच मेंदूचाही मोठा सहभाग असतो. तुम्ही मनाला येईल तसे नाचण्याऐवजी जर स्टेप्स शिकून डान्स करत असाल तर तुम्ही हालचालींचे एक पॅटर्न शिकता आणि गाण्याच्या तालावर स्टेप्सचा क्रम लक्षात ठेवता.
डान्सच्या स्टेप्स शिकल्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता आणि आठवण्याची ताकद वाढते हे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे.
माझ्या बाबतीत म्हणाल तर, माझ्या या एकटं नाचण्यापेक्षा आणि माझ्या सोलो 'पार्टी'साठी स्वतःच स्टेप्स शोधण्यापेक्षा ऑनलाइन पाहून एखादा डान्स प्रकार फॉलो करणे मला अधिक सोपे वाटले.
मी एकटीच डान्स करत असले, तरी फक्त डान्स केल्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. ऑनलाइन ट्रेनरच्या कठीण डान्स स्टेप्स शिकताना सुरुवातीला माझी बरीच तारांबळ उडाली आणि पाय चुकले. पण हळूहळू सराव झाल्यावर मला त्या स्टेप्स नीट जमू लागल्या आणि माझा आत्मविश्वास वाढला.
काही वेळापुरता मूड चांगला करण्यासोबतच, डान्समुळे आपले मानसिक आणि बौद्धिक आरोग्यही सुधारते, हे विविध संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा डान्समुळे मूड पटकन सुधारतो, नैराश्य कमी होते आणि जीवनमान उंचावण्यासाठी मदत होते.
याशिवाय, प्रौढ व्यक्तींमध्ये डिमेंशियाचा (विस्मृतीचा) आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठीही डान्स फायदेशीर मानला गेला आहे.
शाळकरी मुलांवर केलेल्या एका ताज्या अभ्यासात असे दिसून आले की, केवळ 5 मिनिटांच्या सामूहिक नृत्यामुळे मुलांची त्यानंतरच्या गणिताच्या अभ्यासावरील एकाग्रता वाढली. तसेच इतर प्रकारच्या ॲरोबिक व्यायामांपेक्षा मुलांनी या डान्सचा अधिक आनंद घेतला.
ग्रीसमधील ॲरिस्टॉटल युनिव्हर्सिटी ऑफ थेसालोनिकीच्या बायोमेकॅनिक्स लॅबोरेटरीतील सहाय्यक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक व्हॅसिलिओस पानौत्साकोपौलोस यांच्या मते, या निष्कर्षांवरून असे स्पष्ट होते की शारीरिक हालचालींचे छोटे ब्रेक्स एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. अन्यथा थकवा साचत जातो.
डान्समुळे क्रिएटीव्हिटी वाढते
फक्त 5 मिनिटे डान्स केल्यानेसुद्धा आपली क्रिएटीव्हिटी वाढू शकते. ख्रिस्टेनसेन सांगतात की, "याचा थेट संबंध मेंदूच्या 'इंक्युबेशन इफेक्ट'शी (सुप्त विचारांच्या प्रभावाशी) आहे. जसे एखाद्या समस्येवर रात्रभर विचार करून नंतर निर्णय घेतो, तसेच डान्सच्या स्टेप्स करताना तो प्रश्न सोडवण्यासाठी लागणारे मेंदूचे भाग सक्रिय होतात."
याचप्रमाणे, ऐनवेळी सुचेल तसा डान्स केल्याने 'डायव्हर्जंट थिंकिंग' वाढते. म्हणजेच एखाद्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नवनवीन कल्पना सुचू लागतात, असे अभ्यासातून समोर आले आहे.
"डान्समुळे विचारांच्या जुन्या साच्यांमधून बाहेर पडायला मदत होते," असेही त्या पुढे सांगतात.
डान्स ब्रेकनंतर माझे काम (आणि खरे तर हा लेख लिहिण्याचे कामही) कोणत्याही अडथळ्याविना सहजतेने पुढे सरकले, यामुळे हा अनुभव मला पूर्णपणे पटतोय. आणि विशेष म्हणजे मी डान्सच्या गुंतागुंतीच्या स्टेप्स फॉलो करत असतानाही हे घडले.
कठीण डान्स स्टेप्स फॉलो करूनही मला हा फरक जाणवला. कदाचित पुढच्या वेळी मी कोणत्याही स्टेप्स फॉलो न करता मनाला येईल तसा फ्रीस्टाइल डान्स करेन, आणि पाहिन की यामुळे मला कामात अजून जास्त ऊर्जा मिळते का.
असेही डान्स करण्याचे शरीराला प्रत्यक्ष दिसणारे खूप फायदे आहेत. यामुळे आपले शरीर मजबूत होते, शारीरिक समतोल (बॅलन्स) सुधारू शकतो आणि शरीराबद्दलचा आपला आत्मविश्वास वाढवू शकतो. ज्यामुळे खाली पडण्याचा धोका कमी होतो. याच कारणामुळे डॉक्टर आणि तज्ज्ञ 'पार्किन्सन्स'चा आजार असलेल्या रुग्णांवर उपचार पद्धती (थेरपी) म्हणून डान्सचा वापर करतात.
उदाहरणार्थ एका लहान अभ्यासात असे आढळले की, 18 महिन्यांच्या डान्स थेरपीमुळे शारीरिक समतोल सुधारला तसेच स्मरणशक्ती, नवीन गोष्टी शिकणे आणि दिशा समजण्यासाठी महत्त्वाचा असलेला मेंदूतील 'हिप्पोकॅम्पस' हा भागसुद्धा अधिक सक्षम झाला (त्याचा आकार वाढला).
मग यात न आवडण्यासारखं काय आहे? जसा आठवडा पुढे गेला तशी मी रोजच्या डान्स ब्रेकची आतुरतेने वाट पाहू लागले आणि यामुळे माझी कार्यक्षमता वाढल्याचेही मला जाणवले.
एकाच जागी सलग 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहिल्याने कॅन्सर आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. असा एक नवा शोध समोर आला आहे. त्यामुळे मध्येच व्यायामाचा ब्रेक घेणे खूप गरजेचे बनले आहे.
एकाच ठिकाणी बसून राहण्याच्या सवयीमध्ये अशा प्रकारे मधूनमधून थोडी हालचाल किंवा व्यायाम केल्यास आरोग्य नक्कीच सुधारू शकते, असे संशोधक सांगतात.
आवडणारे संगीत आणि डान्सचा प्रकार शोधा
डान्स सुरू कसा करायचा? यासाठी ख्रिस्टेनसेन सांगतात की, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गाण्यांवर नाचायला सुरुवात करा. तुम्हाला जो डान्स आवडेल तो तुम्ही ऑनलाइन शोधू शकता आणि सहज पाहून फॉलो करू शकता.
लोकांशी कनेक्ट होण्याचा किंवा मिसळण्याचा जास्त फायदा घ्यायचा असेल, तर नवीन शिकणाऱ्यांसाठीचे डान्स क्लास किंवा डान्स वर्कआउट क्लास जॉईन करा, असा सल्लाही ख्रिस्टेनसेन देतात.
लव्हॅट यांच्या निरीक्षणानुसार, डान्स करताना एक सामान्य अडथळा म्हणजे लोकांना अनेकदा डान्स करताना संकोच वाटतो किंवा स्वतःच्या कौशल्याबद्दल आत्मविश्वास वाटत नाही.
आमच्या व्हिडिओ कॉलदरम्यान स्वतः हातांची हालचाल करत डान्स करत ते म्हणाले, "हाच संकोच आपल्याला काढून टाकायचा आहे. 'प्रत्येक व्यक्ती डान्स करू शकते' हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे."
ते स्वतः आजही रोज न चुकता डान्स करतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पानौत्सा कोपौलोस या मुद्द्याशी सहमत होत सांगतात की, जेव्हा आपण नियमितपणे व्यायाम करतो. मग तो डान्स असो वा अन्य कोणतेही व्यायाम,तेव्हा आपले जीवनमान सुधारते.
डान्स करताना विशिष्ट स्टेप्स लक्षात ठेवून कराव्या लागतात त्यामुळे आपला आत्मविश्वास आणि स्वतःवरील नियंत्रण (सेल्फ-कंट्रोल) वाढते.
ते पुढे सांगतात, "जर तुम्हाला डान्स करण्याची संधी मिळत असेल तर ती अजिबात सोडू नका, तिचा पुरेपूर आनंद घ्या."
माझ्या बाबतीत सांगायचे तर, मी ऑनलाइन शोधले तेव्हा 5 मिनिटांच्या डान्ससाठी मला खूप सारे पर्याय मिळाले.
फक्त आपल्या क्षमतेनुसार योग्य तोच डान्स निवडण्याची काळजी घ्या. मला कोणी पाहत नाही या विचाराने मला धीर दिला होता. पण कोणाला ठाऊक, एकदा माझा आत्मविश्वास वाढला, की मग पुढचे पाऊल कदाचित एखाद्या मोठ्या ग्रुपसोबत डान्स करण्याचे असेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.