'कमबॅक करना पडेगा'; ठाकरे बंधूंच्या तिरंगा मार्चमध्ये तरुणाईचा जल्लोष, पाहा 10 फोटो

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नीट पेपरफुटी प्रकरणावर देशव्यापी आंदोलनं झाली. विशेषत: दिल्लीतील जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं देशभरातील तरुणाईला जागं केलं आणि आंदोलनानं आणखी मोठं रूप धारण केलं.

या आंदोलनाचं फलित म्हणजे काल (25 जुलै) देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.

तरुणाईच्या आंदोलनाचं यश साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी मुंबईत 'तिरंगा मार्च'चं आयोजन केलं होतं.

खरंतर ठाकरे बंधूंनी यापूर्वीच जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 26 जुलै रोजी मुंबईत 'तिरंगा मोर्चा' काढण्याची घोषणा केली होती.

मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजीच राजीनामा दिल्यानंतर या कार्यक्रमाचं स्वरूप बदलण्यात आलं आणि त्याला 'तिरंगा मार्च' असं नाव देण्यात आलं आहे.

या मार्चमध्ये तरुणाई अगदी परखडपणे व्यक्त झाल्याचे दिसून आली. या मार्चमधील निवडक फोटो पाहूया.

लोकांना आता तुरुंगाची किंवा बंदुकीची भीती वाटत नाही, ही कौतुकास्पद बाब आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जनतेचे निर्भयपणे रस्त्यावर उतरणे हे सत्ताधारी पक्षासाठी एक धोक्याचे चिन्ह आहे, असंही त्यांनी म्हटलं.

या तिरंगा मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह खासदार संजय राऊत, तसेच इतर राजकीय नेतेही उपस्थित होते.

ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या या तिरंगा मार्चमध्ये मुंबईकरांनी, आणि विशेषत: तरुणाईने मोठ्या संख्येत उपस्थिती लावली.

या तिरंगा मार्चमध्ये तरुणाईने बनवून आणलेले पोस्टर्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर मीम्स आणि क्रिएटिव्ह पोस्टर्स मोठ्या प्रमाणात दिसले.

विशेष म्हणजे, हे क्रिएटिव्ह पोस्टर्स प्रत्यक्ष आंदोलनातही प्रिंट काढून आणले जात होते. ठाकरे बंधूंच्या तिरंगा मार्चमध्येही असे पोस्टर्स दिसले.

भारतातल्या तरुणाईनं या आंदोलनात सोशल मीडियावर सहभाग नोंदवलाच, मात्र प्रत्यक्षातील सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला.

शिक्षणव्यवस्थेत सुधारणेची मागणीही या आंदोलनातून केली गेली. नीट पेपरफुटीनंतर तर या मुद्द्याचं गांभीर्यही वाढले आहे.

आता पुढच्या काळात असे प्रकार घडू नयेत म्हणून सरकार काय उपाययोजना आखतंय, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

या आंदोलनातील हटके घोषणा तर अनेकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. जेन-झीच्या या घोषणा आंदोलनाचं नवं रूपही दाखवून देणारं ठरलं.

मुंबईत झालेला तिरंगा मार्च अत्यंत शांततेत पार पडला.

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या तिरंगा मार्चसाठी विशेष पुढाकार घेतला होता.

उद्धव ठाकरे यांनी तर दिल्लीत जाऊनही अभिजित दिपके यांची भेट घेतली होती. एकूणच कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन किंवा एकूणच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात झालेल्या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी अगदी स्पष्टपणे आणि प्रत्यक्ष सहभागाने पाठिंबा दिला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)