You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पासवर्ड कसा असावा? हॅकिंग होऊ नये म्हणून सुरक्षित पासवर्ड कसा निवडाल?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
- Published
ईमेल्स आणि महत्त्वाची माहिती, पैशांच्या व्यवहारांचे तपशील हे सारं सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो तो पासवर्ड.
ईमेल, ऑनलाईन बँकिंग, फेसबुक - इन्स्टाग्राम - ट्विटरसारखा सोशल मीडिया किंवा मग अॅमेझॉन - मेंत्रा सारखी शॉपिंग अॅप्स. यातल्या प्रत्येकासाठी आपल्याला एक पासवर्ड ठेवावा लागतो. आणि तो लक्षातही ठेवावा लागतो, म्हणून मग अनेकदा आपण शॉर्टकट्स मारतो. आणि याच गोष्टी धोकादायक ठरू शकतात.
पासवर्ड कसा नसावा?
- तुमचं नाव किंवा आडनाव आणि त्यापुढे 123 म्हणजे - Sachin123 किंवा मग Preeti@789, qwerty, asdfg अशा प्रकारचे पासवर्ड अंदाज लावायला अत्यंत सोपे असतात.
- पासवर्डमध्ये तुमचं नाव वा आडनाव असू नये.
- सहज अंदाज लावता येतील अशी नावं - नवरा वा बायको, मुलं, घरातला पाळीव प्राणी, सगळ्यांना माहित असलेलं कुटुंबातलं टोपणनाव, वाढदिवसाची तारीख हे शब्द पासवर्ड म्हणून वापरू नये.
- यापूर्वी कधी वापरलेला पासवर्ड परत वापरू नये.
स्ट्राँग पासवर्ड कसा तयार करायचा?
असा पासवर्ड हवा जो तुमच्या लक्षात राहील पण इतरांना सहजासहजी ओळखता येणार नाही. पासवर्डमध्ये अक्षरं - अंक आणि स्पेशल कॅरेक्टर्स असायला हवी.
मग असा पासवर्ड तयार कसा करायचा? सोपं आहे.
तुमचं आवडतं एखादं गाणं वा डायलॉग वा ब्रीदवाक्य घ्या.
उदाहरणार्थ - Twinkle Twinkle Little Star
आता यातल्या प्रत्येक शब्दाचं सुरुवातीचं अक्षर घेऊ, त्यातलं एकच कॅपिटल ठेऊ - Ttls
या चार अक्षरांनंतर स्पेशल कॅरेक्टर - * घातलं तर लक्षात रहायलाही सोपं. म्हणजे आतापर्यंतचा पासवर्ड होईल - Ttls*
यामध्ये आकडे म्हणून तुम्ही तुमच्या लक्षात राहील असा अंक घाला. तुमच्या अगदी पहिल्या (पण आता वापरात नसलेल्या) स्कूटर वा बाईकचा नंबर वा तुमच्याचसाठी महत्त्वाची असणारी तारीख
पासवर्ड होईल - Ttls*2208
आता हा पासवर्ड ओळखणं इतरांना सहज शक्य होणार नाही.
पासवर्डबाबत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
- एकच पासवर्ड अनेक अकाऊंट्स - ईमेल, सोशल मीडिया, बँक यासाठी वापरू नका. तुमचा एक अकाऊंट हॅक झाला, तर इतर आयते हॅकर्सच्या हाती पडतील.
- ठराविक पासवर्ड्स आलटून - पालटून वापरू नका.
- लॉगिन आयडी आणि पासवर्ड असे एकत्र ईमेल ड्राफ्टमध्ये वा मोबाईलच्या नोट्समध्ये लिहून ठेवू नका.
- पासवर्ड लिहायचेच असतील तर ते लिहून अगदी डेस्कजवळ वा सगळ्यांना दिसतील - सापडतील असे ठेवू नका.
- पटकन लॉगिन करता यावं म्हणून ब्राऊजरला पासवर्ड सेव्ह करून ठेवता येतो. पण जर तुम्ही ऑफिसचा वा अनेकजण वापरत असलेला कॉम्प्युटर वापरत असाल, तर असं करू नये. खासगी लॅपटॉप असला, तरी अशा प्रकारे पासवर्ड सेव्ह करून ठेवणं लॅपटॉप चोरीला गेल्यास महागात पडू शकतं.
2 फॅक्टर ऑथेंटिकेशन
2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय तर थोडक्यात कुलूप असणाऱ्या दरवाज्याच्या बाहेर आणखीन एक सेफ्टी डोअर लावणं. या प्रकारामध्ये तुमचा पासवर्ड हा एखाद्या अकाऊंटमध्ये लॉगिन करायला पुरेसा नसेल. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या अकाऊंटला जोडून लॉगिनसाठीचा OTP त्यावर मागवू शकता. म्हणजे पासवर्डसोबतच हा OTP घातल्यानंतरच तुमच्या अकाऊंटमध्ये तुम्हाला लॉगिन करता येईल.
अशाच प्रकारे पासवर्ड भरल्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या आकड्यांपैकी एक योग्य आकडा मोबाईलवरून क्लिक करूनही हे ऑथेंटिकेशन करता येईल.
पासवर्ड मॅनेजर
प्रत्येक अकाऊंटसाठी वेगळा पासवर्ड ठेवला तरी 7-8 पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात. ते ठेवणं कठीण जात असेल तर त्यासाठी पासवर्ड मॅनेजरची मदत घेता येईल.
पासवर्ड मॅनेजर तुमच्यासाठी नवीन युनिक पासवर्ड तयार करेल आणि हे पासवर्ड्स सुरक्षितही ठेवेल. यानंतर तुम्हाला एखाद्या अकाऊंटमध्ये लॉग इन करताना या पासवर्ड मॅनेजरच्या मदतीने लॉग इन करता येईल. या पासवर्ड मॅनेजरचा फायदा म्हणजे दर वेळी नवा - वेगळा पासवर्ड तयार करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार नाही. शिवाय तुमचे यापूर्वी तुम्ही ठरवलेले काही पासवर्ड सुरक्षित नसतील, तर तशी सूचनाही पासवर्ड मॅनेजर तुम्हाला देईल.
इतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
आपण फोनवर अनेक अॅप्स डाऊनलोड करतो. त्यामध्ये वेगळं लॉग इन तयार करण्याऐवजी त्यासाठी आपण आपलं जीमेल, फेसबुक यांचंच लॉग इन वापरतो. अशा प्रकारे आपण कोण कोणत्या अॅपकडे आपलं लॉगिन शेअर केलंय, याचा आढावा वेळोवेळी घेत चला. जी अॅप्स तुम्ही वापरत नाही, त्यांना दिलेला अॅक्सेस काढून टाका. आणि त्यानंतर ही अॅप्सही काढून टाका.
जर तुम्ही विविध गॅजेट्स वापरून लॉगिन करत असाल, तर एकाच वेळी आपण कुठून कुठून लॉगिन करून ठेवलंय, किंवा कोणते डिव्हाईसेस लिंक केलेत, याचाही आढावा घ्या. गरज नसेल, त्या गॅजेट्सवरून केलेलं लॉगिन काढून टाका.
अनेक ठिकाणी तुम्हाला बायोमेट्रिक्स म्हणजे फिंगर प्रिंट किंवा फेस स्कॅनिंग वापरूनही लॉग इन करता येतं. हा पर्यायही तुम्हाला वापरता येईल.
प्रत्येक अकाऊंटसाठी काही रिकव्हरी सेटिंग्स असतात. म्हणजे पासवर्ड विसरला, किंवा अकाऊंट हॅक झाला तर या रिकव्हरी सेटिंग्समधला ईमेल - फोन नंबर यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या अकाऊंटचा पुन्हा ताबा मिळवता येतो. त्यामुळे ही रिकव्हरी सेटिंग्स वेळोवेळी अपडेट करा.
हे ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)