अटकपूर्व जामीन मिळालेल्या व्यक्तीवर सहा जणांची हत्या केल्याचा आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?

फोटो स्रोत, UGC
- Author, बल्ला सतिश
- Role, बीबीसी तेलुगु
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
(सूचना : या लेखात हत्येचा तपशील आहे. यातील मजकूर वाचकांना विचलित करू शकतो.)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याच्या आरोपात अटकपूर्व जामीन मिळालेल्या आरोपीने सहा जणांची हत्या केली.
ज्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात त्याला अटकपूर्व जामीन मिळाला होता त्या मुलीची, तिच्या आईची आणि आजीची त्याने हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या घरी जाऊन पत्नी आणि दोन लहान मुलींची त्याने हत्या केली आणि तो फरार झाला. पोलीस त्याच्या तपासावर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात शाबाद या ठिकाणी राजकुमार नावाच्या तरुणाने सहा जणांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. फ्युचर सिटी पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, पी. राजकुमारने 10 जुलैच्या रात्रीपासून 11 जुलैच्या सकाळपर्यंत सहा जणांची हत्या केली.
"यावर्षी 16 मे रोजी राजकुमारविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करणाऱ्या मुलीची आई आणि आजी यांची त्याने प्रथम हत्या केली. त्यानंतर त्या मुलीला तेथून दैवालगुडा या दुसऱ्या गावात नेलं आणि तेथील एका तलावाजवळ तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने त्याच गावातील स्वतःच्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केली. हा सर्व प्रकार रात्री 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडला," असं पोलिसांनी सांगितलं.

घटनास्थळ क्रमांक - 1
शाबाद हे तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील मंडलाचे मुख्यालय आहे. (तेलंगानामध्ये प्रशासकीय व्यवस्थेसाठी काही गावांचे मिळून मंडल तयार केले जाते आणि त्याच्या मुख्यालयाला मंडल मुख्यालय म्हटले जाते.) ते दुर्गम गाव नाही किंवा आजूबाजूला घरं आणि लोकवस्ती नसलेलं ठिकाणही नाही.
रस्त्यालगत असलेल्या एका घरात दोन मुली, त्यांची आई आणि आजी, अशा एकूण चार महिला राहत होत्या. यापैकी एक 17 वर्षांची मुलीने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
दुसरी 19 वर्षांची मुलगी विकलांग होती. तिची मानसिक आणि शारीरिक प्रकृतीही चांगली नव्हती. 10 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजता राजकुमार कारने तेथे पोहोचला.
त्याने प्यायलेल्या बिअरचा कॅन घराच्या ओट्यावर पडलेला होता.
17 वर्षांच्या मुलीला घराबाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना तिची आई आणि आजी यांनी विरोध केला. त्यानंतर त्यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.
संपूर्ण घर रक्ताने माखलं होतं. विकलांग मुलीला तिची आई आणि आजी यांचा मृत्यू झाला आहे आणि कोणीतरी तिच्या धाकट्या बहिणीला घेऊन गेलं आहे, याची जाणीव झाली होती की नाही, हे स्पष्ट नव्हतं. ती मुलगी किंचाळू शकत नव्हती, हालचालही करू शकत नव्हती. ती रक्ताच्या थारोळ्यात तशीच पडली होती.

घटनास्थळ क्रमांक - 2
पहिल्या ठिकाणाहून अपहरण केलेल्या 17 वर्षांच्या मुलीला राजकुमारने कारमधून जवळच्या दैवालगुडा गावात नेलं.
गावाच्या टोकाला एक तलाव आहे. त्यात फारसं पाणी नाही. तेथे तरुणांनी क्रिकेट खेळण्यासाठी दगड रचून विकेट तयार केली होती.
त्या दगडी विकेटजवळ राजकुमारने मुलीचा गळा चिरून तिची हत्या केली. त्या दगडी विकेटजवळ रक्ताचे डाग अजूनही दिसत होते.

फोटो स्रोत, UGC
घटनास्थळ क्रमांक 3
त्याच गावात आणखी सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर राजकुमारचं घर आहे. तेथे त्याची पत्नी आणि दोन लहान मुलं पलंगावर पडलेली होती.
तेथे नेमकं काय घडलं असेल, याचा अंदाज बांधणंही कठीण होतं. ती दोन्ही लहान मुलं जणू शांतपणे झोपल्यासारखी दिसत होती. पण प्रत्यक्षात त्यांचाही गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हे दृश्य पाहणारे सर्वजण हादरले.
अनेक हत्यांच्या घटनांचा तपास करणारे पोलीस, शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि घटनास्थळी वार्तांकनासाठी गेलेले पत्रकारही त्या लहान मुलांची अवस्था पाहून अस्वस्थ झाले. त्याच पलंगावर, रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्या आईचाही मृतदेह पडलेला होता.

राजकुमारने पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या केली. घराबाहेर मुलांच्या छोट्या चपला विखुरलेल्या होत्या.
त्यांची खेळणी आणि खेळण्यातल्या गाड्याही घरात होत्या. त्या वस्तू मृत मुलांची आठवण करून देत होत्या.
हत्या केल्यानंतर राजकुमारने वडिलांना फोन करून आपण हे खून केल्याचं सांगितलं. त्यानंतर वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस दोन्ही ठिकाणी पोहोचले आणि तपास सुरू केला. दोन्ही कुटुंबीयांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या.
मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं असून अंत्यसंस्कारही पूर्ण झाले आहेत. राजकुमारविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या तीन ठिकाणी झालेल्या सहा हत्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका घरातील तीन पिढ्यांतील महिलांची तसेच स्वतःच्या घरात पत्नी आणि मुलांची हत्या करणाऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत असल्याचं फ्युचर सिटी पोलीस आयुक्तालयाने म्हटलं आहे.
मुलीचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची कार चेगुरू गावाजवळील रेल्वे रुळांजवळ पोलिसांना आढळली. राजकुमारचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
राजकुमारने या हत्यांचा कट आधीच रचला होता का? त्याला कुणाची मदत मिळाली होती का? मुलीला मोठ्याने आरडाओरडा का करता आला नाही? त्याने पत्नी आणि मुलांची हत्या का केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणं बाकी आहे.

'त्याचा प्रेमविवाह होता'
पी. राजकुमारचं मूळ गाव दैवालगुडा आहे. त्याने त्याच गावातील आणि स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सरिता नावाच्या महिलेशी प्रेमविवाह केला होता.
सरिताच्या भावाने बीबीसीला सांगितलं."त्यांचं प्रेमप्रकरण किती वर्षांपासून होतं, हे मला माहिती नाही. त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन आहे. आमचं तसं नाही. पण माझी धाकटी बहीण शिकलेली होती. त्या वेळी ती बी.एड.चं शिक्षण घेत होती आणि शिकवणी घेत होती. 2018 मध्ये त्याने माझ्या बहिणीवर प्रेम असल्याचं सांगितलं आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिचे लग्न ठरवण्याच्या तयारीत होतो पण हे लग्न थांबवा असं तो म्हणाला. त्याविरोधात आम्ही पोलीस ठाण्यात गेलो होतो. बहिणीचं त्याच्याशी लग्न झाल्यानंतर मी त्यांच्याशी बराच काळ बोललो नाही. मात्र, माझी आई अधूनमधून तिची भेट घेऊन तिची विचारपूस करत असे."
त्यानंतर हे दाम्पत्य मूळ गाव सोडून दुसरीकडे राहू लागलं.
ज्या दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांची हत्या झाली, ते त्यांच्याच शेजारी राहत होते. 17 वर्षांच्या मुलीच्या वडिलांचं काही काळापूर्वी निधन झालं होतं.

मुलीच्या काकांनी बीबीसीला सांगितलं की मुलीच्या वडील हयात होते तेव्हादेखील तो आमच्या लहान्या मुलीला त्रास देत होता. तिच्या वडिलांसह सगळ्यांना जीवे मारण्याची धमकी देखील तो देत असे. तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर हा त्रास अधिकच वाढला.
मुलीच्या काकांनी सांगितले की ते आमच्या शेजारी राहत असल्याने दोन्ही कुटुंबांची ओळख होती. त्यांची मुलं आमच्या घरीही येत असत.
'अल्पवयीन मुलीला तो आवडत नसे'
तो तिला त्रास देत असे त्यामुळे आम्ही महाविद्यालयात पण पाठवले नाही. घरूनच शिक्षण घेण्यास सांगितले. ती परीक्षेला जात होती त्यावेळी तिचा हात पकडून त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. घरातील सर्वांना मारून टाकण्याची धमकी त्याने दिली होती. या घटनेनंतर 16 मे रोजी आम्ही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. पण त्याला अटक झाली नाही. आम्ही विचारणा केली की तो फरार असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, त्याला अटकपूर्व जामीन मिळाला.
त्यानंतर तो आम्हाला त्रास देणार नाही असे पोलिसांनी आम्हाला सांगितले. पण त्याचा त्रास सुरुच होता. आम्ही केस परत घ्यावी म्हणून त्याचा भाऊ तडजोड करण्यासाठी घरी देखील आला होता. पण या गोष्टीला आम्ही नकार दिला. त्यानंतर त्याने हे भीषण कृत्य केले असे मुलीच्या काकांनी बीबीसी तेलुगुला सांगितले.
राजकुमार आणि मुलीमध्ये परस्पर संमतीने संबंध असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला.
"त्या मुलीला राजकुमार अजिबात आवडत नव्हता. तसं असतं तर तिने आम्हाला सगळं सांगितलं नसतं. ती त्याच्यासोबत निघून गेली असती. तिच्या आईनेही तो तिचा छळ करत असल्याचं आम्हाला सांगितलं होतं. तिने पोलिसांनाही तशी माहिती दिली होती. राजकुमारने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती," असं मुलीच्या काकांनी सांगितलं.
यापूर्वी मुलीचा हात पकडला तेव्हा 'तुझ्या वडिलांनाही मीच मारलं,' असं राजकुमार म्हणाला होता, असा आरोप करत मुलीच्या वडिलांच्या मृत्यूचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी मुलीची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, हत्येमागील नेमकं कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
पोलिसांवर आरोप
दरम्यान, पॉक्सो प्रकरणाच्या तपासात गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत मुलीच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकावर आरोप केले आहेत.
"आम्ही प्रत्येक वेळी पोलिसांना विचारणा केली की तो सापडला तर त्याला पकडू, असं ते सांगायचे. पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे, असं सांगून आम्हाला परत पाठवलं जायचं. पण तो परिसरात मोकळेपणाने फिरत होता. त्याला अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत पोलिसांनी त्याला अटक केली नाही," असा आरोप मुलीच्या काकांनी केला.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणाचे आरोप झाल्यानंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.
या आरोपांबाबत अधिक स्पष्टीकरण मिळावं यासाठी बीबीसीने फ्युचर सिटी पोलीस आयुक्त, तसेच संबंधित डीसीपी आणि एसीपी यांच्याशी दूरध्वनी, व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळणं बाकी आहे.

फोटो स्रोत, UGC
11 जुलै रोजी परिसरातील नागरिकांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आंदोलन केलं.
त्याच दिवशी तेथे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीआरएसच्या नेत्यांना पोलिसांनी अडवलं.
12 जुलै रोजी माजी मंत्री सविता इंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस)च्या शिष्टमंडळाने पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
सरकारच्या वतीने पटनाम् महेंद्र रेड्डी आणि इतर नेत्यांनीही प्रभावित कुटुंबांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडून आवश्यक मदत दिली जाईल, अशी घोषणा केली.
आता घरात उरली फक्त एक मुलगी
हत्या झालेल्या 17 वर्षांच्या मुलीला 19 वर्षांची मोठी बहीण आहे.
ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग आहे. तिला स्वतःहून चालता, बसता किंवा बोलता येत नाही.
तिला जेवण भरवणं, अंघोळ घालणं आणि दैनंदिन गरजांची काळजी घेणं, ही सर्व कामं तिची आई किंवा आजी करत असत.
तिच्या वडिलांचं यापूर्वीच निधन झालं होतं. आता तिची आई, आजी आणि धाकटी बहीण यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिची काळजी आता कोण घेणार, असा प्रश्न गावकऱ्यांसह नातेवाईकांनाही पडला आहे.
या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले असले, तरी ती स्वतः ती मदत स्वीकारू किंवा वापरू शकत नाही.
"तिला झोपवूनच जेवण भरवावं लागतं. 19 वर्षांच्या मुलीला आई आणि आजीच शौचालयात घेऊन जात असत. आता त्याने घरातील सर्वांनाच मारून टाकलं," असं मुलीच्या काकांनी सांगितलं.
विकलांग मुलगी काळजी कोण घेईल?
विकलांग तरुणीच्या संदर्भातही मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीसांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.
"घरात हत्या झाल्यानंतर संपूर्ण खोली रक्ताने माखली होती. विकलांग तरुणी जागची हलू शकत नव्हती. त्यामुळे तीही रक्ताने माखली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीसांनी सर्वप्रथम जिवंत असलेल्या त्या तरुणीला बाहेर काढायला हवं होतं. पण त्यांनी आधी मृतदेह बाहेर काढले. त्यानंतरही बराच वेळ तिला खोलीतून बाहेर काढलं नाही. आम्हालाही आत जाऊ दिलं नाही. त्यामुळे ती बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यातच पडून होती," असा आरोप मुलीच्या काकांनी केला.
या आरोपांबाबत प्रतिक्रिया मिळावी यासाठी बीबीसीने फ्युचर सिटी पोलीस आयुक्त, तसेच संबंधित डीसीपी आणि एसीपी यांच्याशी दूरध्वनी, व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
नातेवाईकांनी सांगितलं की, जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडून त्या विकलांग तरुणीची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. तिला एका निवासी संस्थेत दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राजकुमारचे विचित्र वागणे
दुसरीकडे, राजकुमारचं मूळ गाव दैवालगुडामध्ये वेगळंच चित्र आहे. पोलिसांच्या निवेदनानुसार, राजकुमारने त्याच गावात पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली.
मुलांचे मामा आणि आजी यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांना ज्या ठिकाणी पुरण्यात आले त्या ठिकाणी ते रडत होते.

आपली मुलगी सरिता आणि नातवंडांची हत्या राजकुमारने का केली असं हंबरडा फोडून बोलत होत्या.
"तो माझ्या मुलीला पुन्हा लग्न कर, प्रियकर आण, असं म्हणायचा. तिने नकार दिल्यावर त्याने तिची हत्या केली. कसंही करून माझी मुलगी संसार टिकवेल, अशी मला आशा होती. म्हणून मी तिच्यासाठी खूप संघर्ष केला. पण तो असं करेल, याची कल्पनाही नव्हती," असं जयम्मा यांनी रडत रडत सांगितले.
सरिताच्या बहीण संजीवा यांनी बीबीसीला सांगितले, "तो काही मुलींशी बोलायचा आणि त्याबद्दल माझ्या बहिणीला कळायचं. त्यामुळे दोघांमध्ये भांडणं व्हायची. एकदा एका मुलीमुळे त्याने कीटकनाशकही पिलं होतं. त्यानंतर सासरच्या लोकांनी माझ्या बहिणीला स्वीकारलं नाही. तिच्या हातचं पाणीही प्यायचे नाहीत. अशा परिस्थितीत राजकुमार कधी तिच्याशी चांगला वागायचा, तर कधी तिचा छळ करायचा. माझ्या बहिणीने सगळं सहन केलं. दुसऱ्या बाळाच्या जन्मापर्यंत माझं तिच्याशी बोलणंही नव्हतं. आमची आई तिची काळजी घ्यायची.
"नंतर तिने त्याच्या छळाबद्दल सांगितलं असतं तर आम्ही गावातील ज्येष्ठांसमोर हा विषय मांडला असता. पण तिने सगळं सहन केलं. राजकुमार मुलांशीही प्रेमाने वागत नव्हता. मोठा मुलगा वडिलांना पाहिलं की घाबरायचा. एकदा तो एवढा घाबरला की माझ्यावरच धावून आला. त्यानंतर मी राजकुमारला मुलांशी असं वागू नकोस, असं सांगितलं होतं. त्याने माझ्या बहिणीचा खूप छळ केला. पण तिने आम्हाला काहीही न सांगता हे सगळं सहन केलं. तो बेटिंग अॅपवर पैसे लावत असल्याचं आम्ही ऐकलं होतं, पण त्याबाबत नेमकी माहिती नव्हती. पॉक्सो प्रकरणानंतरच त्या मुलीबद्दल आम्हाला समजलं. माझ्या बहिणीला यापूर्वीच याची माहिती होती, पण तिने आम्हाला सांगितलं नव्हतं," असं सरिताची बहीण संजीवा यांनी बीबीसीला सांगितलं.
राजकुमारचा शोध पोलीस घेत आहेत. तो एका ठिकाणी दिसल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
बीबीसीने आरोपीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या कुटुंबाकडून प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. ती आल्यावर अपडेट करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























