मुंबईत 8 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप; पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न

(सूचना - या बातमीतील तपशील तुम्हाला विचलित करू शकतो.)
नसरापूरची घटना ताजी असताना मुंबईत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात वॉचमनवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
मुंबईतील पायधुनी परिसरात एका आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परिसरात स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.
दक्षिण मुंबईतील झोपडपट्टीचा परिसर असलेल्या एका भागात राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीवर तिथल्याच एका सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बीबीसी मराठीला दिली.
घटनेनंतर पीडित लहान मुलीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटना काय आहे?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना कळताच दक्षिण मुंबईतील जेजे रुग्णालयाजवळील पायधुनी परिसरात रविवारी 12 जुलै रोजी मोठ्या संख्येने स्थानिकांनी जमाव केला.
12 जुलै रोजी दुपारी पोलिसांना लहान मुलीवर स्थानिक गोडाऊनमध्ये असलेल्या शौचालयात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली.
पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलगी आपल्या घराबाहेर खेळत होती. पण बराच वेळ ती दिसली नाही म्हणून पालकांनी तिला शोधायला सुरुवात केली.
घराजवळ असलेल्या गोडाऊनजवळ ती सापडली. यावेळी तिथल्याच शौचालयात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. तिथल्याच स्थानिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
आरोपीचं वय 32 असून तो त्या गोडाऊनच्या सुरक्षा रक्षकाचं काम करत होता.

फोटो स्रोत, Getty Images
पायधुनी पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे, अशी माहिती डिसीपी विजयकांत सागर यांनी दिली.
दरम्यान, 12 जुलै रोजी दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत स्थानिकांनी या प्रकरणी आंदोलन केले. तसंच पोलीस स्टेशनलाही घेराव घालण्यात आला होता.
आरोपीला तत्काळ शिक्षा व्हावी या मागणीसाठी स्थानिक रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस स्टेशनलाही घेराव घातल्याचं समोर आलं.
तसंच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
पीडितेवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू
पीडित लहान मुलीला काही जखमा किंवा दुखापत असल्याने तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय तपासण्या सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
12 जुलै रोजी माध्यमांशी बोलताना पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितलं की, "मुलीवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. डाॅक्टरांची टीम तिच्यावर काम करत आहे. एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे."
मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हटलं?
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं की, मी माहिती घेतल्यानुसार तिथलं शौचालय मुलगी वापरत असताना सुरक्षा रक्षक पाठलाग करत होता आणि मग तिने तिच्या पालकांना सांगून मग त्या आरोपीला अटक झालेली आहे. त्याला शिक्षा मिळण्याच्याबाबतीत पोलिसांकडून कारवाई केली जात आहे."
"पीडित मुलीला मदत मिळण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शासन आणि विभाग म्हणून संबंधिताला शिक्षा होण्याच्या दृष्टीने जे काही सहकार्य आवश्यक आहे ते करत आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांकडून टीका
या प्रकरणावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जातेय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून राज्यातील त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले.

फोटो स्रोत, Getty Images
तसंच यावेळी त्यांनी नसरापूर प्रकरणाचाही दाखला दिला.
ते म्हणाले, "नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाही मुंबईत पायधुनी परिसरात एका अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर वॉचमनने अत्याचार केल्याची संतापजनक आणि गंभीर घटना घडली."
"सरसकट सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीने न्याय मिळत नाही म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही. त्यासाठीच खटले वेगाने निकाली निघणं आणि शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक आहे."
"याबाबत अधिवेशनातही मागणी केली, त्यानुसार सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत. पीडित चिमुकली लवकर बरी व्हावी, ही प्रार्थना!"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























