पुरुषांनी लघवी बसून करावी की उभं राहून? आरोग्य आणि स्वच्छतेसाठी काय योग्य? महत्त्वाची माहिती

पुरुषांनी लघवी बसून करावी की उभं राहून? आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने कोणता पर्याय चांगला?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फर्नांडो डुआर्टे
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

पुरुषांनी लघवी कशी करावी? हा एक असा प्रश्न आहे की, ज्यावर पुरुषांमध्ये सातत्याने चर्चा होत असते.

परंतु, बसून लघवी करणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही.

तरीही, बसून लघवी करणं हा तुलनेने योग्य मार्ग मानला जातो, याबाबत काही प्रमाणात तरी एकमत आहे.

वडील आणि लहान मुलगा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हा वाद जुना आहे, पण तिच्यामागे अनेक कारणं देखील आहेत.

ब्रिटनच्या युरोलॉजी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मेरी गार्थवेट म्हणाल्या, "लघवी करण्याचा कोणताही बरोबर किंवा चूक असा एकच मार्ग नसतो. ते व्यक्तीवर अवलंबून असतं. पण शौचालय जर स्वच्छ असेल, तर बसून लघवी करणं अधिक सुरक्षित मानलं जातं."

डॉ. गार्थवेट सांगतात की, ज्यांना चालण्यात, उभं राहण्यात किंवा तोल सांभाळण्यात अडचण येते किंवा ज्यांना रात्री अचानक उठून लगेच टॉयलेटकडे धाव घ्यावी लागते, अशा लोकांसाठी बसून लघवी करणं अधिक सुरक्षित ठरतं.

2014 मध्ये नेदरलँडसमधील लीडेन विद्यापीठाच्या एका अभ्यासात डॉक्टरांनी शरीराची स्थिती किंवा स्थितीचा लघवीचा वेग आणि मूत्राशय रिकामं होण्याच्या वेळेवर कसा परिणाम करतं, हे पाहिलं.

या अभ्यासात दिसून आलं की, ज्या पुरुषांच्या प्रोस्टेटचा आकार वाढलेला होता, अशा पुरुषांना बसून लघवी केल्यावर मूत्राशय लवकर आणि पूर्णपणे रिकामं करता आलं. पण जे पुरुष पूर्णपणे निरोगी होते, त्यांच्यात यामुळे काही खास फरक दिसून आला नाही.

खरं सांगायचं तर बहुतेक पुरुषांसाठी उभं राहून लघवी करणं हेच सर्वात सोपं आणि सोयीचं असतं.

याचा अंदाज आपण सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पाहू शकतो. इथे मुलांच्या रांगा मुलींपेक्षा अधिक वेगाने पुढे सरकतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुमचा टूथब्रश टॉयलेटच्या खूप जवळ ठेवू नये.

पण उभं राहून लघवी करताना थेंब उडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे इतरांसाठी हा खूप अस्वच्छ आणि त्रासदायक अनुभव ठरू शकतो.

इथे फक्त टॉयलेटची सीट किंवा जमिनीवर पडणाऱ्या थेंबांचीच गोष्ट नाही. 2013 मध्ये अमेरिकन इंजिनिअर्सनी पाहिलं की, उभं राहून लघवी करताना अतिशय सूक्ष्म थेंब वेगवेगळ्या कोनांत आणि खूप दूरपर्यंत उडतात. इतकं की जवळ ठेवलेला टूथब्रशसुद्धा त्यापासून सुटू शकत नाही.

परंतु, काही संस्कृतींमध्ये बसून लघवी करण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, इस्लाममध्ये हा सुन्नतचा भाग मानला जातो, जो पैगंबर मोहम्मद यांच्या काळापासून चालत आलेल्या परंपरा आणि पद्धतींपैकी एक आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक देशांमध्ये पुरुष लघवी करण्यासाठी उभं राहणंच पसंत करतात.

पण जुन्या सवयी सहज बदलत नाहीत. बहुतेक पुरुष आजही उभं राहूनच लघवी करतात.

पुरुष मूत्राशय रिकामं करण्यासाठी कोणती पद्धत पसंत करतात, याचा यूगॉवने 2023 मध्ये 13 देशांमध्ये सर्व्हे केला.

याचे निकाल आश्चर्यचकित करणारे होते. जर्मनीत 40 टक्के पुरुषांनी सांगितलं की, ते प्रत्येकवेळी बसून लघवी करतात, तर फक्त 10 टक्के लोकांनी सांगितलं की ते नेहमी उभं राहून लघवी करतात.

ग्राफिक कार्ड

ब्रिटनमध्ये फक्त 9 टक्के लोक प्रत्येकवेळी बसून लघवी करतात. तर 33 टक्के लोक नेहमी उभं राहून लघवी करतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर्मनीत बसून लघवी करणाऱ्या पुरुषाला 'झिट्झपिंकलर' (बसून लघवी करणारा पुरुष) म्हणून चिडवलं जातं, आणि ते पुरुषी वर्तन मानलं जात नाही.

"बसून लघवी करणं म्हणजे महिला आणि बेडकांचं काम आहे," अशी ब्राझीलमध्ये एक जुनी म्हण आहे.

'शतकांपासून चालत आलेली कारणं'

पुरुषांना लघवी करण्याची पद्धत बदलण्यासाठी शतकांपूर्वीच्या सवयींशी लढावं लागतं का?

'असं अजिबात नाही', असं ऑक्सफर्ड विद्यापीठातील उत्क्रांतीवादी मानसशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. रॉबर्ट डनबार यांच म्हणणं आहे.

"उभं राहून लघवी करण्यामागे शतकांपूर्वीचं कोणतंही कारण नाही," असं ते म्हणतात.

याचा अर्थ असा की ज्या पुरुषांना बसून लघवी करणं नापसंत आहे त्यांच्यासाठी आता कुठलाही बहाणा उरलेला नाही.

डॉ. गार्थवेट म्हणतात, "खरं म्हणजे काही पुरुषांना उभं राहून लघवी करणं सोयीचं वाटतं, तर काहींना बसून."

त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर स्पष्टपणे काही सांगत नाहीत, तोपर्यंत जगभरातील पुरुषांसाठी हा फक्त त्यांच्या मर्जीचा विषय राहील.

हो, जर पत्नी किंवा गर्लफ्रेंड दबाव टाकत असेल, किंवा टॉयलेटच्या भिंतीवर जर्मन शैलीत लिहिलेलं असेल 'कृपया बसून लघवी करा', तर कदाचित थोडा विचार करावा लागेल.

(लेखात व्यक्त केलेली मतं लेखकाचे स्वतःचे विचार आहेत, कोणत्याही संस्थेचे नाहीत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.