You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, 'त्या' वक्तव्याप्रकरणी सत्र न्यायालयातच खटला
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात संगमनेर न्यायालयात खटला पुढे चालू राहणार आहे.
'सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते,' असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्याविरोधात अहमदनरगच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
सत्र न्यायालयानं हा खटला रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे यांनी अॅड. जितेंद्र पाटील यांच्यासह याचिका दाखल केली होती.
त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं.
दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय म्हटलं होतं?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बाजू मांडणारे वकिल अॅड. जितेंद्र पाटील यांनी कोर्टाच्या आदेशानंतर बीबीसी मराठीला सांगितलं की, "संगमनेर सत्र न्यायालयानं इंदुरीकरांना दिलासा दिला होता. गुन्हा दाखल करू नका, असं म्हटलं होतं. सत्र न्यायालयाचा तो निकाल औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला आहे. त्यामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होईल. खटला पुढे चालू राहिल."
इंदुरीकरांच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वकिल ॲड. राधिका नावंदर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, “सदर याचिकेच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. पण, महाराजांचे सदर वक्तव्य हे प्राचीन हिंदू ग्रंथांवर आधारित आहे. इंदुरीकर महाराज जाहिरातकर्ते नसून ते समाज प्रबोधन करतात. या वक्तव्याद्वारे त्यांनी गर्भलिंग निदान अथवा चाचणी कायद्यात अभिप्रेत असलेली जाहिरात केलेली नाही. सदर कायदा कलम 22 चे उल्लंघन त्याद्वारे होत नाही, असे आमचे म्हणणे आहे.”
“आम्ही सर्वोच्च न्यायालयात सदर निर्णयास आव्हान देणार आहोत. त्यासाठी आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे आदेशाच्या अंमलबजावणीच्या अंतरिम स्थगितीसाठी मागणी केली व ती मागणी उच्च न्यायालयाने मंजूर करून चार आठवड्यांचा कालावधी इंदुरीकर महाराजांना मंजूर केला आहे,” असंही नावंदर यांनी सांगितलं.
अॅड. रंजना गवांदे यांनी आजच्या निर्णयावर बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं की, "इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. इंदुरीकरांचे ते वक्तव्य समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारं आहे. कायद्याच्या विरोधात आहेत. त्याविरोधात आपला लढा आहे आणि त्याला आता यश आलं आहे."
प्रकरण काय?
'सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते,' असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्याविरोधात अहमदनरगच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
सत्र न्यायालयानं हा खटला रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये इंदुरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी करण्यात आलं होतं.
या कीर्तनाचे व्हीडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. तेच पुरावे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सादर केले होते.
गुन्हा दाखल होताच इंदोरीकर महाराजांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं होतं.
याविरोधात इंदोरीकर महाराजांनी आपल्या वकीलामार्फत संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देत सदर खटला रद्द करण्यासाठी धाव घेतली होती.
यात इंदुरीकर महाराजांसह सरकारी पक्ष आणि अंनिसने युक्तिवाद केल्यानंतर सदर खटला रद्द करत जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता.
निकाल देताना डॉ. बालाजी तांबे खटला आणि धार्मिक ग्रंथांचा आधार घेण्यात आला होता. खटला रद्द झाल्याने इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता.
पण, अपप्रवृत्तींच्या विरोधातील ही लढाई आहे. पीसीबीएनडीटी कायद्याचं हे उल्लंघन आहे, असं म्हणत अंनिसने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला, असं अॅड. गवांदे यांनी म्हटलं होतं.
इंदुरीकर महाराज कोण आहेत?
निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज हे नाव आता घरोघरी ओळखीचं झालं आहे. खेडोपाड्यात कीर्तनं करून हसत हसत लोकांना चार आध्यात्मिक गोष्टी सांगणारे इंदुरीकर महाराज युट्यूबमुळे शहरांमध्येही पोहोचले आहेत.
निवृत्ती देशमुख यांचा 9 जानेवारी 2019ला 48वा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचं गाव. या गावाच्या नावावरूनच त्यांना पुढे चालून इंदोरीकर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. पुढे 'इंदोरीकर'चा अपभ्रंश 'इंदुरीकर' असा झाला आणि आता ते इंदुरीकर याच नावाने ओळखले जातात.
राज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त इंदुरीकरांच्या कीर्तनाचं आयोजन केलं जातं. इंदुरीकरांच्या कीर्तनाची लोकप्रियता इतकी आही की त्यांची तारीख मिळण्यासाठी लोक वर्षानुवर्षं वाट पाहतात.
इंदुरीकरांबाबत काय आक्षेप आहेत?
इंदुरीकरांच्या कीर्तनातील अनेक वक्तव्यं ही महिलांचा अपमान करणारी असतात, असा आक्षेप महिलांकडून व्यक्त केला जातो.
यामुळे काही गावांमध्ये त्यांच्या कीर्तनावेळी गोंधळही निर्माण झाला होता.
इंदुरीकरांनी महिलांबाबत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. ती अशी-
- "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
- "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
- "नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
- "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
- "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"
- "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
- "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."
बीबीसी मराठीनं इंदुरीकरांच्या महिलांविषयीच्या वक्तव्यांवर बातमी प्रकाशित केल्यानंतर यातले अनेक व्हीडिओ यूट्यूबवरुव काढून टाकण्यात आले होते.
इंदुरीकर आणि समर्थकांंचं म्हणणं काय?
इंदुरीकरांवरील या आक्षेपांवर त्यांच्या समर्थकांचं काय म्हणणं आहे ते बीबीसी मराठीनं जाणून घेतलं होतं.
भारतीय संस्कृती टिकावी म्हणून इंदुरीकर असं बोलतात, असं इंदुरीकरांच्या समर्थकांनी म्हटलं होतं.
तुमच्या कीर्तनातील भाषा आणि मुद्दे समजून सांगण्याची पद्धत महिलांना खटकते, या प्रश्नावर इंदुरीकर महाराज बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले होते, "प्रत्येक माणूस वेगळाच विचार करणार ना. आपला दृष्टिकोन तो तर नाहीये ना."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)