मान्सून दडी मारण्याची चिन्हं, पुढचे दोन आठवडे कोरडे जाणार? असं असेल राज्याचं हवामान

फोटो स्रोत, Getty Images
मान्सूननं आता महाराष्ट्रात जरा विश्रांती घेतलेली दिसते आहे.
राज्यात वेगवेगळ्या भागांत म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्या हवामान कसं असेल, कुठल्या जिल्ह्यांना काय अलर्ट दिले आहेत आणि पुढच्या दोन आठवड्यांसाठीचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, जाणून घेऊयात.
मान्सूननं 9 जुलै रोजी देशातल्या उरलेल्या भागातही आगेकूच केली आहे आणि अख्खा भारत व्यापला आहे. पण सगळीकडे समान पाऊस पडलेला नाही. गेला आठवडाभर उत्तर कोकणात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. पण मराठवाडा आणि विदर्भात मात्र कमी पाऊस पडला आहे.

फोटो स्रोत, IMD
यंदाच्या मोसमात 9 जुलैपर्यंतची पावसाची आकडेवारी पाहता, पालघर, मुंबई, पुणे, रायगड, नाशिक आणि ठाण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर कोकणातील बाकी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये, पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसंच सिंधुदुर्ग, सोलापूरमध्ये पावसाचे प्रमाण अजूनही सरासरीपेक्षा कमी आहे.
ही चिंतेची बाब आहे. तसंच सध्या काही भागांत समाधानकारक चित्र दिसत असलं, तरी महिना संपेपर्यंत यात बदल घडू शकतो. 9 जुलैपासून महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसात मोठी घट दिसते आहे.

फोटो स्रोत, IMD
हवामान विभागाच्या विस्तारीत अंदाजानुसार या महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात बराच कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. चार आठवड्यांसाठीचा हा अंदाज दर गुरुवारी वर्तवला जातो.
त्यानुसार 9 ते 16 जुलै या कालावधीत राज्यात जवळपास सगळीकडे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि घाट क्षेत्रात ही तूट बरीच जास्त आहे. त्यानंतरच्या आठवड्यातही राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातला काही भाग वगळता सगळीकडे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
9 जुलैच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये महाराष्ट्रावरचे मान्सूनचे ढग बरेच विरळ झाल्याचं दिसून येतं. सध्या या परिसरात मान्सूनच्या पावसाला चालना देणारी कुठलीही प्रणाली तयार झालेली दिसत नाही.

फोटो स्रोत, IMD
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 24 तासांत कोकण आणि घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
9 जुलै रोजी जोरदार पावसासाठी पुणे आणि साताऱ्याच्या घाट प्रदेशात ऑरेंज अलर्ट असून रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या घाट प्रदेशात यलो अलर्ट आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.

फोटो स्रोत, IMD
10 जुलै रोजी पुणे आणि साताऱ्याच्या घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं इथे यलो अलर्ट दिला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.
रायगड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर आणि जालना इथे वीजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हलक्या ते नगण्य पावसाची शक्यता आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























