पुढच्या 24 तासांत याठिकाणी असेल 'ऑरेंज' अलर्ट, राज्यात कुठे काय स्थिती, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

फोटो स्रोत, ANI
उत्तर कोकणात पालघरजवळ तयार झालेली ढगांची प्रणाली उत्तरेला गुजरातकडे सरकली आहे. या सिस्टिममुळे नाशिकमध्येही जोरदार पाऊस झाला. पण आता ती गुजरातकडे वळली आहे.
दरम्यान, याआधी हवामान विभागाने आज (7 जुलै) नाशिक-पुण्याच्या घाट परिसरासह पालघर, रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती.
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड तसंच नाशिक आणि पुण्याच्या घाट प्रदेशात फ्लॅश फ्लड म्हणजे अचानक पूर येण्याच्या घटना घडण्याची शक्यताही वर्तवली होती.
हवामान विभागाच्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि सर्व महाविद्यालयांना आज म्हणजे 7 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
मुंबई, पुणे, नाशिक आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर आता थोडा मंदावला आहे. मराठवाडा आणि विदर्भ मात्र अजून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातल्या या सगळ्या विभागांमध्ये पुढच्या 24 तासांत हवामान कसं असेल, जाणून घेऊयात.
पुढच्या 24 तासांचा अंदाज
गेले दोनतीन दिवस राज्यात कोकण आणि घाटात मान्सून सक्रीय होता आणि इथे जोरदार पाऊस पडला. पण या पावसाला कारण ठरलेलं ओडिसाजवळचं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर प्रदेशच्या दिशेनं आत सरकलं असून त्याचा जोर कमी झाला आहे.
मान्सून आता आणखी पुढे सरकला असून त्यानं 7 जुलैला गुजरात पूर्णपणे व्यापलं आहे. पुढच्या दोन तीन दिवसांत मान्सून संपूर्ण भारत व्यापू शकतो.
7 जुलैच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये पाहिलं तर महाराष्ट्रात ढगांचं आवरण आथा थोडं विरळ झालेलं दिसतं. राज्याच्या उत्तरेकडच्या भागात ढगांचा संचय दिसतो.
पुढच्या 24 तासांत उत्तर कोकणात, उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि घाटातील प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतीजोरदार पावसाची तर दक्षिण कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही भागांत जोरदार पाऊस पडू शकतो, पण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र हलक्या पावसाचीच शक्यता दिसते आहे. या आठवडाअखेरीस इथेही पावसात घट होऊ शकते.

फोटो स्रोत, ANI
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं 7 जुलैला जारी केलेल्या अंदाजानुसार आजच्या रात्री पालघर जिल्ह्यात तसंच नाशिक आणि पुण्याच्या घाट भागांत जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांसाठी रेड अलर्ट दिलेला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिकचा उर्वरीत भाग, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती इथे पाऊस आणि वाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
8 जुलै रोजी पुणे आणि साताऱ्याच्या घाट प्रदेशात ऑरेंज अलर्ट दिला आहे.तर पालघर रायगड, रत्नागिरी हे जिल्हे तसंच नाशिक आणि कोल्हापूरच्या घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा इथे थंडरस्टॉर्म म्हणजे गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कुठलाही अलर्ट नाही, पण इथे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात.
गेल्या दोन दिवसांतला पाऊस पाहता 8 जुलैला पालघर, ठाणे, रायगड, नाशिकचा घाट प्रदेश आणि रत्नागिरीच्या काही भागांत फ्लॅश फ्लड म्हणजे अचानक पूर येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, सोमवारी (6 जुलै) नाशिक जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्वरसह नाशिक ग्रामीण, इगतपुरीत मंगळवारी (7 जुलै) ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी दक्षता बाळगावी, असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं.

फोटो स्रोत, ANI
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, "महत्त्वाचा अलर्ट नाशिकसाठी आहे. नाशिकमध्ये एक मोठा लो प्रेशर बेल्ट तयार होत आहे. त्याला मेजर डिप्रेशन म्हणतात. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या मधल्या भागात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. ही ढगफुटी मोठी असू शकते. ढगफुटीमुळे या भागात जवळपास 300 मिमी पाऊस होऊ शकतो."
"या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. शाळांना सुट्टी दिली आहे, पाणी साचू शकतं अशा भागात काम केलं आहे, नाशिक शहर-नाशिक जिल्हा (ग्रामीण) येथे बऱ्याचशा उपाययोजना केल्या आहेत," अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती.
SDRF आणि NDRF ची पथकं तैनात
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF आणि) 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे.
मान्सून कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके पूर्व तैनात करताना पालघर व नागपूर येथे प्रत्येकी 2 आणि पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व धाराशिव प्रत्येकी 1 पथक तसेच मुंबई येथे 4 पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची एकूण 6 पथके सज्ज असून धुळे व नागपूर प्रत्येकी 2 आणि नांदेड, गडचिरोलीत पथके तैनात आहेत.
पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकवरील दरड हटवली
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक परिसरातील दरड व मातीचा मलबा आज रात्री 10.10 वाजता एमएसआरडीसी व बांधकाम कंपनीने पूर्णपणे हटविला आहे, अशी माहिती MSRDC ने दिली आहे.
एमएसआरडीसी, रोड सेफ्टी इंजिनिअर व बांधकाम कंपनी यांनी सदर मार्ग सुरक्षित असल्याचे सूचित केल्यानंतर पुणे–मुंबई मार्गावरील दोन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन लेनवर अद्याप पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने त्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत, असंही सांगण्यात आलंय.

फोटो स्रोत, ANI
तसंच, नागरिकांनी वाहन चालविताना सावधगिरी बाळगावी, लेन शिस्त पाळावी, नियंत्रित वेगाने वाहन चालवावे तसेच महामार्ग पोलीस व वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलंय.
11 वीच्या प्रवेशाची विशेष फेरी पुढे ढकलली
राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-1 चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार 8 जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























