महाराष्ट्रात विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासह पावसाचा इशारा

महाराष्ट्रात विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासह पावसाचा इशारा, वाचा ताजी माहिती

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

राज्यात पाऊसाची दमदार सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर कुठे तुरळक पावसाने हजेरी लावली.

कोकणात काही ठिकाणी 7 ते 11 सेंटीमीटर मुसळधार पावसाची नोंद झाली असून राज्यातील विविध भागात पुढील काही दिवसांसाठी गडगडाटी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विशेषतः कोकण, मध्यम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

कोकण, मध्यम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच मध्य प्रदेशातील काही भागात वादळी पावसाची स्थिती कायम असून, काही ठिकाणी ताशी 51 ते 70 किमी वेगाच्या वाऱ्यांसह वादळाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजा चमकण्यासह आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर कोकण आणि मध्यम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसासोबत गडगडाटासह वेगवान वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस, तसेच काही ठिकाणी गडगडाटासह सरी आणि वाऱ्यांची शक्यता आहे. काही भागांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाचे वारे आणि वीजांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही दिवशी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, रायगड आणि घाटभागातही विजांसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मध्यम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 30 ते 50 किमी वेगाचे वारे वाहू शकतात. घाट परिसरातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना, परभणी, बीड, लातूर आदी जिल्ह्यांमध्येही गडगडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस

फोटो स्रोत, @RMC_Mumbai

मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, रस्ते-वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच वाऱ्यांमुळे झाडे कोसळणे किंवा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. विजांचा धोका, शेतपिकांचे नुकसान आणि कच्च्या घरांची हानी होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

वादळी पावसाच्या काळात मोकळ्या जागेत काम टाळावे, झाडांखाली उभे राहणे टाळावे आणि विद्युत उपकरणांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांची कापणी आणि संरक्षणाची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी शिफारस देखील करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागील 24 तासांत कोकणात रत्नागिरी येथे सर्वाधिक 64.9 मिमी पावसाची नोंद झाली. तर, गोवा (पणजी) 19.6 मिमी, डहाणू 17.6 मिमी, मुंबई (कुलाबा) 5.4 मिमी तसेच हरनाई येथे 1.4 मिमी पाऊस नोंदवण्यात आला.

मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि सातारा येथे प्रत्येकी 9.6 मिमी पाऊस, जेऊर 6 मिमी आणि सोलापूर 4.2 मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिवमध्ये 30 मिमी, नांदेडमध्ये 17 मिमी, तर विदर्भात वर्धा येथे 27.2 मिमी आणि अकोला येथे 1.4 मिमी पाऊस नोंदवण्यात आला.

हवामान विभागानं जारी केलेल्या एक्स्टेंडेड रेंज फोरकास्ट म्हणजे विस्तारीत अंदाजानुसार पुढचे 2 आठवडे राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. पण कुठे किती पाऊस पडेल?

तर 25 जून ते 2 जुलैदरम्यान कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

तर त्यापुढील आठवड्यात म्हणजे 2 जुलै ते 9 जुलै दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा बराच जास्त तर मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

थोडक्यात पुढचे काही दिवस पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं, पण त्यानंतरच्या आठवड्यात थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

यात स्थानिक पातळीवर पावसाचं प्रमाण वेगवेगळं राहू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना आपापल्या विभागासाठी जारी केलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)