'या' ठिकाणी पडला मुसळधार पाऊस; राज्यात पावसाची कशी आहे स्थिती?

फोटो स्रोत, Yatish Bhanu
मोसमी पावसाने राज्यात दमदार पुनरागमन केले असून गेल्या दोन दिवसांत राज्याच्या सरासरी पावसात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणासह मराठवाडा, पुणे परिसर, उत्तर महाराष्ट्रात जळगावात मुसळधार पाऊस कोसळला.
पावसामुळे काही ठिकाणी उत्साहाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागल्याचे चित्र आहे.
सध्या राज्याच्या बहुतांश भागात वादळी पावसाची तर काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. कोकण प्रदेश मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागाला पावसाने झोडपले असून पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यातील पावसाच्या परिस्थितीबाबत जाणून घेऊया.
रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस, जि.प. शाळेत पाणी शिरले
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
आहेरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत पावसाचे पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा तातडीने सोडण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेबाहेर काढले.

फोटो स्रोत, Pravin Thakre
अचानक झालेल्या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्की, अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुली, कर्कीसह अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.
अनेकांच्या घरात पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर काही दुकानात पाणी घुसून साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचीही स्थिती आहे.

फोटो स्रोत, PravinThakre
कर्की येथे साखरपुड्यासाठी आलेली खासगी बस नाल्यावरून पाणी वाहत असल्याने अडकली. चालकाने वेळीच तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.
या भागातील सद्यस्थिती आणि नुकसान पाहता नागरिकांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात पाऊस
अमरावती जिल्ह्यात काल दहा मंडळात अतिवृष्टी झाली असून शहरातील सामान्य रुग्णालय जलमय झाले.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅम्प रोड परिसरातील दुकानात पाणी शिरले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका कॉम्प्लेक्स मधील 9 दुकान पाण्यानी तुंबले.
या पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाही, त्यामुळे व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

फोटो स्रोत, Pravin Thakre
तर, मोर्शी तालुक्यातील वैष्णोरा गावलगतच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही काळ मुसळधार स्वरूपात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
राज्यातील पावसाची स्थिती
जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात तब्बल 82 टक्के पर्जन्यतूट नोंदवली गेली होती.
मात्र, गेल्या काही दिवसांत मान्सूनने वेग घेतल्याने राज्यातील पावसाचा तुटवडा काही प्रमाणात भरून निघाला आहे.

फोटो स्रोत, IMD
सध्या महाराष्ट्रातील पर्जन्यतूट 62 टक्क्यांवर आली असून, जवळपास 20 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. तरीही राज्याला अद्याप सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस मिळाल्याने शेतकरी, जलसाठे आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने चिंतेचे वातावरण कायम आहे.
आगामी काळात मान्सूनचा जोर आणखी वाढल्यास ही तूट आणखी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मोसमी पावसाने बुधवारपर्यंत अवघ्या दोन दिवसात संपूर्ण राज्य व्यापले असून गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागांपर्यंत वाटचाल केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























