जय शाह यांच्या 'टू टियर टेस्ट सिस्टम' या योजनेवरून वाद, माजी क्रिकेटपटूंमध्ये दोन गट

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

वन डे आणि टी-20 क्रिकेट प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलं तरीही क्रिकेट विश्वात कसोटी सामन्यांचं एक वेगळचं स्थान आहे. किंबहुना क्रिकेटपटूंच्या दर्जाची पारख करण्याचा तो एक निकषच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंचा कस लागतो. तिथे तात्पुरती वेळ मारून नेण्याऐवजी गुणवत्ता, कौशल्य आणि मेहनत यांच्या जोरावरच विजय मिळवता येतो. त्यामुळे कसोटी क्रिकेटला एक वेगळच वलय आणि महत्त्व आहे.

पण, कसोटी सामने पाच दिवस चालतात. त्यामुळे आजच्या वेगवान जमान्यात ते काहीसे निरस वाटतात किंवा प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतात. त्यामुळेच कसोटी सामन्यांची लोकप्रियता कशी टिकवायची हा प्रश्न क्रिकेट विश्वात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.

त्याबद्दल वेगवेगळी मतं मांडली जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (ICC) कसोटी क्रिकेटमध्ये एक नवी व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या नव्या योजनेबद्दल क्रिकेट खेळाडूंमध्ये मतभेद आहेत. ही योजना काय आहे, त्यामागचा हेतू काय आहे, माजी क्रिकेटपटूंना त्याबद्दल काय वाटतं याची मांडणी करणारा हा लेख.

ICC आता कसोटी क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्याच्या तयारीत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये टू टियर सिस्टम म्हणजे दोन स्तरीय व्यवस्था आणली जात आहे.

सहा जानेवारीला मेलबर्न एज या वृत्तपत्रात एक बातमी छापून आली. त्यात म्हटलं आहे की, आयसीसीचे प्रमुख जय शाह लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख माइक बायर्ड आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) प्रमुख रिचर्ड थॉम्पसन यांची भेट घेणार आहेत.

या बातमीत सूत्रांच्या आधारे दावा करण्यात आला आहे की, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या भेटीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला दोन टियरमध्ये विभागण्याचा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

2027 पासून नवीन व्यवस्था?

"टू टियर" योजनेची अंमलबजावणी झाली तर भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशातील संघाचा समावेश टीयर-वनमध्ये होऊ शकतो.

तर वेस्ट इंडिज, बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या देशांच्या संघाचा समावेश टियर-2 मध्ये होण्याची शक्यता आहे.

ही योजना लागू होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे. कारण सध्याचे नियोजित दौरे 2027 मध्ये संपणार आहे.

क्रिकेट विश्वातील तगड्या किंवा चांगल्या संघांमध्ये आपासांत जास्तीत जास्त सामने व्हावेत हे यामागचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं आहे.

इंग्लंडच्या किक्रेट संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन यानं या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही, "कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचं असेल तर सर्वश्रेष्ठ संघांनी आपापसात अधिकाधिक सामने खेळण्याची आवश्यकता आहे," असं म्हणत पाठिंबा दर्शवला आहे.

प्रेक्षकांना आवडलेली बॉर्डर-गावस्कर मालिका

खरंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी झाली. त्याला उत्तम यश मिळालं. दोन्ही देशातील संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात आली.

ही कसोटी मालिका जवळपास दोन महिने चालली. या मालिकेला स्टेडियममध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं. बातम्यांनुसार, ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांना प्रेक्षकांची ही चौथी सर्वोत्तम उपस्थिती होती.

याशिवाय, ही मालिका आतापर्यंत सर्वाधिक पाहिली गेलेली कसोटी मालिकादेखील ठरली. त्यामुळे कसोटी प्रकारातील चांगल्या संघांनी आपसांत अधिकाधिक सामने खेळण्याचा मुद्दा मांडला जातो आहे.

माजी क्रिकेटपटूंचं मत

नव्या योजनेमुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांचे क्रिकेट संघ अधिकाधिक कसोटी सामने खेळल्यानं कसोटी सामने लोकप्रिय होतील, शिवाय पैशांचा ओघदेखील वाढेल, अशी शक्यता आहे.

भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा हे त्याचं उत्तम उदाहरण आहेत. आयपीएल, बीबीएल आणि द हंड्रेड सारख्या स्पर्धा किंवा लीग प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. तसंच या स्पर्धांमुळे या देशांची क्रिकेट नियामक मंडळं दणकून कमाई करत आहेत.

रवी शास्त्री म्हणाले, "माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, जर तुम्हाला कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचं असेल तर तुमच्यासमोर एकच मार्ग आहे. तो म्हणजे सर्वोत्तम संघांनी एकमेकांशी जास्तीत जास्त सामने खेळावेत."

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉनदेखील शास्त्री यांच्याशी सहमत आहेत.

मायकल वॉन यांनी टेलीग्राफमधील एका स्तंभात लिहिलं, "मला वाटतं की कसोटी सामने आता चार दिवसांचे असले पाहिजेत. तसंच दररोज किती षटकं टाकायची तेदेखील निश्चित करण्यात आलं पाहिजे. प्रत्येक मालिकेत किमान तीन कसोटी सामने झाले पाहिजेत. कसोटी संघांचे दोन गट असावेत."

"आयसीसी 2027 पासून कसोटी क्रिकेटमध्ये दोन टियर सिस्टम म्हणजे दोन स्तरीय व्यवस्था आणण्याचा विचार करत आहे हे वाचून मला आनंद झाला. याचा अर्थ, आता दर तीन वर्षांनी दोनवेळा अ‍ॅशेस मालिका पाहायला मिळू शकते."

नव्या प्रस्तावामागे अर्थकारण?

श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा म्हणाले की, मला यातील अर्थशास्त्र समजतं.

यामुळे तीन क्रिकेट नियामक मंडळांचा फायदा होईल. मात्र क्रिकेट हा खेळ पौंड, डॉलर्स आणि रुपयांसाठी नाही. या खेळाशी निगडीत लोकांनी खेळाच्या भल्यासाठी, खेळ पुढे नेण्यासाठी काम केलं पाहिजे.

इंग्लंडचे माजी जलदगती गोलंदाज स्टिव्हन फिन यांनी बीबीसी रेडिओ 5 बरोबर बोलताना सांगितलं की, "मला हे योग्य वाटत नाही. ही गोष्ट क्रिकेटच्या हिताची आहे असं मला वाटत नाही. मला वाटतं हा पैशांचा मोह आहे. यामुळे कसोटी क्रिकेटची अधोगती होईल."

क्लाईव्ह लॉईड यांनी कर्णधार असताना वेस्ट इंडिजला 1975 आणि 1979 चे विश्वचषक जिंकून दिले होते. ते देखील या नव्या योजनेशी सहमत नाहीत.

ते म्हणाले, "ही योजना इथेच थांबवली पाहिजे. ज्या देशांनी कसोटी संघांचा दर्जा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि जे आता दुबळ्या संघांबरोबरच क्रिकेट खेळत आहेत, अशा देशांसाठी ही योजना खूपच वाईट आहे."

लॉईड म्हणाले, "या नव्या योजनेमुळे हे संघ सर्वोत्तम संघ बनू शकतील का? जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा चांगल्या संघांबरोबर खेळता तेव्हाच तुमचा खेळ उंचावतो. तेव्हाच तुम्हाला कळतं की, तुमचा खेळ कसा आहे. या नव्या योजनेमुळे मला वाईट वाटत आहे."

ते पुढे म्हणाले, "क्रिकेट संघांना समान पैसे मिळाले असते तर ते चांगलं झालं असतं. कारण त्यामुळे खेळ उंचावण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले असते."

एकेकाळी वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघाचा क्रिकेट विश्वात प्रचंड दबदबा होता. 1980 ते 1995 पर्यंत वेस्ट इंडिजचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये अपराजित होता. मात्र त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ संघर्ष करतो आहे. त्यांचा तो दबदबा, दर्जा राहिलेला नाही.

आयर्लंड आणि अफगाणिस्तान या देशांच्या संघांना 2017 मध्ये कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा (टेस्ट प्लेईंग नेशन) दर्जा मिळाला होता. तेव्हापासून त्यांचे संघ काही सामने तगड्या किंवा सर्वोत्तम संघांबरोबर खेळले आहेत. मात्र त्या सामन्यांचे निकाल धक्कादायक नव्हते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.