You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमानुष हत्या करण्याची प्रवृत्ती, मृतदेहाचे तुकडे करून गुन्हा लपवण्याची मानसिकता कुठून येते?
- Author, कमलादेवी नल्लापनेनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
(सूचना - या बातमीतील मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)
फ्रेंच तत्त्ववेत्ता अल्बर्ट कामू म्हणतो की 'कोणताही गुन्हा गुन्हाच असतो. मात्र, गुन्ह्याची तीव्रता वाढली की समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.'
चोरी, दरोडे किंवा प्राणघातक हल्ल्यांसारख्या गुन्ह्यांकडे समाज फारसं लक्ष देत नाही. घटना घडतात, त्यावर चर्चा होते आणि कालांतराने त्यांचा सहज विसर पडत जातो. परंतु, हत्येसारखे गुन्हे स्मृतीतून सहजपणे काढून टाकता येत नाही.
आर्थिक संबंधातील ताण, मानवी नात्यातील संघर्षामुळे समाजात गुन्हे घडतात, खून होतात. अनियंत्रित राग किंवा क्षणिक संताप बरेचदा खुनाचे कारण बनते, तर कुठे प्रतिस्पर्धा, हेवेदावे, सूडभावना, कौटुंबिक कलह मोठ्या घटनेचे कारण ठरतात.
अशा प्रकारच्या गुन्ह्यात दोषीला कठोर शिक्षाही सुनावली जाते. परंतु, काही घटना अतिशय क्रूर आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात.
मात्र अलीकडच्या काळात झालेल्या काही हत्यांमुळे मोठी खळबळ उडाली. यामागचे मुख्य कारण खून करण्याच्या पद्धतीसह पोलिसांच्या हाती न सापडण्यासाठी गुन्हेगारांनी केलेले प्रयत्न आहेत. खून करुनही त्यांचे वर्तन इतके सामान्य असते जणू काही घडलेच नाही अशाप्रकारचा आरोपींचा आव असतो.
खासकरुन कौटुंबिक कलहातून घडणाऱ्या घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या असतात. त्यामागे सूडभावना तर असतेच सोबतच स्वत:च्या बचावाचा प्रयत्नही असतो. समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या मते, हे अत्यंत विकृत आणि अतिरेकी मानसिकतेचं लक्षण आहे.
विकृत मानसिकतेचा कळस गाठला जातोय का?
अलीकडे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्याचा समाजमनावर खूप खोलवर परिणाम पडल्याचं पाहायला मिळालं. खून करून मृतदेहाबरोबर क्रूर व्यवहाराच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे.
इतकं अमानवीय कृत्य कोणी कसं करू शकतं? लोक इतकी क्रूर का होतात? वैवाहिक संबंधातून घडलेल्या घटनांकडे पाहताना, ज्या व्यक्तीबरोबर आपण राहत आलोय, संसार थाटलाय त्याच्याप्रति इतकी घृणा, सुडाची भावना कशी उत्पन्न होऊ शकते. असे एक ना अनेक प्रश्नांचं वादळ मनात उठत राहतं.
मृतदेहांबरोबर अमानुष कृत्य करणे आणि हिंसेमागे एकप्रकारे असुरी आनंद असल्याचं दिसून येतं असल्याचं समाजशास्त्रज्ञ सांगतात.
हिंसक चित्रपट आणि वेब सीरिजच्या रूपानं अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचंही काही तज्ज्ञ वारंवार सांगताना दिसतात.
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड
अडीच वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर या तरुणीच्या खुनाने मोठी खळबळ उडाली होती. जेव्हा केव्हा मी एखाद्या मृतदेहासोबत केलेल्या क्रूर विकृतींबाबत ऐकतो, तेव्हा मला श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण येते.
18 मे 2022 रोजी श्रद्धा वालकरचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने तिचा खून केला. हा गुन्हा केवळ हत्येपुरता राहिला असता आणि आफताबने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असते तर त्याची तीव्रता तितकी जाणवली नसती परंतु, आरोपीने पोलिसांपासून आपल्या बचाव करण्याच्या उद्देशातून अतिशय क्रूर कृत्य केलं.
त्याने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून दिल्लीतल्या मेहरौली भागातील जंगलात फेकले होते. या प्रकरणाने तेव्हा मोठी खळबळ उडाली होती, हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे.
मीडिया रिपोर्ट्स आणि तपास करणार्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर आणि आफताब यांची ओळख मुंबईतील एका डेटिंग ॲपद्वारे झाली होती. दोघेही तीन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये होते. जानेवारी 2022 मध्ये दोघे मुंबईतून दिल्लीला शिफ्ट झाले. मात्र, या दोघांमध्ये खटके उडू लागले होते. आफताब श्रद्धाला मारहाणही करायचा, असंही पोलिसांनी तपासातून सांगितलं.
18 मे 2022 रोजी अशाच एका वादातून रागाच्या भरात आफताबने श्रद्धा वालकरचा गळा आवळून खून केला. श्रद्धाने आफताबवर लग्नासाठी दबाव टाकल्यामुळे तिचा खून करण्यात आल्याचं कारण पुढे आलं होतं. पण, नंतर हा खून संशयातून करण्यात आल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं.
परंतु क्रुरतेची सीमा म्हणजे आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. नवीन फ्रीज खरेदी करून त्यात ते तुकडे ठेवले, आणि एक एक करत प्रत्येक तुकड्याची विल्हेवाट लावत गेला.
श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सहा महिन्याने तिच्या हत्येचा उलगडा झाला. या घटनेने समाजमन सुन्न झालं होतं.
मुंबईत श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती
एखादी विकृतीचा कळस गाठणारी घटना घडल्यानंतर तशाच विकृतीच्या घटनांची पुनरावृत्ती होत असते. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच एक घटना मुंबईतही समोर आली होती.
यात 56 वर्षीय मनोज साहनी नामक व्यक्तीनं 32 वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यचा खून केला. ती त्याच्यासोबत तीन वर्षांपासून राहत होती. एकेदिवशी साहनीच्या घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. हे प्रकरण 7 जून 2023 रोजी उघडकीस आले.
पोलिसांच्या तपासानुसार आरोपीने सरस्वती यांच्या चार दिवसांपूर्वीच खून केला होता. मनोज साहनी मानसिक समस्यांनी ग्रस्त होता, असंही पोलिसांनी सांगितलं.
हैदराबादेत पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले?
नुकतंच हैदराबादेतल्या एका घटनेतून पुन्हा एकदा मानवी विकृतीचा कळस गाठण्याचा प्रकार समोर आला. माधवी असं या महिलेचं नाव होतं. हैदराबादेतील मीरपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कथितपणे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
माधवीचा पती गुरुमूर्ती याने तिचा खून करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून विल्हेवाट लावल्याचं समोर आलं. या भयंकर कृत्यानं पुन्हा एकदा विकृतीचा मुद्दा समोर आला.
"गेल्या महिन्यात 16 तारखेला, गुरुमूर्तीने मुद्दाम आपल्या पत्नीशी वाद घालत तिचे डोके भिंतीवर जोरात आपटले. ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर त्याने तिचा गळा आवळून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने अतिशय अमानुष वर्तन केले," असं राचकोंडा पोलिस आयुक्त सुधीर बाबू यांनी सांगितलं.
"एका महिलेसाठी तिचं घरात सर्वात सुरक्षित स्थान असते. पण माधवीच्या बाबतीत ते उलट ठरलं माधवीचा तिच्याच घरात तिच्याच पतीकडून अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला," असंही पोलीस अधिकारी यावेळी म्हणाले.
टोकाची मानसिकता याला कारण आहे का...?
श्रद्धा वालकर, सरस्वती वैद्य आणि माधवी, कोलकाता डॉक्टर हत्याप्रकरण अशा कित्येक घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटना आणि माणसांची प्रवृत्ती कोणत्या थराला जाऊ शकते हे या घटनांतून दिसून येतं.
माणसाची गुन्हेगारी प्रवृत्ती केवळ खुनावर थांबत नाही. एखाद्याचा जीव घेतल्यानंतरही त्याला पश्चात्ताप होत नाही. त्याने कितीही मोठा गुन्हा केला असला, तरीही त्याला आपली चूक जाणवत नाही. ही अत्यंत विकृत मानसिकता खून झाल्यानंतरही कायम राहते.
खून करण्यामागची कारणं आणि मृतदेहासोबत केलेल्या क्रूर वागणुकीबद्दल वेगवेगळी मते आहेत. काही पुराणमतवादी विचारसरणीच्या लोकांनी असा दावा केलाय की, श्रद्धा वालकर आफताबसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. ती त्याची पत्नी असती, तर तो इतक्या क्रूरतेने वागला नसता.
पण जर आपण वेंकट माधवीच्या प्रकरणाकडे पाहिलं, तर तिचा 13 वर्षांचा संसार होता. त्यानंतरही पती गुरुमूर्तीनं क्रूरपणे तिला संपवले. "एखादी व्यक्ती आपल्या जवळच्या माणसाचा इतक्या निर्घृण पद्धतीने खून कसा काय करू शकते?" असा प्रश्न स्वतः पोलीस आयुक्तांनी उपस्थित केला.
मानसशास्त्रज्ञ विशेष यांच्या मते, जोडीदारासोबत क्रूर वर्तन करणाऱ्यांना लग्न किंवा सहजीवन यापैकी काहीही महत्त्वाचे वाटत नाही. खरी समस्या त्यांच्या मानसिकतेतल्या विकृतीची आहे.
"खून झाल्यानंतर मृतदेहासोबत क्रौर्य दाखवण्याचे कारण केवळ गुन्ह्यातून सुटण्याची इच्छा नसून, त्यांच्या मानसिकतेवर असलेला विकृतीचा प्रभाव आहे.
जेव्हा त्यांना वाटतं की त्यांना नात्यातून सुरक्षितरीत्या बाहेर पडता येणार नाही (मान-सन्मान गमवायचा नाही, घटस्फोट घेता येत नाही, वेगळे राहता येत नाही), तेव्हा ते समोरच्या व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न करतात", असं त्यांनी सांगितलं.
या घटनांचा समाजावर काय प्रभाव पडतो?
सामाजिक कार्यकर्त्या देवी यांच्या मते, जेव्हा समाज हिंसेकडे गुन्हा म्हणून न पाहता त्याकडे काहीतरी नवीन कृत्याचा भाग म्हणून पाहतो, तेव्हा त्याचा परिणाम गुन्हेगारांवर दिसून येतो. "साधारणतः दोन ते तीन टक्के लोक हिंसक प्रवृत्तीचे असतात आणि एखाद्या क्षणी त्यांचा स्वतःवरील ताबा सुटतो आणि गुन्हा घडतो."
"हिंसेचा आनंद घेण्याची संस्कृती वाढत आहे. मृतदेहावर क्रूरता दाखवत सूड उगवण्यात गुन्हेगारांना एक वेगळाच आनंद मिळतो," असे विश्लेषण त्यांनी केले.
सिनेमा, यूट्यूब आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचा समाजावर खोल परिणाम होत आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ होण्यामागचे हे मुख्य कारण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ऑनलाइन कंटेंटचा गुन्हेगारांवर मोठा प्रभाव पडत आहे, असंही ते म्हणाले.
मानसशास्त्रज्ञ विशेष यांच्यानुसार पती-पत्नी किंवा सोबत राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वारंवार टोकाचे वाद निर्माण झाले, तर त्यातून गुन्हे घडून येतात. गुन्हेगारी विचारसरणी निर्माण होण्यामागे व्यक्तीची विकृत मानसिकता कारणीभूत ठरते.
"जेव्हा दोन व्यक्ती आपल्या नात्यातील वाद सोडवण्यासाठी मनोवैज्ञानिकांकडे येतात, तेव्हा त्यांच्या विचारसरणीत गुन्हेगारी प्रवृत्ती आहे का, हे त्यांच्या व्यवहारातून समजून येतं. समुपदेशनाद्वारे त्या विचारांना बदलता येऊ शकते. पण खरं पाहता, समुपदेशन घेणाऱ्या लोकांची संख्या संपूर्ण समाजाच्या केवळ 10 टक्के किंवा त्यापेक्षाही कमी आहे," असं विशेष सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.