चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची केली महात्मा फुलेंशी तुलना, राष्ट्रवादीकडून निषेध

Published

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची केली ज्योतिबांशी तुलना

राज्यात मागील काही दिवसांपूर्वी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून वातावरण तापलं होतं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नव्या वक्तव्याने वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आली आहे. त्या म्हणाल्या, “तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे”. ‘सकाळ’ने ही बातमी दिली आहे.

पुण्यातील हेमंत रासने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाची राळ उडाली होती.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तुमच्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही ही विधानं करत आहात पण त्यात महापुरुषांना मध्ये ओढू नका असं मिटकरी म्हणाले.

2. विधान परिषदेसाठी आज मतदान

काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी यासह विविध नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होत आहे.

प्रथमच चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. ‘लोकसत्ता’ने ही बातमी दिली आहे. सध्या महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे आहे. महाविकास आघाडी आपले संख्याबळ कायम राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता या निवडणुकीत आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांकरिता जुनी निवृत्तिवेतन योजना पुन्हा लागू करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आला. एरवी शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघांमधील निवडणूक फारशी चर्चेत नसते. मात्र यंदा काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे ती अधिक चर्चेत आली.

3. अमित शहांनी फक्त जम्मू ते काश्मीर यात्रा करुन दाखवावी- राहुल गांधी

राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ४० हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा केली आहे. या यात्रेच्या समारोपानंतर राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आवाहन दिलं. ‘एनडीटीव्हीने’ने ही बातमी दिली आहे.

श्रीनगर येथे आज राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग आणि बॉम्बस्फोट होत आहेत. जर सुरक्षा व्यवस्था एवढी तगडी आहे तर भाजप लाल चौकातून जम्मूपर्यंत यात्रा का करत नाही? मी जम्मू काश्मीरमध्ये जे काही बघतोय ते पाहून दुःखी आहे.

चीनसोबत सुरू असलेल्या वादावरुन राहुल गांधींनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मी निवृत्त जवान आणि लडाखवासियांना भेटलो, त्यावरुन चीनने आपली दोन हजार वर्ग किलोमीटर जमीन बळकावल्याचं समोर आल्याचं स्पष्ट होत आहे. भारताचे अनेक पेट्रोलिंग पॉईंटस् आता चीनच्या ताब्यात आहेत. सरकारने हे नाकारलं तर चीनचं आत्मबल वाढेल. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधींनी तिरंगा फडकवला आहे.

4. हिंडनबर्ग अहवालाला अदानी समूहाचं 413 पानी उत्तर

हिंडेनबर्ग अहवालाला अदानी उद्योगसमूहाने 413 पानी उत्तर जारी केलं आहे. हिंडेनबर्ग अहवालाने केलेले आरोप म्हणजे भारतावरील हल्ला असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

"हा अहवाल खोटा आहे. हिंडेनबर्ग अहवालासाठी निवडक माहिती चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. आमच्या उद्योगसमूहाला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांचे नुकसान करत शॉर्ट सेलिंगच्या माध्यमाने नफा कमावण्यासाठी हिंडेनबर्ग सेक्युरिटीज एक खोटा बाजार तयार करण्याच्या प्रयत्नात आहे", असं अदानी उद्योगसमूहाने म्हटलं आहे.

अदानी एंटरप्रायझेसचा देशातील सगळ्यात मोठा एफपीओ मांडला जाणार असतानाच हा अहवाल आहे. ‘लोकमत’ने ही बातमी दिली आहे.

खोटी कहाणी पसरवण्यासाठी आधीपासूनच पब्लिक डोमेनमधील प्रकरणांचे सिलेक्टिव्ह आणि मॅनिपुलेटिव्ह प्रेझेंटेशन करण्यात आलं आहे. लिगल आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि इंडस्ट्री प्रॅक्टिसचे पूर्ण अज्ञान अथवा जाणूनबुजून अवहेलना करणे तसंच नियामक आणि न्यायव्यवस्थेसह भारतीय संस्थांचा पूर्णपणे अवमान हे तीन मुद्दे अदानी समूहाने मांडले आहेत.

5. ट्वेन्टी-20 लढतीत भारताचा न्यूझीलंडवर विजय

लखनौ इथल्या फलंदाजांची परीक्षा पाहणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेन्टी20 लढतीत न्यूझीलंडवर 6 विकेट्सनी विजय मिळवला.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण गोलंदाजांना साहाय्यकारी खेळपट्टीवर न्यूझीलंडची घसरगुंडी उडाली. त्यांनी 99 धावाच केल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना सूर्यकुमार यादवच्या 26 धावांच्या संयमी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

सूर्यकुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिसरा सामना अहमदाबाद इथे बुधवारी होणार आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)