Pak vs Eng : धूमशान फटकेबाजी, स्टान्स बदलून बॅटिंग आणि धडाकेबाज दृष्टिकोन

इंग्लंड, पाकिस्तान, क्रिकेट, ब्रेंडन मॅक्युलम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रेंडन मॅक्युलम आणि बेन स्टोक्स
Published

आक्रमक खेळ आणि धाडसी निर्णय यांच्या बळावर इंग्लंडने रावळपिंडी टेस्टमध्ये पाकिस्तानवर 74 धावांनी विजय मिळवला.

इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर दुसरा डाव घोषित करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. पाचव्या आणि अंतिम दिवशी पाकिस्तानने 80/2 वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. जिंकण्यासाठीचं लक्ष्य 343 होतं.

पाकिस्तानने दोन सत्रांमध्ये 80हून अधिक धावा करत विजयाचा पाया रचला पण तिसऱ्या सत्रात इंग्लंडने टिच्चून गोलंदाजी करत बाजी मारली.

सौद शकीलने 76 धावांची खेळी केली. इंग्लंडतर्फे ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.

या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने वादळी वेगाने खेळत पहिल्या डावात 657 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानने त्याला जोरदार प्रत्युत्तर देत 579 धावांची मजल मारली.

इंग्लंडला अल्प आघाडी मिळाली. इंग्लंडने दुसरा डाव 264/7 वर घोषित केला. टेस्ट मॅच निकाली व्हावी यासाठी इंग्लंडने हे धाडसी पाऊल उचललं.

पाकिस्तानने पाचव्या दिवशी चांगला खेळ करत विजयाच्या दिशेने आगेकूच केली पण इंग्लंडच्या शिस्तबद्ध आक्रमणासमोर त्यांचा डाव 268 धावांतच आटोपला.

पाटा खेळपट्टीवर उतारा म्हणून इंग्लंड संघाने टेस्टमध्ये अंगीकारलेला ट्वेन्टी20 दृष्टिकोन बाकी संघांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इंग्लंड संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पहिली टेस्ट रावळपिंडी इथे सुरू आहे. इंग्लंडने टेस्टच्या पहिल्याच दिवशी पाचशेहून अधिक धावांचा रतीब घातल्यामुळे यजमान पाकिस्तानवर पाटा खेळपट्टी तयार केली म्हणून टीका झाली होती. 

मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी काढलेले उद्गार सूचक होते. इंग्लंडचा संघ मालिकेच्या तयारीसाठी युएईत होता. केवळ 48 तास आधी इंग्लंड संघाचं पाकिस्तानमध्ये दाखल झाला.

पाहुणा संघ अशा तयारीनिशी उतरत असेल तर आम्ही टेस्ट मॅच जिंकण्यासाठीच खेळ करू असं मॅक्युलम म्हणाले होते. मॅक्युलम जे म्हणाले त्याचा प्रत्यय इंग्लंडच्या खेळात दिसून आला.

टेस्ट, वनडे असो किंवा ट्वेन्टी20- मॅक्युलम यांनी धडाकेबाज पद्धतीनेच खेळण्याची पद्धत रुजवली.

मॅक्युलम यांचा हा दृष्टिकोन न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी फायदेशीर ठरला होता. कर्णधार आणि फलंदाजी दोन्हीमध्ये मॅक्युलम यांनी दे दणादण आक्रमणाचं प्रारूप अंगीकारलं होतं.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मॅक्युलम यांनी आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं.

केकेआर संघालाही त्याचा फायदा झाला. केकेआरचं प्रशिक्षकपद सोडून मॅक्युलम यांनी इंग्लंड संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं.

टेस्ट क्रिकेटमध्ये धडपडणाऱ्या इंग्लंड संघासाठी मॅक्युलम प्रशिक्षक होणं अगदीच पथ्यावर पडलं आहे. त्यानंतर काही दिवसातच जो रूटने इंग्लंडचं कर्णधारपद सोडलं.

जिगरबाज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली. सकारात्मक आणि झुंजार खेळासाठी स्टोक्स ओळखला जातो. मॅक्युलम-स्टोक्स द्वयीचा परिणाम लगेचच इंग्लंडच्या खेळात दिसू लागला आहे. 

इंग्लंड, पाकिस्तान, ब्रेंडन मॅक्युलम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रेंडन मॅक्युलम आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स

पाटा खेळपट्टी आहे लक्षात आल्यानंतर इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टेस्ट जिंकायची असेल तर रटाळ खेळून चालणार नाही हे इंग्लंडच्या खेळातून जाणवलं.

टेस्टच्या पहिल्या दिवशी खेळपट्टी फलंदीजाला अनुकूल असताना इंग्लंडच्या फलंदाजांनी यंत्रवत हल्ला चढवला.

पडला चेंडू की तुडव या न्यायाने इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवल्या. त्यात भर म्हणजे पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणात तीन पदार्पणवीर खेळाडू होते. या अनुनभवाचा पुरेपूर फायदा इंग्लंडने उठवला.

सामान्यत: टेस्टच्या एका दिवसात तीनशे धावा होतात पण इंग्लंडने पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांवर तुफान आक्रमण करत 75 षटकातच 500 धावांची वेस ओलांडली.

अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबला नाहीतर इंग्लंडने लत्ताप्रहार सुरूच ठेवला असता. टेस्टच्या दुसऱ्या दिवशीही पाटा खेळपट्टीचा फायदा उठवत इंग्लंडने धावा चोपणं सुरूच ठेवलं. 101 षटकातच त्यांनी 657 धावांचा डोंगर उभारला.

इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतकी खेळी साकारल्या. धावांचे, भागीदाऱ्यांचे असंख्य विक्रम मोडीत निघाले. सहा वर्षानंतर टेस्ट संघात पुनरागमन करणाऱ्या बेन डकेटनेही शतक साकारलं.

सलामीवीर म्हणून सातत्यपूर्ण खेळू न शकल्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या झॅक क्राऊलेनेही शतक केलं.

पाकिस्तानचा पदार्पणवीर गोलंदाज झाहीद महमूदच्या 33 षटकात इंग्लंडने 235 धावा कुटल्या. नसीम शहा, मोहम्मद अली यांच्या गोलंदाजीवर शंभराहून अधिक धावा निघाल्या. 

आशियाई उपखंडातील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असतात हे जाणून इंग्लंडने ताफ्यात केवळ दोनच वेगवान गोलंदाजांना सामील केलं.

जॅक लिच आणि विल जॅक्स या फिरकीपटूंनी सर्वाधिक गोलंदाजी केली. संघातील प्रमुख फलंदाज आणि कामचलाऊ फिरकी गोलंदाज जो रुटनेही गोलंदाजी केली.

उष्ण आणि दमट हवामानात वेगवान गोलंदाजांना दमवण्याऐवजी इंग्लंडने फिरकीपटूंनाच संघात स्थान दिलं.

पाकिस्तानच्या फलंदाजांनी घरच्या परिचित खेळपट्टीवर धावांची टांकसाळ उघडली. इमाम उल हक आणि बाबर आझम यांच्या शतकांच्या बळावर पाकिस्तानने 579 धावांची मजल मारली.

जॅक लिचने 49 तर विल जॅक्सने 41 षटकं गोलंदाजी केली. या दोघांच्या तुलनेत वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन या दोघांनी मिळून 41 षटकंच गोलंदाजी केली.

पाकिस्तानने दमदार प्रत्युत्तर दिल्याने इंग्लंडला 78 धावांचीच आघाडी मिळाली. 

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

टेस्ट मॅच जिंकायचीच या उद्दिष्टाने खेळणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या डावातही अनोखा दृष्टिकोन अंगीकारला. दुसऱ्या डावातही त्यांनी जोरदार आक्रमण केलं आणि 35.5 षटकात 264 धावा करून डाव घोषित केला.

गोलंदाजांना 10 विकेट मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हे लक्षात घेऊन इंग्लंडच्या सगळ्याच फलंदाजांनी फलंदाजी केली.

इंग्लंडचे इरादे लक्षात घेऊन पाकिस्तानने गोलंदाजीचे डावपेच बदलवले. त्याला काटशह देण्यासाठी इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रुटने उजव्याऐवजी डावखुऱ्या पद्धतीनेही फलंदाजी केली.

आधुनिक काळातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये तसंच इंग्लंडच्या महान फलंदाजांमध्ये रुटची गणना होते.

गेल्या दशकभराहून अधिक काळात जगभरात सगळीकडे दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध सातत्याने धावा करण्यासाठी रुट ओळखला जातो. पण याआधी त्याने हे तंत्र अवलंबलं नव्हतं.

एकाच कालखंडात दिमाखदार फलंदाजी करणाऱ्या चौकडीला फॅब फोर असं म्हटलं जातं. यामध्ये विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, केन विल्यसमन आणि जो रुट यांचा समावेश होतो.

जो रुटने यानिमित्ताने आपल्या खेळातली आक्रमक आणि अनोखी बाजूही दाखवून दिली. रुटने 69 चेंडूत 73 धावांची खेळी करत वेगाने धावसंख्या वाढेल याकडे लक्ष दिलं.

टेस्ट जिंकण्याच्या दृष्टीने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने धाडसी पाऊल उचललं. टेस्टच्या चौथ्या दिवशी स्टोक्सने दुसरा डाव घोषित करत पाकिस्तानला 343 धावांचं लक्ष्य दिलं.

हा निर्णय घेतानाच स्टोक्सने आपल्या गोलंदाजांना जवळपास सव्वा दिवस मिळेल याची दक्षता घेतली.

मात्र त्याचवेळी पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली तर 343 धावांचं लक्ष्य ते गाठूही शकतात याचा अंदाज इंग्लंडला होता.

रटाळ खेळत बसण्याऐवजी स्टोक्सने झटपट डाव घोषित करुन टेस्ट रंगतदार स्थितीत आणली. चौथ्या दिवसअखेर पाकिस्तानने 2 विकेट्स गमावून 80 धावा केल्या आहेत. 

इंग्लंड, पाकिस्तान, क्रिकेट, ब्रेंडन मॅक्युलम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंग्लंडचा संघ

पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी 8 विकेट्स घ्यायच्या आहेत तर पाकिस्तानला 263 धावांची आवश्यकता आहे.

दोन्ही संघांना विजय मिळवण्याची समान संधी आहे पण हे इंग्लंडच्या आक्रमक आणि धाडसी योजनांमुळे शक्य झालं हे विसरुन चालणार नाही.

वनडे आणि त्यानंतर ट्वेन्टी20च्या आक्रमणामुळे टेस्ट क्रिकेट दिवसेंदिवस मागे पडत चाललं आहे.

टेस्ट क्रिकेट मैदानात जाऊन तसंच टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत टेस्ट क्रिकेट जिवंत ठेवायचं असेल तर ब्रेंडन मॅक्युलमसारख्या क्रांतिकारी विचारांची आवश्यकता आहे.

मॅक्युलमची विचारधारा इंग्लंड संघाने खेळात भिनवली असल्याचं त्यांच्या खेळातून दिसत आहे.

मॅक्युलम यांचं टोपणनाव 'बॅझ' आहे. त्यंच्या या दृष्टिकोनाला बॅझबॉल तंत्र म्हटलं जाऊ लागलं आहे.

फलंदाजीत वादळी आक्रमणाबरोबरीने गोलंदाजीत केलेले बदल आणि क्लोज इन म्हणजे 30 यार्ड वर्तुळात जास्तीत जास्त क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना मॅक्युलमच्या धोरणांचाच भाग आहे. 

काही महिन्यांपूर्वीच भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये इंग्लंडने चौथ्या डावात 378 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

चौथ्या डावात खेळपट्टी खराब झालेली असते. गोलंदाजांचं वर्चस्व असतं. अशा परिस्थितीत छोटं लक्ष्यही कठीण ठरतं.

पण इंग्लंडने या शक्यतांना छेद देत पाचव्या दिवशीही नेहमीच्या तडफेने आक्रमक खेळ करत थरारक विजय मिळवला. 

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)