मध्ययुगीन काळातल्या लोकांची झोपण्याची कपाटं, ज्यामध्ये अगदी पाच-सहा लोकही मावायचे

    • Author, झरिया गॉर्वेट
    • Role, बीबीसी फ्युचर
  • Published

या आरामदायक, कपाटासारख्या फर्निचरमध्ये पाच जण सहज झोपू शकायचे. मग त्याचा वापर बंद का करण्यात आला?

स्कॉटलंडच्या अगदी उत्तरेकडील विक येथील एका संग्रहालयात पाईन वृक्षाच्या लाकडापासून बनविण्यात आलेली मोठ्या आकाराची कपाटं नजरेस पडतात. समोरच्या बाजूला पूर्ण लांबीचे दोन दरवाजे आणि त्याच्यासमोर आधुनिक बेडरूमध्येही शोभून दिसतील अशा सामानाच्या पेट्या रचलेल्या दिसतात.

नेहमीच्या लाकडी फळ्यांपासून बनवण्यात आलेल्या या फर्निचरचा प्रत्येक तुकडा वेगळा करता येऊ शकतो, त्यामुळे ते सहजपणे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलवता आणि पुन्हा जोडता येऊ शकतं. पण हे कपाट तुमचे कपडे ठेवण्यासाठी नाहीये. याच्या आतमध्ये कोणतीही हँगर्स किंवा कप्पे नाहीत.

हा एक बॉक्स बेड आहे - आणि तो लोकांना झोपण्यासाठी डिझाइन केलेला आहे. याला फडताळ बेड किंवा बंद बेड म्हणून ओळखलं जायचं.

मध्ययुगीन काळापासून 20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण युरोपमध्ये बॉक्स बेड अतिशय लोकप्रिय होते. लाकडापासून बनवलेल्या या बॉक्सच्या आतमध्ये बेड आहे आणि तुम्हाला अपेक्षित असलेली प्रत्येक गोष्ट या वजनदार फर्निचरमध्ये असल्याचं दिसेल.

काही बेड हे सामान्य लाकडी पेट्यांसारखे अतिशय साधे आणि हलक्या दर्जाचे होते, तर काही कोरीव काम, रंगकाम करून कौशल्यपूर्ण पद्धतीने सजवलेले होते.

बऱ्याचदा झोपलेल्या व्यक्तीला आतमध्ये मिट्ट काळोख करता यावा यासाठी कपाटांना दारं असायची किंवा पडदा लावलेल्या छोट्या खि़डक्या असत. एक अतिरिक्त कप्पा आणि खाली बसायला जागा असलेल्या या कल्पक वस्तूचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जात असे.

अनेक वर्षं, दमलेले शेतमजूर, मच्छिमार आणि अगदी खानदानी लोकही दररोज रात्री या आरामदायी लाकडी कपाटांमध्ये रांगत शिरायचे.

हे करताना हाताच्या कोपरांना लागू नये याची काळजी घेतली जाई आणि ते स्वतःला आतमध्ये कोंडून घेत असत.

बॉक्स बेड हे विविधोपयोगी फर्निचर होतं. बऱ्याचदा त्याचा छोट्या बेडरूमसारखा वापर केला जात असे.

जिथे मुबलक जागा उपलब्ध नसे तिथे लोकांना झोपण्यासाठी त्याचा वापर होई. विक सोसायटीने 1890 सालच्या दिलेल्या एका उदाहरणानुसार, स्कॉटिश डोंगराळ प्रदेशातील एक कुटुंब हे त्यांच्या एका खोलीच्या मानाने खूप मोठं होतं - त्यामुळे कुटुंबातील काही सदस्य कुत्रे आणि घोड्यांसोबत गोदामातील बॉक्स बेडमध्ये झोपायचे.

काही भागांमध्ये स्थलांतरित कामगारांसाठीही त्यांचा नियमितपणे वापर केला जात असे. उदाहरणार्थ- विकच्या प्रदेशात मासेमारीच्या हंगामात वाहून येणा-या माशांचं वर्गीकरण करण्यासाठी जे कामगार येत असत, अशांपैकी पाच ते सहा लोकांना एक बेड वाटून घ्यावा लागत असे.

खरंतर कुटुंबातील सदस्य किंवा सहकाऱ्यांसोबत बॉक्स बेड शेअर करणं सामान्य गोष्ट होती.

1825 च्या ‘द फॅक्टरी लॅड’ या नाटकात एका बॉक्स बेडमध्ये दोन ते तीन कामगार झोपल्याचं दाखवण्यात आलेलं.

काहींना हवा खेळती राहण्यासाठी छिद्रे होती, परंतु खूप लोकांना एकत्रितपणे आतमध्ये घुसवल्याने गुदमरण्याचा धोकाही असायला.

फ्रान्समधील 13 व्या शतकातील एका कथेत एक महिला तीन गुप्त पाहुण्यांना पलंगाच्या आत लपवते, ज्यांचा नंतर आतमध्येच गुदमरून मृत्यू होतो.

बॉक्स बेड हे मुख्यत: ब्रिटन आणि युरोप खंडात वापरले जात असत. 1840 मधील एका अहवालानुसार, ब्रिटनी, फ्रान्समधील बहुतांश कॉटेजमध्ये ओक वृक्षाच्या लाकडापासून हे चार फूट उंचीचे आणि आतल्या गाद्यांसह हे बॉक्स तयार केले जात.

कदाचित एका खोलीत असे अनेक बॉक्स ठेवले जात आणि प्रत्येकाच्या पायाशी एक लांबलचक लाकडी पेटी असे.

"ही अतिशय सन्मानाची जागा असे आणि मनोरंजनासाठी येणा-या महिलांना उंच पलंगावर चढण्यासाठी त्याचा पायरी म्हणूनही वापर केला जात असे,” असं लेखक थॉमस ॲडॉल्फस ट्रोलोप यांनी लिहिलंय.

पण या झोपण्याच्या शवपेटींचा आणखी एक फायदा होता - तो म्हणजे उबदारपणासाठी.

आधुनिक काळातील उष्णता निर्माण करणारी उपकरणं किंवा इन्सुलेशन शीट त्याकाळी नव्हत्या. हिवाळ्यात बेडरूम्स हे अक्षरशः गोठलेले असायचे - इतके थंड की नियमितपणे संपूर्ण शरीर झाकून फक्त तुमचा चेहरा उघडा राहिल अशी टोपी घालून झोपावं लागे.

त्यावेळी हाडं गोठवणारी थंडी असायची.

व्हर्जिनियाच्या व्हर्जिनिया टेक येथील इतिहासाचे प्रतिष्ठित प्राध्यापक आणि ‘ॲट डेज क्लोज: अ हिस्ट्री ऑफ नाईटटाइम’चे लेखक रॉजर एकिर्च स्पष्ट करतात की, 14 ते 19 व्या शतकापर्यंत, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही प्रदेश लहान हिमयुग अनुभवत होता. लंडनमध्ये थेम्स नदी अठरा वेळा गोठली - 1963 नंतर आजवर असं एकदाही घडलेलं नाही.

“डाय-यांमध्ये अशा नोंदी सापडतात की, शेकोटीमधील जळणा-या लाकडातून बाहेर पडणारा द्रव पदार्थ लाकडाच्या टोकावरच गोठून जाई... शाईच्या दौती रात्रीतच गोठत असत," असं ते म्हणाले.

उबदार वातावरण तयार करणारी बॉक्स बेडच्या आतील जागा हे जोडप्यांसाठी तर वरदानच ठरलं.

पुढे बॉक्स बेड गरिबी आणि गावाकडील जीवनाशी जोडले गेले आणि कालबाह्य झाले. 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत ते दुर्मिळ झाले. मात्र, आता अशाच प्रकारचं फर्निचर पुन्हा एकदा तयार केलं जाऊ लागलंय.

आज बेड टेंट खरेदी करता येतो, ज्यामुळे झोपण्याती जागा एका छोट्या गुहेत बदलता येऊ शकते आणि त्याचा अतिरिक्त फायदा म्हणजे एकांतसुद्धा मिळतो.

दरम्यान बॉक्स बेडसारखे दिसणारे लाकडापासून तयार केले जाणारे ‘कोनाडे’ हवीहवीशी वाटणारी 'कॉटेज शैली'तील घरं म्हणून विकली जातायत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)