एलिझाबेथ होम्स : काल्पनिक यंत्राचं स्वप्न दाखवून अब्जाधीशांना फसवणारी तरुणी

Published

“जगातली सर्वांत तरुण स्वतः बनलेली अब्जाधीश” असा तिचा परिचय फोर्ब्स मॅगझीनने केला होता.

तर दुसऱ्या एका बिझनेस मॅगझीनने तिला पुढची स्टीव्ह जॉब्स म्हटलं होतं. हा काळ होता 2014चा आणि एलिझाबेथ होम्स तेव्हा जग जिंकायला निघी होती.

 

स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ड्रॉपआऊट झाल्यानंतर एलिझाबेथ हिने एक कंपनी स्थापन केली – थेरानोस. तुमच्या आजारांचं निदान करणारं एक क्रांतिकारी तंत्रज्ञान तिची ही कंपनी बनवेल, असं एलिझाबेथने म्हटलं होतं.

रक्ताचे काही थेंब घेऊन तिच्या कंपनीचं एक यंत्र अशा अनेक टेस्ट करेल, ज्यातून कॅन्सर आणि डायबिटीससाठीच्या चाचण्या एका झटक्यात होतील, असं आश्वासन तिने दिलं होतं.

हे खरोखरंच एक मोठं स्वप्न होतं, आणि एलिझाबेथ ते अनेक दिग्गज लोकांना दाखवत होती – गुंतवणूकदार ते अमेरिकन राजकारणीसुद्धा. अगदी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्रीसुद्धा तिच्या या कंपनीशी संलग्न होते.

त्यामुळे तिच्या कंपनीचं मूल्य एका क्षणी 9 अब्जांपर्यंत गेलं होतं. पण एक अडचण होती. तिचं हे यंत्र कधी तयारच होत नव्हतं.

 

2015च्या अखेरीस हे स्पष्ट होऊ लागलं की एलिझाबेथ अब्जाधीशांना फसवतेय. तिच्या इन्वेस्टर्सनी तिच्याविरोधात खटला भरला, आणि तिला 15 वर्षांची शिक्षा व्हावी, सोबतच तिने थेरानोस या तिच्या कंपनीतल्या गुंतवणूकदारांना 80 कोटी डॉलर्स परत करावे, अशी मागणी केली.

 

आणि 18 नोव्हेंबरला कॅलिफोर्नियातल्या एका न्यायालयात तिच्याविरोधात फसवणुकीचे चार आरोप सिद्ध झाले असून, त्यासाठी तिला आता तब्बल 11 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि बिझनेस पार्टनर रमेश “सन्नी” बलवानी, याच्यावर मानसिक आणि लैंगिक छळाचे आरोप केले होते, ज्यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडल्याचं तिने म्हटलंय. तिच्या बॉयफ्रेंडवरही फसवणुकीचे आरोप आहेत, आणि त्याच्यावरचा खटला फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. पण हो, त्याने मानसिक आणि लैंगिक छळाचे आरोप नाकारले आहेत.

खरंतर एलिझाबेथ वॉशिंग्टनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात वाढली. तिचे आईवडील अमेरिकन सत्तेचं केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या कॅपिटॉल हिलवर कामाला होते.

 

तिला लहानपणापासूनच काहीतरी नवीन आणि मानवतेसाठी काहीतरी वेगळं करायचं होतं, असं सांगितलं जातं. तिने लहानपणी तिच्या वडिलांना तसं सांगितलं होतं. मोठी झाल्यावर तिने स्टॅनफर्डमध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश केला, पण तिथूनही अर्धवट शिक्षण घेऊन ती स्वतःची कंपनी थाटायला निघाली.

 

तिची कल्पना आणि कॉन्सेप्ट भारी होतं, पण मुळात ते यंत्र, ज्याला तिने एडिसन नाव दिलं होतं, अद्याप काम करत नव्हतं. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांना ती तिच्या यंत्राचं प्रोटोटाईप दाखवून आकर्षित करू पाहत होती. पण त्या रक्ताचा नमुन्याची चाचणी बाजारात उपलब्ध दुसऱ्याच एका मशीनमधून करून आणत ती दाखवायची, अशी तिची पोलखेल द वॉल स्ट्रीट जर्नलने एका मालिकेत केली होती.

 

त्यानंतर 2015मध्ये तिच्याविरोधात खटले भरले जाऊ लागले. 2018 मध्ये थेरानोस ही कंपनीसुद्धा बंद करण्यात आली. 2019 मध्ये तिने अमेरिकेतल्या इव्हन्स हॉटेल ग्रुपच्या विल्यम इव्हन्सशी लग्न केलं, आणि त्यांना जुलै महिन्यात एक मूलही झालं.

पण या पूर्ण वेळ तिच्यावर खटले सुरूच होते, आणि ती सतत तिने कुठलाही गुन्हा केला नाही, असंच सांगत राहिली. अखेर कोर्टात ती निर्दोष असल्याचं सिद्ध नाही करू शकली, आणि अखेर तिला 11 वर्षांसाठी तुरुंगवास ठोठावण्यात आलं.

 

पण एक कमाल आहे, जर एलिझाबेथला माहिती होतं की तिचं तंत्रज्ञान काम करत नाहीय, तर तिने गुंतवणूकदारांकडून इतके पैसे का घेतले? किंवा ते परत का नाही केले?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)