नाना पटोलेंना शह देण्यासाठी भाजपची ही रणनिती कितपत यशस्वी होईल?

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

विधानसभा निवडणुकीत विदर्भात रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. कारण, इथून भाजप आणि काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते मैदानात आहेत.

यापैकीच एक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

साकोली विधानसभा मतदारसंघात कोणते मुद्दे निर्णायक आहेत जे थेट निकालावर परिणाम करू शकतात? कोणते मुद्दे निकाल ठरवू शकतात? इथलं राजकीय समीकरण काय सांगतं?

नाना पटोलेंकडून साकोली मिळविणे भाजपला शक्य होईल का? साकोलीत कोणाचं पारडं जड? या प्रश्नांची उत्तर समजून घेऊयात. पण, त्याआधी या मतदारसंघाचा इतिहास आपल्याला पाहायला लागेल.

साकोली विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी आणि लाखांदूर हे तीन तालुके येतात. गेल्या काही विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मतदारसंघात दर दोन टर्मनंतर इथं मतदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला संधी देतात.

कधी दोन टर्म काँग्रेस तर कधी दोन टर्म भाजप असं इथलं आतापर्यंतच राजकीय समीकरण दिसतंय. गेल्या 2009 पासून इथं भाजपचा वरचष्मा दिसतोय.

काँग्रेसच्या नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करून इथून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि नाना पटोले विजयीही झाले होते.

त्यानंतर 2014 ला नाना पटोले भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून संसदेत गेले आणि त्यांच्या पाठिंब्यानं भाजपचे बाळा काशीवार आमदार झाले. पण, पटोलेंचं मन भाजपात रमलं नाही आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

पटोलेंनी 2019 मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानं ते भाजपच्या हिटलिस्टवर आहेत.

त्यामुळे पटोलेंना साकोलीत गाठण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खास मर्जीतल्या परिणय फुके यांना उमेदवारी दिली होती. यावेळी ही लढत स्थानिक विरुद्ध आयात अशी झाली होती.

फुके नागपुरातून आयात केलेले उमेदवार आहेत, असा प्रचार नाना पटोलेंनी केला होता.

इथं सेवक वाघाये हे वंचितचे उमेदवार होते त्यांना तब्बल 34,436 मतं मिळाली होती. तरीही नाना पटोलेंचा 6 हजार 240 मतांनी विजय झाला होता.

पटोलेंविरोधात भाजपनं दिला कुणबी उमेदवार

गेल्या पाच वर्षात नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. तिथून राजीनामा देऊन त्यांना थेट महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं.

नाना पटोलेंचं राजकीय महत्त्व वाढतच गेलं. काही दिवसांपूर्वीच विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचे जास्त आमदार आले तर नाना पटोले मुख्यमंत्री होतील असं बोलून दाखवलं होतं. साकोली विधानसभा मतदारसंघ आणि भंडारा जिल्ह्यावर नाना पटोलेंची मजबूत पकड आहे.

पटोलेंचं भंडाऱ्यावरील वर्चस्व कमी करण्यात अद्याप भाजपला यश आलं नाही. नाना पटोले यांना आव्हान देण्यासाठी या मतदारसंघात भाजपला सुरुवातीला तुळ्यबळ उमेदवार सापडत नव्हता.

यावेळी पटोलेंना साकोलीत गाठायचं असेल तर बाहेरचा उमेदवार न आणता स्थानिक उमेदवारच तगडी लढत देऊ शकतो, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना होती.

भाजपकडून माजी आमदार बाळा काशीवार आणि सोमदत्त करंजेकर यांनी या मतदारसंघात तयारीही केली होती. दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण, अखेर राष्ट्रवादीतून आयात करून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली.

अविनाश ब्राह्मणकर हे कुणबी असून ते प्रफुल पटेलांचे कार्यकर्ते आहेत. तसेच ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहेत.

या बातम्याही वाचा:

साकोलीत कोणते मुद्दे निकालावर परिणाम करतील?

साकोली विधानसभा क्षेत्रात विकास, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत. पण, आतापर्यंत या मुद्द्यांचा निवडणूक निकालावर थेट परिणाम झाल्याचं दिसलं नाही.

इथल्या निकालावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ते इथलं जातीय समीकरण.

जातीय समीकरणाचा फायदा कोणाला?

सर्वाधिक मतदार कुणबी आहेत. त्यानंतर तेली आणि दलित समाजाची मतं या मतदारसंघात आहेत. कुणबी आणि दलित मतांमुळे नाना पटोले या मतदारसंघातून निवडून येतात. तसेच लोकसभेलाही या मतांचा फायदा होत पडोळे खासदार झाले.

नाना पटोलेंना कुणबी आणि स्थानिक उमेदवारच तगडी लढत देऊ शकतो हा विचार करत भाजपनं राष्ट्रवादीच्या अविनाश ब्राह्मणकरांना आयात करत उमेदवारी दिली. त्यामुळे आता कुणबी मतं विभाजित होण्याची शक्यता आहे.

पण, जवळपास सर्वच मतदारसंघात तेली मतांचा ओढा हा भाजपकडे असतो. पण, या मतदारसंघातली तेली मतं यावेळी भाजपचे अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर यांच्यामुळे विभाजीत होण्याची भीती आहे. त्याचा फटका हा भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो, असं भंडाऱ्यातले राजकीय जाणकार सांगतात.

दुसरं म्हणजे भंडारा विधानसभा मतदारसंघात दलित उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी इथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केली होती.

पण, काँग्रेसनं पूजा ठवकर यांच्यासारख्या नवीन चेहऱ्याला पसंती दिली. त्यामुळे इथल्या काँग्रेस नेत्यांसह बौद्ध समाजानं नाराजी बोलून दाखवली होती. त्यांनी यावेळी भंडारा, तुमसर आणि साकोली विधानसभा क्षेत्रातलं समीकरण बिघडवण्याचा इशाराही दिला होता.

पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यानं इथल्या बौद्ध समाजाच्या नाराजीची झळ साकोलीपर्यंत पोहोचून त्याचा फटका पटोलेंना बसण्याचीही शक्यता असल्याचं बोललं जातंय.

आयात उमेदवारामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी?

अविनाश ब्राह्मणकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून आयात केलेले उमेदवार आहेत. इथं भाजपचे नेते इच्छूक होते. त्यांनी तयारीही केली होती.

पण, ऐनवेळी अविनाश ब्राह्मणकर यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे स्थानिक भाजप नेते नाराज झाले. पक्षात उमेदवार असताना बाहेरून आयात करायची काय गरज होती, अशी नाराजी इथले भाजप कार्यकर्ते बोलून दाखवतात.

त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या अधिकृत उमेदवाराचं किती काम करतात यावर बरंच गणित अवलंबून आहे.

बंडखोर उमेदवार कोणाचं गणित बिघडवणार?

भाजपनं आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळे भाजपचे नेते सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी केली. भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार हे उघडपणे भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा प्रचार करताना दिसतात.

तसेच सोमदत्त करंजेकर यांचे वडील ब्रह्मानंद करंजेकर आरएसएससोबत संबंधित आहेत. करंजेकरांचं शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनसंपर्क आहे. दुसरीकडे अविनाश ब्राह्मणकर हे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचं फारसं वलय दिसत नाही. ते प्रफुल पटेलांचे कार्यकर्ते आहेत.

सध्याच्या परिस्थितीत सोमदत्त करंजेकर या अपक्ष उमेदवाराची बाजू भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यापेक्षा वरचढ दिसतेय, असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात.

"पटोले यांना पाडायचं असेल तर कुणबी उमेदवार द्यायचा हे समीकरण भाजपवर उलटू शकतं. कारण स्थानिक भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी असताना यांनी राष्ट्रवादीतून उमेदवार आयात केला. त्यामुळे सकोलीमधले मोठे भाजप नेते आणि पदाधिकारी दुखावले आहेत. याचा फटका भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना बसून त्याचा फायदा नाना पटोले यांना होऊ शकतो", असं 'लोकसत्ता'च्या भंडारा इथल्या पत्रकार कविता नागपुरे सांगतात

या मतदारसंघात नाना पटोले, सोमदत्त करंजेकर आणि अविनाश ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आता या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार हे बघणं महत्वाचं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)