म्हातारपणातही काहीजण इतके निरोगी कसे राहतात? 'सुपर-एजर्स'वरील संशोधन काय सांगतं?

वृद्धापकाळ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मार्गारिटा रॉड्रिग्ज आणि रेबेका थॉर्न
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

डॉ. एरिक टोपोल हृदयरोगतज्ज्ञ आहेत. ते जेव्हा 98 वर्षांच्या 'एलआर' यांना पहिल्यांदा वैद्यकीय तपासणीसाठी भेटले, तेव्हा एका गोष्टीनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं.

त्यांच्या लक्षात आलं की एलआर यांच्यासोबत कोणीही नातेवाईक नाही. त्यामुळे डॉ. एरिक यांनी एलआर यांना विचारलं की, त्या वैद्यकीय केंद्रापर्यंत कशा पोहोचल्याय़

डॉ. एरिक यांनी बीबीसीला सांगितलं की, "त्या स्वत: गाडी चालवत आल्या होत्या. लवकरच मला त्या एकमेवाद्वितीयरीत्या उत्साही आणि निरोगी महिलेबद्दल कळालं. त्या एकट्या राहतात, त्यांचं मोठं सामाजिक नेटवर्क आहे. मात्र तरीदेखील त्यांना एकटेपणा आवडतो."

डॉ. टोपोल, स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि संचालक आहेत. ही अमेरिकेतील प्रसिद्ध वैद्यकीय संशोधन संस्था आहे. एक वैज्ञानिक आणि लेखक म्हणून त्यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे.

त्यांच्या अलीकडच्या संशोधनात त्यांनी आपल्यापैकी काहीजण इतरांच्या तुलनेत अधिक निरोगी आणि दीर्घायुषी का जगू शकतात यावर अभ्यास केला आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेतील एका अलीकडच्या संशोधनात, आपल्यापैकी काहीजण इतरांच्या तुलनेत अधिक निरोगी आणि दीर्घायुषी का जगू शकतात यावर अभ्यास केला गेला आहे.

डॉ. टोपोल, कोणताही डेटा नसलेल्या "अँटी-एजिंग सप्लीमेंट्स आणि कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय केल्या जाणाऱ्या, विकल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि थेरेपी" यासारख्या मिथकांवर आणि खोट्या विज्ञानावर विश्वास ठेवण्याबाबत इशारा देतात.

ते म्हणतात, "कदाचित भविष्यात एखाद्या दिवशी आपल्या हाती जादूची कांडी सारखी एखादी गोळी येईल जी वृद्धापकाळात आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करेल. मात्र सध्यातरी आपल्याकडे अशी गोळी नाही. आपण त्याच्या अगदी जवळदेखील नाही."

मग निरोगी वृद्धत्वाचं किंवा वृद्धापकाळात निरोगी राहण्यामागचं विज्ञानावर आधारित रहस्य काय आहे?

वृद्धापकाळात निरोगी राहण्यात अनुवांशिकतेची भूमिका किती?

2007 मध्ये डॉ. टोपोल आणि त्यांच्या टीमनं अमेरिकेतील 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृद्ध, ज्यांना कोणताही मोठा आजार किंवा समस्या नव्हती अशा जवळपास 1,400 लोकांच्या जीनोमची म्हणजे जनुकांची रचना समजून घेण्यासाठी सहा वर्षांहून अधिक काळ अभ्यास केला.

"कधीही आजारी न पडलेले (मोठे आजार किंवा बऱ्याच काळापासून आजारी असलेले), बऱ्याच वर्षांपासून औषधं घेत नसलेले आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले निरोगी लोक सापडणं खूप कठीण आहे," असं डॉ. टोपोल म्हणतात.

या सुपर-एजर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला, तेव्हा डॉ. टोपोल आणि त्यांच्या टीमला, ते इतके निरोगी असण्यामागचं कारण त्यांच्या अनुवांशिकतेत किंवा जनुकांच्या रचनेत फारसं आढळलं नाही.

डॉ. टोपोल यांनी तो अभ्यास प्रकाशित केल्यानंतर 98 वर्षांच्या एलआर यांच्याशी त्यांची भेट झाली. डॉ. टोपोल यांच्या सुरुवातीच्या अभ्यास एलआर जरी नसल्या तरी त्यांची कहाणी त्यांनी त्यांच्या ताज्या अभ्यासात समाविष्ट केली आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुपर-एजर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांचा अभ्यास केला, तेव्हा ते इतके निरोगी असण्यामागचं कारण त्यांच्या अनुवांशिकतेत किंवा जनुकांच्या रचनेत फारसं आढळलं नाही.

डॉ. टोपोल एलआर यांचं उदाहरण देताना नमूद करतात की त्या अशा कुटुंबातील महिला आहेत, ज्या कुटुंबातील सदस्यांचे लवकर मृत्यू झाले आहेत. तरीदेखील एलआर मात्र वृद्ध झाल्या आहेत आणि निरोगी आहेत.

"हे निरोगी वृद्ध, ज्यांचं आरोग्य अविश्वसनीय स्वरुपाचं आहे, जे अगदी वयाची शंभरीदेखील गाठतात, आरोग्याच्या बाबतीत हा त्यांच्या कुटुंबातील पॅटर्न नाही. कदाचित त्यामागे काही अनुवांशिक घटक असेल, मात्र ते त्यांच्या निरोगी असण्यामागचं प्रमुख कारण नाही," असं डॉ. टोपोल म्हणतात.

ज्यांच्या घरात अकाली मृत्यू झाले आहेत आणि कुटुंबात दीर्घकालीन आजार असण्याची पार्श्वभूमी आहे, अशा लोकांसाठी निरोगी वृद्धत्वासाठी अनुवांशिकता हा महत्त्वाचा घटक असू शकत नाही, ही प्रस्थापित धारणांपलीकडे विचार करायला लावणारी गोष्ट आहे, असं डॉ. टोपोल म्हणतात.

'इन्फ्लेमेएजिंग'

या अभ्यासातून समोर आलेल्य निष्कर्षांमुळे डॉ. टोपोल यांनी असा सिद्धांत मांडण्यास भाग पाडलं की 'सुपर-एजर्स' म्हणजे निरोगी वृद्धांना वयोमानामुळे होणाऱ्या दीर्घकालीन इन्फ्लेमेशनचा कमी त्रास होतो.

इन्फ्लेमेशन ही तुमच्या शरीरातील संसर्ग, दुखापत किंवा विषारी पदार्थांसारख्या हानीला दिलेला नैसर्गिक आणि निरोगी प्रतिसाद आहे.

प्राध्यापक डेव्हिड जेम्स युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थी एजिंग (आयएचए) मध्ये संशोधक संचालक आहेत.

ते म्हणतात की, इन्फ्लेमेशन जेव्हा शरीरावर जास्त काळ परिणाम करतं, तेव्हा त्यामुळे ह्रदय, रक्तवाहिन्यांशी संबंधित आणि न्युरोडिजनरेटिव्ह आजार गंभीर स्वरुपात होऊ शकतात.

या प्रक्रियेला 'इन्फ्लेमेएजिंग' असं म्हणतात, असं ते सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपल्याला लठ्ठपणामुळे मधुमेह, स्मृतिभ्रंश आणि ह्रदय, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होण्यामागचा एक मार्ग म्हणजे इन्फ्लेमेशन, असं प्राध्यापक जेम्स सांगतात.

"दीर्घकाळ असणाऱ्या इन्फ्लेमेशनची समस्या अशी असते की ती काहीशी बिल्डर्ससारखी असते. ते तिथेच असतात, निघून जात नाहीत आणि मग खूप त्रासदायक होतात," असं ते म्हणतात.

यासंदर्भातील एक सिद्धांत असा आहे की, आपल्या आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे ही समस्या उद्भवते आहे. कारण आपलं शरीर ज्याप्रकारे उत्कांत झालं आहे आणि आज आपण जसं जगतो आहोत, यात विसंगती आहे.

"आपल्या शरीराची रचना अशा जगासाठी तयार झालेली आहे, जिथे अन्नाची कमतरता आहे," असं जेम्स म्हणतात.

"आपल्या शरीराची रचना सदासर्वदा अतिरिक्त अन्न खाण्यासाठी तयार झालेली नाही. विशेषकरून शुद्ध अन्न घटकांसह असलेले खूप जास्त चरबीयुक्त पदार्थ खाण्यासाठी ही रचना नाही," असं ते म्हणतात.

आपल्याला लठ्ठपणामुळे मधुमेह, स्मृतिभ्रंश आणि हृदय, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होण्यामागचा एक मार्ग म्हणजे इन्फ्लेमेशन, असं प्राध्यापक जेम्स सांगतात.

शरीरातील इन्फ्लेमेशन कमी कसं करायचं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. टोपोल ज्या गोष्टींची सूचना करतात, त्यातील बहुतांश बाबी अनेकदा आपल्याला निरोगी जीवनशैली जगण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या जातात, तशाच आहेत.

ते सूचना करतात की भाजीपाला किंवा भूमध्यसागरी आहाराचं सेवन करावं. या आहारात मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाल्याचा समावेश असतो.

त्याचबरोबर पुरेशी आणि चांगली गाढ झोप घेणं देखील आवश्यक आहे.

"दररोज रात्री आपल्या मेंदूमध्ये हे टाकाऊ पदार्थ, मेटाबोलाईट्स असतात. ते खरोखरंच विषारी किंवा हानिकारक असतात आणि त्यामुळे इन्फ्लेमेशन होतं. हे घटक आपण तथाकथित ग्लिम्फॅटिक चॅनेलद्वारे साफ करण्याची आवश्यकता असते. अलीकडच्या काळात त्याचा शोध लागला आहे," असं डॉ. टोपोल म्हणतात.

ग्लिम्फॅटिक चॅनेलचा शोध 2012 मध्ये लागला. ते मेंदूतील कचरा साफ करण्याची यंत्रणा म्हणून काम करतं. ही यंत्रणा मेंदूतील हानिकारक किंवा विषारी घटक बोगद्यांच्या नेटवर्कद्वारे दूर नेते. नंतर झालेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे की झोपेमध्ये ही यंत्रणा अधिक सक्रिय असते.

"जर आपण पुरेशी गाढ झोप घेतली नाही, तर ही यंत्रणा काम करत नाहीतआणि मग मेंदूतील विषारी किंवा हानिकारक घटक काढून टाकले जात नाहीत. त्यामुळे मेंदूमध्ये इन्फ्लेमेशन होण्याची संधी निर्माण होते. त्यामुळे न्युरोडिजनरेटिव्ह आजार टाळण्यासाठी आपण चांगली गाढ झोप घेतली पाहिजे," असं ते पुढे म्हणतात.

त्याचबरोबर ते योग्य व्यायाम करण्याचीही सूचना करतात.

"जर ते औषध असतं तर ते आतापर्यंत आपण तयार केलेलं सर्वात महत्त्वाचं औषध ठरलं असतं," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

ते म्हणतात की, वेगानं चालणं किंवा सायकलिंग करणं हे एरोबिक व्यायामाचे उत्तम प्रकार आहेत. मात्र त्याचबरोबर लोकांनी स्नायू बळकट करणारे आणि तोल साधण्याच्या इतर व्यायाम प्रकारांचाही विचार केला पाहिजे.

"मात्र त्याचा अतिरेक करण्याची आवश्यक नाही. सतत चालणारी किंवा नियमितपणे होणारी कोणतीही क्रिया उपयुक्त असते," असं ते म्हणतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, समुदायात मिसळणं आणि एकटेपणा टाळणं या गोष्टींचा देखील डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होण्याशी संबंध जोडला गेला आहे.

समुदायात मिसळणं आणि एकटेपणा टाळणं या गोष्टींचा देखील डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होण्याशी संबंध जोडला गेला आहे. अर्थात त्याचा नेमका किती परिणाम होतो यावर वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही.

2020 च्या लॅन्सेट कमिशननं अंदाज लावला आहे की समाजात न मिसळणं किंवा एकटेपणा दूर केल्यास जगातील स्मृतिभ्रंशाचा आजार (डिमेन्शिया) 4 टक्क्यांनी कमी होईल.

सिडनी विद्यापीठातील आणखी एका अभ्यासात, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि युरोप, दक्षिण अमेरिका, आशिया, आफ्रिकेतील अनेक देशांमधील 13 आंतरराष्ट्रीय संशोधनांमधून समोर आलेल्या निष्कर्षांचं विश्लेषण करण्यात आलं.

त्यात कोणत्या प्रकारे समाजात मिसळण्याचा, संवाद करण्याचा सर्वात जास्त परिणाम झाला याचा अभ्यास करण्यात आला.

डॉ. सुरज समतानी सिडनी विद्यापीठात अभ्यास करणाऱ्या टीमचे एक सदस्य आहेत.

ते म्हणाले, "आम्हाला आढळलं की वारंवार म्हणजे दर महिन्याला किंवा आठवड्याला कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर बोलण्यानं, मिसळण्यानं तसंच बोलण्यासाठी कोणीतरी असल्यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होतो."

"आम्हाला असंही आढळलं की इतरांसोबत राहिल्यानं आणि समुदायांसाठी काम केल्यानं मृत्यूचा धोका कमी होतो."

असं मानलं जातं की समाजात मिसळल्यामुळे अल्झायमर आजाराच्या परिणामांविरोधात मेंदूमध्ये कणखरपणा निर्माण होतो. त्याला कॉग्निटिव्ह रिझर्व्ह किंवा आकलनाची राखीव क्षमता म्हणतात.

अल्झायमर्स सोसायटी युकेनुसार, त्यामुळे व्यायाम करण्यासारख्या आरोग्यदायी गोष्टींना प्रोत्साहन देण्यास, तणाव कमी करण्यास आणि इन्फ्लेमेशन कमी करण्यास मदत होऊ शकते.

डॉ. टोपोल म्हणतात की एलआर या त्याचं उत्तम उदाहरण आहे.

ते म्हणतात, "त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय उत्साही, आनंदी आणि आशावादी आहे. त्यामुळे त्या समाजात भरपूर मिसळतात. त्यांना बरेच छंददेखील आहेत. त्या तैलचित्र काढतात आणि त्यांनी पुरस्कार जिंकले आहेत."

"आपण देखील याच गोष्टीची आकांक्षा केली पाहिजे, ते म्हणजे निरोगी वृद्धत्व."

'गेम चेंजर'

डॉ. टोपोल यांना अपेक्षा आहे की भविष्यात वयोमानानं होणारे आजार रोखण्यासाठी आणि खूप मोठ्या प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत होईल.

त्यांना असंही वाटतं की एखाद्या व्यक्तीला कोणत्या वयात आजार होण्याची शक्यता आहे हे देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सांगता येईल. त्यामुळे जीवनशैलीत बदल करून आधीच तो आजार होण्यापासून टाळता येईल.

"आपण कधीही आजार होऊ न देण्याबद्दल बोलत आहोत. तुम्हाला एकदा ह्रदयविकाराचा झटका आला की पुढचा हृदयविकाराचा झटका टाळता येईल," असं ते म्हणतात.

डॉ. टोपोल आजारासंदर्भातील धोक्याच्या या प्रकारच्या विश्लेषणाला 'गेम चेंजर' म्हणजे 'कलाटणी देणारं' म्हणत असताना, प्राध्यापक जेम्स याबाबत सावध आहेत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निरोगी जीवनशैली जगण्यासाठी व्यायाम करा, जॉगिंग करा.

त्यांना वाटतं की जरी लोकांना याप्रकारची माहिती देता आली तरी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल करण्यास सांगणं कितपत वास्तववादी आहे.

"तुम्ही असं म्हणू शकता, पाहा, सर्वजण व्यवस्थित आहार का घेत नाहीत? तुम्हाला माहीत आहे, योग्य आहार घ्या, सकस अन्न खा, जिममध्ये जाऊन व्यायाम करा, जॉगिंग करा आणि बाकी सर्वकाही करा. मात्र बहुतांश लोकांकडे ते करण्यासाठी वेळ नाही," असं ते म्हणतात.

"मला वाटत नाही की या समस्या सोडवण्यासाठी आपल्या हाती लवकरच कोणत्याही प्रकारची जादूची कांडी येणार आहे," असं ते म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)