महिलेच्या बॅगेत सापडली दोन वर्षांची मुलगी; कसं उघड झालं प्रकरण?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

न्यूझीलंडमध्ये एका महिलेच्या बॅगेमध्ये दोन वर्षांची मुलगी आढळल्याने तिला अटक करण्यात आली आहे. ही महिला या लहानग्या मुलीला बॅगेत ठेवून बसमधून प्रवास करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "रविवारी (3 ऑगस्ट) उत्तर न्यूझीलंडमधील कायवाका या लहानश्या शहरातील एका बस स्टॉपवर हे प्रकरण उघडकीस आलं.

एका प्रवाशाने सामान काढण्यासाठी विनंती केली, तेव्हा ड्रायव्हरला एक बॅग हालताना दिसून आली. ड्रायव्हरने ही बॅग उघडली तर त्यामध्ये दोन वर्षांची मुलगी सापडली."

27 वर्षांच्या या महिलेला लहानग्या मुलीसोबत बेजबाबदार आणि चुकीच्या पद्धतीने वर्तणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ही मुलगी जवळपास एक तास बॅगेत बंद होती. पोलिसांनी सांगितलं की, आता ही मुलगी सुरक्षित असून तिची देखभाल करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जात आहेत.

'मुलीचं शरीर गरम झालं होतं'

पोलिसांनी सांगितलं की, "या मुलीचं शरीर फारच गरम झालेलं होतं. मात्र, तिला कसल्याही प्रकारची शारीरिक इजा झाली नव्हती."

आता या मुलीला हॉस्पिटलला नेण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार होत आहे. मात्र, ती महिला आणि ही लहानगी मुलगी या दोघींमधलं नेमकं नातं अद्याप समोर आलेलं नाही.

महिलेला सोमवारी (4 ऑगस्ट) नॉर्थ शोर डिस्ट्रीक्ट न्यायालयात हजर करण्यात आलं, असंही पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी बस ड्रायव्हरचं कौतुक करत म्हटलं की, "ड्रायव्हरच्या सतर्कतेचं आम्हाला कौतुक आहे. त्याने त्वरीत पाऊल उचललं आणि मोठा घातपात टळला."

न्यायालयात काय घडलं?

रेडिओ न्यूझीलंडने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, 27 वर्षांच्या या महिलेला नॉर्थ शोर डिस्ट्रीक्ट न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

चार्जशीटमध्ये पोलिसांनी म्हटलं की, या मुलीचा श्वास गुदमरणं, डिहायड्रेशन, गरम होणं आणि मानसिक आघात यांसारख्या समस्या झेलाव्या लागल्या असतील. त्यांनी याला "काळजी घेण्याच्या पद्धतीमधील मोठी चूक" असं म्हटलंय.

न्यायालयामध्ये या प्रकरणातील कारवाईबाबत माहिती देताना रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, "महिलेने न्यायालयामध्ये कोणतंही उत्तर दिलेलं नाही. न्यायालयामध्ये ती हलक्या रंगाची हुडी घालून शांत बसलेली दिसली आणि तिने कॅमेऱ्याकडे पाठ फिरवली. सध्या तिची ओळख उघड करण्यात आलेली नाही."

या आठवड्यात न्यायालयामध्ये पुढील सुनावणीच्या आधी फॉरेन्सिक सायकोलॉजीची टीम या महिलेची चौकशी करेल.

पोलीस अधिकारी सायमन हॅरिसन यांनी सांगितलं की, पोलीस या लहानग्या मुलीचे कुटुंबीय आणि न्यूझीलंडच्या बालकल्याण मंत्रालयाच्या साथीनं काम करत आहेत. जेणेकरुन, मुलीला संपूर्ण सहकार्य आणि योग्य ती काळजी मिळू शकेल.

याआधीही समोर आली अशी प्रकरणं

2016 मध्ये एका महिलेने इस्तानबूलहून पॅरिसला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या एका फ्लाईटमध्ये हँडबॅगमध्ये लहान मुलीला लपवून प्रवास केला होता.

एअरलाईनने तेव्हा सांगितलं होतं की, मुलगी विनातिकीट प्रवास करत होती आणि रात्रीच्या फ्लाईटवेळी ती पकडली गेली.

एएफपीच्या एका एअरपोर्टवरील सूत्राने सांगितलं होतं की, ही महिला फ्रान्सची रहिवाशी आहे. ती हैतीमधून या मुलीला दत्तक घेण्याची प्रक्रिया करत होती.

इस्तंबूलमध्ये ट्राझिंट झोनमध्ये तिला त्या मुलीसोबत बोर्डिंगची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर तिने नवं तिकीट खरेदी केलं आणि त्या मुलीला बॅगेत लपवून ती फ्लाईटमध्ये चढली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लाईटमध्ये महिलेने या मुलीला आपल्या पायाजवळ पांघरुणात गुंडाळून ठेवलं होतं. मात्र, जेव्हा त्या मुलीला टॉयलेटला घेऊन जावं लागलं तेव्हा प्रवाशांनी तिला पाहिलं.

प्रवाशांनी फ्लाईट अटेंडेट्सना याची माहिती दिली. त्यानंतर, या मुलीला बॅगेतून बाहेर काढण्यात आलं.

2019 मध्ये अमेरिकेतील एका महिलेला फिलीपाईन्समध्ये मानवी तस्करीच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली होती. कारण, तिने कथितरित्या एका नवजात बाळाला देशातून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता.

43 वर्षांची जेनिफर टॅल्बॉटला मनीलामधील निनॉय एक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती सहा दिवसांच्या एका मुलाला आपल्या कॅरी-ऑन बॅगमध्ये लपवून अमेरिकेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती.

तेव्हा फिलापाईन्सच्या नॅशनल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एनबीआय) म्हटलं होतं की, टॅल्बॉटने इमिग्रेशन अधिकाऱ्यांना या मुलाविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नव्हती. तसेच, या मुलाला लपवून देशाबाहेर घेऊन जाण्याचा तिचा मनसुबा होता.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर टॅल्बॉट ही महिला या मुलाचा बोर्डिंग पास अथवा इतर कोणतंही कागदपत्र साद करु शकली नाही. या मुलाच्या आई-वडिलांच्याविरोधातही चाईल्ड प्रोटेक्शन लॉ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)