टू फिंगर टेस्ट : जेव्हा शेकडो आशियाई महिलांची हिथ्रो विमानतळावर कौमार्य चाचणी केली होती...

कौमार्य चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार, संशोधक
  • Published

आजपासून 44 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेमकी तारीख सांगयची तर 24 जानेवारी 1979 रोजी. 35 वर्षीय एक भारतीय शिक्षिका लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरली. तिचं लंडनस्थित भारतीय वंशाच्या तरुणाशी लग्न जुळलं होतं आणि लग्नकार्यासाठीच लंडनमध्ये ती गेली होती. मात्र, विमानतळावर तिनं एका भयंकर प्रकाराचा अनुभव घेतला.

हिथ्रो विमानतळातून बाहेर पडताना ती प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्यात होती आणि तिला रक्तस्राव होत होता. तिचा होणारा जोडीदार विमानतळावर तिला नेण्यासाठी आला होता.

त्यानं जे काही पाहिलं, त्यानंतर हे सगळं ‘टू फिंगर टेस्ट’मुळे झाल्याचं त्याला कळायला काही अवधी गेला, इतकं ते धक्कादायक होतं.

या महिलेनं झाला प्रकार ‘द गार्डियन’ या इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्राला सांगितला. त्यानंतर या प्रकरणावर बरीच चर्चा झाली, आंदोलनं झालं, वाद-विवाद झाले. सर्वसामान्य माणसांपासून माध्यमांपर्यंत ते अगदी ब्रिटिश संसदेपर्यंत. त्यानंतर असं समोर आलं की, त्यापूर्वीच्या 10-12 वर्षात या प्रकाराला अनेक महिलांना सामोरं जावं लागलं होतं.

लग्नाचं कारण देऊन इंग्लंडमध्ये येणाऱ्या या महिला खरंच ‘विवाहित’ आहेत की ‘अविवाहित’ यासाठी विमानतळावर ‘टू फिंगर टेस्ट’ केलं जायचं.

इंग्लंडमधील इमिग्रेशन अॅक्ट 1971 नुसार जे लोक केवळ लग्न करण्यासाठी देशात यायचं आहे, त्यांना स्वतंत्रपणे व्हिसाची आवश्यकता नव्हती. मात्र, पतीला भेटण्यासाठी म्हणून इंग्लंडमध्ये यायचं असेल, तर व्हिसासाठी दिवसेंदिवस वाट पाहत राहावं लागायचं. त्यामुळे व्हिसाची प्रतिक्षा टाळण्यासाठी महिला अविवाहित असल्याचं भासवत इंग्लंडमध्ये प्रवेश करतात, असं ब्रिटिश सरकारला संशय आला आणि त्यांनी पुढे वादग्रस्त ठरलेल्या ‘टू फिंगर टेस्ट’ची सुरुवात केली.

पत्रकार अॅलन ट्रॅव्हिस यांनी ‘द गार्डियन’ वृत्तपत्रात 2011 साली एक लेख लिहिला. त्यात त्यांनी लिहिलं की, ‘कौमार्य चाचणीचा प्रकार इंग्लंडमधील काळ्या युगाचे प्रतिबिंब आहे.’

गृहखात्याच्या तत्कालीन कागदपत्रांनुसार, ‘इमिग्रेशन, सिक्युरिटी आणि इन्फोर्समेंट या विभागांची जबाबदारी असलेले लोक या कृत्यांसाठी जबाबदार होते. भारतीय शिक्षिकेची घटना घडली तेव्हा हिथ्रो विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्याला शंका आली की, ती लग्नासाठी आलीय की पतीला भेटण्यासाठी. त्यामुळे त्याने कौमार्य चाचणीचे आदेश दिले.’

भारतात परत पाठवण्याची भीती

एखादी महिला विवाहित असेल, असा इमिग्रेशन विभागाच्या चौकशीचा निष्कर्ष निघाला, तर त्यांना इंग्लंडमध्ये प्रवेशासाठी व्हिसा बंधनकारक केला जायचा.

सोफी व्हाईटहेड यांनी त्यांच्या संशोधनपर लेखात म्हटलंय की, ‘महिलांना असं सांगितलं जायचं की, तुमची कौमार्य चाचणी पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञांकडूनच होईल. जर तुम्हाला स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून महिला डॉक्टर हवी असल्यास प्रतीक्षा करावी लागेल.’

1979 साली या घटनेवेळी तर सदर महिलेकडे कुठलाच पर्याय उपलब्ध राहिला नव्हता. तिनं पुढे ‘द गार्डियन’सोबत बोलताना म्हटलं की, जर त्यांच्या आदेशानुसार केलं नाही, तर आपल्याला भारतात परत पाठवलं जाईल, अशी भीती वाटली.

कौमार्य चाचणी

फोटो स्रोत, TWITTER/@IRRNEWS

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मात्र, ‘द गार्डियन’ने सदर घटना बातमी म्हणून प्रसिद्ध केल्यानंतर सर्व भारतीय वृत्तपत्रांनीही वृत्तांकन केलं आणि या घटनेला ‘निंदनीय घटना’ आणि ‘बलात्कार’ असं म्हटलं.

इंग्लंडच्या गृहखात्यानं ही घटना घडल्याला दुजोरा दिला, मात्र अशाप्रकारची ही एकमेव घटना घडल्याचंही गृहखात्यानं म्हटलं.

मात्र, गृहखात्याचा हा दावा लगेचच खोटा ठरला, कारण माजी इमिग्रेशन अधिकारी अॅलेक्स लियॉन यांनी म्हटलं की, गृहखात्यात काम करत असताना मला कळलं की, ढाक्यातही अशा प्रकारच्या कौमार्य चाचण्यात घेतल्या जात होत्या.

असा प्रकार होत असल्याचं कळल्यानंतर लियॉन यांनी इंग्लंडमध्येही ते थांबवण्याचे आदेश दिले.

गृहखात्याच्या म्हणण्यानुसार, ‘लियॉन यांनी इस्लामाबाद (ढाका नव्हे) मधील घटनेनंतर आदेश दिले. तिथे कौमार्य चाचणी केल्यानंतर सदर महिला विवाहित असल्याचे संकेत मिळाले हे. त्या महिलेनं अविवाहित असल्याचा दावा केला होता.’

मात्र, फिजिशियन फॉर ह्युमन राईट्सला त्यांच्या अभ्यासात असं आढळून आलं की, एखाद्या महिलेनं पूर्वायुष्यात लैंगिक संबंध ठेवले आहेत की नाही, याबाबतची विश्वसनीय आणि अचूक माहिती देणारी कोणतीच चाचणी नाही.

‘टू फिंगर टेस्ट’चा प्रकार घडल्याचं गृहखात्यानं स्वीकारलं

संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार, लिंगनिहाय अशा तपासण्या होतात.

नंतर जेव्हा गृहखात्याला कळलं की, ज्या भारतीय महिलेची कौमार्य चाचणी झालीय, तिचा जोडीदार न्यायालयाचे दार ठोठवण्याच्या प्रयत्नात आहे, तेव्हा गृहखात्यानं महिलेला 500 पाऊंड देऊन प्रकरणावर तडजोड करण्याचा प्रयत्न केला.

याच काळात इव्हान स्मिथ आणि मरिनेल्ला मर्मा या दोन ऑस्ट्रेलियन संशोधकांनी तडजोडीसाठी गृहखात्यानं पैसे देऊ केल्याचे पुरावे समोर आणले. इव्हन आणि मरिनेल्ला ब्रिटिशन स्थलांतरांमधील भेदभावासंदर्भात संशोधन करत होते.

सुरुवातीला सर्व प्रकरणं फेटाळत असणाऱ्या गृहखात्यानं अखेर 1995 मध्ये ‘टू फिंगर टेस्ट’ची तीन प्रकरणं स्वीकारली.

कौमार्य

फोटो स्रोत, COURTESY GUARDIAN

इव्हन स्मिथ यांनी पत्रकार पेल्बी मुन्सी यांना सांगितलं की, फॉरेन अँड कॉमनवेल्थ ऑफिसच्या 1980 च्या कागदपत्रांमधून असं कळतं की, 1979 च्या दरम्यान इमिग्रेशन विभागानं संशयाच्या नावाखाली 120 ते 140 आशियाई महिलांची अशाप्रकारे शारीरिक तपासणी केली. त्यापैकी दिल्लीत 73, मुंबईत 10, ढाक्यात 40 ते 60 महिलांची तपासणी करण्यात आली. इस्लामाबद आणि कराचीतली निश्चित संख्या कळू शकली नाही.

ब्रिटिश पत्रकार हुमा कुरेशी यांनी 2011 साली ‘द गार्डियन’मध्ये लिहिलं होतं की, “माझी आई पाकिस्तानातून इंग्लंडमध्ये आली, तो दिवस तिला सारखा आठवतो. डॉक्टर असलेले माझे वडील इंग्लंडमध्ये होते. मात्र, इमिग्रेशनच्या नियमांमुळे माझ्या आईला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला.

“हिथ्रो विमानतळावर इमिग्रेशनच्या रांगेत उभी असताना, ब्रिटिश इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तिचं कौमार्य तपासण्यात आलं. तपासणी करणारा डॉक्टर पुरुष होता की स्त्री, हे तिला आठवत नाही. मात्र, त्या घटनेनं तिला धक्का बसला आणि ती घटना आठवल्यावर अजूनही ती अस्वस्थ होते. हा सगळा प्रकार वैयक्तिक हक्कांचं उल्लंघन असल्याचं ती आजही म्हणते.”

त्रासदायक अनुभव

अनेक पाकिस्तानी महिलांना अशा अनुभातून जावं लागल्याचं हुमा म्हणतात. तर हुमा यांच्या आई म्हणतात की, एकट्यानं प्रवास करणाऱ्या महिलांचीच अशाप्रकारे तपासणी केली जात असे.

ज्यांची ज्यांची अशाप्रकारे तपासणी केली गेली, त्यांच्या नावांची नोंद अधिकृत कागदपत्रांमध्ये नाही.

“स्त्रियांच्या शरीराकडे हेतूपुरस्सर पाहिलं जातं, असाच यातून अर्थ निघतो आणि हे त्रासदायक आहे,” असं मर्मा म्हणतात.

हुमा कुरेशी यांनी लिहिलंय की, “माझ्या आई-वडिलांनी विवाह प्रमाणपत्र ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर सादर करून लग्न झाल्याचं सिद्ध केलं होतं. माझ्या आईकडे व्हिसाही होता. त्यामुळे तिला इंग्लंडमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाली. तरीही तिला अशी अपमानास्पद वागणूक देणारी तपासणी का करावी लागली?”

मर्मा म्हणतात की, “व्हिसा असलेल्या विवाहित महिलेचीही तपासणी केल्याचं कळल्यानंतर मला तर धक्काच बसला.”

मग या अनुभवातून गेलेल्यांना आता प्रशासनाकडून दिलगिरीची अपेक्षा आहे का?

हुमा म्हणतात की, “आईला याबाबत विचारलं, तर ती म्हणाली की, तेव्हाची घटना आठवूनही आता संताप येतो, अस्वस्थ वाटतं. कारण इथे मी माझ्या पतीकडे कायदेशीररित्या आली होती. आमचा असा अपमान व्हायला नको होता.”

ब्रिटिश सरकारनं माफी मागितली का?

मार्च 1977 मध्ये पत्रकार अम्रित विल्सन यांना त्यांच्या एका मित्राकडून माहिती मिळली की, 16 वर्षीय पाकिस्तानी मुलीला हिथ्रो विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं आहे.

“पाकिस्तानी मुलगी वधूचे कपडे परिधान करूनच हिथ्रो विमानतळावर आली होती आणि लंडनमध्ये येऊन जोडीदाराशी लग्न करण्याचा तिचा मानस होता. मात्र, तिला हार्मंड्सवर्थ डिटेन्शन सेंटरमध्ये एका आठवड्यासाठी ठेवण्यात आलं. तिथं एका पत्रकारानं सांगितल्यानुसार, ती सांगत असलेल्या जोडीदारापेक्षा खूप लहान आहे आणि त्यामुळे तिला तिचं वय सिद्ध करण्यासाठी कशाप्रकारे शारीरिक तपासणी करावी लागली,” असं विल्सन म्हणतात.

‘फायडिंग अ व्हॉईस : एशियन वुमन इन बिटन’ या आपल्या पुस्तकात अम्रित विल्सन यांनी म्हटलंय की, त्या मुलीला 16 वर्षापेक्षा कमी वय असल्याचं सांगत पाकिस्तानात परत पाठवलं गेलं.

कौमार्य चाचणी

फोटो स्रोत, TWITTER/@SUFF66

मुंबईतील 18 वर्षीय गर्भवती मुलगी लग्नानंतर इंग्लंडला आली होती. हिथ्रो विमानतळावर या जोडप्याला वेगळं करण्यात आलं आणि महिलेला हर्मंडस्वर्थ डिंटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आलं. विल्सन म्हणतात की, “तिथल्या डॉक्टर आणि नर्सने तिची तपासणी केली असता तिला प्रसूती झाली. रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिच्या बाळाचा मात्र मृत्यू झाला.”

ब्रिटीश सरकारने फेब्रुवारी 1979 मध्ये कौमार्य चाचणीवर बंदी घातली. पण त्याबद्दल माफी मागितलेली नाही.

कॅसॅन्ड्रा विनोग्राड यांनी लिहिलंय की, “2008 ते 2011 दरम्यान मारिनेल्ला मर्मा आणि इव्हान स्मिथ यांनी शोधलेल्या दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की, ब्रिटीश सरकारने 1970 च्या दशकात लग्नासाठीच्या व्हिसावर देशात प्रवेश करण्याच्या आशेवर असलेल्या महिलांची कौमार्य तपासणी कथितपणे केल्याचे सत्य झाकण्याचा प्रयत्न केला.”

सरकारने कबूल केलं की, कागदपत्रे खरी आहेत, परंतु ब्रिटीश बॉर्डर एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले : “ही कारवाई 30 वर्षांपूर्वी झाली आणि स्पष्टपणे अनुचित होती.”

सरकारी धोरणानुसार ब्रिटनची धोरणे आता पर्यटकांच्या हक्कांचे संरक्षण करतात, असं या अधिकाऱ्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं.

विनोग्राडने मर्माला दिलेल्या फाईल्स (पत्रे आणि टिप्पण्या, काही टाइप केलेल्या, काही हस्तलिखित, काहीवेळा मार्जिनमध्ये लिहिलेल्या) इमिग्रेशन मर्यादित करण्यासाठी एक व्यापक अजेंडा दाखवतो. मर्मानं एका चिठ्ठीकडे लक्ष वेधत, त्यामध्ये लिहिलंय की, “आपण भेदभाव करत नाही, असं कधी ढोंग करू नये.”

ब्रिटिश सरकारने माफी मागावी, असे संशोधकांचे मत होते.

मर्मा म्हणतात, “आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण पुढच्या काळासाठी एक चांगलं उदाहरण तरी घालून देऊ शकतो. पीडितांना सामोरं जाऊन सत्य समोर आणायला हवं.”

म्हणून त्यांनी इंग्लंड सरकारकडे माफीची अपेक्षा व्यक्त करत म्हटलं की, “हे जे काही घडलं आहे, त्याबद्दल आम्हाला माफ करा, एवढं तरी म्हणा.”

हेही नक्की वाचा

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)