अर्शदीप सिंग - 22 मॅचेस, 14 नोबॉल

Published

पुणे इथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत एकाच ओव्हरमध्ये नोबॉलची हॅट्ट्रिक आणि सामन्यात एकूण 5 नोबॉल टाकल्यामुळे युवा गोलंदाज अर्शदीप सिंगवर सोशल मीडियावर जोरदार टीका होते आहे. सामना संपल्यानंतर बोलताना कर्णधार हार्दिक पंड्यानेही नोबॉलसंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली होती.

"अर्शदीपसाठी परिस्थिती कठीण होती. पराभवाचं खापर फक्त त्याच्या एकट्यावर फोडणं योग्य ठरणार नाही. पण कोणत्याही प्रकारात नोबॉल टाकणं गुन्ह्यासमान आहे", असं हार्दिकने म्हटलं होतं. दुसऱ्या लढतीत पराभवामुळे मालिकेत 1-1 बरोबरी झाली. राजकोटला आज तिसरी लढत होत आहे. या लढतीत अंतिम अकरात अर्शदीप असणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

अर्शदीपने आतापर्यंत 22 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या 22 लढतीत अर्शदीपच्या नावावर 14 नोबॉल आहेत. ही आकडेवारी अर्शदीपच्या करिअरला सातत्याने बट्टा लावते आहे. एकीकडे अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळूनही एकही नोबॉल न टाकण्याची शिस्तबद्ध कामगिरी काही खास गोलंदाजांच्या नावावर आहे. दुसरीकडे इतक्या छोट्या कारकीर्दीत अर्शदीपच्या नावावर मात्र खूप साऱ्या नोबॉल्सची नोंद आहे.

ट्वेन्टी20 प्रकारात एकाच ओव्हरमध्ये नोबॉलची हॅट्ट्रिक नावावर होणारा अर्शदीप पहिलाच गोलंदाज ठरला होता. अर्शदीपने त्या लढतीत आणखीही 2 नोबॉल टाकले. एकूण 5 नोबॉल टाकल्यामुळे सोशल मीडियावर अर्शदीपला जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अर्शदीपच्या 2 ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांनी 37 धावा कुटल्या. जोरदार आक्रमणामुळे अर्शदीप 4 ओव्हर्सचा कोटा पूर्ण करु शकला नाही.

पहिल्या लढतीत फिट नसल्यामुळे अर्शदीप निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं कर्णधार हार्दिक पंड्याने स्पष्ट केलं होतं. दुसऱ्या लढतीपूर्वी फिट झाल्याने अर्शदीपला अंतिम अकरात समाविष्ट करण्यात आलं. मात्र नोबॉलच्या नकोशा विक्रमामुळे अर्शदीपचं पुनरागमन चर्चेत राहिलं.

सोपा झेल सोडल्याने झाला होता ट्रोल

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीदरम्यान सोपा झेल सोडल्याने अर्शदीपला सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आलं होतं. आक्षेपार्ह भाषेत त्याच्यावर टीका करण्यात आली होती.

या टीकेमुळे इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विकिपिडियाप्रति नाराजी व्यक्त केली होती. भारतात कोणत्याही इंटरमीडियरी प्लॅटफॉर्मवर चुकीचं माहिती देणं, पसरवणं हे खपवून घेतलं जाणार नाही असं त्यांनी अर्शदीप संदर्भातील ट्वीट शेअर करताना म्हटलं होतं. कोणालाही असुरक्षित वाटता कामा नये. सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेट अशी सरकारची अपेक्षा आहे. राजीव यांनी स्क्रीनशॉट शेअर करताना अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पानावर झालेल्या बदलांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे अकाऊंट पाकिस्तानातून ऑपरेट करण्यात आलं होतं.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अर्शदीपच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह बदलानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्र्यांनी विकिपीडियाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावला आहे. पण यासंदर्भात मंत्रालयाकडून कोणतंही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलेलं नाही.

28 ऑगस्ट रोजी झालेल्या लढतीत पाकिस्तानने 5 विकेट्सनी विजय मिळवला. 17व्या षटकात अर्शदीपच्या हातून एक झेल सुटला.

मॅचमध्ये काय घडलं?

आशिया चषक टी-20 स्पर्धेत सुपर 4 गटातील सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला होता. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ते पाकिस्तानने 19.5 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात गाठून विजय प्राप्त केला होता. भारतीय संघाने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर 181 धावांची मजल मारली. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी 54 धावांची खणखणीत सलामी दिली. पण मोठा फटका खेळण्याचा रोहितचा प्रयत्न खुशदील शाहच्या हातात जाऊन विसावला. त्याने 28 धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर राहुलने आक्रमक पवित्रा स्वीकारला. पण शदाब खानने त्याची खेळी संपुष्टात आणली. त्यानेही 28 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीत शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमारला या लढतीत 13 धावाच करता आल्या. दिनेश कार्तिक नसल्याने ऋषभ पंतवर जबाबदारी वाढली होती पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.

भरवशाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला मोहम्मद हसनैनने शून्यावर बाद केलं. सहकारी एका बाजूने बाद होत असताना कोहलीने दिमाखदार खेळी साकारली. कोहलीने 44 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी केली. दीपक हुड्डाने 16 धावा करत त्याला चांगली साथ दिली. 10 षटकात शंभरी गाठणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तानने शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर ब्रेक लावला. पण शेवटच्या षटकांमध्ये पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी सोपे झेल टाकले. पाकिस्तानतर्फे शदाब खानने 2 तर नसीम खान, मोहम्मद हसनैन, हॅरिस रौफ आणि मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 182 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यालढतीतही मोठी खेळी करू शकला नाही. पण मोहम्मद रिझवान एक बाजू सांभाळून खेळत होता. चौथ्या क्रमांकावर आलेल्या नवाजची त्याला चांगली साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी करत पाकिस्तानचा विजय दृष्टिपथात आणला. पण मोक्याच्या क्षणी दोघेही माघारी परतल्याने सामन्यात रंगत आली होती. दरम्यान, नवोदित खेळाडू अर्शदीप सिंहने पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीचा सोडलेला झेल भारताला महागडा ठरला. अखेरीस आसिफ अलीने खुशदिल शाहच्या सोबतीने पाकिस्तानचा विजय साकार केला.

अर्शदीपने कधी सोडला झेल?

18वी ओव्हर सुरू झाली तेव्हा पाकिस्तानला 18 चेंडूत 34 धावांची आवश्यकता होती. रवी बिश्नोईचा पहिला चेंडू वाईड देण्यात आला. दुसऱ्या चेंडूवर एकही धाव निघू शकली नाही. तिसऱ्या चेंडूवर खुशदिलने एक धाव काढली. चौथ्या चेंडूवर असिफ अलीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अंपायर्सनी वाईड दिला. भारतीय संघाने झेलसाठी अपील केलं. पण थर्ड अंपायरने त्याला नाबाद ठेवलं.

त्याच्या पुढच्या चेंडूवर असिफ अलीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत उंच उडाला. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करत असलेला अर्शदीप हा चेंडू सहज पकडेल अशी स्थिती होती. पण अर्शदीपने झेल सोडला. अर्शदीपने झेल सोडला आणि मैदानातील पाकिस्तानातील चाहत्यांनी जल्लोष केला. कर्णधार रोहित शर्मा या घटनेनंतर नाराज झाला. असिफ अलीने या जीवदानाचा फायदा उठवत 8 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकारासह 16 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

पंजाब किंग्जचा आधारस्तंभ

युवा अर्शदीपला आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाने लहान वयातच ताफ्यात समाविष्ट केलं. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला रिटेनही केलं. मोठमोठ्या खेळाडूंना संघाबाहेर करणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने अर्शदीपला 4 कोटी रुपये मानधनासह संघात राखलं.

4 हंगामात पंजाब किंग्जकडून खेळलेल्या अर्शदीपने 37 सामन्यात 40 विकेट्स पटकावल्या आहेत. डावाच्या सुरुवातीला आणि हाणामारीच्या ओव्हर्समध्ये अर्शदीप कर्णधारासाठी हुकूमी एक्का ठरतो.

डावखुरा वेगवान गोलंदाज संघात असणं कर्णधार आणि संघासाठी दुर्मीळ असतं. भारतीय संघानेही नेमकं हेच हेरलं. उत्तम वेग, मोठ्या फलंदाजांना बाद करण्याची हातोटी, दडपण हाताळण्याची क्षमता यामुळे अर्शदीपने भारतीय संघातही अल्पावधीत स्थान पक्कं केलं. एकीकडे कामगिरी चांगली होत असताना नोबॉलमुळे त्याच्या वाटचालीत खीळ बसते आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)