You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुन्हा एकदा कंझावाला प्रकार, महिलेला धडक देऊन ट्रकने मृतदेहाला नेले फरपटत #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट यांच्यावर प्रकाशित झालेल्या बातम्याचा थोडक्यात आढावा.
1. महिलेला धडक देऊन ट्रकने मृतदेहाला नेले फरपटत
दिल्लीमधील कंझावला येथे एका तरुणीला कारने फरपटत नेल्याची घटना घडली असताना अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यामध्ये स्कूटी चालवणाऱ्या एका महिलेला ट्रकने धडक दिली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहाला ट्रकने 3 किलोमीटर फरपटत नेले.
या घटनेत ट्रकला आग लागली आणि त्यात स्कूटीही जळून खाक झाली. संबंधित महिला आपल्या स्कुटीसह ट्रकमध्ये अडकल्याने ट्रकला आग लागली. या दुर्दैवी घटनेत पीडितेची स्कूटीही जळून खाक झाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
पोलिसांनी पीडितेचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
ही महिला एका विद्यापीठात लिपिक होती. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
2. अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं विमान गुवाहाटीमध्ये अचानक उतरवण्यात आलं. बुधवारी रात्री गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपिनाथ बोर्डोलोई विमानतळावर त्यांचं विमान उतरलं.
अमित शाह आगरतळाला जात असताना खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला. अमित शाह त्रिपुरामध्ये रथयात्रेची आरंभ करण्याच्या कार्यक्रमासाठी तसेच प्रचारमोहीम सुरू करण्यासाठी जात आहे.
गुवाहाटीला विमान उतरल्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे.
3. धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना फ्रॅक्चर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यात अपघात झाला. त्यानंतर त्यांना मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली आहे. त्यांनी सांगितलं की "धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना थोडंसं फ्रँक्चर झालंय. तरीदेखील आपण 24 तास लक्ष देऊ. त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं आहे” ही बातमी सकाळने दिली आहे.
4. मुंबईत योगी आदित्यनाथ यांचा रोड शो
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री काल 4 जानेवारी रोजी मुंबईत आले आहेत. उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी, उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी त्यांनी हा दौरा केला आहे.
उत्तर प्रदेशात ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट होणार आहे. त्यासाठी योगी आदित्यनाथ आणि त्यांचे मंत्री गुंतवणुकदारांना आमंत्रित करत आहेत.
त्यासाठी ते विविध नेते, उद्योजकांची भेट घेत आहेत. आज 5 रोजी ते मुंबईत रोड शोही करणार आहेत.
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइझ लि.चे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांची योगी आदित्यनाथ भेट घेतील.
टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन, पार्ले अॅग्रोचे चेअरमन प्रकाश चौहान आणि एमडी शवना चौहान, अदानी पोर्ट्स लि.चे करण अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ मुकेश अंबानी आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांच्याशीही ते चर्चा करतील.
ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
5. देवेन भारती यांच्यासाठी विशेष आयुक्त पदाची निर्मिती
देवेन भारती यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या विशेष आयुक्तपदाची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
देवेन भारती हे याआधी मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलिस सहआयुक्त, आर्थिक आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र एटीएसचेही नेतृत्व केले आहे. देवेन भारती यांच्याकडे गुन्हे आणि आर्थिक गुन्हे शाखा यांची जबाबदारी असणार आहे.
ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)