डोकेदुखीवर मात करायची आहे? तर अंमलात आणा 'हे' सोपे घरगुती उपाय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, यास्मिन रुफो
- Role, बीबीसी न्यूज
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
जवळपास सर्वांनाच कधी ना कधी डोकेदुखीचा सामना करावा लागतो.
ही डोकेदुखी काही मिनिटांपासून ते काही दिवसांपर्यंत राहू शकते. ही वेदना कधी तीव्र, कधी हलकी तर कधी टोचणारी असू शकते. कधी कधी ही वेदना डोक्यातून पुढे जाऊन टाळू, चेहरा किंवा मानेपर्यंतही पसरू शकते.
बीबीसीच्या व्हॉट्सअप डॉक्स वेलनेस पॉडकास्टचे होस्ट डॉ. झँड व्हॅन टुल्केन यांना याचा चांगला अनुभव आहे.
ते म्हणतात की, त्यांना दर महिन्याला किंवा सहा आठवड्यांनी एकदा डोकेदुखीचा त्रास होतो आणि ते सांगतात, "असं वाटतं जणू कोणीतरी माझ्या डोक्यात कवायतच करत आहे."
तीव्र डोकेदुखीमागे काही तरी गंभीर कारण असू शकतं असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु, नॅशनल मायग्रेन सेंटरच्या तज्ज्ञ डॉ. केटी मुनरो या हे क्वचितच एखाद्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं, असं सांगतात.
त्या म्हणतात की, "काहीतरी गंभीर घडू शकतं अशी काळजी वाटणं स्वाभाविक आहे. परंतु, प्रत्यक्षात त्याची शक्यता खूपच कमी आहे."
जर ही तुमची "आतापर्यंतची पहिली किंवा सर्वात त्रासदायक डोकेदुखी" असेल, तर नक्की डॉक्टरांकडे जा, असा सल्लाही त्या देतात.
पण जर डोकेदुखी सौम्य असेल आणि वारंवार होत असेल, तर काही सोपे घरगुती उपाय करून पाहता येतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणंही महत्त्वाचं आहे.
1. तुमच्या दैनंदिन जीवनावर याचा किती परिणाम झाला?
डॉ. झँड म्हणतात की, आपली डोकेदुखी समजून घेणं खूप उपयुक्त ठरू शकतं, कारण त्यामागे अनेकदा एकच कारण नसतं. त्यामुळे एक डायरी ठेवणं फायदेशीर ठरतं, ज्यामुळे तुम्ही पॅटर्न आणि ट्रिगर्स ओळखू शकाल.
काही लोकांसाठी वाईट हवामान, जसं विजेचा कडकडाट किंवा ती चमकल्याने, डोकेदुखी सुरू होऊ शकते, तर काहींसाठी तीव्र प्रकाश हे कारण असू शकतं.
डॉ. मुनरो म्हणतात, "माझ्यासाठी सर्वात त्रासदायक वेळ म्हणजे जेव्हा आपण शरद ऋतूमध्ये गाडी चालवत असतो आणि सूर्याची किरणे झाडांवरून चमकतात, त्यामुळे माझी डोकेदुखी आणखी वाढते."

फोटो स्रोत, AFP via Getty Images
या गोष्टीची काळजी घ्या-
- डोकेदुखी सुरू होताना तुम्ही काय करत होता?
- तुम्ही काय खाल्लं किंवा काय प्यायलात?
- तुमची झोप कशी झाली?
- हवामान कसं होतं?
- महिलांसाठी: मासिक पाळीची नोंद ठेवा, कारण डोकेदुखी हार्मोनल बदलांमुळेही होऊ शकते.
पण, त्याचा अतिरेक करू नका, असा सल्ला डॉ. मुनरो देतात.
त्या म्हणतात, "मी माझी डायरी खूप तपशीलवार बनवली होती, त्यामुळे ती थोडी कंटाळवाणी आणि निराशाजनक झाली. ती सोपी ठेवा आणि दिवसभर झालेल्या परिणामाला 1 ते 10 मधील क्रमांक द्या."
"फक्त त्रासदायक दिवसच नाही, तर पूर्णपणे सामान्य दिवसाचीही नोंद घ्या. त्यामुळे डॉक्टरांना पॅटर्न ओळखायला मदत होते."
2. कॅफीनचा योग्य वापर करा
तुम्हाला वाटेल की डोकेदुखी सुरू झाल्यावर कॅफीन टाळावं, पण डॉ. मुनरो म्हणतात की खरी गोष्ट थोडीशी वेगळी आहे.
कमी आणि नियंत्रित प्रमाणात कॅफीन पेनकिलर औषधांचा परिणाम वाढवू शकतो. पण तुम्ही रोज खूप कॅफीन घेत असाल तर फायदा होत नाही.
त्या सांगतात, "कॅफीन ही को-एनाल्जेसिक (सह-वेदनाशामक) आहे, म्हणजे ते पेनकिलरचा परिणाम वाढवू शकते." पण दुपारी किंवा रात्री कॅफीन घेणं टाळा, कारण त्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
कॅफीनची एकूण मात्रा (प्रमाण) लक्षात ठेवा. रोज खूप जास्त कॅफीन घेतल्यास 'कॅफीन ओवरयूज (अतिवापर) डोकेदुखी' होऊ शकतो, आणि अचानक बंद केल्यास 'विड्रॉल डोकेदुखी' होऊ शकते.
3. जेवण सोडू नका
तुम्ही कधी आणि काय खाता, त्याचा तुमच्या डोकेदुखीवर परिणाम होऊ शकतो.
डॉ. मुनरो सुचवतात की, अशी आहार पद्धत अवलंबवा ज्यात प्रथिने (प्रोटीन), निरोगी चरबी (हेल्दी फॅट) आणि कॉम्प्लेक्स कर्बोदक (कार्बोहायड्रेट) पुरेसे असतील. यामुळे ऊर्जा पातळी कायम राहते.
तत्काळ ऊर्जा देणारे गोड म्हणजेच साखरयुक्त स्नॅक्स खाणं टाळा आणि जेवण कधीही टाळू नका, कारण हे डोकेदुखीचं एक सामान्य कारण किंवा ट्रिगर बनू शकतं.
त्या म्हणतात की, डेअरी आणि ग्लूटेन सोडल्यामुळे त्यांना आराम मिळाला, पण हे सर्वांना लागू होऊ शकत नाही.
"मला असं आढळून आलं की नियमित जेवण घेणं फायदेशीर ठरतं."

फोटो स्रोत, AFP via Getty Images
जेवणासोबतच डॉ. मुनरो नियमित व्यायाम, चांगली झोप, तणाव नियंत्रण आणि पुरेसे पाणी पिण्याचाही सल्ला देतात.
दिवसभर इतकं पाणी प्या की तुमची लघवी हलक्या रंगाची आणि स्वच्छ राहील आणि तहान लागल्याची जाणीवही होऊ नये.
4. कोडीन असलेले पेनकिलर टाळा
डॉ. मुनरो म्हणतात की, "पेनकिलर (वेदनाशामक) किंवा मळमळ रोखणारी काही औषधं डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही मिळतात आणि डोकेदुखीत आराम देऊ शकतात."
पण त्या इशारा देतात की, "कोडीन असलेली औषधं टाळा, कारण यामुळे वारंवार डोकेदुखी होऊ शकते आणि मळमळीची लक्षणं वाढू शकतात."

त्या म्हणतात, "पेनकिलर औषधं खूप प्रभावी ठरू शकतात, पण हे डोकेदुखी किती तीव्र आहे यावर अवलंबून असते."
जर डोकेदुखी वारंवार जाणवत असेल किंवा तीव्र होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधं घ्या.
आठवड्यात दोन दिवसांपेक्षा जास्त पेनकिलर घेऊ नका, म्हणजे औषधांमुळे होणारी डोकेदुखी (रिबाउंड हेडेक) टाळता येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























