घराभोवती विजेच्या तारा बांधल्या, शॉक लागून महिलेचा मृत्यू; राजकीय वादातून यवतमाळमध्ये काय घडलं?

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

राजकीय वादातून घराभोवती तारा बांधून त्यात वीजेचा प्रवाह सोडण्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती जखमी झाला आहे.

या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी दोघांना अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं हे प्रकरण काय आहे? पोलिसांचं म्हणणं काय आहे? आणि पोलिसांनी ज्यांना अटक केली, त्या आरोपींच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे? जाणून घेऊया या बातमीतून.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील अंजी नाईक गावात ही घटना घडली. या गावाची 1800 लोकसंख्या असून सगळे रहिवाशी बंजारा समाजाचे आहेत. गावात येत्या जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.

घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता मनेष पवार (वय 37 वर्ष) असे मृत महिलेचं नाव आहे.

26 जुलैच्या रात्री सविता यांच्या घराच्या समोरच्या भागापासून तर मागच्या भागापर्यंत वीजेची तार सोडण्यात आली होती. त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडण्यात आला. त्यादिवशी गावात मुसळधार पाऊस देखील सुरू होता.

सविता रात्री अडीच वाजता लघवीसाठी उठल्या आणि घराबाहेर असलेल्या बाथरूममध्ये जाऊ लागल्या. घराच्या दरवाजाबाहेर पाय ठेवताच त्यांच्या उजव्या हाताला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्या काही अंतरावर फेकल्या गेल्या.

पत्नीचा आवाज ऐकून पती मनेष पवार देखील उठले आणि काय घडल्याचं पाहण्यासाठी पुढे गेले, तर त्यांच्या पायाला विजेचा धक्का बसला. पतीनं आरडाओरड केली असता शेजारी जमले. त्यांनी दोघांनाही रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केलं होतं. मनेष पवार यांच्यावर सुद्धा दोन दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याप्रकरणी मनेष पवार यांनी गावातील सहा जणांविरोधात तक्रार दिली होती. त्यांच्यासोबत आधीपासूनच राजकीय वाद व्हायचा. राजकीय वादातून त्यांनी आम्हाला ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

त्यावरून पोलिसांनी गावातील सहा जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर इंदल राठोड आणि राजू जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे.

राजकीय द्वेषापोटी आमच्यावर आरोप करून आम्हाला फसवलं असल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं. पण याआधीही राजकीय वादातून भांडण केल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

सविता पवार यांचा चुलत दीर गावचा सरपंच आहे. त्यांच्या कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच पद आहे.

येत्या जानेवारी महिन्यात गावात ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने बरेच वर्षापासून वाद सुरू असल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे.

ही घटना राजकीय द्वेषातून घडली हे पोलिसांनाही मान्य आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पण, ही घटना नेमकी कोणी घडवून आणली? हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण, गावात कोणीही कोणाविरोधात बोलायला तयार नाहीत.

गावात सीसीटीव्ही पण नाही. आता कोणी विजेचे तार जोडले हे कोणालाच माहिती नाही. या गावात राजकारणावरून वाद होत असतात. पण तक्रारीनुसार आम्ही सध्या तपास करत आहोत. नक्की कोणी मारल्याचा प्रयत्न केला हे पूर्ण तपासाअंती पुढे येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांनी दिली.

सध्या इंदल राठोड आणि राजू जाधव हे दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून याप्रकरणात पुढचा तपास घाटंजी पोलिस करत आहेत.

आरोपीच्या नातेवाईकांचं म्हणणं काय आहे?

या घटनेत पोलिसांनी अटक केलेला आरोपी इंदल राठोडचा मुलगा गणेश इंदल राठोडसोबत आम्ही संपर्क साधला. तो म्हणाला, "आम्ही दिवसभर शेतात फरवारणी करत होतो. सायंकाळी लवकर घरी आलो आणि 9 वाजता आम्ही झोपलो होतो. आमचे वडील सुद्धा घरातच झोपले होते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्हीच त्यांना झोपेतून उठवलं. आम्ही देखील काय झालं म्हणून बघायला गेलो होतो."

"राजकारणातून आधी भांडण झालं होतं. त्यामुळे त्यांनी माझ्या वडिलांविरोधात आरोप करून त्यांना फसवलं. ज्यादिवशी गावात मयत होती त्याच दिवशी माझ्या वडिलांना त्यांनी पकडून नेलं", असा आरोप गणेश यांनी केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)